India Foreign Policy | संस्कृतींच्या संवादातून शांततेकडे...

India Foreign Policy |
India Foreign Policy | संस्कृतींच्या संवादातून शांततेकडे...
Published on: 
Updated on: 

प्रा. सतीश कुमार

जगभरात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी देशादेशांमध्ये लष्करी ताकद, आर्थिक सामर्थ्य आणि राजनैतिक दबाव वाढवण्यासाठीची स्पर्धा सुरू असताना भारताने संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा मार्ग निवडला आहे. युद्धे आणि संघर्षांनी विभागल्या जाणाऱ्या जगात विविध देशांना त्यांच्या इतिहासाच्या, विचारांच्या आणि सांस्कृतिक वारशाच्या आधारे जोडण्याचा प्रयत्न ही भारताची शांततावादी भूमिका महत्त्वाची आहे. नवी दिल्लीत पार पडलेला ‌‘एससीओ सभ्यता संवाद‌’ हा याच भूमिकेचा विस्तार आहे. भारताच्या प्राचीन वारशाचे प्रदर्शन करण्यापलीकडे जाऊन जागतिक संबंधांना सहअस्तित्वाची नवी दिशा देण्याची क्षमता या उपक्रमात आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात सामर्थ्य हा हुकमी एक्का ठरतो. सामरीक ताकद, आर्थिक वर्चस्व, व्यापारी निर्बंध आणि राजनैतिक दबाव यांच्या आधारे जगातील प्रभावशाली देश आपले हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात. या संघर्षात सांस्कृतिक संवाद, परस्परांचा इतिहास समजून घेणे आणि विविध संस्कृतींमधील साम्यस्थळे शोधणे या गोष्टी मागे पडतात. अशा परिस्थितीत नवी दिल्लीत पार पडलेला तीन दिवसांचा ‌‘एससीओ सिव्हिलायझेशन डायलॉग‌’ हा उपक्रम अभिनव आणि तितकाच महत्त्वाचा ठरला. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये संवादाचे एक वेगळे परिमाण निर्माण करण्याची क्षमता या उपक्रमात आहे. भारताने या मंचाची संकल्पना मांडणे, हे अधिक महत्त्वाचे आहे.

गतवर्षी चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्य देशांमध्ये संस्कृतीविषयक चर्चा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी स्वतंत्र मंच असावा, असा प्रस्ताव मांडला होता. किर्गिस्तानमधील बिश्केक घोषणापत्रात या प्रस्तावाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील आयोजनातून या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप मिळाले. एससीओ सदस्य देशांचा इतिहास, सांस्कृतिक परंपरा, धार्मिक विचार, साहित्य, कला आणि पुरातत्त्वीय वारसा यांचा परस्परांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. राजकीय मतभेद कायम असले, तरी सांस्कृतिक पातळीवर संवादाचे दरवाजे उघडे ठेवता येतात, हा या उपक्रमाचा सर्वांत महत्त्वाचा संदेश आहे.

दुर्दैवाने या आयोजनाच्या व्यापक उद्देशापेक्षा पाकिस्तानच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीची चर्चा अधिक झाली. पाकिस्तानचे पर्यावरणमंत्री मसूद मलिक यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे राजकीय वर्तुळांतून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण असताना पाकिस्तानी प्रतिनिधीला निमंत्रण देण्याची गरज काय, असा आक्षेप घेतला गेला. मात्र, एससीओ हा बहुराष्ट्रीय मंच आहे. त्याच्या सदस्य देशांना अशा कार्यक्रमासाठी निमंत्रित करणे ही स्वाभाविक राजनैतिक प्रक्रिया आहे. पाकिस्तानशी असलेले मतभेद कायम ठेवूनही भारताने आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि सभ्यतागत वारशाची ओळख करून देण्याची संधी साधली, हे अधिक महत्त्वाचे आहे. आपली ऐतिहासिक भूमिका मांडण्यासाठी दुसऱ्या देशाच्या मान्यतेची गरज नसते. त्यासाठी पुरावे, अभ्यास आणि आत्मविश्वास पुरेसा असतो.

दिल्लीतील पुराना किल्ला या आयोजनाचे महत्त्वाचे केंद्र ठरला. या ऐतिहासिक वास्तूचा संबंध हुमायून आणि शेरशाह सूरी यांच्या काळाशी जोडला जातो. मात्र, दिल्लीचा इतिहास त्याही आधीचा आहे. महाभारतातील इंद्रप्रस्थापासून मध्ययुगीन दिल्लीपर्यंतचा इतिहास या परिसराशी जोडला जातो. पंतप्रधान मोदी यांनी या ऐतिहासिक संदर्भांकडे लक्ष वेधले. पुरातत्त्वीय अवशेष, ऐतिहासिक नोंदी आणि प्राचीन ग्रंथांमधील उल्लेख यांच्या आधारे भारताच्या दीर्घ सांस्कृतिक प्रवासाची मांडणी करण्यात आली. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने पुराना किल्ल्याचा उल्लेख मुघल आणि शेरशाह यांच्या वारशाच्या संदर्भात केला असला, तरी भारताने त्यापलीकडचा इतिहास समोर ठेवला. यामागे इतिहासाची व्यापकता दाखवण्यावर भर होता.

या आयोजनातील ‌‘एसन्स ऑफ अवर एक्झिस्टन्स‌’ अर्थात ‌‘आपल्या अस्तित्वाचा मूलाधार‌’ या प्रदर्शनातून भारताच्या पुरातत्त्वीय आणि साहित्यिक वारशाची ओळख करून देण्यात आली. इ.स.पूर्व १२०० ते इ.स. १२०० या कालखंडातील दिल्लीत सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तू, कलाकृती आणि ऐतिहासिक संदर्भ यांचा त्यात समावेश होता. संगीत, नृत्य, दृश्यात्मक कथन आणि ऐतिहासिक उद्धरणे यांच्या माध्यमातून भारत आणि युरेशियामधील सांस्कृतिक संबंधही मांडण्यात आले. भारताचा इतिहास हा राजवटी, युद्धे आणि सत्तांतरांपुरता मर्यादित नाही. विविध समाज गट, विचारप्रवाह, धार्मिक परंपरा आणि ज्ञानशाखांनी घडवलेला हा प्रदीर्घ प्रवास आहे. या व्यापकतेची ओळख जगाला करून देणे हे अशा प्रदर्शनांचे खरे प्रयोजन आहे.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‌‘सॉफ्ट पॉवर‌’ ही संकल्पना गेल्या काही दशकांत विशेष महत्त्वाची ठरली आहे. एखाद्या देशाची लष्करी किंवा आर्थिक ताकद म्हणजे त्याची हार्ड पॉवर; तर त्या देशाची संस्कृती, शिक्षण, कला, साहित्य, मूल्यव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा यांच्या माध्यमातून इतर देशांवर निर्माण होणारा प्रभाव म्हणजे सॉफ्ट पॉवर. अमेरिकेने चित्रपट, विद्यापीठे आणि लोकप्रिय संस्कृतीच्या माध्यमातून जगभर प्रभाव निर्माण केला. युरोपीय देशांनीही आपली सांस्कृतिक परंपरा आणि ज्ञानव्यवस्था यांचा प्रभाव वाढवला. भारताकडे या सामर्थ्याचा हजारो वर्षांचा वारसा आहे. योग, आयुर्वेद, बौद्ध तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, नृत्य, साहित्य आणि अध्यात्म यांना जगभर स्वीकारार्हता मिळाली आहे. विविध विचारधारांना सामावून घेण्याची क्षमता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य राहिले आहे.

भारताच्या इतिहासात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवाह एकत्र आले. संघर्ष झाले, सत्तासंघर्ष झाले; परंतु या प्रक्रियेतून नवे विचार, कला आणि जीवनपद्धती विकसित झाल्या. या अनुभवातून जगाला सहअस्तित्वाचा संदेश देता येतो. महात्मा गांधी यांनी भारतीय सभ्यता आणि नैतिक मूल्यांच्या आधारे जगाला नवी दिशा देण्याची भूमिका मांडली होती. त्यांच्या विचारांमध्ये सत्य, अहिंसा, सहिष्णुता आणि मानवी प्रतिष्ठा यांना मध्यवर्ती स्थान होते. आजच्या संघर्षग्रस्त जगात या मूल्यांची उपयुक्तता कैकपटींनी वाढली आहे. अर्थात, प्राचीन वारशाचा अभिमान असणे स्वाभाविक आहे; पण त्याचे महत्त्व जगापर्यंत पोहोचवण्यासाठी संशोधन, पुरातत्त्वीय पुरावे, वस्तुनिष्ठ इतिहासलेखन आणि शैक्षणिक देवाणघेवाण यांना प्राधान्य द्यावे लागेल. केवळ भव्य प्रदर्शने आणि समारंभांमधून आंतरराष्ट्रीय प्रभाव निर्माण होत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण सांस्कृतिक धोरण, संग्रहालयांचे आधुनिकीकरण, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, संशोधकांमधील सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीचे कार्यक्रम राबवावे लागतील.

एससीओ सांस्कृतिक संवादाचे यशही याच निकषांवर ठरेल. एकदा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मंच निष्क्रिय राहिला, तर या संकल्पनेचा अपेक्षित परिणाम साधणार नाही. सदस्य देशांमध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प, ऐतिहासिक स्थळांचे जतन, सांस्कृतिक वारशाचे डिजिटल दस्तऐवजीकरण आणि विद्यापीठांमधील सहकार्य यांना चालना मिळाली पाहिजे. राजकीय मतभेदांमुळे संवाद थांबू नये, याची काळजीही घ्यावी लागेल.

जगाला आज युद्धे, धार्मिक संघर्ष, आर्थिक स्पर्धा आणि वाढत्या अविश्वासाने ग्रासले आहे. अशा वेळी सांस्कृतिक संवाद हा आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक मानवी स्वरूप देण्याचा मार्ग ठरू शकतो. भारताकडे यासाठी आवश्यक ऐतिहासिक अनुभव आणि सांस्कृतिक संपन्नता आहे. मात्र, जागतिक नेतृत्वाचा दावा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला साजेसे सातत्यपूर्ण काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. दिल्लीतील एससीओ सभ्यता संवादाने त्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारताने या संधीचे रूपांतर दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सहकार्यामध्ये केले, तर त्याचा लाभ संपूर्ण जगाला होऊ शकतो. लष्करी आणि आर्थिक सामर्थ्याच्या स्पर्धेत अडकलेल्या जगाला परस्परांचा इतिहास समजून घेण्याची आणि मतभेदांसह एकत्र राहण्याची नवी दिशा देणे, हेच भारताच्या सांस्कृतिक नेतृत्वाचे खरे यश ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.