India Commonwealth Games | खेळातला नवा भारत

India Commonwealth Games |
India Commonwealth Games | खेळातला नवा भारत
Published on
Updated on

नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

ग्लासगो येथे पार पडलेल्या २०२६मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर क्रीडा जगतात नवा इतिहास रचला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण ३९ पदके जमा झाली. यामध्ये १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेने भारताच्या नवीन पिढीतील प्रतिभावान खेळाडूंचा झालेला उदय जगासमोर आणला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या खेळाडूंपैकी अनेकजण अत्यंत सामान्य कुटुंबांतून पुढे आले आहेत.

ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी देशातील बदलत्या क्रीडा संस्कृतीची आणि नव्या आत्मविश्वासाची साक्ष देणारी ठरली आहे. अनेक पारंपरिक भारतीय वर्चस्वाचे खेळ यंदाच्या स्पर्धांमध्ये समाविष्ट नसतानाही भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. ही कामगिरी भविष्यातील अधिक मोठ्या यशाची आशादायक नांदी मानावी लागेल. भारतीय खेळाडूंनी वारंवार तिरंगा सर्वोच्च स्थानी फडकवत १४० कोटी भारतीयांचा अभिमान उंचावला आहे.

यंदाच्या स्पर्धांमध्ये विशेषतः मुष्टियुद्ध (बॉक्सिंग), वेटलिफ्टिंग आणि ज्युडो या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे, भारताने प्रथमच बॉक्सिंगमध्ये सात सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई केली. ही कामगिरी भारतीय क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. या यशातील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे भारतीय महिला खेळाडूंचे वर्चस्व. मीराबाई चानू यांनी सुवर्णपदकाची सुरुवात केली आणि त्यानंतर शर्मिला, अस्मिता, प्रीती पवार, साक्षी चौधरी, प्रिया धंधास, अरुंधती चौधरी, जैस्मिन यांसारख्या अनेक खेळाडूंनी सुवर्णपदकांची शृंखलाच तयार केली. या पदकविजेत्या खेळाडूंनी देशातील लाखो मुलींच्या आशा पल्लवित करतानाच त्यांच्यासाठी पुढील वाट प्रशस्त केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या खेळाडूंपैकी अनेक जणी अत्यंत सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांतून पुढे आल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे त्यांच्या यशाचे महत्त्व केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित राहत नाही. ग्रामीण भागातील आणि लहान शहरांतील असंख्य मुलींना आता मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य मिळत आहे. त्याचबरोबर क्रीडा प्रशासनालाही ग्रामीण भागातील प्रतिभांचा शोध घेण्याची आणि त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची नवी प्रेरणा मिळत आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात क्रीडा संस्कृतीचा वेगाने विकास होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेसह क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये वाढलेली गुंतवणूक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध आधुनिक सुविधा आणि खेळाडूंना मिळणारे प्रोत्साहन यामुळे देशातील युवक मोठ्या प्रमाणावर क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. खेळ हा केवळ छंद न राहता सन्मान, करिअर आणि आर्थिक स्थैर्याचा मार्ग ठरू शकतो, ही जाणीव समाजात अधिक दृढ झाली आहे. भारतातील या बदलामागे क्रिकेटचाही मोठा वाटा आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यानंतर छोट्या शहरांमधून आणि ग्रामीण भागातून अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. त्यांना मिळालेली प्रसिद्धी आणि आर्थिक यश यामुळे पालकांचा खेळांविषयीचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य देणारी अनेक कुटुंबे आता मुलांना आणि विशेषतः मुलींना खेळांमध्येही प्रोत्साहन देऊ लागली आहेत. महिला खेळाडूंच्या यशामुळे समाजात आणखी एक सकारात्मक परिवर्तन घडताना दिसते. काही वर्षांपूर्वी मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रवेश करताना सामाजिक बंधने, सुरक्षिततेचे प्रश्न आणि सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारतीय मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा फडकवत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकतालिका ही त्यांच्या मेहनतीची, चिकाटीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी ठरली आहे. तथापि, या यशामध्ये काही आव्हानेही दडलेली आहेत. हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आसाम आणि मणिपूर या राज्यांमधून सातत्याने उत्कृष्ट खेळाडू घडत असताना उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक पट्ट्यातील अनेक राज्यांमधून तुलनेने कमी खेळाडू पुढे येत आहेत. याचा अर्थ त्या राज्यांमध्ये प्रतिभेचा अभाव आहे असे नाही, तर आवश्यक सुविधा, प्रशिक्षण आणि नियोजनाची कमतरता आहे.

झारखंडने हॉकी, तिरंदाजी आणि इतर खेळांमध्ये अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले आहेत. बिहारच्या सोमन राणा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पॅराशॉटपुटमध्ये जिंकलेले सुवर्णपदक हे त्या राज्यातील सुप्त प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहे. योग्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर अनेक राज्यांमधूनही जागतिक दर्जाचे खेळाडू घडू शकतात. त्यामुळे राज्य सरकारांनी क्रीडा धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पुढील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे होणार आहेत. यजमान देश म्हणून भारतासमोर मोठी जबाबदारी असेल. २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकसंख्येचा विक्रम मोडून नवा इतिहास घडविण्याची संधी भारतीय खेळाडूंसमोर असेल. त्यासाठी आतापासूनच दीर्घकालीन नियोजन, ग्रामीण भागातील प्रतिभांचा शोध, आधुनिक प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाचा अधिक प्रभावी वापर आवश्यक ठरेल. एकूणच, ग्लासगोतील भारताची कामगिरी ही देशात घडत असलेल्या सामाजिक परिवर्तनाची आणि नव्या क्रीडा संस्कृतीची पोचपावती म्हणून महत्त्वाची आहे. विशेषतः भारतीय कन्यांनी मिळवलेले यश हे नव्या भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. त्यांचा गौरव करणे, त्यांच्या यशातून प्रेरणा घेणे आणि देशभरातील प्रत्येक गुणवंत खेळाडूला संधी उपलब्ध करून देणे हीच भारताच्या उज्ज्वल क्रीडा भविष्याची खरी गुरुकिल्ली ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news