MPSC Paper Leak Case | एमपीएससीलाही पेपरफुटीचे ग्रहण

MPSC Paper Leak Case |
MPSC Paper Leak Case | एमपीएससीलाही पेपरफुटीचे ग्रहण
Published on
Updated on

गणेश खळदकर

गेल्या वर्षभरात विविध परीक्षांचे पेपर फुटले. एमपीएससीचेही पेपर फुटतील असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं. यामध्ये एमपीएससीतीलच काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा एमपीएससीवरचा देखील विश्वास उडाला आहे.

केवळ कला शाखाच नाही, तर अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीयचे उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षांचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातच सध्या पेपरफुटीचे लागलेले ग्रहण, परीक्षांचे बेभरोशी वेळापत्रक आणि नैराश्यातून स्पर्धा परीक्षार्थींवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे धाराशिवचा प्रथमेश देशमुख आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेपेक्षा पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात करिअर करावे आणि एमपीएससी हा 'प्लॅन बी’ ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.

गेल्या वर्षभराचा विचार केला, तर विविध परीक्षांचे पेपर फुटले; परंतु राज्यांमध्ये एकमेव विश्वासार्ह परीक्षा म्हणजे एमपीएससीची होती. एमपीएससीचे पेपर फुटतील असं स्वप्नातही कुणाला वाटलं नव्हतं; परंतु गेल्या वर्षभरात एमपीएससीलादेखील पेपर फुटीचे ग्रहण लागले. यामध्ये एमपीएससीतीलच काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा एमपीएससीवरचादेखील विश्वास उडाला आहे. यातूनच तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून राज्यभरात आंदोलने होत आहेत. सनदी नोकरी ही एकीकडे शाश्वत नोकरी असली, तरी त्या माध्यमातून वेगळ्या मार्गाने पैसा कमवून श्रीमंत होण्याचा प्रयत्न अनेक अधिकारी करताना दिसतात. त्यामुळे श्रीमंत व्हायचे असेल, नाव कमवायचे असेल, तर सरकारी नोकरीशिवाय पर्याय नाही, असे तरुणांना वाटते. त्यामुळेच नोकरीच्या जागा फारच कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी लाखो तरुण स्पर्धा परीक्षा देताना दिसून येतात. एकीकडे स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी, वाढते वय आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे तरुणांनादेखील शॉर्टकटने सरकारी नोकरीत जाण्याचा हव्यास असतो. त्यालाच सरकारमधीलच काही अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळते आणि यातूनच पेपरफुटीचा उगम होतो. परीक्षा होण्याअगोदरच प्रश्नपत्रिका तरुणांच्या हातात पोहोचतात आणि पेपरफुटी झाल्याचे लक्षात येताच अन्य स्पर्धा परीक्षार्थींचा तीव्र असंतोष उफाळून येतो. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते तरुण याला बळी पडतात; परंतु आर्थिक परिस्थितीने पिचलेल्या तरुणांनी नेमके काय करायचे, असा यक्ष प्रश्न निर्माण होतो. हे सध्याच्या सडलेल्या परीक्षा व्यवस्थेचे वास्तव आहे.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शाश्वत नोकरीची संधी मिळत असल्यामुळे आणि तशा प्रकारची संधी खासगी क्षेत्रात उपलब्ध नसल्यामुळे उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या आशेने स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे पुण्यासह राज्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे, तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या संधी या एक हजारातदेखील उपलब्ध होत नाहीत. जागा उपलब्ध झाल्या, तर परीक्षा वेळेत होत नाहीत. परीक्षा झाली, तर निकाल वेळेत लागत नाही आणि लागलाच निकाल लवकर तर वर्षे-दोन वर्षे नियुक्ती मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थी वैफल्यग्रस्त होतात आणि त्यातूनच काही तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत.

सनदी नोकरीच्या मोहापायी पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेऊन ऐन तारुण्यात पंचवीशीतील मुले-मुली स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करतात. बघता बघता दहा-पंधरा वर्षांचा कालावधी निघून जातो. यामध्ये काही विद्यार्थ्यांना यशदेखील मिळते; परंतु असंख्य विद्यार्थ्यांना पुढील संधीची वाट पाहावी लागते. पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांचाच अभ्यास करत असल्यामुळे कोणतीही नोकरी ते करत नाहीत. त्यामुळे वयाची पस्तीशी-चाळीशी कधी येते, हे त्यांनादेखील कळत नाही. अधिकारी झाल्याशिवाय लग्नच करणार नाही असा चंगच मुले-मुली बांधतात. त्यामुळे वय उलटून जाते; मात्र अनेकांना यश मिळत नाही. वय जास्त झाल्यामुळे लग्न जुळत नाहीत, तर उच्च शिक्षण घेतलेले असूनही केवळ कोणताही अनुभव नसल्यामुळे नोकरीची संधीदेखील मिळत नाही. त्यामुळे नोकरीही नाही अन् लग्नही नाही अशा गंभीर समस्येच्या विळख्यात तरुण सापडले आहेत.

शाश्वत नोकरीचा पर्याय म्हणून उच्चशिक्षित तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांकडे वळतात. स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपानुसार पूर्व परीक्षा पात्र झाल्यानंतर मुख्य परीक्षा द्यायची आणि मुख्य परीक्षा पात्र झाल्यानंतर मुलाखतीला सामोरे जायचे असते; परंतु मुलाखतीत संबंधित विद्यार्थी पात्र झाला नाही, तर त्याला नव्याने सुरुवात करावी लागते. यामध्ये अनेक विद्यार्थी असे असतात की, मुलाखतीपर्यंत जातात; परंतु त्यात अपयश आले की, त्यांना पुन्हा पूर्वपरीक्षादेखील उत्तीर्ण होता येत नाही. काही विद्यार्थी पूर्व परीक्षा पात्र होतात; परंतु अनेक वर्षे त्यांना मुख्य परीक्षाच पास होता येत नाही. काही विद्यार्थी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा पास होतात; परंतु मुलाखतीत त्यांना पात्र होता येत नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने या सर्वच विद्यार्थ्यांना नवीन संधीची वाट पाहावी लागते.

देशाचे भविष्य तरुणाई आहे, असे सांगितले जाते; परंतु ही तरुणाई कौशल्याभिमुख असावी, व्यवसाय किंवा नोकरी करणारी असावी यासाठी कोणतेही धोरण तयार केले जात नाही. त्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगारांचे लोंढे तयार होतात आणि घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर कुठेच नोकरी नाही म्हणून स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थी वळतात. त्यामुळे सरकारच युवा धोरणाबाबत उदासीन असल्याचे दिसते. बेरोजगारांच्या या लोढ्यांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news