Paris Olympics : मनू अध्याय

मनूने दोन कांस्यपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी
Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
Tokyo Olympics : मनूने दोन कांस्यपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी. Pudhari File Photo
Published on
Updated on
मिलिंद ढमढेरे

नियमितरीत्या गीता पठण करणार्‍या मनू हिला अखेर या गीतेमधीलच वेगवेगळ्या बोधक कथांनी आणि प्रसंगांनी तारले. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे लक्षात घेऊनच तिने पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी गेली दोन वर्षे अथक परिश्रम घेतले. किंबहुना, नेमबाजी केंद्र हेच तिचे घर झाले होते.

Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
शाबास मनू..!

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥

महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला फळाची अपेक्षा न करता तू कर्म करीत जा, फळ तुला आपोआप प्राप्त होईल, असा उपदेश केला होता. श्रीकृष्णांच्या या उपदेशाप्रमाणेच भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील अपयश धुवून काढताना, पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत लागोपाठ दोन कांस्यपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. जिथे आपल्या देशाच्या भल्या भल्या नेमबाजांना हे यश मिळवता आले नाही, तिथे तिने अचूक नेम साधला आणि खर्‍या अर्थाने नेमबाजी या क्रीडा प्रकाराला युवा चेहरा दिला.

नेमबाजी हा अ‍ॅथलेटिक्स व जलतरण या क्रीडा प्रकारांसारखाच पदके जिंकण्यासाठी असलेला मोठा खजिना मानला जातो. हा खजिना लुटण्यासाठी प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी संपूर्णपणे एकाग्रता आणि आत्मविश्वास दाखवायला लागतो. मनू हिने दहा मीटर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक गटात कांस्यपदक, तसेच सरबज्योत सिंग याच्या साथीत मिश्र दुहेरी गटात कांस्यपदक, असा दुहेरी धमाका केला. सन 1900 मध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नॉर्मन प्रिटचर्ड यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. त्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीचे पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. सन 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीमध्ये पदक मिळाले होते, त्यानंतर एक तप नेमबाजीमध्ये भारताची पाटी कोरीच राहिली होती. हा दुष्काळ मनू हिने संपुष्टात आणला आहे.

Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
Paris Olympics 2024 : पदकांची हॅट्ट्रिक करण्यास मनू सज्ज

मनू हिचे यश अतिशय कौतुकास्पदच आहे. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिने तीन क्रीडा प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते; मात्र या तिन्ही क्रीडा प्रकारांत तिला अपयशच आले होते. एवढेच नव्हे, तिच्या अपयशाबाबत कडाडून टीका झाली होती. तिला संधी देऊन भारतीय नेमबाजी संघटनेने मोठी चूक केली, अशीही टीकाटिपणी ऐकायला मिळाली होती. ही टीका एवढ्यावरच संपली नव्हती, तिचे प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज जसपाल राणा यांच्यावरही अपयशाचे खापर फोडण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्यानंतर जसपाल यांना प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी देण्याबाबतही अनेक जण टाळत होते. जणू काही तेच एकटे मनू हिच्या अपयशास जबाबदार आहेत. साहजिकच, मनू आणि जसपाल यांच्यातही वितुष्ट आले. ही कटुता एवढी टोकास गेली की, नेमबाजी या क्रीडा प्रकारापासून फारकत घ्यावी, असे विचारही मनू हिच्या मनात येऊ लागले होते.

Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
बहार विशेष : विकासाभिमुख अर्थसंकल्प

टीकाटिपणीकडे दुर्लक्ष

नियमितरीत्या गीता पठण करणार्‍या मनू हिला अखेर या गीतेमधीलच वेगवेगळ्या बोधक कथांनी आणि प्रसंगांनी तारले. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे लक्षात घेऊनच तिने पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी गेली दोन वर्षे अथक परिश्रम घेतले. किंबहुना, नेमबाजी केंद्र हेच तिचे घर झाले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारे नेमबाज अभिनव बिंद्रा यांचाही आदर्श मनू हिच्या पुढे होता. अभिनव यांनाही पहिल्या दोन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदकाने हुलकावणी दिली होती. या अपयशाने त्यांनाही भरपूर टीकेला सामोरे जावे लागले होते; मात्र या सर्व टीकांकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यांनी संयम, चिकाटी, आत्मविश्वास याला अथक कष्टांची जोड दिली आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. मनू हिने त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवत तमाम टीकांकडे डोळे झाक केली. एवढेच नव्हे, तर तिने पुन्हा जसपाल यांनाच आपल्याला मार्गदर्शन करण्याविषयी विनंती केली. जसपाल यांनीही मोठेपणा दाखवत दोघांमधील मतभेद विसरून पुन्हा तिला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्याचेच फलित आता दिसले आहे.

Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
…चक्क ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

आपल्या देशाच्या ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता असलेले भरपूर क्रीडानैपुण्य आहे. मनू हीदेखील अशाच अनमोल रत्नांपैकी एक आहे. हरियाणामधील झाझर जिल्ह्यात असलेल्या गोरिया या खेडेगावात जन्म झालेल्या मनू हिला शालेय जीवनात क्रीडा क्षेत्रासाठी तिच्या पालकांनी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्य आणि सहकार्य केले. ज्या क्षेत्रात आपण उतरू त्या क्षेत्रात सर्वोत्तम यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे गुण लाभलेली काही माणसे असतात. मनू हिनेदेखील सुरुवातीला मुष्टियुद्ध, टेनिस स्केटिंग अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य केवळ राज्य नव्हे, तर राष्ट्रीयस्तरावरही दाखविले. मात्र, राजवर्धनसिंह राठोड, अभिनव बिंद्रा, गगन नारंग आदी खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील मिळवलेल्या पदकांमुळे मनू व तिच्या पालकांना नेमबाजी या खेळाने भुरळ घातली नसती तर नवलच. नेमबाजी हा खर्चिक खेळ असूनही अनेक गोष्टींचा त्याग करीत मनू हिला पालकांनी नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य काही खेळाडूंकडे उपजतच असते. मनू हिने सन 2017 मध्ये केरळ राज्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत नऊ सुवर्णपदकांची लयलूट करीत सर्वांचे लक्ष वेधले. पाठोपाठ तिने 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक युवा स्पर्धेतही सोनेरी यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळेच तिला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची दारे खुली झाली. त्यावेळी जेमतेम एकोणीस वर्षांच्या मनूसाठी ही पहिलीच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होती. सारे जग जिंकणार्‍या अनेक भारतीय नेमबाजांना ऑलिम्पिक पदकाने हुलकावणी दिली आहे. हे लक्षात घेतले तर पदार्पण करणार्‍या मनूचे अपयश ही भारतीय नेमबाजी क्षेत्रासाठी काही नवीन गोष्ट नाही.

Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
Sarabjot Singh : मनू भाकरसोबत ऑलिम्पिक गाजवणारा सरबज्योत सिंग कोण आहे?

महत्त्वाकांक्षेला परिश्रमांची जोड

एकदा ठेच लागली की मनुष्य शहाणा होतो, त्याप्रमाणेच टोकियो येथील अपयशानंतर मनू हिने त्यामागील कारणांचा भरपूर अभ्यास केला, आत्मपरीक्षण केले आणि आपल्या कामगिरीत सुधारणा केली. ज्याप्रमाणे महाभारतामधील अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत होता, त्याप्रमाणे मनू हिला डोळ्यांसमोर पदक जिंकण्याचे ध्येय दिसत होते आणि तिला ऑलिम्पिक पदकाची स्वप्ने पडत होती. ‘प्रयत्न हे वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या म्हणीप्रमाणेच तिने एकाग्रता, निष्ठा, महत्त्वाकांक्षा याला अथक परिश्रमांची जोड दिली आणि ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न साकारले.

मिश्र दुहेरीत तिला साथ देणार्‍या सरबज्योत याचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; कारण याच ऑलिम्पिक स्पर्धेतील वैयक्तिक क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला, तेव्हा त्याच्यावरही टीका झाली होती. त्याकडे त्याने दुर्लक्ष केले आणि आपल्याला मनूच्या साथीत पदक जिंकायचे आहे, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत सर्वोत्तम कामगिरी केली. मिश्र दुहेरीत जरी खेळाडू वैयक्तिक कौशल्य पणास लावत असले, तरीही प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी एकमेकांना प्रेरणा व मनोधैर्य देणे हेदेखील महत्त्वाचे असते. एकमेकांमध्ये चांगला समन्वय ठेवत मनू व सरबज्योत यांनी शेवटपर्यंत संयम व चिकाटी दाखवत कांस्यपदकाचे स्वप्न साकार केले.

मनू व सरबज्योत या दोघांनी आपल्या विजयाचे श्रेय त्यांचे पालक, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, त्यांना मदत करणार्‍या वेगवेगळ्या विश्वस्त संस्था यांना देत अतिशय मोठेपणा दाखविला. त्यांनी नेमबाजी क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या एक लाखाहून अधिक खेळाडूंपुढे आदर्श निर्माण केला आहे. या दोन्ही खेळाडूंना अजून करिअरमध्ये ऑलिम्पिक गाजवण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहे. या संधींचा लाभ घेत ते भारताचे नाव ऑलिम्पिक क्रीडा चळवळीत मोठे करतील, अशी खात्री आहे.

Manu Bhakar won two bronze medals at the Paris Olympics
Paris Olympics Swapnil Kusale | ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून प्रमोशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news