‘दृष्टी’पल्याडचा दृष्टिकोन!

‘दृष्टी’पल्याडचा दृष्टिकोन!
Published on
Updated on

'श्रीकांत' हा सिनेमा म्हणजे एका अतुलनीय जिद्दीची गोष्ट आहे. अशक्य ते शक्य करण्याच्या सामर्थ्याची गोष्ट आहे. जन्मानं अंध असलेल्या माणसानं, आपल्यासारख्या दिव्यांगांना सन्मानाचा रोजगार मिळावा यासाठी उभारलेल्या कोट्यवधींच्या कंपनीची गोष्ट आहे. आपल्या सर्वसामान्य डोळ्यांनी न मिळणारा, 'द़ृष्टी'पलीकडला द़ृष्टिकोन देणारी गोष्ट आहे.

आंध्र प्रदेशातल्या सीतापुरम् गावातल्या सर्वसामान्य घरात 7 जुलै 1992 रोजी एक बाळ जन्माला आलं. हे बाळ अंध होतं. त्याबद्दल आजूबाजूच्या घरात चर्चा सुरू झाली. नातेवाईक घरी भेटायला आले. त्यांनीही आई-वडिलांना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातल्या काही तर अघोरी होत्या. हे बाळ भविष्यात तुम्हाला खूप त्रास देईल. उद्या हा मुलगा वॉचमन म्हणूनही काम करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याला अनाथाश्रमात ठेवा, असेही सल्ले दिले गेले.

दामोदर आणि वेंकटम्मा असं या दाम्पत्याचं नाव. त्यांनी मात्र लोकांनी सांगितलेलं सगळं ऐकून घेतलं. पण त्यांचा आतला आवाज त्यांना सांगत होता की, आपल्यापोटी हे बाळ जन्माला आलंय, तर त्याला मोठे करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांनी या मुलाचं नाव ठेवलं श्रीकांत. श्रीकांतला जन्मापासूनच अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण त्याच्या आई-वडिलांनी जिद्द सोडली नाही.

श्रीकांत मोठा होत होता. त्याला शाळेत जायचं होतं. मोठ्या भावासोबत त्याला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. पण शाळेत काय शिकवतात, हे श्रीकांतलाही कळत नव्हतं आणि त्याला कसं शिकवायचं ते शिक्षकांनाही कळत नव्हतं. त्यामुळे श्रीकांत कायम मागच्या बाकावर बसून राहू लागला. त्याच्याशी कोणीच बोलत नव्हतं, खेळत नव्हतं. एकटेपणा त्याला निराशेच्या गर्तेत नेऊ लागला. श्रीकांत सांगतात की, ते एकटेपण मला आजही आठवतं आणि डोळ्यातून अश्रू येतात.

श्रीकांत नऊ वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांना एका संस्थेची माहिती मिळाली. ही संस्था गरीब दिव्यांग मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये शिकवत असे. इथे श्रीकांत यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इथं त्यांना नवे मित्र मिळाले. तिथे ते पोहायला, बुद्धिबळ खेळायला आणि आवाज करणार्‍या बॉलचा वापर करून क्रिकेट खेळायला शिकले. आनंद, धम्माल काय असते हे ते पहिल्यांदाच अनुभवत होते. याचा परिणाम अभ्यासावरही झाला. त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळू लागले.

दहावीपर्यंतचं शिक्षण याच शाळेत झालं. त्यांना दहावीला उत्तम मार्क मिळाले. आता श्रीकांत यांना इंजिनिअर होण्याचं स्वप्न पडत होतं. त्यासाठी त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश हवा होता. पण इथे आंध्र प्रदेश स्टेट बोर्डाचा नियम आडवा आला. या नियमानुसार तिथे अंध मुलांना विज्ञान शाखेत प्रवेश दिला जात नव्हता. विज्ञानात आकृत्या आणि प्रयोग अशा दृश्य गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे अंध मुलांना प्रवेश नाही, असं बोर्डाचं म्हणणं होतं. त्यांच्या एका शिक्षकाने त्यांना स्टेट बोर्डाच्या या कायद्याविरुद्ध कोर्टात जायला सांगितलं. त्यासाठी वकील आणि मदतही मिळवून दिली. अखेर आंध्र प्रदेशमधील कोर्टात केस उभी राहिली. कोर्टात श्रीकांत यांनी दिलेली साक्ष ही फक्त त्यांनी स्वतःसाठी मांडलेली भूमिका नव्हती. तर देशातील प्रत्येक अंध व्यक्तीसाठी केलेला तो युक्तिवाद होता. सहा महिने हा खटला चालला आणि अखेर श्रीकात जिंकले. कोर्टाने 11 वी आणि 12 वीची विज्ञान शाखा अंध मुलांसाठी खुली केली.

या निकालानं श्रीकांत यांच्या इंजिनिअर होण्याच्या प्रवासातील मोठी अडचण दूर झाली. श्रीकांत यांना प्रचंड आनंद झाला होता. पण ते सांगतात की, मला सर्वात आनंद कसला झाला तर यापुढे आणखी कोणत्याही माझ्यासारख्या अंध मुलाला आता कोर्टात जावं लागणार नाही याचा. ते सांगतात की, मला तेव्हा आयुष्याचं गूज कळलं. स्वतःसाठी सगळेच संघर्ष करतात. दुसर्‍यांसाठी मार्ग मोकळा करून देण्यात अधिक आनंद आहे. नेतृत्व त्यालाच म्हणतात, जेव्हा आपण आपल्यासारख्या संघर्ष करणार्‍यांना नवी व्यवस्था उभी करतो, तेव्हाच खरं कौशल्य पणाला लागतं.

या निकालानं त्यांना प्रचंड आत्मविश्वास दिला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 'लीड इंडिया 2020'ची स्थापना केली होती. श्रीकांत हे या 'लीड इंडिया 2020 : द सेकंड नॅशनल यूथ मूव्हमेंट'चे सदस्य बनले. या मोहिमेतच त्यांना कलाम यांना भेटायची संधी मिळाली. तेव्हा कलाम यांनी सर्वांना विचारलं, तुम्हाला काय बनायला आवडेल. सर्वांनी आपापलं उत्तर दिलं. श्रीकांत यांचं उत्तर ऐकून कलामही स्तब्ध झाले. श्रीकांत म्हणाले होते की, मला या देशाचा पहिला अंध राष्ट्रपती व्हायचंय!

ज्या विज्ञान शाखेनं श्रीकांत यांना अंध म्हणून प्रवेश नाकारला होता, त्याच विज्ञानाचा अभ्यास अनेक अडथळे पार करत श्रीकांत यांनी केला आणि बारावीला 98 टक्के मिळवले. आता त्यांना आयआयटीला प्रवेश हवा होता. पण आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणार्‍या एकाही कोचिंग क्लासने त्यांना प्रवेश द्यायला नकार दिला. एवढंच नाही तर चक्क आयआयटीनंही त्यांना प्रवेश नाकारला. पण श्रीकांत यांनी ठरवलं की, आयआयटीनं नाकारलं, तर मी आयआयटीपेक्षा प्रतिष्ठित ठिकाणी प्रवेश घेऊन दाखवेन. त्यांनी एमआयटी, बर्कली आणि केंब्रिज विद्यापीठात अर्ज केला. त्यांचे गुण पाहून या तिन्ही विद्यापीठांनी त्यांना प्रवेश दिला. या तिघांपैकी त्यांनी एमआयटीची निवड केली. या प्रवेशामुळे ते एमआयटीचे पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी बनले.

एमआयटीचा काळ सर्वात कठीण अभ्यासाचा. पण सर्वाधिक सहकार्याचा होता, असं श्रीकांत यांचं म्हणणं होतं. एमआयटीची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनेक मोठमोठ्या पगाराच्या ऑफर्स आल्या. पण त्यांनी त्या नाकारल्या. कारण त्यांच्या मनात एक अपूर्णता होती. आपल्यासारख्या दिव्यांगांसाठी काही तरी करायचं, ही जाणीव त्यांना आतमधून अस्वस्थ करत होती.

ते भारतात आले. सुरुवातीला त्यांना शिक्षक व्हायचे होते. पण शिक्षणापेक्षाही दिव्यांगांना सन्मानाची गरज आहे आणि तो सन्मान रोजगारातून मिळणार आहे, हे त्यांना पुरतं पटलं होतं. त्यांना रोजगार मिळू शकत असेल तर त्यासठी शिक्षणाच्या नव्या वाटा शोधल्या जातील, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे दिव्यांगांसाठी काहीतरी वेगळं करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या डोक्यात भिरभिरत होती.

त्यातून जन्म झाला बोलान्ट इंडस्ट्रीज या कंपनीचा. ही अशी कंपनी होती, ज्यांत दिव्यांगांना नोकरी मिळेल असं व्यवस्थापन उभारलं जाईल. या कंपनीचे सुरुवातीचे दिवसही निराशेचे होते. लोकांनी असं करणं किती अवघड आहे याचे अनेक पाढे वाचले. पण श्रीकांत यांनी मनाशी द़ृढ निश्चय केला होता. त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

2012 मध्ये श्रीकांत भारतात परत आले आणि हैदराबाद येथे बोलान्ट इंडस्ट्रीज ही कंपनी सुरू केली. इको फ्रेंडली पॅकेजिंगचं काम ही कंपनी करत होती. दिव्यांगांना घेऊन ही कंपनी चालवणं अत्यंत जिकिरीचं होतं. त्यामुळे दररोज नवनव्या अडचणी येत होत्या. अनेकदा हे अशक्य आहे, असंही वाटत होतं. पण त्यांनी सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न काही सोडला नाही.

त्यांच्या या प्रयत्नांना साथ मिळाली ती रतन टाटा यांची. त्यांनी त्यांच्या या कंपनीत गुंतवणूक केली. पर्यावरण आणि दिव्यांगांना रोजगार अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य करणार्‍या या कंपनीत आज शेकडो माणसं काम करताहेत. त्यात दिव्यांगांची संख्या मोठी आहे. 'फोर्ब्ज'च्या यादीत श्रीकांत बोल्ला यांना स्थान मिळालं असून 'ब्लाईंड बिलिओनियर' अशी त्यांची ओळख बनली आहे.

बोल्ला यांनी 2011 मध्ये 'समन्वाई सेंटर फॉर चिल्ड्रेन विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज'ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातूनही दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक, पुनर्वसन करण्यात येते. श्रीकांत हे सप्टेंबर 2016 मध्ये स्थापन झालेल्या 'सर्ज इम्पॅक्ट फाऊंडेशन'चे संचालक देखील आहेत. आपल्यासारख्या दिव्यांगांना या देशात कोणत्याही अडचणी येऊ नये, हे त्यांचं ध्येय आहे.

त्यांच्या या भन्नाट यशोगाथेवर 'श्रीकांत' हा सिनेमा बेतला आहे. राजकुमार राव याने श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारलीय. या सिनेमात एक दृश्य आहे, श्रीकांत बोल्ला गाडीत ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसले आहेत. गाडी सिग्नलला थांबते. एक अंध भिकारी गाडीच्या काचांवर टकटक करतो. ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या मित्राच्या मनात कालवाकालव होते. श्रीकांत म्हणतात, उसे पैसे दे रहे हो, उसके बदले मुझे दो, उसे हम रोजगार देंगे. उसे उसकी ज्यादा जरुरत है!

ही दृष्टी नाही, तर हा 'दृष्टी'पलीकडला द़ृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन सगळ्यांना मिळावा यासाठीच हा सिनेमा निर्माण केला गेलाय. या सिनेमाची टॅगलाईनही भारीय. ती सांगते की… श्रीकांत, आ रहा है सब की आँखे खोलने!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news