'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते राम मंदिराचे सीईओ

Air Marshal Jitendra Mishra
जितेंद्र मिश्रा
Published on
Updated on

डॉ. सुकृत खांडेकर

अयोध्येत उभारण्यात आलेले भव्य राम मंदिर हे देशातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पराक्रम गाजवलेले व करड्या शिस्तीचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नेमणुकीने राम मंदिराचे व्यवस्थापन लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांना मंदिराचे विश्वस्त, प्रशासन, पोलीस आणि सरकार यांच्यामध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळावी लागेल. स्वत: जितेंद्र मिश्रा हे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आघाडीवर होते. त्यांना या कामगिरीबद्दल भारत सरकारचा सर्वोत्तम सेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिमी वायू कमांडचे नेतृत्व करणारे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची अयोध्येतील राम मंदिराचे पहिले सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत उभारण्यात आलेले भव्य राम मंदिर हे देशातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान आहे. सर्व देशाचा अभिमान व भक्तिभावाचे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम मंदिरावर भारतीय सेना दलातील वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्याची सीईओ म्हणून करण्यात आलेली ही पहिलीच नेमणूक असावी. भारतीय हवाई दलातील शिस्त व काटेकोरपणा राम मंदिराच्या व्यवस्थापनात लागू करण्यासाठी जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली असावी. धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनावर सेनादलातील कर्तृत्ववान अधिकाऱ्याची नेमणूक होणे याचे अनेकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे; पण त्यांच्या नेमणुकीने सर्व स्तरांतून समाधान प्रकट झाले आहे. राम मंदिराचा व्यवस्थापकीय कारभार यापुढे पारदर्शक राहील, अशी अपेक्षा भक्तांकडून व्यक्त होत आहे. जितेंद्र मिश्रा यांना हवाई दलातील कामगिरीबद्दल सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल हा सन्मान प्राप्त झालेला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पराक्रम गाजवलेले व करड्या शिस्तीचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नेमणुकीने राम मंदिराचे व्यवस्थापन लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा आहे.

नि. एअर मार्शल मिश्रा यांच्या हवाई दलातील ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना तीन हजारांपेक्षा जास्त तास विमानोड्डणाचा अनुभव आहे. त्यांनी सेवेत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांचे उड्डाण केले आहे किंवा ती हाताळली आहेत. फायटर (लढाऊ), ट्रान्स्पोर्ट एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आदींचा त्यांना विपुल अनुभव आहे. दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विशिष्ट सेवा मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच वर्षी ३० एप्रिल रोजी ते हवाई दलाच्या सेवेतून निवृत्त झाले; पण अवघ्या सव्वाशे दिवसांतच त्यांच्यावर राम मंदिराची नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. जितेंद्र मिश्रा यांचे कुटुंबीय दिल्लीत राहतात. त्यांची पत्नी सरिता सिंह या एअर फोर्स वाईफ वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे वडील नथुनी मिश्रा हे दिल्ली विद्यापीठात कॉमर्सचे प्राध्यापक होते. जितेंद्र मिश्रा यांचे धाकडे बंधू डॉ. देवेंद्र मिश्रा हे दिल्लीमधे एका मेडिकल कॉलेजमध्ये प्रशासकीय पदावर आहेत. त्यांची बहीण डॉ. वंदना मिश्रा या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) प्राध्यापिका आहेत.

स्वत: जितेंद्र मिश्रा हे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आघाडीवर होते. त्यांना कामगिरीबद्दल भारत सरकारचा सर्वोत्तम सेवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्याशी त्यांचा पारिवारिक संबंध आहे. चार दशकांतील हवाई दलाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कमांडचे नेतृत्व केले आहे. राम मंदिराला रोज भेट देणाऱ्या भाविकांची संख्या सतत वाढत आहे. देशातील सर्व भागांतून रोज हजारो भाविक राम मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. अशा वेळी प्रशासन, व्यवस्थापन, सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण हे सर्व एकाच वेळी व्यवस्थापनाला बघावे लागते. सेना दलातील प्रशासकीय अनुभवाचा जितेंद्र मिश्रा यांना राम मंदिराचे सीईओ म्हणून काम करताना निश्चितच उपयोग होऊ शकतो. जितेंद्र मिश्रा यांनी पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी बंगळुरू येथील एअरफोर्स टेस्ट पायलट स्कूल तसेच ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडिज येथेही त्यांनी प्रशिक्षण घेतले.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर नि. एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाखत प्रसिद्ध केली. या मुलाखतीत त्यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील रडार व कमांड सेंटर्सना कसे टार्गेट बनवले होते, हे सांगितले. भारतीय हवाई दलाच्या अचूक हल्ल्यांनी पाकिस्तानी एअर डिफेन्स सेवेला कसा हादरा दिला, ते या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितले होते. 'ऑपरेशन सिंदूर' चालू असताना जितेंद्र मिश्रा हे पश्चिमी वायू सेनेच्या कमांडमध्ये बसून होते. त्यावेळी युद्ध चालू असल्याने दोन्ही बाजूंनी तणावपूर्ण वातावरण होते. अचानक एक अधिकारी त्यांच्याकडे धावत आला, लाईट ताबडतोब बंद करा, पश्चिम कमांडचे कार्यालय व हवाई दलाला हल्ल्यासंबंधी आदेश देणारे जितेंद्र मिश्रा यांनाच शत्रूचे सैन्य टार्गेट बनवत आहे, असे त्या अधिकाऱ्याने त्यांना घाबरतच सांगितले. शत्रूचे सैन्य आपले लोकेशन शोधत असल्याची त्याने माहिती दिली. एअर मार्शल जितेंद्र मिश्रा बेधडक व निडरपणे त्याला म्हणाले, मी त्यांना उघड आव्हान देतो, हिम्मत असेल, तर त्यांनी मला टार्गेट बनवावे… त्यांना जबर आत्मविश्वास होता की, बंकरमधे लपून लढण्यापेक्षा कमांडच्या कार्यालयात बसून आपण ऑपरेशन सहज पार पाडू शकतो. भारतीय सैन्य दलाने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' धडक कारवाईला प्रारंभ केला. पाकिस्तानातील व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी केंद्रांवर भारतीय सैन्य दलाने क्षेपणास्त्रांचा मारा केला. जैश ए महंमदच्या मुख्यालयासह दहशतवादाची प्रशिक्षण देणारी त्यांची नऊ केंद्रे उद्‌ध्वस्त केली. शंभरहून अधिक दहशतवाद्यांना भारतीय सेनेने कंठस्नान घातले.

भारत सरकारने या मोहिमेचे नामकरण 'ऑपरेशन सिंदूर' असे केले. काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना वेचून त्यांच्या हत्या केल्या. त्यांच्या पत्नींना विधवा केले. म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त करण्याच्या मोहिमेला 'ऑपरेशन मंगलसूत्र' असे नाव द्यावे असा सुरुवातीला विचार होता; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' या नावाला मंजुरी दिली. ऑपरेशनदरम्यान भारतीय हवाई दलाची सर्व रडार व मिसाईल्स डिफेन्स युनिट सज्ज होती. शत्रूच्या प्रदेशातील एक मोठे टार्गेट हवाई दलाने निश्चित केले होते. कंट्रोल रूममध्ये बसलेल्या एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांना माहिती मिळताच त्यांनी शूट असा आदेश दिला व त्या एका शब्दानिशी भारताच्या एस ४०० मिसाईल्सनी पाकमधील दहशतवादी अड्ड्यांवर मारा केला. भारताच्या सरहद्दीपासून ३१४ कि.मी. अंतरावर असलेली पाकिस्ताची रडार सिस्टीम भारतीय हवाई दलाने उद्‌ध्वस्त करून टाकली. दूरवरून केलेल्या क्षेपणास्त्राच्या माऱ्याने पाकिस्तानची संरक्षण व्यवस्थाच भारतीय हवाई दलाने खिळखिळी करून टाकली.

जितेंद्र मिश्रा यांना लहापणापासून विमान उड्डाणाचा शौक होता. आसाममधील तेजपूर येथे लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणून ६ सप्टेंबर १९८६ रोजी हवाई दलाने त्यांची नेमणूक केली. कारगिल युद्धात मिराज २००० लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग होता. जून २०१० मध्ये फ्रान्समध्ये हवाई हल्ल्याच्या प्रशिक्षणासाठी गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या टीमचे त्यांनी नेतृत्व केले होते. पुण्यात सुखोई ३० एअर बसचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. कारगिल युद्ध २०००, अभ्यास गरूड २०१० आणि 'ऑपरेशन सिंदूर' अशा तिन्ही ऑपरेशन्समध्ये आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारे जितेंद्र मिश्रा यांच्यावर आता राम मंदिरचे सीईओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राम मंदिरातील दान पेटीतून दोन- अडीचशे कोटी रोख रक्कम व मौल्यवान दागिने चोरीस गेल्याचे उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापनात मोठे बदल करण्यात आले. सीईओ म्हणून जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दानपेटी व देणग्यांमधे हेराफेरी होऊ नये, यासाठी कठोर उपाय योजावे लागतील. मंदिराच्या कारभारासाठी अकाऊंट सिस्टीम जारी करावी लागेल. मंदिराच्या सुरक्षा, सफाई व व्यवस्थापनाच्या दोन हजार कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवावी लागेल. भक्तांना प्रभुरामाचे सहज दर्शन मिळावे, यासाठी पोलीस व प्रशासन यांच्यात समन्वय घडवावा लागेल. मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही नेटवर्क मजबूत ठेवावे लागेल.

मंदिराचे विश्वस्त, प्रशासन, पोलीस आणि सरकार यांच्यामध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळावी लागेल. मंदिराच्या कब्जात ३२ किलो सोने व १,५१८ किलो चांदी आहे. शुद्ध चांदीच्या विटा बँक लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवाव्या लागतील. मंदिराकडे १८७६ कोटी रोख रक्कम आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ३,२६४ कोटी निधी जमला होता. दानपेटीतून ३९२ कोटी जमले होते. असा मोठा व्याप सांभाळण्याची जबाबदारी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर आहे. मंदिराच्या सीईओ पदासाठी ५,५३८ अर्ज प्राप्त झाले होते. ११ व १२ ऑगस्ट रोजी त्यातल्या १६ जणांना अयोध्येत मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. अंतिम फेरीसाठी जितेंद्र मिश्रा, मेजर जनरल संजय प्रतापसिंह आणि श्रुती भारद्वाज अशा तिघांची निवड झाली. सर्वानुमते जितेंद्र मिश्रा यांची सीईओ पदावर नेमणूक करावी, असे ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news