क्रीडा : ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा क्रिकेटवर ‘इम्पॅक्ट’

क्रीडा : ‘इम्पॅक्ट प्लेअर’चा क्रिकेटवर ‘इम्पॅक्ट’

[author title="निमिष पाटगावकर" image="http://"][/author]

इम्पॅक्ट प्लेअरमुळे आयपीएलचे सामने जास्त रंगतदार झाले. दोनशे धावांचा टप्पा हा विजयाला पुरेनासा झाला. सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगायला लागले आणि ट्वेंटी-ट्वेन्टी क्रिकेटचे गणित बदलले. मात्र इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू झाला तर अष्टपैलू खेळाडू तयार करायच्या प्रक्रियेवर परिणाम होईल हे नक्की.

कुठल्याही खेळाला एक नियमांची चौकट असते आणि या नियमांच्या चौकटीवरच त्या खेळाची विविध अंगे तयार होत असतात. जेव्हा हे नियम बदलतात तेव्हा ते खेळासाठी चांगले का वाईट याची उलटसुलट चर्चा नेहमीच होते. कालांतराने हे नियम अंगवळणी पडल्यावर खेळाचा तो एक भाग बनून जातात आणि त्याची सवय होते. आयपीएल मध्ये सध्या चर्चेत असलेला इम्पॅक्ट प्लेअर हा असाच एक नियम आहे. हा नियम आयपीएलमध्ये प्रायोगिक तत्त्वावरच राबवला जात आहे. पण यामुळे जी विविध मते ऐकायला येत आहेत, ती बघता फ्रँचायझी क्रिकेटच्या या नियमाने भारतीय क्रिकेटपटूंच्या जडणघडणीत मूलभूत फरक पडेल की काय, अशा शंका उपस्थित व्हायला लागल्या आहेत. माणूस हा सहसा चाकोरीबाह्य गोष्टींना लवकर आपलेसे करत नाही हे जरी सत्य असले तरी हा बदल निव्वळ खेळातला थरार वाढवायला असेल तर त्याच्या दोन्ही बाजूंचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.

जेव्हा पारंपरिक पांढर्‍या कपड्यातले क्रिकेट रंगीत झाले तेव्हा प्रथम त्याची पायजमा क्रिकेट अशी अवहेलना अनेक वर्षे झाली. एकदिवसीय क्रिकेटला मान्यता मिळाली तेव्हा तो आक्रमक क्रिकेटचा परमोच्च बिंदू वाटायला लागला. ट्वेंटी-ट्वेन्टी क्रिकेटचा उदय झाला तेव्हा पुन्हा एकदा क्रिकेटचा खेळखंडोबा म्हणून अनेकांनी नाके मुरडली. आता ट्वेंटी-ट्वेन्टी क्रिकेट हवेहवेसे झाल्यावर पुढच्या दहा षटकांच्या किंवा इंग्लंडमधल्या हंड्रेड पद्धतीच्या क्रिकेटला आयसीसी स्पर्धेमार्फत राजमान्यता मिळायची आपण वाट पाहात आहोत. हे सर्व क्रिकेटचे बदलते रूप लोकप्रिय व्हायला काही काळ जावा लागला. यात जे मर्यादित क्रिकेट आहे ते अजून स्पर्धात्मक बनवायला नियमांत फेरबदल केले. नो बॉलवर फ्री हिट, पॉवर प्लेचे नियम, षटकांची गती राखायचे नियम हे सर्व आपण हळूहळू आत्मसात करत गेलो. यात या नव्या इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाची भर पडली. वास्तविक हा नियम नवा नाही. मला आठवतंय, साधारण 2001 च्या सुमारास सामन्यादरम्यान बदली खेळाडूचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये केला होता. पण तो फारसा न चालल्याने पुढे रद्द करण्यात आला.

क्रिकेटचा संघ, मग तो कुठल्याही फॉरमॅटमध्ये असो, एका ठरावीक पद्धतीने बांधला असतो. पाच फलंदाज, एक यष्टीरक्षक, चार गोलंदाज आणि यांच्या जोडीला संघात हवाच तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू. कपिलदेव, बॉथम, हॅडली आणि इम्रानखान हे क्रिकेटमधले सार्वकालीन उत्तम अष्टपैलू होते आणि क्रिकेटच्या आजवरच्या वाटचालीत कॅलिस ते जडेजा सारखे अनेक उत्तम अष्टपैलू बघायला मिळाले. आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअर या संकल्पनेने प्रथम घाव कशावर घातला असेल तर संघातील अष्टपैलू खेळाडूंच्या स्थानावर. या संकल्पनेने बर्‍यापैकी फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार्‍या अष्टपैलू खेळाडूच्या जागी उत्तम फलंदाजी आणि उत्तम गोलंदाजी करणार्‍या दोन खेळाडूंना संधी दिली. अकराच्या ऐवजी बारा खेळाडूंचा हा खेळ झाला. जे फक्त फलंदाज आहेत, त्यांचे काम फलंदाजीनंतर उरत नाही आणि जे निव्वळ गोलंदाज आहेत त्यांचे काम गोलंदाजीपुरतेच मर्यादित असते तेव्हा त्यांच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेतला तर बिघडले कुठे? इम्पॅक्ट प्लेअर संकल्पनेला काही माजी खेळाडूंचा विरोध का? याचे प्रमुख कारण म्हणजे या नियमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागणारे अष्टपैलू खेळाडू तयार होण्यात अडसर ठरण्याची भीती.

ही भीती रास्त आहे. अष्टपैलू खेळाडू हे क्रिकेटचे दैवत असतात. एकहाती सामना फिरवायची ताकद त्यांच्या गोलंदाजीत किंवा फलंदाजीत असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तर संघात जितके अष्टपैलू खेळाडू तितके उत्तम हे समीकरण आदर्श मानतात. जो खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो, त्याचा सर्वांगीण विकास व्हायला त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतील कामगिरी पूरक असावी लागते. या दोन्ही कामगिरी जेव्हा एकाच खेळाडूकडून उंचावतात तेव्हा संघाला फायदा होतो. संघातील विविधता आणि पर्याय जपायला खरं तर शक्य तितक्या खेळाडूत हे अष्टपैलुत्व असणे गरजेचे असते. हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूचा विचार केला तर 2015 च्या आयपीएलमध्ये पदार्पणात एक गोलंदाज म्हणून तो निष्प्रभ होता. पण पुढच्या चार आयपीएलमध्ये तो एक अष्टपैलू म्हणून उदयास आला. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोपर्यंत हा इम्पॅक्ट प्लेअरचा नियम येत नाही, तोपर्यंत अष्टपैलू खेळाडू घडवणे ही गरज आहे. इम्पॅक्ट प्लेअरमुळे आयपीएलचे सामने जास्त रंगतदार झाले. दोनशे धावांचा टप्पा हा विजयाला पुरेनासा झाला, सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगायला लागले आणि ट्वेंटी-ट्वेन्टी क्रिकेटचे गणित बदलले.

क्रिकेटचा प्रत्येक प्रकार हा दर काही वर्षांनी कात टाकत असतो. कसोटी क्रिकेट हे एकेकाळी रटाळ होऊन गेले होते. पण आता कसोटी सामने वेगवान झाले आणि क्वचितच कसोटी सामना रटाळ होत अनिर्णीत होतो. एक दिवसीय क्रिकेटमध्ये एकेकाळी पंधरा षटकांत 1 बाद 50 ही मोठी धावसंख्या उभारायला आदर्श सुरुवात मनाली जायची. कारण 250 ही तेव्हा मोठी धावसंख्या होती. श्रीलंकेच्या जयसूर्या-कालूविथरणा जोडीने सलामीची पारंपरिक पद्धत मोडीत काढली आणि आता तीनशे धावाही पन्नास षटकांत कमी वाटतात. ट्वेंटी-ट्वेन्टी क्रिकेटचेही असेच झाले. एकेकाळी 160-180 धावा जिंकायला पुरेशा होत्या. आता दोनशे धावा करूनही विजयाची खात्री देता येत नाही. इम्पॅक्ट प्लेअरने अजूनच धावांची फोडणी वाढवली. पण या उत्कंठावर्धक सामन्यात काय निव्वळ हाय स्कोअरिंग धमाका बघायला मिळाला. पण याचबरोबर अनेक प्रश्नही उपस्थित झाले.

पहिला प्रश्न म्हणजे क्रिकेटपटूला आपल्या मुख्य भूमिकेपासून दुसर्‍या क्षेत्रात जायला यामुळे उत्सुकता राहणार नाही. जे उत्तम फलंदाज संघाला वेळप्रसंगी गोलंदाजीचा आधार असतात, एखादी भागीदारी तोडण्यासाठी त्यांच्यासारख्या गोलंदाजांचा प्रयोग केला जातो तो या इम्पॅक्ट प्लेअरमुळे थांबेल. प्रमुख फलंदाजाला धावा काढणे हेच एकमेव काम असल्याने त्याची फलंदाजी झाल्यावर तो मैदानातून बाहेर जाऊन एखाद्या पूर्णवेळ गोलंदाजाला मैदानात उतरवले जाईल. त्याचप्रमाणे एखादा गोलंदाज आपली षटके टाकून झाल्यावर त्याच्यापुरता हा सामना संपला असेल. यामुळे खेळाडूचे दुय्यम स्किल विकसित करण्याची प्रक्रियाच थांबेल. भारतीय क्रिकेटच्या वाटचालीसाठी हे घातक ठरू शकते. हार्दिक पंड्याचा ट्वेंटी-ट्वेन्टी विश्वचषकासाठीच्या संघात नुसता समावेशच झाला नाही तर त्याला उपकर्णधार केले तेव्हा अनेक शंका उपस्थित केल्या. ज्याच्या फिटनेसविषयी खात्री नाही, एक खेळाडू म्हणून फॉर्म नाही आणि एक कर्णधार म्हणून तो निष्प्रभ ठरला असताना त्याच्या निवडीचे समर्थन 'आम्हाला पंड्याला योग्य दुसरा पर्याय आढळला नाही', असे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिले. आपल्या देशात अशी परिस्थिती असेल तर या इम्पॅक्ट प्लेअर प्रकारामुळे आधीच योग्य अष्टपैलू नसताना अष्टपैलू तयार करण्याची प्रकियाच बंद करणे चुकीचे ठरते.

आयपीएल हे फ्रँचायझी क्रिकेट असले तरी ते बीसीसीआयच्या अखत्यारीत येते. आयपीएलच्या संरचनेचा एक मूळ हेतू हा भारतीय क्रिकेटला पूरक ठरण्याचा आहे. फ्रँचायझी क्रिकेट हे रंगतदार असणे जरुरीचे असले तरी भारतीय क्रिकेटला मारक ते असू शकत नाही. बीसीसीआयच्या शिखर समितीने यावर्षी देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठीही हा इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आणला. याचे स्वरूप आयपीएलपेक्षा थोडे वेगळे होते. मुश्ताक अली स्पर्धेत नाणेफेकीच्या आधी संघ आणि चार बदली खेळाडू जाहीर करणे बंधनकारक होते तर आयपीएलमध्ये नाणेफेकीनंतर संघ जाहीर केला जातो. या इम्पॅक्ट प्लेअरची सकारात्मक बाजू बघितली तर नाणेफेकीचा कौल जिंकणार्‍या संघाला खेळपट्टीचा फायदा मिळणार असेल तर दुसर्‍या संघाला आपली बाजू बळकट करायला संघ बदलीचा एक पर्याय सामन्याचा रागरंग पाहून ठरवता येतो. पण हेही तितकेसे खरे नाही. कारण नाणेफेक जिंकणारा संघही आपला इम्पॅक्ट प्लेअर बदलतो. 2022 साली मुश्ताक अली स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेअरचा पर्याय घ्यायचा असेल तर तो चौदाव्या षटकाच्या आत घेणे बंधनकारक होते. पण यंदा तो नियम बदलून आयपीएलसारखा केला.

कुठल्याही नव्या नियमाचे फायदे-तोटे पडताळून बघायचे असतील तर काही काळ जावा लागतो. बीसीसीआयचे कार्यवाह जय शहा यांनी इम्पॅक्ट प्लेअरबाबत हा नियम अजून तरी कायम केला नसल्याचे भाष्य केले आहे. खेळाडू, तज्ज्ञ इत्यादींचे मत विचारात जाऊन या नियमाबाबत निर्णय घेण्यात येईल. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, अश्विन, सौरव गांगुली यांनी या नियमाचे स्वागत केले आहे तर आपली मते रोखठोक मांडणार्‍या रोहित शर्माने या नियमामुळे अष्टपैलूच्या संघातील भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आजच्या घडीला या नियमाचे फायदे-तोटे यावर क्रिकेट तज्ज्ञांची मते भिन्न आहेत. या इम्पॅक्ट प्लेअरमुळे आयपीएलवर तर चांगलाच इम्पॅक्ट झाला आहे. मात्र हाच नियम जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू झाला तर अष्टपैलू खेळाडू तयार करायच्या प्रक्रियेवर इम्पॅक्ट पडेल हेही नक्कीच दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news