India Semiconductor Hub | सेमीकंडक्टर हबच्या दिशेने...

India Semiconductor Hub |
India Semiconductor Hub | सेमीकंडक्टर हबच्या दिशेने...
Published on: 
Updated on: 

डॉ. योगेश प्र. जाधव

भारत आता सेमीकंडक्टर्सची निर्यात करू लागला आहे. देशाच्या औद्योगिक वाटचालीतील हा महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा आहे. येणार्‍या काळात देशात उत्पादित होणार्‍या चिपची संख्या, त्यातील स्वदेशी मूल्यवर्धन, निर्यात, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन या सर्व बाबतीत नियोजनबद्ध पावले पडल्यास सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत जागतिक हब बनेल, असे खात्रीने वाटते.

जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पाया ठरलेल्या सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने अखेर प्रत्यक्ष उत्पादनाच्या दिशेने महत्त्वाची झेप घेतली आहे. मोहाली, सुरत आणि साणंद येथील प्रकल्पांमधून सुरू झालेल्या उत्पादनामुळे अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या महत्त्वाकांक्षेला औद्योगिक स्वरूप प्राप्त होत आहे. जागतिक इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत मोठे स्थान मिळविणार्‍या भारताला चिपनिर्मितीच्या माध्यमातून आपले तंत्रज्ञानावरील परावलंबित्व कमी करण्याची संधी निर्माण झाली आहे. अत्याधुनिक चिपनिर्मितीमध्ये तैवान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी कारखाने उभारण्यासोबतच संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि पूरक उद्योगांची उभारणीही गरजेची आहे.

औद्योगिक वाटचालीतील अभिमानास्पद टप्पा

जगभरातील संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अभियंत्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. जागतिक सॉफ्टवेअर उद्योगात भारताने मोठे स्थान मिळविले; मात्र याच संगणकांना कार्यान्वित करणार्‍या सेमीकंडक्टर चिपसाठी भारताला प्रामुख्याने परदेशांवर अवलंबून राहावे लागले. बुद्धिमत्ता भारताची, सॉफ्टवेअर भारतीयांचे; परंतु त्याला चालना देणार्‍या चिप मात्र परदेशी, असे चित्र अनेक दशके कायम राहिले. या परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे आता दिसत आहेत. राजधानी दिल्लीत आयोजित ‘सेमिकॉन इंडिया २०२६’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात उत्पादित झालेल्या चिप देशातील आणि परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचू लागल्याची घोषणा केली. भारताच्या औद्योगिक वाटचालीतील हा एक अभिमानास्पद टप्पा आहे. मोहाली आणि सुरत येथील प्रकल्पांमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे. गुजरातमधील साणंद येथे मायक्रॉनच्या चिप असेंब्ली आणि चाचणी प्रकल्पामुळे या क्षेत्राचा औद्योगिक पाया तयार होण्यास सुरुवात झाली. आता भारत सेमीकंडक्टर्सची निर्यात करू लागला आहे.

सेमीकंडक्टरचे महत्त्व केवळ संगणक किंवा मोबाईलपुरते मर्यादित राहिलेले नाही. मोटारी, विमान, उपग्रह, वैद्यकीय उपकरणे, औद्योगिक यंत्रसामग्री, संरक्षण यंत्रणा आणि दळणवळण अशा असंख्य क्षेत्रांचा कारभार या सूक्ष्म चिपवर म्हणजेच सेमीकंडक्टरवर अवलंबून आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्तारामुळे तर अत्याधुनिक चिपची मागणी आणखी वाढत आहे. सुमारे ४.३ ट्रिलियन डॉलर मूल्याच्या जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या पायाशी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या उद्योगातील स्थान हे एखाद्या देशाच्या आर्थिक क्षमतेबरोबरच तंत्रज्ञानविषयक आणि सामरिक सामर्थ्याशीही जोडले गेले आहे. कोरोना महामारीच्या काळात जगाला याची प्रकर्षाने जाणीव झाली. चिपच्या टंचाईमुळे अनेक देशांतील मोटारनिर्मिती कारखाने बंद ठेवावे लागले. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या उत्पादनावरही परिणाम झाला. सेमीकंडक्टरची निर्मिती काही मोजक्या देशांमध्ये केंद्रित असल्याचे धोके स्पष्ट झाले. त्यानंतर अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी आपल्या सेमीकंडक्टर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. भारताच्या प्रयत्नांकडेही याच जागतिक घडामोडींच्या संदर्भात पाहावे लागेल.

मोबाईलनिर्मितीचा अनुभव

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील वाढ हा सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन २०१४-१५ मधील सुमारे १.९ लाख कोटी रुपयांवरून २०२५-२६ मध्ये १३.११ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. याच काळात इलेक्ट्रॉनिक्स निर्यात सुमारे ३८ हजार कोटी रुपयांवरून ४.२४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. मोबाईल उत्पादनातील बदल विशेष उल्लेखनीय आहे. या कालावधीत मोबाईल उत्पादनाचे मूल्य १८ हजार कोटी रुपयांवरून ६.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले. निर्यातही सुमारे १,५०० कोटी रुपयांवरून २.५९ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. देशांतर्गत वापरातील ९९.२ टक्के मोबाईल भारतातच तयार होत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातून सुमारे २५ लाख रोजगार निर्माण झाल्याचाही अंदाज आहे. असे असले, तरी अत्याधुनिक प्रोसेसर, मेमरी चिप आणि इतर महत्त्वाच्या घटकांसाठी आयातीवरील अवलंबित्व कायम आहे. आता देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या वाढत्या बाजारपेठेचा उपयोग भारतीय सेमीकंडक्टर उद्योगाला कितपत होतो, यावर पुढील प्रगती अवलंबून असेल.

मोठी गुंतवणूक, मोठी जबाबदारी

सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या नव्या प्रयत्नांना २०२१ मध्ये सुरू झालेल्या ७६ हजार कोटी रुपयांच्या कार्यक्रमामुळे चालना मिळाली. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये १ लाख २७ हजार ५०० कोटी रुपयांच्या ‘सेमिकॉन इंडिया २.०’ कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. चिप डिझाईन, उत्पादन, अत्याधुनिक पॅकेजिंग, उपकरणे, आवश्यक साहित्य, संशोधन आणि मनुष्यबळ विकास या सहा प्रमुख क्षेत्रांचा या कार्यक्रमात समावेश आहे. त्यासाठी सहा राज्यांमध्ये १२ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, १.६४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची बांधिलकी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय मोबाईल उत्पादनासाठी स्वतंत्र आर्थिक प्रोत्साहनाचीही तरतूद करण्यात आली आहे. सेमीकंडक्टर उद्योगासाठी प्रचंड भांडवल, अत्याधुनिक उपकरणे, अखंड वीजपुरवठा आणि मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर ते नियोजित वेळेत पूर्ण होणे आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक उत्पादन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणार्‍या अत्यंत प्रगत चिपचे उत्पादन ही मोठी तांत्रिक आणि आर्थिक कसोटी आहे; मात्र जागतिक बाजारपेठेत अत्याधुनिक चिपबरोबरच तुलनेने जुन्या उत्पादन प्रक्रियांवर आधारित चिप्सनाही मोठी मागणी आहे. मोटारी, घरगुती उपकरणे, औद्योगिक नियंत्रण यंत्रणा आणि दळणवळणासाठी अशा चिप आवश्यक असतात. भारताच्या प्रारंभीच्या प्रयत्नांमध्ये या बाजारपेठेला विशेष महत्त्व आहे.

देशातील पहिला प्रमुख वेफर फॅब्रिकेशन प्रकल्प २०२८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. तो नियोजित वेळेत सुरू झाल्यास भारताने या क्षेत्रात घेतलेली झेप ठळकपणाने दृष्टिपथात येऊ शकेल. या जोडीला परदेशी कंपन्यांकडून तंत्रज्ञान हस्तांतरण, भारतीय संशोधन संस्थांबरोबर सहकार्य आणि देशांतर्गत बौद्धिक संपदा विकसित करण्यावर भर द्यावा लागेल. सेमीकंडक्टर उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या बाबतीत भारतात अनुकूलता आहे. ‘चिप्स टू स्टार्टअप’ कार्यक्रमांतर्गत ३२० शैक्षणिक संस्थांमध्ये चिप डिझाईनसाठी आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ६८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. देशातील तब्बल ४०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उद्योगात वापरल्या जाणार्‍या दर्जाची ‘ईडीए’ टूल्स थेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष चिप डिझायनिंगचा सराव करता येणे शक्य झाले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेल्या चिप्स ‘एससीएल’ प्रकल्पात टॅप-आऊट म्हणजेच प्रत्यक्ष निर्मितीच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे, हा भारतातील तांत्रिक शिक्षणाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. याखेरीज २४ चिप डिझाईन प्रकल्पांना आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे. आणखी १०५ स्टार्टअप आणि लघुउद्योगांना डिझाईनसाठी आवश्यक साधनांची मदत मिळाली आहे. एप्रिल २०२६ पर्यंत ७५ संस्थांनी २११ चिपचे डिझाईन अंतिम उत्पादनासाठी सादर केले होते. त्यापैकी सात चिपचे प्रत्यक्ष उत्पादन विविध तंत्रज्ञान पातळ्यांवर करण्यात आले. ही प्रगती महत्त्वाची असली, तरी भारतात चिप डिझाईन विकसित करणार्‍या कंपन्यांची संख्या वाढणे, विद्यापीठांमधील संशोधनाचे औद्योगिक उत्पादनात रूपांतर होणे आणि भारतीय कंपन्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदविले जाणे आवश्यक आहे. परदेशात कार्यरत असलेल्या भारतीय संशोधकांना यासाठी मायदेशी परतण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनासाठी दीर्घकालीन निधी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यावसायिक संधी निर्माण कराव्या लागतील.

जागतिक स्पर्धेत भारताचे स्थान

अमेरिका आणि चीनमधील तंत्रज्ञान स्पर्धा, तैवानचे सामरिक महत्त्व आणि जागतिक पुरवठा साखळीतील बदल यांमुळे सेमीकंडक्टर उद्योगाला आंतरराष्ट्रीय राजकारणात विशेष स्थान मिळाले आहे. भारताने यंदा अमेरिकेसह इतर भागीदार देशांच्या ‘पॅक्स सिलिका’ उपक्रमात सहभाग घेतला आहे. महत्त्वाची खनिजे, चिपनिर्मिती, अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित पायाभूत सुविधांची पुरवठा साखळी अधिक सुरक्षित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या सहकार्यामुळे भारताला तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात; मात्र कोणत्याही एका देशावर किंवा गटावर अतिरिक्त अवलंबित्व निर्माण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगापुढील आव्हान दुहेरी आहे. एकीकडे जागतिक कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी दीर्घकालीन औद्योगिक क्षमता निर्माण करायची. या दोन्ही उद्दिष्टांमध्ये समतोल साधणे आवश्यक आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या वाटचालीचा पहिला टप्पा आता प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत पोहोचत आहे. येणार्‍या काळात देशात उत्पादित होणार्‍या चिपची संख्या, त्यातील स्वदेशी मूल्यवर्धन, निर्यात, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन या सर्व बाबतीत नियोजनबद्ध पावले पडल्यास सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची छाप उमटण्यास मदत होईल. भारताने यापूर्वी वाहननिर्मिती, अवकाश संशोधन आणि औषधनिर्मितीसारख्या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन प्रयत्नांतून औद्योगिक क्षमता विकसित केली आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातही सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि संशोधनाची अशीच आवश्यकता आहे. आज सुरू झालेल्या उत्पादनातून उद्याचा सक्षम भारतीय सेमीकंडक्टर उद्योग उभा राहू शकतो.

‘सेमिकॉन १.०’च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ‘सेमिकॉन २.०’ च्या माध्यमातून अधिक व्यापक आणि दूरगामी पावले उचलली जात आहेत. या योजनेचा उद्देश एका भक्कम, स्वावलंबी आणि व्यापक सेमीकंडक्टर परिसंस्थेची (इकोसिस्टीम) निर्मिती करणे हा आहे. ही परिसंस्था आकाराला आल्यानंतर भारत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीतील एक विश्वासू आणि मजबूत भागीदार म्हणून उदयास येईल, यात शंकाच नाही!

जागतिक कंपन्यांची पावले भारताकडे

जगभरातील आघाडीच्या चिपनिर्मात्या कंपन्यांनी देशातील आपल्या गुंतवणुकीचा आणि विस्ताराचा वेग वाढवला आहे. ‘अ‍ॅप्लाईड मटिरियल्स’, ‘इन्फिनिअन टेक्नॉलॉजिस’ आणि ‘एनएक्सपी सेमीकंडक्टर्स’ या जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी भारतातील संशोधन, विकास, उत्पादन आणि कुशल मनुष्यबळ उभारणीत मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. केवळ डिझायनिंगपुरते मर्यादित न राहता संपूर्ण पुरवठा साखळी आणि उत्पादन साखळी भारतात विकसित करण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यापैकी ‘अ‍ॅप्लाईड मटिरियल्स’ या कंपनीची घोषणा सर्वात मोठी ठरली आहे. कंपनी पुढील १० वर्षांत भारतात ५ अब्ज डॉलर्सची (सुमारे ४१ हजार कोटी रुपये) अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. कंपनीने आपल्या ‘इंडिया व्हिजन २०३५’ अंतर्गत बंगळुरू येथे १४५ एकर जागेवर अत्याधुनिक संशोधन पार्क उभारण्याची योजना आखली आहे. जर्मनीची प्रमुख चिपनिर्माती कंपनी असणार्‍या ‘इन्फिनिअन’ने नुकतीच एआय प्रोसेसरसाठी ऊर्जा व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित करणार्‍या ‘सी२आय’ सेमीकंडक्टर्स’ या भारतीय डीप-टेक स्टार्ट-अपचे अधिग्रहण केले आहे.

पूरक उद्योग गरजेचे

सेमीकंडक्टर उद्योगात चिपनिर्मितीसाठी विशिष्ट रसायने, अतिशुद्ध वायू, सिलिकॉन वेफर, अचूक उपकरणे आणि विशेष साहित्य लागते. यांपैकी अनेक घटकांसाठी भारताला आजही आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या प्रकल्पांबरोबरच देशांतर्गत पूरक उद्योग विकसित करणे आवश्यक आहे. विशेषतः भारतीय लघू आणि मध्यम उद्योगांना जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत सहभागी करून घेण्याची संधी निर्माण करावी लागेल. मोठे डेटा सेंटर, उच्च क्षमतेची संगणकीय यंत्रणा आणि सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांना विश्वासार्ह वीजपुरवठा आवश्यक असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news