

यादवकाळात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. या राजभाषेचा विकास करण्याचे कार्य महानुभाव पंथातील अनेकांनी केले. त्यांच्या साहित्याचा वारसा संत ज्ञानेश्वरांनी पुढे नेला. संत नामदेव, संत तुकाराम महाराजांच्या रचनांनी भक्तीची परंपरा जनसामान्यांपर्यंत पाझरवण्याचे काम केले. 27 फेब्रुवारी रोजी होणार्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने...
मराठी ही अनेक स्थित्यंतरे आणि उत्क्रांतीनंतर तयार झालेली समृद्ध अशी भाषा आहे. मराठी भाषेची उत्पत्ती प्राकृतात असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. प्राकृत भाषेत लिहिला गेलेला ‘गाथा सप्तशती’ हा आद्य ग्रंथ आणि यातील भाषा ही अस्सल महाराष्ट्राची, गोदावरी खोर्यातील आहे. महाराष्ट्र प्रदेशावर साडेचारशे वर्षे राज्य करणार्या सातवाहन कुलातील राजा हाल याने हा ग्रंथ लिहिला. मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथील श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंग राजे सुत्ताले करवियले हा आहे; तर रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील आक्षी येथे सापडलेला शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी म्हटले आहे. एकूणच कर्नाटकातील चावुण्ड राजांचा, गंग राजांचा काळ आणि महाराष्ट्रातील शिलाहार राजांच्या काळात मराठी भाषा लिखित स्वरूपात वापरात होती, असे दिसून येते. त्याही आधी ‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. 859) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे हे त्यात दोन ओळीत सांगितले आहे. ‘सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला। मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती॥’ सहाव्या शतकातील वाहर मिहिरच्या बृहत्द संहितेत महाराष्ट्र देशाचा उल्लेख पाहावयास मिळतो; तर महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख महानुभाव लेखक डिंबकृष्णमुनी यांनी केला आहे. ‘विंध्याद्रीपासौनि दक्षिणदिशेसी। कृष्णनदीपासौनि उत्तरेसी॥ झाडीमंडळापासौनि पश्चिमेसि। महाराष्ट्र बोलिजे॥’ असा महाराष्ट्र प्रदेश असल्याचे ते सांगतात. याशिवाय मराठीच्या वापराची उदाहरणे आपल्याला दिवे आगर, पंढरपूर येथील ताम्रपटांतून पाहावयास मिळतात.
यादवकाळात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. या राजभाषेचा विकास करण्याचे कार्य महानुभाव पंथातील अनेकांनी केले. श्री गोविंदप्रभू, भटोबास, केसोबा, डिंबकृष्णमुनी यांनी मराठीला आकार दिला. पंथीयांच्या अनेक साहित्यातून मराठी समृद्ध होत गेली. त्यामध्ये म्हाईंभटांचे लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्र किंवा ऋद्धिपूरचरित्र, केशिराजबास यांचे द़ृष्टांतपाठ, सिद्धांतसूत्रपाठ, बाईदेवबास यांचे पूजावासर, नरेंद्रस्वामी यांचे रुक्मिणीस्वयंवर, भास्करभट्ट यांचे शिशुपाळवध, उद्धवगीता, दामोदरपंडित यांचे वच्छाहरण, रवळोबास यांचे सह्याद्री माहात्म्य, नारो बहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन, विश्वनाथ पंडित यांचे ज्ञानप्रबोध यासह स्थानपोथी, वृद्धाचार, मार्गरुढी, चरित्र अबाब, महदबेचे धवळे अशा ग्रंथांचा समावेश आहे. महानुभाव साहित्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांकेतिक लिपीचा वापर. या वापरामुळेच अनेक वर्षे हे साहित्य सामान्यांपासून लांब राहिले; पण याचमुळे हे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत आज आपल्याला उपलब्ध झाले. यादवकाळात 12 व्या शतकात महानुभाव पंथ उदयास आला. या पंथाने पंथीयांना मार्गदर्शन करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली. या साहित्यातूनच आधुनिक मराठीला आकार मिळत गेला. यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायाने मराठी अधिक समृद्ध केली.
महानुभाव सांप्रदायाने महाराष्ट्राला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे समृद्ध साहित्य. पंथीयांच्या या साहित्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल असा ग्रंथ म्हणजे स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भ्रमण केले त्याची भौगोलिक माहिती देणारा ग्रंथ म्हणजे स्थानपोथी. यादवकालीन महाराष्ट्र समजून घेताना स्थानपोथीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एकूणच या ग्रंथाच्या माध्यमातून आपणास यादवकाळातील महाराष्ट्राचा भूगोल, संस्कृती, जीवनपद्धती, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, व्यवहार, प्रशासन, घर बांधणी, व्यापार व व्यवसाय याविषयी सविस्तर माहिती मिळते.
लीळाचरित्र : लीळाचरित्र महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधरयांच्याविषयीच्या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला महत्त्व आहे. महिंद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. याचा रचनाकाल 1178 च्या आसपासचा आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून आले आहे. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा उत्तम नमुनाच होय.
ऋद्धिपूरलीळा ऊर्फ गोविंदप्रभूचरित्र : ऋद्धिपूरचे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू ऊर्फ गुंडमराऊळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाईंभटांनी गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा ऊर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. रचना इ.स. 1288. एकूण 325 लीळा. प्राचीन वर्हाडी भाषेच्या अभ्यासाचे हा ग्रंथ हे एक उपयुक्त साधन आहे.
द़ृष्टांतपाठ : हा मराठीतील पहिला कथासंग्रह आहे. द़ृष्टांत म्हणजे छोटीशी बोधगर्भ कथा होय. प्रत्येक द़ृष्टांत स्वतंत्र, रोचक आहे. विचारप्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाजजीवनाचे निरीक्षण या सर्वच गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्व आहे. चक्रधरांचे तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा मराठीतून मांडणे व अध्यात्मासारखे शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणे हे केशिराजाचे मोठे कार्य. द़ृष्टांतपाठ हा फक्त तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही, तर लोककथांचे मराठीतील पहिले संकलन आहे.
रुक्मिणीस्वयंवर : नरेंद्रस्वामींनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे मराठीतील पहिले शृंगारिक आख्यानकाव्य. काव्यद़ृष्ट्या व कालद़ृष्ट्या साती ग्रंथांमधील पहिल्या क्रमांकाचा ग्रंथ. हे भक्तीतून उमललेले विदग्ध काव्य आहे. ज्या यादवकाळात रुक्मिणीस्वयंवर लिहिले गेले, त्या काळात मराठी वाङ्मयाच्या भावसृष्टीवर श्रीकृष्णाच्या विभूतिमत्त्वाचे अधिराज्य होते. या काव्याची रचना संस्कृतमधील महाकाव्यांच्या धर्तीवर आहे. वर्णनाची विपुलता व कथानकाची मंदगती यांचा प्रत्यय येतो. रुक्मिणीस्वयंवराच्या कथेवर अनेकांनी रचना केली; पण नरेंद्राची सर कुणालाच आली नाही. खरीखुरी कलावंताची द़ृष्टी असणारा नरेंद्र हा मराठीतील पहिला कवी आहे.
शिशुपालवध : कर्ता भास्करभट्ट बोरीकर. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आले आहे. वीरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचे संस्कार या ग्रंथात अधिक आढळतात.
उद्धवगीता : कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते.
वछाहरण : कर्ता दामोदर पंडित. दामोदरपंडिताचा कवित्वाचा विलास वृंदावनवर्णन, यमुनावर्णन, श्रीकृष्णमूर्तीवर्णन यामधून प्रकर्षाने जाणवतो. श्रीकृष्णवर्णन आणि पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार हे दुहेरी कार्य दामोदरांनी साधले आहे.
सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन : सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन हा महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता रवळोबास. लेखनसमाप्तिकाल शके 1570 कीलक संमत्सर. मूळ ग्रंथ शके 1254 ते 1275 यादरम्यान केव्हा तरी लिहिला गेला असावा. सैह्याद्रवर्णन काव्यातील सह्याद्री म्हणजे माहूरचा डोंगर. पश्चिम घाटावरील सह्याद्री डोंगराशी या काव्यातील सह्याद्रीचा काही संबंध नाही. सैह्यादी-माहात्म्य हे काव्य, कवीचे वर्णनचातुर्य, त्याची प्रतिभासृष्टी आणि काव्यातला रसाविष्कार या द़ृष्टीने वाचले, तर रवळोबास हे एक एक प्रतिभावंत कवी होते, असे प्रत्ययास येते.
ज्ञानप्रबोध : महानुभावांच्या ग्रंथांपैकी एक. कर्ता विश्वनाथ. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगम; वैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.
अशा वैविध्यपूर्ण ग्रंथांच्या लिखाणातून पंथीयांनी मराठीचे साहित्य विश्व प्राचीनकाळी समृद्ध केले आहे. त्यांच्या साहित्याचा वारसा पुढील काळात संत ज्ञानेश्वरांनी पुढे नेला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी अशा ग्रंथांनी मराठी भाषेतील साहित्याला वेगळ्या उंचीवर नेले; तर त्यानंतर संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांनी केलेल्या रचनांनी भक्तीची परंपरा जनसामान्यांपर्यंत पाझरवण्याचे काम केले.