Mahatma Jotirao Phule: महात्मा फुलेंच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उलगडणारी नऊ अल्पचरित्रे

Mahatma Jotirao Phule Biographies: महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित झालेला ‘महात्मा फुले यांची नऊ जुनी अल्पचरित्रे (१८९१-१९३९)’ हा ग्रंथ त्यांच्या जीवनातील अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकतो.
Mahatma Jotirao Phule Biographies
Mahatma Jotirao Phule BiographiesPhule
Published on
Updated on

Mahatma Jotirao Phule Nine Biographies: महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्माची द्विशताब्दी ११ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे. अशा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर श्रद्धा कुंभोजकर आणि बापूराव घुंगरगांवकर यांनी संपादन केलेली ‘महात्मा फुले यांची नऊ जुनी अल्पचरित्रे (१८९१-१९३९)’ पुनर्प्रकाशित झाली आहेत. महात्मा फुले यांच्यावरील उपलब्ध साहित्याच्या गर्दीत ही अल्पचरित्रे विशेष ठरतात, कारण ती केवळ चरित्रसंग्रह नाहीत, तर इतिहास, स्मृती, समाजसुधारणा आणि संशोधन यांचा संगम आहेत. फुले यांच्या निधनानंतरच्या जवळपास पन्नास वर्षांच्या कालखंडात लिहिलेली आठ मराठी आणि एक इंग्रजी अशी नऊ दुर्मिळ अल्पचरित्रे प्रथमच एकत्रितपणे या ग्रंथातून वाचकांसमोर येत आहेत.

महात्मा फुले यांच्याविषयी आज अनेकांना माहिती आहे. स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेविरोधातील लढवय्ये, सावित्रीबाई फुले यांचे सहकारी अशी त्यांची ओळख सर्वदूर पोहोचलेली आहे. मात्र त्यांच्या जीवनातील अनेक तपशील, त्यांच्या कार्यातील सूक्ष्म पैलू आणि समकालीन लोकांनी त्यांच्याकडे कसे पाहिले, हे जाणून घेण्यासाठी ही जुनी चरित्रे अत्यंत महत्त्वाची ठरतात.

या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ऐतिहासिक संदर्भमूल्य. इतिहासकारांसाठी समकालीन स्रोतांना विशेष महत्त्व असते. कारण त्यामध्ये नंतरच्या काळातील कल्पनारंजन किंवा गौरवीकरणापेक्षा त्या काळातील प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षणे नोंदवलेली असतात. या ग्रंथातील पहिले चरित्र १८९१ मध्ये लिहिले गेले आहे. म्हणजे महात्मा फुले यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांची आठवण जपण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. त्यामुळे या चरित्रांमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांच्या, अनुयायांच्या आणि समकालीन लेखकांच्या नजरेतून दिसणारे जोतीराव आपल्याला भेटतात.

Mahatma Jotirao Phule Nine Biographies
Mahatma Jotirao Phule Nine BiographiesPudhari

शास्त्री नारो बाबाजी महाधट पाटील यांनी लिहिलेले ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ हे चरित्र विशेष उल्लेखनीय आहे. कारण यात प्रथमच महात्मा फुले यांची अचूक जन्मतारीख ११ एप्रिल १८२७ अशी नोंदवण्यात आली आहे. याच चरित्रातून त्यांच्या वंशावळीची तपशीलवार माहिती मिळते. आजी- पणजींची नावे, कुटुंबाचा इतिहास, शिक्षणाची सुरुवात, त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांच्या तारखा यांचे संदर्भ येथे आढळतात. संशोधकांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

या चरित्रांमधून महात्मा फुले यांच्या आयुष्यातील अनेक अशा व्यक्ती समोर येतात ज्यांचा उल्लेख मुख्य प्रवाहातील इतिहासात फारसा आढळत नाही. सगुणाबाई क्षीरसागर, गफ्फारबेग मुन्शी, लेजिटसाहेब, धोंडिराम नामदेव कुंभार, बाळ पाटील सेलार यांसारख्या व्यक्तींनी फुले यांच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. समाजसुधारणा ही एका व्यक्तीची कामगिरी नसून ती अनेक सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून उभी राहते, याची जाणीव या चरित्रांमुळे होते.

या ग्रंथातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे फुले यांच्या कार्याचा व्यापक पट. स्त्रीशिक्षण आणि सत्यशोधक समाज या पलीकडेही त्यांनी अनेक क्षेत्रांत काम केले. विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी विहीर खुली करणे, सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रम, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, शिवजयंती उत्सवाची सुरुवात अशा अनेक उपक्रमांची माहिती या चरित्रांतून मिळते. त्यामुळे फुले यांचे व्यक्तिमत्त्व अधिक व्यापक आणि बहुआयामी स्वरूपात उलगडते.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून महात्मा फुले यांच्या सार्वजनिक प्रतिमेतील बदल समजून घेता येतो. १८९१ ते १९३९ या काळात विविध लेखकांनी त्यांच्याविषयी लिहिले. प्रत्येक लेखकाचा सामाजिक, राजकीय आणि वैचारिक संदर्भ वेगळा होता. त्यामुळे कुणी त्यांना समाजसुधारक म्हणून पाहिले, कुणी धर्मसुधारक म्हणून, तर कुणी क्रांतिकारक विचारवंत म्हणून गौरवले. अनंत एकनाथ गवंडी यांनी त्यांना ‘महाराष्ट्राचा मार्टिन ल्यूथर’ म्हटले. या विविध प्रतिमांमधून एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची समाजातील प्रतिमा समजून घेता येते.

या ग्रंथाचे संपादक श्रद्धा कुंभोजकर आणि बापूराव घुंगरगांवकर यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी केवळ दुर्मिळ साहित्य एकत्र आणले नाही, तर त्यामागील ऐतिहासिक संदर्भ, लेखकांची पार्श्वभूमी आणि या चरित्रांचे संशोधनमूल्यही अधोरेखित केले आहे. अनेक चरित्रे दुर्लक्षित होती. काहींचा उल्लेख होत होता, पण मूळ प्रत मिळत नव्हती. अशा साहित्याचे संपादन करणे म्हणजे इतिहास संशोधनात एक महत्त्वाची भर आहे.

महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दीच्या निमित्ताने हा ग्रंथ प्रकाशित होणे याला विशेष महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षण, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता, जातिव्यवस्थेचे प्रश्न आणि लोकशाही मूल्ये यांवर नव्याने चर्चा होत असताना फुले यांचे विचार अधिकच समकालीन वाटतात.

‘महात्मा फुले यांची नऊ जुनी अल्पचरित्रे (१८९१-१९३९)’ हा ग्रंथ महात्मा फुले यांना नव्याने समजून घेण्याची संधी देतो. तो केवळ चरित्रांचा संग्रह नाही; तो महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा, सत्यशोधक चळवळीचा आणि आधुनिक भारताच्या घडणीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक अशा सर्वांसाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. महात्मा फुले यांच्या विचारांची आणि कार्याची मुळे शोधायची असतील, तर या ग्रंथाचे वाचन अपरिहार्य आहे.

  • पुस्तक: महात्मा फुले यांची नऊ जुनी अल्पचरित्रे (१८९१-१९३९)

  • संपादन: श्रद्धा कुंभोजकर, बापूराव घुंगरगांवकर

  • प्रकाशन: इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

  • किंमत: 250 रुपये

  • अधिक माहितीसाठी: sppuhistorylibrary@gmail.com

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news