शुभांगीताई, चला उत्सवाच्या मांडवात जाऊ...

गणेशोत्सव म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारी शाळा
Public Ganeshotsav
सार्वजनिक गणेशोत्सवPudhari File Photo
Published on
Updated on
सुनील माळी

शुभांगीताई, तुम्ही म्हणालात त्यात काहीच चूक नाही. 'सार्वजनिक गणेशोत्सव रस्त्यावर साजरा होतो, रात्री दारू पिऊन पत्ते खेळले जातात... सार्वजनिक गणेशोत्सवात प्रदूषण होतं…एनर्जी वाया जाते.' अगदी बरोबर बोललात तुम्ही, पण ताई, काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्यात का ? आदर्श-चांगल्या कार्यकर्त्यांची, समाजोपयोगी कामे करणारी अनेको मंडळे तुमच्या नजरेआड झालीत का ? स्वराज्यासाठी लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आता स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी, पुन्हा दुंभगण्याच्या वाटेवर असणाऱ्या समाजाला सांधण्यासाठी उपयोगी ठरेल, असे तुम्हाला वाटत नाही का ? आणि शेवटचे म्हणजे उत्सवात शिरलेले हिणकस तणकट उपटून फेकून देण्याची आणि उत्सव पुन्हा एकदा रसरशीत, हवाहवासा करण्याची जबाबदारी कुणाची ?तुम्हा-आम्हा समाजातील घटकांचीच ना ? मग चला जाऊ मांडवात, उचलूया तबक-ताम्हण, लावू कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा. 'बाप्पा मोरया...'म्हणत सळसळत्या उत्साहाची, आनंदाची पर्वणीच असलेल्या या उत्सवाला लागलेली

Public Ganeshotsav
Paris Olympics : मनू अध्याय

काळी किनार कापून टाकूयात...

गणेशोत्सवात शिरलेल्या अपप्रवृत्ती, दिसणारे आक्षेपार्ह प्रकार यांवर बोट ठेवून 'उत्सवच नको', अशी भूमिका घेणाऱ्या शुभांगीताई या पहिल्या नव्हेत. गेल्या किमान दोन दशकांपासून ही भूमिका घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कोणा चित्रपटाच्या निमित्ताने शुभांगीताईंनी व्यक्त केलेल्या मतावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा घडत असली तरी ही भूमिका आणि मत नवे नाही. तसेच त्यात घेण्यात येणाऱ्या आक्षेपांमध्ये तथ्यही जरूर आहे.

प्रश्न एकच आहे, या आक्षेपांतील तथ्यांश असलेल्या बाबींमध्ये सुधारणा करायची का उत्सवच बंद करायचा ? दर दहा वर्षांनी पिढी बदलते आणि प्रत्येक पिढीगणिक विचार बदलतात. त्यामुळे उत्सवाच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्यात बदल होत जाणे स्वाभाविकच होते आणि हा उत्सव त्यानुसार बदलत गेलाही. ब्रिटिशांनी देशवासियांना ज्या पारतंत्र्याच्या जोखडात कोंडले होते, ते पारतंत्र्य फेकून देण्याच्या उद्देशाने १८९३ मध्ये उत्सवाला सुरूवात करण्यात आली आणि स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पोचवण्याचे काम पहिल्या पन्नास वर्षांत उत्सवाने चोखपणाने केले.

स्वातंत्र्यानंतर मनोरंजनाबरोबरच सुराज्य येण्यासाठी, सामाजिक कार्यकर्ते तयार करण्यासाठी उत्सवाने प्रयत्न केले. कालानुरूप काही हिणकस प्रकार उत्सवात दिसू लागले. शुभांगीताई म्हणतात त्याप्रमाणे मांडवाखाली जुगारी पत्ते-दारू तर आहेच, पण बहुधा त्यांच्या नजरेतून सुटलेली कर्कश्य गाणी, खंडणीकडे जाणारी वर्गणी, कार्यकर्त्यांचा सहभाग कमी होऊन कंत्राटीकरण आणि सार्वजनिकत्व जाऊन एका भाऊच्या इशाऱ्यावर मंडळ नाचणे, मिरवणुकीत दारू पिऊन अश्लील नृत्ये करणे, तीस-तीस तास चालणाऱ्या मिरवणुका अन स्पीकरच्या भिंती... असे प्रकारही त्यात आले. त्यामुळे 'आता उत्सवच नको' अशी चर्चाही काही घटकांकडून काही काळापासून सुरू झाली, मात्र उत्सवातील जाणकार, जागरूक कार्यकर्त्यांनी ही टीका कशी घेतली ?, तिला उत्तर देण्याचा कसा प्रयत्न केला ? याकडे जाणता-अजाणता दुर्लक्ष होते.

जाणकार, समंजस कार्यकर्त्यांच्या फळीने त्यावर मात करत गेल्या काही दशकांत उत्सवाला नवा आयाम, नवी दृष्टी, नवे परिमाण देण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याचे उत्सवाचे आस्थेने, पण चिकित्सक निरीक्षण करणाऱ्यांना दिसून आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजता आवाज बंद झाल्यानंतर प्रेक्षकांना हेडफोन देत आणि त्या माध्यमातून देखाव्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवून ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न सोडवणाऱ्या पुण्यातल्या पेरूगेट मंडळासारखा अभिनव उपक्रम वानगीदाखल सांगता येतो. पुण्याचीच काही उदाहरणे सांगायची तर नक्षलवादी भागापासून ते देवदासींच्या वस्तीपर्यंत काम करणारे उदय जगताप, शिरीष मोहिते, साईनाथ मंडळाचे पियूष शहा यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत. जाणीवपूर्वक सामाजिक देखावे करणारी सेवा मित्र मंडळ, साखळीपीर तालीम सारखी मंडळे, चांद्र्यानापासून ते जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंतचे वैज्ञानिक देखावे करणारी मेहुणपुरा, नातूवाडा सारखी अनेक मंडळे आहेत. उत्सवाला चांगले रूप देण्यासाठी अनेक

ठिकाणी मंडळांच्या बैठका होण्यास सुरूवात झाली आहे. अनेक मंडळांनी एकत्र येऊन विधायक या नावानेच व्यासपीठ स्थापन केले आहे. आयटीतील तरुणांचा उत्सवातील सहभाग वाढत चालल्याचे आणि त्यामुळे उत्सव आधुनिक होत चालल्याचे माझे निरीक्षण आहे. कोरोनाने दोन वर्षे उत्सव झाकोळला गेला, पण त्या दोन वर्षांत समाजाला मदत करण्याचे कर्तव्य राज्यभरातल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी अचूकपणे पार पाडले. भूकंप-महापूर-दुष्काळ-आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे भवितव्य अशा अनेक आपत्तीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते धावून गेले आहेत. केवळ पौराणिक कथांमधील राक्षसवधासारखे देखावे एकेकाळी सादर करणाऱ्या मंडळांपैकी काही मंडळे वैज्ञानिक देखावे सादर करू लागली आहेत. ज्वलंत सामाजिक समस्यांना हात घालत समाजाचे प्रबोधन काही मंडळे करीत आहेत. जिवंत देखावे म्हणजे मंचावर कलाकारांनी नाट्यरूपाने सादर करायचे देखावे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

आधी केवळ ऐतिहासिक प्रसंगापुरतेच घुटमळणारे हे देखावे आता सामाजिक प्रश्न, देशभक्ती आदींवरही भर देत आहेत आणि त्याचा समाजावर इष्ट, सुपरिणाम होताना दिसतो आहे. हे सारे आपल्याला कधी कळेल ? आपण शहरभर फिरून मंडळांचे पडदे बाजूला करत कार्यकर्त्यांच्या मनांपर्यंत पोचलो तर... केवळ बाहेरून कोरडी टीका करून नव्हे... उत्सवाच्या निमित्ताने राज्यभर अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना तुमच्या लक्षात आली आहे का ? राज्याच्या विविध शहरांत आणि अगदी ग्रामीण भागांतही गणेशोत्सव साजरा होतो.

त्यात गणपती साकारणारे कारागीर, सजावटीपासून फुलांपर्यंतच्या वस्तू विकणारे विक्रेते, सार्वजनिक उत्सवातील मांडवापासून ते गाड्यांपर्यंतच्या सेवा देणारे व्यावसायिक आदींचा या अर्थव्यवस्थेत मोठा भाग आहे. गणेशोत्सव ही एक स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे. एका अंदाजानुसार राज्यातील सार्वजनिक मंडळांची एकेकाळी ४० हजार असणारी संख्या एक लाखाच्या घरापर्यंत पोचली असून राज्यात उत्सवाच्या निमित्ताने होणारी उलाढाल काही हजार कोटींच्या घरात आहे. द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया म्हणजेच असोचेमच्या २०१५ च्या अहवालात देशभरातल्या गणेशोत्सवात तब्बल २० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले होते.

मुंबईत त्यावर्षी १५ हजार, पुण्यात पाच ते सहा हजार, नागपूरला दीड हजार तर अहमदाबादेत २ हजार मंडळे होती, असेही हा अहवाल म्हणतो.  वार्षिक किमान दहा टक्क्यांची वाढ गृहीत धरली तर त्यानंतरच्या आठ वर्षांनी म्हणजे चालू वर्षी किमान ७० ते ८० हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. ताई, गणेशोत्सव म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारी शाळा. केवळ घर आणि मर्यादित मित्रपरिवार एवढेच संकुचित वर्तुळ असलेल्या तरूणाला त्यापेक्षा मोठ्या वर्तुळात आणण्याचे काम गणेशोत्सव मंडळ करते. शंभर-दीडशे कार्यकर्ते एकत्र येतात, बैठक घेतात, उत्सव कसा साजरा करायचा ? त्याची चर्चा करतात, कामे वाटून घेतात आणि सांघिकरित्या, एकदिलाने ती पार पाडतात. त्यातून टीमस्पिरिट म्हणजेच संघवृत्ती वाढीस लागते. नेतृत्वगुण विकसित होतो.

समाजासाठी काहीतरी करण्याची मानसिकता तयार होते, तो कार्यकर्ता चांगला नागरिक होतो, समाजोपयोगी घटक बनतो. राजकारणात नेतेपदाची शिडी चढतचढत वर गेलेल्या अनेक जणांची सामाजिक, सार्वजनिक कामाची पहिली पायरी ही गणेशोत्सव मंडळच होती, असे आपल्याला आढळून येईल. राजकारण, समाजकारणात नेत्यांपासून ते प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या फळीपर्यंत अनेक जण लागतात. ते तयार होतात या मंडळांच्या शाळेत.

समाजाला सार्वजनिक कामात आणण्याचे महत्त्व लोकमान्यांनी ओळखले होते. उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची त्यांची सुस्पष्ट भूमिका त्यांनी उत्सवाच्या अगदी प्रारंभीच्या वर्षांत "केसरी'मध्ये लिहिलेल्या अग्रलेखांमध्ये दिसून येते. "या उत्सवास जे सार्वजनिक स्वरूप प्राप्त होते आहे त्याबद्दल दोन शब्द... राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे जरूरी आहे... कोणत्याही लोकांत ऐक्‍याची वृद्धि होण्यास अनेक साधने असतात. एक उपास्यदैवत असणे हे त्यापैकींच एक कारण आहे...

मेळेवाल्यांनी प्रत्येक पदांत काही तरी सार्वजनिक हिताहिताचा उल्लेख केलेला होता, मग तो एकीने वागण्याबद्दल असो, रायगडी जाण्याबद्दल असो...गणेशोत्सवास राष्ट्रीय स्वरूप यावे अशी "केसरी'कारांची उत्कट इच्छा आहे... ' (अग्रलेख -- ३ सप्टेंबर १८९५ आणि २२ सप्टेंबर १८९६) गणपतीसारखी प्रचंड सोवळ्या-ओवळ्यातल्या देवतेचे पूजन अनेक शतके काही उच्च मानल्या गेलेल्या जातींपुरतेच मर्यादित होते. अशा सोवळ्या घरातल्या केवळ

देवघरात बंदिस्त असलेल्या या देवतेला रस्त्यावर आणून लोकमान्यांनी सामाजिक क्रांतीच केली. गणेशपूजन आणि उत्सव धार्मिक उत्सव न राहता सामाजिक उत्सव बनला. ही पार्श्‍वभूमी ध्यानी घेतली तर टिळकांनी लिहिलेल्या पुढील ओळींचा अर्थ समजतो.

ताई, गणेशोत्सव म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारी शाळा. केवळ घर आणि मर्यादित मित्रपरिवार एवढेच संकुचित वर्तुळ असलेल्या तरूणाला त्यापेक्षा मोठ्या वर्तुळात आणण्याचे काम गणेशोत्सव मंडळ करते. शंभर-दीडशे कार्यकर्ते एकत्र येतात, बैठक घेतात, उत्सव कसा साजरा करायचा ? त्याची चर्चा करतात, कामे वाटून घेतात आणि सांघिकरित्या, एकदिलाने ती पार पाडतात. त्यातून टीमस्पिरिट म्हणजेच संघवृत्ती वाढीस लागते. नेतृत्वगुण विकसित होतो. समाजासाठी काहीतरी करण्याची मानसिकता तयार होते, तो कार्यकर्ता चांगला नागरिक होतो, समाजोपयोगी घटक बनतो. राजकारणात नेतेपदाची शिडी चढतचढत वर गेलेल्या अनेक जणांची सामाजिक, सार्वजनिक कामाची पहिली पायरी ही गणेशोत्सव मंडळच होती, असे आपल्याला आढळून येईल. राजकारण, समाजकारणात नेत्यांपासून ते प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या फळीपर्यंत अनेक जण लागतात. ते तयार होतात या मंडळांच्या शाळेत. समाजाला सार्वजनिक कामात आणण्याचे महत्त्व लोकमान्यांनी ओळखले होते. उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची त्यांची सुस्पष्ट भूमिका त्यांनी उत्सवाच्या अगदी प्रारंभीच्या वर्षांत "केसरी'मध्ये लिहिलेल्या अग्रलेखांमध्ये दिसून येते. "या उत्सवास जे सार्वजनिक स्वरूप प्राप्त होते आहे त्याबद्दल दोन शब्द... राष्ट्राच्या अभ्युदयाकरिता असे उत्सव असणे जरूरी आहे... कोणत्याही लोकांत ऐक्‍याची वृद्धि होण्यास अनेक साधने असतात.

Public Ganeshotsav
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, ४ ऑगस्‍ट २०२४

टिळक १८ सप्टेंबर १८९४ च्या अग्रलेखात लिहितात, ""गणपती देवता आजपर्यंत पांढरपेशे वगैरे लोकांमध्ये असून त्या देवतेसंबंधाने घरोघरी उत्सव, मंत्रपुष्प, जाग्रणे, कीर्तने वगैरे थाटाने होत असत हे खरे आहे, तथापि यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभmजो वैश्‍यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हां सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांतील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली ती केवळ अपूर्व आहे...

'' याच अग्रलेखात मिरवणुकीबाबत ते लिहितात, ""साळी, माळी, सुतार, रंगारी, ब्राह्मण, व्यापारी, मारवाडी, चांभार देखील या सर्व जातींनी क्षणभर आपआपला जातिमत्सर सोडून देऊन परस्परांशी एका दिलाने व एका धर्माभिमानाने मिसळले व या सर्वांनी हातभार लावल्यामुळे सर्व समारंभ शेवटास गेला असता - खेद करण्याकरती ती काय गोष्ट झाली ?... ही झाली लोकमान्यांच्या वेळची स्थिती. त्यानंतर उत्सवाने शतक साजरे केल्यानंतरही तीस वर्षे उलटली. या वेळी लोकमान्यांच्या वेळी नव्हती एवढी या उत्सवाची, समाजाला एकत्र आणण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येते. देशातली आणि विशेषत: राज्यातली सामाजिक स्थिती बरीच बदलली आहे. राज्य घटनेतील समानतेच्या तत्त्वाचा अवलंब होत असतानाही पुन्हा धर्मीय, वर्गीय, जातीय भावना डोके वर काढू लागल्याचे दिसू लागले आहे. सकस वाद खेळण्याची, मुद्‌द्‌याला मुद्‌द्‌याने उत्तर देण्याची परंपरा या महाराष्ट्राने गेल्या शंभर-दीडशे वर्षांत निर्माण करून जपली. दुसऱ्याच्या विचाराच्या

विरोधातील विचार मांडण्याची मोकळिक त्या काळात प्रत्येकाला होती आणि दुसऱ्याच्या मताचा आदरही राखला जात होता. स्वातंत्र्य आणि समानतेचे तत्त्व अंगीकारून काही दशके उलटली असताना ती तत्त्वे अधिक परिपक्व होणे अपेक्षित होते. दुर्दैवाने तसे न होता समाज पुन्हा जाती-पातीच्या कुंपणाआड जात चालला आहे आणि दुसऱ्याचा विरोधी विचार विचाराने नव्हे तर बळाने आणि सांस्कृतिक दहशतीने दाबण्यात येतो आहे. त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज उत्सव सुरू करण्याच्या वेळेस जेवढी होती, त्यापेक्षा अधिक गरज आज २०२४ मध्ये जाणवू लागली आहे. म्हणूनच सर्व जाती-धर्म-पंथाच्या व्यक्तींना सुज्ञ नागरिकांनी गणेशाच्या मांडवात एकत्र आणून त्यांचे खऱ्या अर्थाने मनोमीलन केले तरच "महाराष्ट्र अन मानव धर्म राहिला काही तुमचे कारणे...' असे पुढच्या पिढ्या म्हणतील. संपूर्ण उत्सवावर प्रभाव पाडू शकणारे आधुनिक भाऊसाहेब रंगारी आणि आधुनिक लोकमान्य टिळक आज नसले तरी उत्सवातील पुढच्या पिढीने एकदिलाने प्रयत्न केल्यास ती

उणीव जाणवणार नाही, एवढे निश्‍चित...!


... शुभांगीताई, उत्सवात शिरलेल्या हिणकस बाबींच्या तुलनेत उत्सवाचे मोल अधिक जड भरते. त्यामुळेच उत्सवच बंद करण्याची भाषा करण्याऐवजी तो शुद्ध करण्याच्या कामात आपण सर्वांनी लक्ष दिले, तर ते अधिक चांगले ठरणार नाही का ?

- (पूर्व प्रसिद्धी - दै. पुढारी, रविवारची बहार पुरवणी, ४ ऑगस्ट २०२४.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news