

येत्या आठ वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत मानव अमरत्व प्राप्त करेल, असा दावा रे कुर्जविल या शास्त्रज्ञाने केला आहे. कुर्जविल यांनी वर्तवलेली अनेक भविष्ये खरी झाल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जगभरात सध्या चर्चा आहे. वाढत्या वयावर अंकुश ठेवणारा बाजार 15 लाख कोटींपर्यंत गेला असून, तो 35 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे; पण मानवाला खरोखरीच अमरत्व मिळेल काय?
मानव लवकरच म्हणजे येत्या आठ वर्षांत अमरत्व प्राप्त करेल, असा दावा रे कुर्जविल या शास्त्रज्ञांनी नुकताच केला आहे. मानव आता अमरत्वाचे रहस्य उलगडण्याच्या अगदी समीप येऊन पोहोचला असून, आगामी 10 वर्षांच्या आत एक मोठा चमत्कार होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. वयाचा एखादा टप्पा ओलांडल्यानंतर मृत्यू अटळ आहे.
अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही. मात्र, मरणाचे भय प्रत्येकालाच आतून-बाहेरून अस्वस्थ करणारे असते. त्यामुळेच अटळ असणारा मृत्यू लांबवता कसा येईल, यासाठी अनेक सायास केले जातात. त्यातून दीर्घायुष्य लाभू शकते; पण मरणावर विजय मिळवणे अद्याप तरी शक्य झालेले नाही. असे असले तरी अनादी काळापासून यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. पौराणिक कथांमधून खल प्रवृत्तीच्या अनेक व्यक्तिमत्त्वांना अमरत्वाची संजीवनी प्राप्त करून जगावर अधिराज्य गाजवण्याची अभिलाषा असल्याचे आपण वाचले-पाहिलेले आहे. परंतु, आजकाल विज्ञान आणि आरोग्याच्या क्षेत्रात सातत्याने होणारे क्रांतिकारी संशोधन आणि शोधही याच द़ृष्टिकोनातून होत आहेत. त्यांना काही प्रमाणात यशदेखील मिळाले आहे. गेल्या 50 ते 100 वर्षांत माणसाचे सरासरी आयुष्य वाढले आहे. 'रिव्हर्स एजिंग'च्या दाव्यानुसार आणि अंदाजानुसार ही पातळी प्रायोगिकच आहे.
कोणत्याही एखाद्या जीवाचा जन्म होणे, किशोरावस्था, तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्था गाठल्यानंतर मृत्यू होणे हा निसर्गक्रम आहे. तो स्वाभाविक आहे आणि हे शाश्वत सत्य आहे; पण कोणत्याही जीवासाठी जन्म आणि मृत्यू हा केवळ अस्तित्वाचा विषय नाही. शास्त्र आणि उपचाराच्या द़ृष्टीने एका व्यापक अर्थाने मृत्यू टाळण्यासाठी चिंतन आणि संशोधन करण्यात आले. म्हणजे मृत्यू होणार हे खरे असले, तरी काही काळासाठी त्याला थांबवता येणार नाही का? असा विचार केला गेला. एखाद्याला अमरत्व दिले नसेल, तर त्याला दीर्घायू करता येणार नाही का? आपण शरीराला एखाद्या मशिनप्रमाणे गृहीत धरले आणि प्रत्येक अवयवाला सुटे भाग म्हटले, तर यंत्राच्या नियमानुसार अधिक वापराने एखादा सुटा भाग खराब झाला तो बदलता येऊ शकतो किंवा दुरुस्त करता येतो; म्हणजेच एखादी बंद पडलेली मशिन पुन्हा सुरू करण्यासाठी दुरुस्ती केली जाते, तशाच पद्धतीने आपण मानवी शरीरातील खराब भाग बदलू शकत नाही का? अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी संशोधन सुरू झाले.
वास्तविक, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इस्रायलचे लेखक युवल नोव्हा हरारी यांच्या 'होमो डेयस : येणार्या भविष्याचा संक्षिप्त इतिहास' या पुस्तकामध्ये मिळू शकते. यात हरारी म्हणतात की, शास्त्रज्ञांच्या नजरेतून मृत्यू हा शरीराच्या यंत्रणेत होणारा तांत्रिक बिघाड आहे. या बिघाडामुळे शरीराची यंत्रणा काम करण्याचे थांबवते. आता प्रश्न असा की, ज्याप्रमाणे यंत्राचे सुटे भाग दुरुस्त करता येतात, त्याप्रमाणे शरीरातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करता येऊ शकत नाहीत का? त्याच धर्तीवर आजघडीला 'फेसबुक'चे मार्क झुकेरबर्ग आणि 'अॅमेझॉन'चे जेफ बेजोस आणि 'गुगलौचे लॅरी पेज हे अमरत्व मिळवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहेत आणि कदाचित हे त्यांचे प्रयत्न काही फळाला येऊ शकतात, अशीही चर्चा होताना दिसते.
अर्थात, अशा शक्यतेवर अनेक काळापासून शास्त्रज्ञांकडून प्रयत्न केले गेले आहेत आणि त्यांना आता नवीन बळ मिळाले आहे. अमरत्व मिळवणे किंवा वय वाढविण्यासाठी अनेक प्रयोग करणारे 45 वर्षीय अमेरिकी सॉफ्टवेअर उद्योजक ब्रायन जॉन्सन यांनी अलीकडेच आपल्या एका वक्तव्यावरून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानुसार, आपल्या प्रयोगातून त्यांनी आपले बायोलॉजिकल (जैविक) वय सात महिन्यांपेक्षा कमी करून घेतले. या प्रयोगाला त्यांनी 'रिव्हर्स एजिंग' असे नाव दिले. जॉन्सन यांच्या दाव्यानुसार, सात महिन्यांपर्यंत संशोधन केल्यानंतर त्यांचे हृदय 37 वर्षे, त्वचेचे वय 38 वर्षे आणि फुफ्फुसाचे वय 18 वर्षांच्या तरुणाप्रमाणे झाले आहे.
ब्ल्यू प्रिंट नावाच्या प्रोजेक्टअंतर्गत ब्रायन जॉन्सन हे दरवर्षी 16 कोटी रुपये (20 लाख डॉलर) खर्च करत आहेत. यासाठी 30 डॉक्टर आणि आरोग्य पथक त्यांनी आपल्यासोबत ठेवले आहे. ही टीम जॉन्सन यांच्या प्रत्येक पैलूची बारकाईने तपासणी करते. त्यांचे खानपान, झोप, जागे होणे, व्यायाम आदींवर लक्ष ठेवते. कोणत्याही गोष्टीमध्ये वाढ करणे किंवा कमी करणे तसेच दिनक्रम ठरवणे, आहार निश्चित करणे या गोष्टी ठरवल्या जातात. प्रत्यक्षात सर्व प्रयत्न हे तारुण्य टिकवणे अणि मृत्यू पुढे ढकलण्यासाठी सुरू आहेत. या सर्व शास्त्रज्ञांसह जगातील अनेक मंडळी यावर काम करत आहेत. त्यातूनच अमरत्वासाठीच्या प्रयत्नांना आता एका उद्योगाचे-बाजारपेठेचे स्वरूप मिळाले.
'रिव्हर्स एजिंग' उद्योगाच्या बाजाराबाबत पी अँड एस इंटेलिजिन्स नावाची संस्था अहवालात म्हणते की, वाढत्या वयावर अंकुश बसविणारा बाजार हा 15 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. हा बाजार 2030 पर्यंत 35 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या ज्या वेगाने श्रीमंतांची संख्या वाढत आहे, ते पाहता बाजार वाढण्याबाबत कोणीही शंका घेण्याचे कारण नाही. तरुण राहणे आणि मृत्यूला अंगठा दाखविण्यासाठी काय काय केले जात आहे आणि का केले जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. यासंदर्भात काही रंजक उदाहरणे आहेत.
अमेरिकेचे भविष्यकार रे कुर्जविल दररोज दोन डझनभर गोळ्या खातात. त्यांना कोणताही आजार नाही. परंतु, ते दीर्घ भविष्याचे स्वप्न पाहतात आणि ते साकार करण्यासाठी एखाद्या औषधाप्रमाणेच गोळ्या घेत आहेत. त्यांच्या मते, विज्ञानाच्या मदतीने वाढत्या वयावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. प्रत्यक्षात त्यांचे प्रयत्न हे स्वत:ला अमरत्व मिळवून देण्यासाठीचे आहेत. अमरत्व मिळालेे नाही तरी कुर्जविल ते 120 ते 140 वर्षांपर्यंत जगण्याची मनीषा बाळगून आहेत. यात ते यशस्वी ठरले तर किमान 125 ते 150 वर्षांपर्यंत जिवंत राहण्याची शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते आणि ते काम फार अवघड नाही.
विज्ञान युग हे ज्याप्रमाणे अमरत्वाचे स्वप्न उराशी बाळगून आहे, ते पाहता माणसाचे आयुर्मान लवकरच आणखी 15 ते 20 वर्षे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शतायुषी झाल्यानंतरही माणूस तितक्याच उत्साहाने आाणि सक्रियतेने जीवन जगू शकेल. यासाठी आणखी काही प्रयोग सुरू आहेत. न्यूयॉर्कच्या सेंटर फॉर एपिजेनेटिक्स रिसर्च प्रोग्रामनुसार, 2022 मध्ये शास्त्रज्ञांच्या टीमने असा एक शोध लावला आहे की, त्यामुळे मानवी त्वचेचे वय 30 वर्षांपर्यंत मागे नेता येऊ शकते. म्हणजेच एखाद्याचे वय 80 वर्षे असेल, तर त्याची त्वचा नितळ करता येऊ शकते आणि तो कमाल 50 वर्षांचा दिसू शकतो. हा प्रयोग शरीरातील अन्य अवयवांवरदेखील करता येऊ शकतो. अर्थात, 2017 मध्ये याबाबत 'प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्स जर्नल'ने केलेल्या एका संशोधनांती इशारा देण्यात आला आहे.
त्यात म्हटले की, मल्टी सेल्युलर म्हणजेच बहुकोशीय पेशींच्या वाढत्या वयाला जबरदस्तीने रोखण्याचा प्रयत्न केला, तरी अशा जीवांचा मृत्यू हा कर्करोगासारख्या भयंकर आजारपणामुळे होऊ शकतो. अशावेळी त्वचा किंवा एखाद्या अवयवाचे वय कमी केल्याचा कोणताही फायदा होणार नाही; कारण मृत्यू अटळ आहे. तरीही आरोग्य विज्ञानाने विकासाच्या बळावर हा करिश्मा करून दाखविला आहे आणि त्यामुळे मानवाचे सरासरी वय हे पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढले आहे. संपूर्ण जगात ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. याचाच अर्थ मृत्यूला काही काळ लांबणीवर टाकणे कठीण राहिलेले नाही. 2030 पर्यंत जगातील बहुतेक भागांमध्ये विज्ञान असा चमत्कार करण्यात यशस्वी होऊ शकते की, संपूर्ण जगात मानवाचे सरासरी वय 100 वर्षांपर्यंत असेल. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. आब्रे डी ग्रे यांनीही याबाबत आशा निर्माण केली आहे. अँटी-एजिंग औषधांच्या संशोधनावर काम करणार्या डॉ. ग्रे यांच्या मते, पेशींचा र्हास थांबवून आणि शरीरातील रेणूंच्या हालचाली पूर्ववत करून वृद्धत्व काही प्रमाणात थांबवता येते. विज्ञान आता हे करण्याच्या जवळ असल्याने शंभर वर्षे जगणे ही एक सामान्य गोष्ट बनवणे शक्य आहे.
मृत्यू म्हणजे काय?
पौराणिक कथांचा विचार करता नचिकेताने यमाला 'मृत्यू म्हणजे काय?' असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी यमराजांनी उत्तर दिले की, प्रत्येकाचे कर्म आणि नशीब वेगवेगळे असल्याने प्रत्येकाच्या संसारात राहण्याच्या वेळेत फरक असतो. मृत्यूच्या शाश्वततेबद्दल विज्ञानदेखील असेच तर्क देते. विज्ञानाच्या द़ृष्टिकोनातून, वृद्धत्व ही अशी प्रक्रिया आहे, ज्याचा सामना पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला करावा लागतो. चेहर्यावर, हाता-पायांवर सुरकुत्या पडणे, शरीर वाकणे आणि कमकुवत हाडे, प्रत्येक इंद्रिय क्षीण होत जाणे, हे वृद्धत्वाचे स्पष्ट लक्षण आहे. विज्ञान म्हणते की, वृद्धत्व आणि मृत्यू हे खरे तर पेशी विभाजनाच्या दरावर अवलंबून असतात. मानवी पेशी मरण्यापूर्वी सरासरी 50 वेळा विभाजित होतात. जितक्या वेळा पेशी विभाजित होतात तितक्या हळूहळू मानवी क्षमता कमी होऊ लागतात. वृद्धत्वाचे आणखी एक कारण म्हणजे टेलोमेरेस एन्झाईम्स. डीएनए पेशींची झीज होण्यापासून संरक्षण करणारे टेलोमेरेस नावाचे एन्झाईम तारुण्यात मुबलक प्रमाणात तयार होते; पण वय वाढत जाईल तसे त्याचे प्रमाण कमी होत जाते.
डॉ. संजय वर्मा,
सहायक प्राध्यापक, बेनेट युनिव्हर्सिटी