

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
अमेरिकेच्या चीनविषयक धोरणात सध्या एक महत्त्वपूर्ण बदल घडताना दिसत आहे. गेल्या दोन दशकांपासून चीनला अमेरिकेचा सामरिक प्रतिस्पर्धी मानले जात होते. चीनचा वाढता आर्थिक, लष्करी आणि तंत्रज्ञानविषयक प्रभाव रोखणे हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असोत किंवा डेमोक्रॅटिक पक्षाचे, चीनच्या बाबतीत अमेरिकेच्या भूमिकेत फारसा मूलभूत बदल झाला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हे चित्र बदलताना दिसत आहे. चीनशी संघर्ष करण्याऐवजी जुळवून घेण्याची भूमिका ट्रम्प घेत आहेत. एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांचे पदावरून दूर होणे आणि अवघ्या ११ दिवसांत पुन्हा त्याच पदावर पुनरागमन होणे, या घडामोडींकडे याच दृष्टिकोनातून पाहावे लागेल.
एनव्हिडिया ही सेमीकंडटर क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची अमेरिकन कंपनी आहे. मायक्रोचिप आणि प्रगत संगणकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या कंपनीचे मोठे वर्चस्व आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या चिप्सच्या निर्मितीत एनव्हिडियाची भूमिका निर्णायक आहे. जेन्सेन हुआंग हे कंपनीच्या स्थापनेपासून तिच्याशी जोडलेले असून एनव्हिडियाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा आणि बाजारपेठ मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अलीकडेच त्यांना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर या महाकाय कंपनीची धुरा कोण सांभाळणार याची चर्चा सुरू होती. टीम कुक यांच्यासारखी अनेक नावे त्याअनुषंगाने चर्चेत येत होती; पण अवघ्या ११ दिवसांत त्यांचे याच पदावर पुनरागमन झाले आणि जगाला आश्चर्याचा धक्का बसला.
हुआंग यांना पदावरून दूर करण्यामागे विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा चर्चेत होता. मात्र त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे चीनसाठी हेरगिरी केल्याचा त्यांच्यावर व्यक्त झालेला संशय. अमेरिकेत चीनविषयी असलेली भावना लक्षात घेतली, तर हा आरोप अत्यंत संवेदनशील होता. चीन हा अमेरिकेचा आर्थिक प्रतिस्पर्धी तर आहेच; पण भविष्यातील सामरिक आव्हानही मानला जातो. अशा राष्ट्रासाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला एनव्हिडियासारख्या महत्त्वाच्या कंपनीच्या नेतृत्वात ठेवण्याबाबत अमेरिकेत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. या प्रकरणातील ‘मेगास्पीड’ या सिंगापूरस्थित कंपनीच्या प्रमुख आणि चिनी नागरिक असलेल्या अॅलिस हुआंग या चीनच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा आणि त्यांच्या कंपनीमार्फत प्रगत एआय चिप्स बेकायदेशीरपणे चीनला पाठवल्या गेल्याचा संशय अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना आहे. तथापि, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशार्यांकडे दुर्लक्ष करत ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी एनव्हिडियाच्या संचालक मंडळावर वैयक्तिक दबाव आणला. हुआंग हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत ट्रम्प यांनी त्यांची बाजू उचलून धरली. त्यामुळेच अवघ्या काही दिवसांत हुआंग यांचे पुनरागमन झाले. या प्रक्रियेत एनव्हिडियाच्या व्यवस्थापनाने अमेरिकन सरकारी सूत्रांशी संपर्क साधला आणि चर्चा केली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही हुआंग यांचे पुनरागमन अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी चीनचे नावही घेतले नाही. मी त्यांची समजूत काढली आणि हा व्यवहार पूर्ण केला, असे ट्रम्प यांनी स्वतः जाहीर केले. सिनेटचे नेते आणि डेमोक्रॅटिक खासदारांनी या निर्णयावर तीव्र टीका केली असून ही राष्ट्रीय सुरक्षेशी केलेली तडजोड आणि राजकीय भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे.
जून २०२६ मध्ये सादर करण्यात आलेल्या ट्रम्प यांच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्रानुसार, २०२५ च्या अखेरीस त्यांच्याकडे एनव्हिडियाचे सुमारे १२.५ दशलक्ष ते ५८ दशलक्ष डॉलर्स किमतीचे समभाग होते. विशेष म्हणजे, २०२४ च्या तुलनेत ट्रम्प यांनी या कंपनीतील आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. हुआंग यांच्या पुनरागमनाची घोषणा होताच सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी एनव्हिडियाच्या समभागांनी ३१ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. या तेजीमुळे एकाच दिवसात ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या मूल्यात कोट्यवधी रुपयांची कागदोपत्री वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या ११ दिवसांच्या काळात चीनमधील शेनझेन शहरात झालेल्या घडामोडीही लक्षात घ्याव्या लागतील. चीनमधील हे अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. हुआवेईसारख्या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीचे आणि बीवायडीसारख्या मोटार उद्योगातील कंपनीचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. याच शेनझेनमध्ये डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी चीनशी जुळवून घेण्याची भूमिका स्वीकारल्याचे दिसते. हुआंग यांच्या पुनरागमनाकडेही या बदलत्या राजनैतिक वातावरणाच्या संदर्भात पाहता येईल. वस्तुतः, अमेरिकेने गेल्या दोन दशकांपासून चीनला सामरिक प्रतिस्पर्धी मानून आपले परराष्ट्र आणि संरक्षण धोरण आखले होते. जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षपदाच्या काळापासून हे धोरण सातत्याने पुढे गेले. कोंडोलीझा राईस अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असतानाही चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यावर भर देण्यात आला होता. या धोरणानुसार भारताला चीनचा काऊंटरवेट म्हणून पुढे आणण्यात आले. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक सहकार्य वाढवण्यामागे चीनचा वाढता प्रभाव हे एक महत्त्वाचे कारण होते. मात्र, आता ट्रम्प या पारंपरिक धोरणाला मुरड घालताना दिसत आहेत. चीनशी मैत्री करण्याचा आणि त्याच्याशी संघर्ष टाळण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. एनव्हिडिया नाट्य हा त्याचा ढळढळीत पुरावा म्हणून पाहावा लागेल.
ट्रम्प यांच्या या भूमिकेमागे अमेरिकेतील अंतर्गत राजकीय परिस्थितीही महत्त्वाची आहे. मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट तसेच प्रतिनिधिगृहात आपली ताकद वाढवली. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर आगामी काळात राजकीय दबाव वाढण्याची शयता आहे. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण क्षेत्रात काही ठोस यश मिळवणे त्यांच्यासाठी आवश्यक बनले आहे. आखाती संघर्षामुळे अमेरिकेत महागाई कडाडली आहे. या परिस्थितीचा राजकीय फटका ट्रम्प यांना बसू शकतो. त्यामुळे चीनशी संबंध सुधारून आर्थिक आघाडीवर काही दिलासा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.
सुरुवातीला ट्रम्प यांनी चीनवर १४९ टक्के आयात शुल्क लावले होते. मात्र, काही दिवसांतच हे शुल्क मागे घेण्याची वेळ आली. यामागचे कारण अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व हे आहे. अमेरिकेला आपल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन करायचे आहे. उत्पादन क्षेत्राला चालना द्यायची आहे. अमेरिकेतच अधिक वस्तूंचे उत्पादन व्हावे, यासाठी ट्रम्प प्रयत्न करीत आहेत. मात्र, या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या जागतिक पुरवठा साखळीवर चीनचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे चीनशी संघर्ष करून अमेरिकेला आपले औद्योगिक उद्दिष्ट साध्य करता येणार नाही, ही वस्तुस्थिती ट्रम्प यांच्या लक्षात आली आहे.दुर्मीळ खनिजांच्या पुरवठा साखळीवरही चीनचे मोठे नियंत्रण आहे. सेमीकंडटर, मायक्रोचिप, क्षेपणास्त्रे आणि विविध संरक्षण उपकरणांच्या निर्मितीसाठी या खनिजांची आवश्यकता असते. अमेरिकेकडे मायक्रोचिप निर्मितीचे प्रगत तंत्रज्ञान आहे; परंतु त्यासाठी लागणार्या दुर्मीळ खनिजांच्या पुरवठ्याच्या बाबतीत चीनचे वर्चस्व आहे. चीनने या खनिजांच्या पुरवठ्यावर निर्बंध आणले, तर अमेरिकेच्या औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रासमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. हुआंग यांच्या पुनरागमनाला धोका नसल्याचे सांगणे ही अमेरिकेची आगतिकता म्हणावी लागेल.
याच आगतिकतेमुळे आगामी दोन वर्षांत डोनाल्ड ट्रम्प चीनशी संघर्ष करण्यापेक्षा जुळवून घेण्याला अधिक प्राधान्य देऊ शकतात. चीनच्या आर्थिक आणि औद्योगिक सामर्थ्यामुळे अमेरिकेला त्याच्याशी थेट संघर्ष करणे कठीण झाले आहे. गेल्या दोन दशकांपासून चीनला रोखण्यासाठी आखलेली रणनीती आता आर्थिक वास्तवाच्या कसोटीवर तपासली जात आहे. हुआंग यांचे पुनरागमन म्हणजे अमेरिका चीनशी कशा प्रकारे संबंध ठेवणार आहे, याचे संकेत देणारे आहे. अमेरिकेने चीनला सामरिक प्रतिस्पर्धी मानण्याचे धोरण पूर्णपणे सोडले आहे, असे म्हणता येणार नाही; मात्र चीनशी संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प किती दूर जाऊ शकतात, याची झलक या प्रकरणातून नक्कीच दिसते.