शिक्षण : ‘फलका’वरची वजाबाकी

शिक्षण : ‘फलका’वरची वजाबाकी

[author title="योगेश मिश्र, ज्येष्ठ विश्लेषक" image="http://"][/author]

खरे म्हणजे शिक्षणाच्या नावावर युवकांचा केला जाणारा हा खेळखंडोबा आहे. शिक्षणाचे महत्त्व हे पदवी मिळवण्यापुरतेच राहिले आहे. कदाचित ही पदवी नोकरी देऊ शकते असे तरुणांना वाटते. मात्र हासुद्धा गैरसमज आहे. देशात 1100 पेक्षा अधिक विद्यापीठे आहेत आणि 45 हजार महाविद्यालये आहेत. सुमारे सात कोटी पदवीधर आहेत. मात्र यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील सुमारे 47 टक्के पदवीधर हे कोणत्याच नोकरीला पात्र नाहीत. पदव्या खूप आहेत. परंतु गुणवत्तेचा अभाव आहे.

सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. अनेक चमत्कारिक गोष्टी, माहिती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. काही गोष्टी तर धक्कादायक आहेत आणि अविश्वसनीयही. मात्र नेत्यांच्या प्रभावाखाली आणि वलयामुळे सर्व काही दबून गेले आहे आणि त्याला नगण्य स्थान दिले जात आहे. भाषणातून होणारे आरोप-प्रत्यारोप, वय, आश्वासने, आकडेवारीतून समजणारी अफाट संपत्तीची माहिती आणि रोकड अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यावर खुलेपणाने आणि सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. यामागचे एक सोपे कारण दिसते आणि ते म्हणजे आपली आकलन क्षमता, बुद्ध्यांक, बौद्धिक पातळी. कदाचित हे म्हणणे कटू वाटू शकते. मनाला टोचणी देऊ शकते आणि कदाचित वाईटही वाटेल. पण ते खरेच आहे. आपण सर्वजण गेंड्यांच्या कातडीप्रमाणे निगरगट्ट झालो आहोत आणि आपल्यावर काही फेकले तरी त्याचा काही परिणाम होत नाही.

या ठिकाणी एका घटनेचा उल्लेख करता येईल. विशेष म्हणजे ही घटना सोशल मीडिया, वर्तमानपत्र, टीव्हीवर दाखवली गेलेली आहे. पण सर्वच जण आता 'डान्स ऑफ डेमोक्रॅसी'मध्ये मश्गुल झालेले असताना हे प्रकरण फार हायलाईट झाले नाही. कारण सर्वच जण नेत्यांच्या मागे पळत आहेत. घटना दिल्लीचीच आहे. बॅनर, पोस्टर, फलके हातात घेऊन असंख्य विद्यार्थी राजधानीत एकत्र झाले. ते काँग्रेस आणि त्यांच्या जाहीरनाम्याचा विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. देशातील तरुण मुलं जागरुक आहेत, हे पाहून चांगले वाटणे स्वाभाविक आहे.

आपले विचार मांडलेच पाहिजेत. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचा जागरुकपणा दिसणे ही कितीतरी चांगली बाब. परंतु खरी गंमत तर पुढेच आहे. तिथे एक उत्साही टीव्ही पत्रकार तरुणांचे ऐक्य पाहून भारावून गेला आणि तो विद्यार्थ्यांशी बोलू लागला. पण काही क्षणातच त्याच्या उत्साहावर पाणी फेरले. याचे कारण आंदोलनकर्त्यांना आपण कशाचा विरोध करतोय, हेच ठाऊक नव्हते. या पोस्टरवर काय लिहिलेले आहे, घोषणा काय आहेत याचा थांगपत्ताच नव्हता. ते वाचूदेखील शकत नव्हते. राजकीय आकलन तर सोडाच; सामान्य ज्ञानातील अबकड देखील येत नव्हते.

या प्रकरणात अधिक खोलवर गेले असता देशातील ही तरुण शक्ती, नायक हे उत्तर प्रदेश – एनसीआरमधील नामांकित गलगोटिया विद्यापीठाचे विद्यार्थी होते. यूजीसी मान्यताप्राप्त हे मोठे खासगी विद्यापीठ असून त्याला नॅक ए प्लसची रँकिंग देखील आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी गुण दिले जाणार होते आणि ते गुण परीक्षेच्या गुणांना जोडले जाणार होते. हा संपूर्ण प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि गमतीचा विषय ठरला. अनेक मीम्स तयार झाले. मात्र ही घटना किंवा प्रसंग हसण्यावर नेण्यासारखा नाही आणि तो खूपच गंभीर विषय आहे. खरे म्हणजे एक प्रकारे शिक्षणाच्या नावावर युवकांचा केला जाणारा खेळखंडोबा आहे. शिक्षणाचे महत्त्व हे पदवी मिळवण्यापुरतेच राहिले आहे. कदाचित ही पदवी नोकरी देऊ शकते असे तरुणांना वाटते. मात्र हासुद्धा गैरसमज आहे.

भारतात 1100 पेक्षा अधिक विद्यापीठे आहेत आणि 45 हजार महाविद्यालये आहेत. सुमारे सात कोटी पदवीधर आहेत. तांत्रिक कौशल्यप्राप्त 73 लाखांपेक्षा अधिक तरुण आहेत. 30 लाखांपेक्षा अधिक मुलांनी पदवी आणि पंधरा लाखांपेक्षा अधिक लोकाकंडे वैद्यकीय पदवी आहे. लोकसंख्येच्या द़ृष्टिकोनातून ही आकडेवारी खूपच कमी आहे. 140 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येत केवळ 8.15 टक्के पदवीधर आहेत. यातही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांची ज्ञान आणि सजग असण्याची नीचांकी पातळी.

2021 मध्ये जारी केलेल्या 'इंडिया स्किल रिपोर्ट'नुसार, निम्म्यापेक्षा कमी भारतीय पदवीधर हे रोजगाराला पात्र आहेत. विशेेष म्हणजे या पात्रतेत वाढ होण्याऐवजी कमी झाली आहे. कारण या अहवालानुसार 2021 मध्ये सुमारे 45.9 टक्के पदवीधर रोजगाराला पात्र होते आणि 2020 मध्ये 46.21 टक्के आणि 2019 मध्ये 47.38 टक्के. म्हणजे दरवर्षी यात घसरण होताना दिसत आहे. पॉलिटेक्निक करणार्‍या विद्यार्थ्यांपैकी केवळ 25.92 टक्के विद्यार्थी रोजगाराला पात्र आहेत. तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास केला जातो. पण तेथेही केवळ पदवी घेणे हाच उद्देश ठेवला आहे का? अ‍ॅस्पायरिंग माईंडस्च्या एका अहवालानुसार, भारतात सुमारे 47 टक्के पदवीधर हे कोणत्याच नोकरीला पात्र नाहीत. या कंपनीच्या मते, 80 टक्के इंजिनिअरिंग पदवीधर हे नोकरीला पात्र नसल्याचे निदर्शनास आले. हे सत्य आहे. पदव्या खूप आहेत. परंतु गुणवत्ता नाही.

कोणत्याही सेक्टरच्या लहान-मोठ्या कंपनीचे आकलन करा. कोणत्याच कंपनीला प्रशिक्षित, पात्र विद्यार्थी, तरुण मिळताना दिसत नाही. मीडिया सेक्टरचे उदाहरण घेऊ. तेथे लिहिणारे, वाचन करणारे आणि सजग मेंदू असणारे लोक काम करतात, असे म्हटले जाते. यात पदवी घेणार्‍या तरुणांची संख्या कमी नाही. पण स्थिती भयावह आहे. तेथे काम करणार्‍या अनेक नवख्या तरुणांना चार ओळी धड लिहिता येत नाहीत आणि सभोवताली काय घडतेय, याचेही सोयरसुतक नाही. मग याचा दोष कोणाला द्यायचा? मुले ज्या ठिकाणी पदवी प्राप्त करतात, उच्च शिक्षण घेतात, तेथे शिकवणारे देखील याच परिस्थितीचे वाहक आहेत. अनेक काळापासून ही परंपरा सुरू आहे. एका अर्थाने ही गंभीर स्थिती आहे. मात्र तसे मानण्यास कुणी तयार नाहीये. निवडणुकीच्या हंगामात तर यावर कोणीही चर्चा केली नाही आणि चिंताही व्यक्त केली गेली नाही.

जाहीरनाम्यात फक्त शिक्षण पद्धतीवर लक्ष देऊ, एवढाच उल्लेख आहे. गलगोटिया विद्यापीठाच्या नाट्यावर गंभीर चर्चा कुठे झाली आहे काय? आपला तरुण देशाचा आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो. परंतु शिक्षणावर एकूण जीडीपीच्या केवळ साडेतीन टक्के खर्च केला जात आहे. या खर्चातून बाहेर येणारे फळ काय आहे, याचे चित्र आपल्यासमोर आहे. जागरुकतेबद्दल काय बोलावे? सर्व ज्ञान व्हॉटस्अप, फेसबुक आणि रिल तयार करण्यावर खर्च केले जात असेल तर काय बोलायचे? एका सर्वेक्षणानुसार आजचे बहुतांश तरुण वर्तमानपत्रदेखील वाचत नाहीत. जे काही वाचत असतील, त्यांचाही उद्देश हा स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करणे हाच असतो. ही समस्या आव्हानात्मक आणि गंभीर आहे.

दुर्दैवाने बहुतांश मंडळी याला समस्या मानतच नाहीत. अशावेळी बिचार्‍या तरुणांनी देखील काय करावे? रोजीरोटीसाठी पळापळ करावी, जागरुक राहावे की आणखी काय करावे? या परिस्थितीसाठी त्यांना कोण तयार करणार? जागरुक असतील तर प्रश्न विचारतील आणि प्रश्न विचारणे तर कोणालाच आवडत नाही. मग आपण काही करणार का? आपल्या घरापासून, स्वत:पासून सुरुवात करायला हवी. गरज आपल्याला देखील आहे. सभोवतालच्या अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतील. देशाला बाजाराच्या वातावरणात आणि वळणावर आणून ठेवले आहे. त्यामुळेच जग आपल्याकडे बाजारपेठ म्हणून पाहात आहे. आपल्या सर्वांना या देशाला ज्ञानाच्या वळणावर अणि वातावरणात आणावे लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news