

वयाच्या ३९व्या वर्षी २०७ आंतरराष्ट्रीय सामने आणि १२५ गोलसह लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाचा अध्याय बंद केला. महान खेळाडूंच्या कारकिर्दीला शेवट असतो; पण त्यांच्या आठवणींना नसतो. मेस्सी आता अर्जेंटिनाची जर्सी घालणार नाही. यापुढे ज्या ज्या वेळी अर्जेंटिना मैदानात उतरत राहील, त्या त्या वेळी अर्जेंटिनाला या सुपरस्टारची उणीव प्रकर्षाने जाणवत राहील. कारण, कॅनव्हास समोर असला, तरी तो रंगवणारा एक डावा पाय मात्र थांबला आहे. भले पुढली पिढी आता त्यावर नवे रंग भरेल; पण त्या कॅनव्हासवर उमटलेले एक नाव पुसणे कोणालाही शक्य होणार नाही, ते म्हणजे लिओनेल मेस्सी.
काही निरोप हे फक्त निरोप नसतात. तो एका युगाचा शेवट असतो. लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या निळ्या-पांढऱ्या जर्सीला अखेरचा सलाम केला आणि अवघे फुटबॉल विश्व ढवळून निघाले. खरं तर, २०२६च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्पेनकडून १-० असा पराभव झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने निवृत्तीचे पत्र लिहिले होते; पण तो निर्णय जाहीर करण्याची वेळ त्याने पुढे ढकलली. वडील जॉर्ज मेस्सी यांच्या ऑगस्टमधील निधनानंतर मात्र त्याने मनाशी खुणगाठ बांधली आणि जड अंतकरणाने आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा निर्णय इन्स्टाग्रामवरून जाहीर केला.
अर्जेंटिनाच्या जर्सीतील २१ वर्षांचा प्रवास त्या क्षणाला संपला. आता अर्जेंटिना खेळत राहील. नवे खेळाडू येतील. नव्याने गोल होतील. नवे विक्रमही रचले जातील; पण एक प्रश्न मात्र कायम राहील, संकटाच्या क्षणी आता चेंडू कुणाकडे द्यायचा? कारण, अर्जेंटिनासाठी मेस्सी केवळ दहा नंबरची जर्सी नव्हता. तो आश्वासक खेळाडू होता. मैदानावर काहीही बिनसले, तरी शेवटच्या क्षणी कुठून तरी एक वाट निघेल, एक पास सुटेल, एक डाव्या पायाचा फटका गोलजाळ्याचा अचूक वेध घेईल, हा विश्वास होता.
मेस्सीचा खेळ समजावून सांगण्यासाठी फुटबॉलची नेहमीची भाषा अपुरी पडते. तो ड्रिबल करायचा; पण ते केवळ ड्रिबलिंग नसायचे. तो बचावपटूला चकवायचा; पण ती केवळ चकवाचकवी नसायची. त्याच्या डाव्या पायातून जणू रेषा उमटायच्या आणि त्या रेषांनी काही क्षणांत संपूर्ण चित्र तयार व्हायचे. समोर दोन खेळाडू असोत किंवा चार. जागा असो वा नसो. चेंडू पायाशी आला की, मेस्सीला वाट दिसायची. इतर खेळाडू मैदानावर जागा शोधायचे. मेस्सी जागा निर्माण करायचा. त्याची खरी जादू वेगात नव्हती, ती विचार करण्याच्या वेगात होती. इतरांना पुढचा पास दिसत असताना मेस्सीला त्यापुढचा पास दिसायचा. प्रतिस्पर्ध्याला स्वतःच्या हालचालीचा अंदाज येण्यापूर्वीच मेस्सी पुढे निघून गेलेला असायचा. म्हणूनच त्याचा खेळ पाहताना अनेकदा वाटायचे, बाकीचे खेळाडू फुटबॉल खेळत आहेत आणि मेस्सी फुटबॉलशी संवाद साधत आहे.
अर्जेंटिनासाठी मात्र ही वाट नेहमीच सोपी नव्हती. मेस्सीला बार्सिलोनात देवासारखे मानणाऱ्या जगाने अर्जेंटिनाच्या जर्सीत मात्र त्याच्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले. अंतिम सामने हरले. टीका झाली. २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली; पण देशासाठी खेळण्याची ओढ त्याला पुन्हा घेऊन आली आणि मग त्याने अर्जेंटिनाची कथा बदलली. त्याने धडाधड काही स्पर्धा एकहाती जिंकून दिल्या. २०२१ ची कोपा अमेरिका. २०२२ चा विश्वचषक. २०२४ ची कोपा अमेरिका. ज्याच्यावर ‘अर्जेंटिनासाठी जिंकत नाही’ अशी टीका झाली होती, त्याच मेस्सीने अखेर अर्जेंटिनाला जगाच्या शिखरावर नेले. कतारमध्ये विश्वचषकाची ट्रॉफी उचलताना त्याने केवळ एक कप जिंकला नव्हता. त्याने स्वतःभोवती वर्षानुवर्षे बांधले गेलेले अपयशाचे वर्तुळ तोडले होते. तेव्हा कदाचित मेस्सी आणि अर्जेंटिना दोघांनाही जाणवले असेल, आता काहीच बाकी नाही; पण फुटबॉलमध्ये काहीच संपत नाही.
पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून जात असताना २०२६ मध्ये तो पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला. यावेळी मात्र नियतीने वेगळे चित्र रंगवले. स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला. तीच मेस्सीची अर्जेंटिनासाठी अखेरची लढत ठरली. जगाच्या फुटबॉलवर अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू मैदानाबाहेर मात्र प्रसिद्धीपासून कायम काहीसा दूर राहिला. त्याच्या पायातील जादूइतकाच त्याचा साधेपणा लोकांना भावला. तो ओरडत नसे. स्वतःची जाहिरात करत नसे. स्वतःला महान म्हणवत नसे. त्याचे उत्तर मैदान देत होते. म्हणूनच अर्जेंटिनाचा मेस्सीशी असलेला संबंध केवळ फुटबॉलचा नव्हता. तो भावनेचा होता.
एक पिढी त्याला पाहत मोठी झाली. मुलांनी त्याच्यासारखे केस केले. त्याच्यासारखी जर्सी घातली. त्याच्यासारखा डावा पाय वापरण्याचा प्रयत्न केला; पण मेस्सी होणे कुणालाच जमले नाही. कारण, मेस्सीची नक्कल करता येते; मेस्सी निर्माण करता येत नाही. साहजिकच मेस्सी निवृत्त झाल्यानंतर अर्जेंटिनासमोर आजच्या घडीला एकच प्रश्न उभा ठाकतोय, आता काय? खरं तर, मेस्सीच्या जागी दुसरा मेस्सी शोधणे हीच सर्वांत मोठी चूक ठरेल. कारण, इतिहासात काही खेळाडूंच्या जागा भरल्या जात नाहीत, त्या फक्त स्वीकारल्या जातात.
अर्जेंटिनाकडे प्रतिभा आहे. तरुण खेळाडू आहेत. विश्वचषक विजेत्या पिढीचा अनुभव आहे; पण आता त्यांना एक गोष्ट स्वतःला शिकवावी लागेल, ‘मेस्सी आहे ना!’ या विश्वासाशिवाय जिंकणे. कारण, मेस्सी असताना अर्जेंटिनाला आशा असायची. तो डावा पाय काही तरी जादू दाखवेल, हा विश्वास असायचा. ती आशा, तो विश्वास आता नसेल. आता फक्त त्याच्या आठवणी असतील. फुटबॉलच्या कॅनव्हासवर मेस्सीने रेखाटलेल्या सुरेल आठवणी!
आजार, संघर्ष आणि महान मेस्सी!
मेस्सीच्या कथेची सुरुवातच एका संघर्षाने झाली. बालपणी त्याला ‘ग्रोथ हार्मोन डेफिसिएन्सी’ या आजाराचा सामना करावा लागला. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या हार्मोनची कमतरता असल्यामुळे त्याची शारीरिक वाढ अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. तेराव्या वर्षी तो बार्सिलोनात पोहोचला, तेव्हा त्याच्या अंगकाठीकडे पाहून कुणालाही भविष्यातील महानायक दिसत नव्हता; पण त्याच्या पायाशी चेंडू आला की, सगळे प्रश्न संपायचे. छोटे शरीर आणि मोठी स्वप्ने यांच्यामध्ये त्याचा डावा पाय पूल बनला. बार्सिलोनाने त्याच्यावर विश्वास ठेवला. उपचारांचा खर्च उचलला आणि पुढची वाटचाल फुटबॉलच्या इतिहासातील सर्वांत सुंदर कथांपैकी एक ठरली.
पहिला करार चक्क नॅपकिनवर
फुटबॉल जगतात लिओनेल मेस्सीचा बार्सिलोना क्लबसोबत झालेला पहिला करार हा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा रंजक मानला जातो. आश्चर्य म्हणजे, हा करार कोणत्याही अधिकृत कागदपत्रावर नसून एका साध्या कागदी नॅपकिनवर लिहिला गेला होता. झाले असे की, डिसेंबर २००० च्या सुमारास मेस्सी अर्जेंटिनामधील न्यूवेल्स ओल्ड बॉईज क्लबकडून खेळत होता. याचवेळी बार्सिलोना क्लबचे तत्कालीन क्रीडा संचालक कार्ल्स रेक्साच यांच्या नजरेस त्याचा खेळ पडला आणि त्यांनी त्याला स्पेनमध्ये बोलावून चाचणी घेतली.
मेस्सीच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या रेक्साच यांना त्याला तत्काळ क्लबशी जोडायचे होते; परंतु बार्सिलोनाचे इतर संचालक अजूनही मेस्सीच्या वयाबद्दल आणि उपचारांच्या खर्चानुसार गुंतवणूक करण्याबाबत साशंक होते. याचदरम्यान, बार्सिलोना येथील ‘पॉम्पेया’ टेनिस क्लबच्या रेस्टॉरंटमध्ये कार्ल्स रेक्साच, मेस्सीचे एजंट जोसेप मारिया मिन्गुएला आणि स्थानिक व्यावसायिक होसप मारिया गास्टेला यांची बैठक झाली. वेळ न घालवता मेस्सीला पक्के करण्यासाठी रेक्साच यांनी तिथल्या टेबलवरील एका पिवळसर कागदी नॅपकिनवर पेनने लिहून सही केली आणि त्याचा पहिलावहिला ऐतिहासिक करार नॅपकिनवर संपन्न झाला. आश्चर्य म्हणजे, तो नॅपकिन बार्सिलोना क्लबने आपल्या संग्रहालयात आजही जपून ठेवला आहे.
डाव्या पायाचा विमा तब्बल साडेआठ हजार कोटींचा
मेस्सीचा खेळ बहरायचा तो डाव्या पायानेच. याचमुळे त्याने आपल्या डाव्या पायासाठी भरभक्कम रकमेचा विमा उतरवला होता. हा विमा ९०० दशलक्ष डॉलर्सच्या आसपास असल्याचे मानले जाते. भारतीय चलनात याची किंमत साधारणपणे ७,००० कोटी ते ८,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. मेस्सीच्या जादूई डाव्या पायावरच त्याचे सर्व गोल, उत्कृष्ट ड्रिब्लिंग आणि त्याची फुटबॉल कारकीर्द अवलंबून असल्याने भविष्यात दुखापतीमुळे होणाऱ्या प्रचंड आर्थिक नुकसानीपासून बचाव करण्यासाठी हा विमा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला. ख्रिस्तियानो रोनाल्डो किंवा डेव्हिड बेकहॅम यांसारख्या खेळाडूंनीही शरीराच्या अवयवांचे विमे उतरवले आहेत; परंतु मेस्सीच्या डाव्या पायाचा विमा हा क्रीडा इतिहासातील सर्वात महागड्या विम्यांपैकी एक मानला जातो.
काही रंजक बाबी!
l बार्सिलोनाशी पहिला करार आणि मद्यपी वडिलांची अट! : मेस्सीने बार्सिलोनासोबत जेव्हा पहिला अधिकृत व्यावसायिक करार केला, तेव्हा त्याच्या वडिलांनी क्लबसमोर एक अट घातली होती की, मेस्सीला दरवर्षी त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अर्जेंटिनाच्या रोसारियो शहरात विमानाने जाण्याची मोफत सोय क्लबने करून दिली पाहिजे.
l कानात बाली... कभी नही! : करिअरच्या सुरुवातीला मेस्सीला फॅशन आणि लूकबाबत फारसे कुतूहल नव्हते; पण एकदा ब्राझिलियन फुटबॉलपटू रोनाल्डिन्होने त्याला प्रेरित करून एकदा कानात बाली घालण्याचा प्रयत्न केला होता; पण मेस्सीने ते पूर्णपणे टाळले कारण त्याला साधेपणाच आवडत असे.
l दोन देशांचे नागरिकत्व आणि अर्जेंटिनाविषयीची निष्ठा : २००५ मध्ये स्पॅनिश नागरिकत्व मिळाल्यानंतर मेस्सीला स्पेनच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचे थेट आमंत्रण मिळाले होते. परंतु, अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न असल्यामुळे त्याने तो प्रस्ताव तत्काळ धुडकावून लावला आणि केवळ अर्जेंटिनाकडूनच खेळण्याचा निर्धार कायम ठेवला.
l खाण्याच्या सवयींमधील मोठा बदल : कारकिर्दीच्या पहिल्या काही वर्षांत मेस्सीला जंक फूड, सोडा आणि विशेषतः 'अर्जेंटिनी असॅडो' (मांस) आणि चॉकलेट्सचे प्रचंड व्यसन होते. परंतु, २०१४ च्या विश्वचषकानंतर त्याच्या शरीरातील वारंवार होणाऱ्या स्नायूंच्या दुखापती रोखण्यासाठी इटालियन आहारतज्ज्ञ गिुलियानो पोसेर यांच्या सल्ल्यानुसार त्याने आहार पूर्णपणे बदलला आणि साखर, मैदा व प्रक्रिया केलेले अन्न खाणे पूर्णपणे सोडले.
l मैदानावर कधीही न बोलण्याचा स्वभाव : मेस्सी मैदानावर सहसा अत्यंत शांत असतो. तो प्रतिस्पर्धी खेळाडूंशी किंवा पंचांशी क्वचितच हुज्जत घालतो. विशेषतः सामन्यादरम्यान तो सहसा जर्सी बदलत नाही. कारण, तो स्वतःहून कधीही कोणाकडे जर्सीची मागणी करत नाही. फक्त कुणी खेळाडूने येऊन विनंती केली, तरच तो आपली जर्सी देतो. हा शिरस्ताही त्याने आतापर्यंत कायम ठेवला आहे.