

जगभरातील भारतीयांना वेगवेगळ्या द्वेषभावनेला सामोरे जावे लागते. हा द्वेष हिंसात्मक मार्गाने किंवा इतर छुप्या मार्गाने व्यक्त होतो. अमेरिकेत सुमारे चार कोटी हिंदू धर्मीय आहेत. अमेरिकेच्या वैद्यकीय, विज्ञान-तंत्रज्ञान, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रांत त्यांनी आपले भरभरून योगदान दिले आहे; पण अमेरिकन लोकांच्या मनात 'हिंदूफोबिया' म्हणजेच हिंदूंबद्दल तिरस्कार वा अकारण भीती वाढत जात असल्याचे दिसून येत आहे.
हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगभरात शंभरहून अधिक देशांत 1.2 अब्ज हिंदू राहतात. भारतीय माणूस आपली मातृभूमी सोडून दुसर्या देशात गेला, तरी आपला धर्म, संस्कृती सोबत नेतो. परमुलखात आपल्या मूल्यांची जोपासना करतो; पण ते करताना आपला धर्म, संस्कृती कोणावरही लादायचा प्रयत्न करत नाही. विविधतेतून एकता ही भारतीयांच्या रक्तातच असल्यामुळे ते परमुलखात गेले तरी तिथल्या समूहाशी एकजीव होण्याचा प्रयत्न करतात. त्यांची संस्कृती अंगीकारली नसली, तरी तिचा अनादर करीत नाहीत. असे असूनही जगभरातील भारतीयांना त्यातही हिंदूंना, मुस्लिमांना, शीख लोकांना वेगवेगळ्या द्वेषभावनेला सामोरे जावे लागते. हा द्वेष कधी तरी हिंसात्मक मार्गाने, तर बहुतांशवेळा इतर छुप्या मार्गाने, जसे की शाब्दिक, लिखित स्वरूपात केला जातो.
अमेरिकेतील हिंदू समुदायही त्याला अपवाद नाही. अमेरिकेत सुमारे साडेचार दशलक्ष भारतीय आहेत. त्यापैकी चार दशलक्ष हिंदू धर्मीय आहेत. इथल्या भारतीय लोकांनी अमेरिकेच्या वैद्यकीय, विज्ञान-तंत्रज्ञान, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात आपले भरभरून योगदान दिले आहे. याशिवाय त्यांनी आपले योग, संगीत, आयुर्वेद, खाद्यसंस्कृती असा आपला अमूल्य ठेवाही अमेरिकन लोकांसोबत शेअर केला आहे; पण तिथल्या लोकांच्या मनात 'हिंदूफोबिया' म्हणजे हिंदूंबद्दल तिरस्कार वा अकारण भीती वाढत जात असल्याचे दिसून येते आहे. रूटगर्स विद्यापीठाच्या 2022 च्या एका अहवालातून असे समोर आले आहे की, 'हिंदूफोबिया' व हिंदूविरोधी द्वेष हा समाजमाध्यमे व संवादाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून श्वेतवर्णीयांकडून मुद्दाम वाढविला जात आहे आणि ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. त्याचा थेट परिणाम सध्या तरी अमेरिकन समुदायावर होईल, असे वाटत नाही; पण भविष्यात तो होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या वाढत्या 'हिंदूफोबिया'विरोधात अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या विधिमंडळात 1 एप्रिल रोजी एक ठराव संमत करण्यात आला. या राज्यातील अटलांटा या शहरात मोठा हिंदू समुदाय आहे. त्या शहराचे विधानसभेचे प्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड व टॉड जोन्स यांनी हा ठराव मांडला होता. त्याला रिक जॅस्पर्स, डेव्हिड क्लार्क आणि ब्रेंट कॉक्स यांनी पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, हे सगळे प्रतिनिधी रिपब्लिकन पक्षाचे आहेत. खरे तर डेमोक्रॅटिक पक्ष हा जास्त हिंदू समुदायाला पाठिंबा देतो. रिपब्लिकन पक्षातील बहुतांश लोकांना भारतीयांबद्दल आकस आहे. त्यांना वाटते की, हे लोक आपल्यापेक्षा वरचढ होण्याचा, आपला धर्म, संस्कृती अमेरिकेत पसरविण्याचा, आपल्या नोकर्या, संधी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या गैरसमजातूनच मग द्वेष भावना वाढते.
या ठरावामध्ये 'हिंदूफोबिया'ला आळा घालण्यासाठी कोणत्याही तरतुदी केलेल्या नाहीत. केवळ हिंदूंविरोधात वाढणार्या द्वेषाकडे लक्ष वेधले असून, हिंदू समुदायाच्या अमेरिकेतील योगदानावर प्रकाश टाकला आहे. अटलांटा शहरातील हिंदू अमेरिकन नागरिकांच्या भावना आपण या ठरावाद्वारे मांडून, 'हिंदूफोबिया' निषेध करत आहे. इथल्या हिंदू समुदायाने कायमच जॉर्जिया राज्यातील आर्थिक व सामाजिक समतोल साधण्यात मदत केल्याचे मत या विधानसभा प्रतिनिधींनी मांडले. 'कोहिलेशन ऑफ हिंदूज् ऑफ नॉर्थ अमेरिका' या संघटनेने हा ठराव मंजूर करावा यासाठी प्रयत्न केले. अमेरिकेतील हिंदू समुदायाला कायदेशीर सल्ला देण्याचे काम ही संघटना करते. कामाच्या ठिकाणी काही अडचणी असतील तर त्या सोडविणे व हिंदू संस्कृतीबाबत जनजागृती करण्याचे काम करते.
फेब्रुवारी महिन्यात सिएटल सिटी कौन्सिलने जातीभेदाविरुद्ध एक कायदा संमत केला. जी जात नाही ती जात भारतीय लोकांसोबत अमेरिकेतही येऊन पोहोचली आहे व बर्याच ठिकाणी ती आपले अस्तित्व दाखवत असते. कॅलिफोर्निया, सिएटल अशा आयटी हब असणार्या शहरांतही जातीभेदभावाच्या घटना घडू लागल्या होत्या. त्याचे मूळ खोलवर रुजण्याआधी सिटी कौन्सिलच्या एकमेव भारतीय सदस्या क्षमा सावंत, ज्या स्वतः हिंदू उच्चवर्णीय आहेत, त्यांनी भेदभाव करणार्या प्रकारांत जातीचाही समावेश करावा म्हणून प्रस्ताव मांडला होता. जो बहुमताने संमत झाला. साधरणतः, धर्म, वर्ण, वंश, लिंग, प्रांत यावरून भेदभाव केला जातो. जर जातीवरून कोणी भेदभाव केला तर तो गुन्हा मानून त्याला शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. असा कायदा करणारे सिएटल अमेरिकेतील पहिले शहर ठरले.
पण, जसे या कायद्याचे स्वागत करण्यात आले त्याच प्रमाणात त्याला विरोधही काही हिंदू संघटनांनी केला. त्यामध्ये विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिका, कोअलिशन ऑफ हिंदूज् ऑफ नॉर्थ अमेरिका व हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचा समावेश होता. त्यांच्या मते, या कायद्यावरून जातीभेदभाव अमेरिकेतील हिंदूंत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हिंदू धर्माबद्दल गैरसमज वाढतील व 'हिंदूफोबिया'ला आणखी प्रोत्साहन मिळेल.
फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेट म्हणजे 'एफबीआय'च्या 2021 च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सर्वात जास्त द्वेषातून होणार्या गुन्ह्यांना आफ्रिकन अमेरिकन लोकांना सामोरे जावे लागते; पण ते वर्णद्वेषातून होतात. धर्मावर आधारित गुन्हे हे सर्वाधिक ज्यूविरोधी असून, त्यांचे प्रमाण 31.9 टक्के आहे, तर त्यानंतर शीखविरोधी 21.3 टक्के, इस्लामविरोधी 9.5 टक्के आहे. हिंदूंविरोधी प्रमाण अत्यल्प म्हणजे 1 टक्का आहे; पण हिंदू संघटनांच्या मते, 'एफबीआय'कडे जेवढ्या नोंदी आहेत तेवढेच प्रमाण दिसते. त्यांचे रेकॉर्ड सोडून आशियाई अमेरिका संघटनाही कुठे काय झाले त्याची नोंद ठेवत असतात.
11 नोव्हेंबर 2001 रोजी अमेरिकेवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारतीयांविरोधी हल्ले वाढले. अमेरिकेत सुमारे एक हजार मंदिरे व धार्मिक केंद्रे आहेत. त्यावरही गेल्या पंधरा वर्षांत हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातही बर्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची इतर मुलांकडून हिंदू धर्मावरून चेष्टा केली जाते. काही शिक्षक सर्व वर्गासमोर हिंदू धर्मातील संकल्पनांची चुकीची माहिती देतात वा थट्टा करतात. त्यामुळे बरीच मुले आपण हिंदू असल्याचे लपवितात; पण तो काही उपाय नाही. आपला धर्म, विचार, संस्कृतीबद्दल आपल्या संकल्पना या इतरांना न दुखावता स्पष्ट करता आल्या पाहिजेत. यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. दुसर्या धर्माबाबत विनाकारण तिरस्कार बाळगून त्रास देणार्यांविरुद्ध कायदे केले पाहिजेत. काही नाही तर निषेध नोंदविता आला पाहिजे. खरे तर जॉर्जिया राज्याचे अनुकरण बाकीच्या राज्यांनी करणे आवश्यक आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस भारतीयांची संख्या वाढत आहे. त्यासोबत त्यांच्याविरोधातील गैरसमज, द्वेषही वाढायला लागले, तर अमेरिकेच्या केंद्र सरकारने ठोस पावले उचलून भारतीयांना सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे.
-आरती आर्दाळकर-मंडलिक, मायामी (फ्लोरिडा), अमेरिका