हवामान : उष्णतेच्या लाटांचा हाहाकार

हवामान : उष्णतेच्या लाटांचा हाहाकार

[author title="के. जे. रमेश, माजी महासंचालक, भारतीय हवामान विभाग" image="http://"][/author]

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजेच जोपर्यंत गंगा नदीच्या खोर्‍यात मान्सून येत नाही, तोपर्यंत उत्तर भारतात उष्णता कायम राहणे हे एक सामान्य नैसर्गिक चक्र आहे. या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, झारखंड, बंगालसारख्या राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ होते. अर्थात पाऊस चांगला पडण्यासाठी हे वातावरण पोषक मानले जाते. कारण उकाडा अधिक राहिल्यास अरबी समुद्र हा तितक्याच प्रमाणात भारताला पावसात चिंब करण्याचे काम करेल. परंतु यंदा तेथे प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत आहे आणि तापमान 50 अंशांच्या पुढे पोहोचले आहे. भारतातील अनेक शहरे गेल्या महिनाभरापासूनच तीव्र उन्हाचा सामना करत आहेत.

या उष्णतेच्या झळांचा सामना करताना प्रत्येकाच्याच मनात एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे असे का घडतेय? वास्तविक यामागचे प्रमुख कारण म्हणजे हवामान बदलात सतत येणारी स्थित्यंतरे. हवामान बदलामुळे आता प्रत्येक हंगाम हा मागचा विक्रम मोडताना दिसत आहे. यावर्षी जानेवारीत मागच्या जानेवारीच्या तुलनेत अधिक उष्णता जाणवली होती. मार्च किंवा एप्रिल महिन्यातही अशीच स्थिती राहिली. अर्थात जागतिक तापमानाने 1.2 अंश सेल्सिअसची मर्यादा कधीच ओलांडली आहे. समुद्राची किनारपट्टी लाभलेले देश 2100 पर्यंत जागतिक तापमानाला 1.5 अंशांपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पॅरिस करारानुसार जागतिक तापमानातील वाढ औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या पातळीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअस कमी ठेवण्यावर एकमत झाले. परंतु आता ते देखील मागे पडताना दिसत आहे.

आयपीसीसीच्या मते, तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ होत असेल तर उष्णतेची लाट येण्याचे प्रमाण, वेळ अणि त्याचा परिणाम यात किमान दुपटीने वाढ होते. या कारणांमुळेच अलीकडच्या काळात उष्णतेची लाट येण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, बिहार, बंगाल, महाराष्ट्रासारखे राज्य उष्णतेच्या झळा सहन करायचे. परंतु आता तेलंगण, उत्तर कर्नाटकचे काही भाग देखील मार्च एप्रिलपासूनच उष्णता सहन करण्यास प्रवृत्त झाले आहेत. त्याचेवळी राज्य सरकारनेही उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच त्याचा सामना करण्याची तयारी केली.

तूर्त तापमान वाढणे अणि उष्णतेची तीव्रता सहन करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कुठे ऊन जास्त तर कुठे कमी, असे आपल्या वाचनात आले असेलच. तुलनेने उष्णता अधिकच जाणवते. या गोष्टी आर्द्रतेवर अवलंबून आहेत. वातावरणात ओलावा कमी राहात असेल तर कोरडी उष्णता जाणवू लागते. या वातावरणात कुलर, पंखा आदींनी दिलासा मिळतो. परंतु जेव्हा वातावरणाबरोबरच आर्द्रताही असेल तर आपल्या शरीरातून गरजेपेक्षा अधिक घाम बाहेर पडतो आणि 35-36 अंश सेल्सिअस असणारे तापमानदेखील 40 अंशांसारखे वाटू लागते. अशावेळी एसी उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे तापमान मोजण्याचा मार्ग खूपच सोपा आहे.

शहरातील काही ठिकाणी मशिन बसविण्यात येते आणि त्यात थर्मामीटरप्रमाणे तापमापक यंत्र असते. ते वार्‍याची गती मोजण्याचेही काम करते. आता उत्तर भारतात कमाल तापमान वाढलेले दिसत आहे. मात्र लवकरच त्यापासून दिलासा मिळेल. पुढील तीन-चार दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये वेस्टर्न डिस्टबर्न्स येऊ शकतात. दिल्ली अणि एनसीआरच्या काही भागात तर बुधवारी सायंकाळी हलका पाऊसही पडला. या डिस्टबर्न्सने राजस्थान वगळता अन्य सखल भागात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. अर्थात त्याचा परिणाम तीन-चार दिवसांंपर्यंत राहू शकतो. पुन्हा सूर्य पूर्वीसारखा आग ओकू शकतो. ही स्थिती पाऊस पडेपर्यंत राहू शकते.

वाढती उष्णता मानवाच्या आरोग्यालाही हानीकारक आहे. ज्याप्रमाणे 98.5 फॅरेनहाईट तापमानामुळे शरीरातील हालचाली वाढतात, त्याचप्रमाणे 37 अंशांपेक्षा तापमान अधिक राहिल्यास शरीराची स्थिती बिघडू शकते. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे तसेच आजारी लोकांनीदेखील काळजी घेतली पाहिजे. अर्थात खबरदारी ही सर्वांनीच घ्यायला हवी. कारण जेव्हा तापमान 40 अंशापेक्षा अधिक जात असेल तर शरीरातील पाणी कमी होते आणि शारीरिक क्षमता कमी होऊन ती निम्मीच होते. या कारणांमुळेच उन्हाळ्यात अधिकाधिक पाणी पिण्यास आणि फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. नारळ, टरबूज, काकडी, खरबूज यांसारख्या फळांमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. तसेच सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाच्या तीव्र झळांपासून दूर राहिले पाहिजे.

महानगर आणि मोठ्या शहरांत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून दिशानिर्देश लागू केले जातात. उदा. रुग्णालयात शंभर खाटा उष्माघात झालेल्या लोकांसाठी राखीव ठेवणे, तसेच मुलांचा वॉर्ड सर्वात वरच्या मजल्यावर ठेवू नये, असेही निर्देश दिले जातात. कारण तेलंगणात 2017 मध्ये नवजात अर्भकांच्या मृत्यूनंतर झालेल्या अभ्यासात काही धक्कादायक बाबी उघड झाल्या. संबंधित रुग्णालयाचा मुलांचा वॉर्ड सर्वात वरच्या मजल्यावर होता आणि तेथे अधिक उष्णता जाणवत होती. याप्रमाणे मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यालगत काम करणार्‍या कामगार, मजूर, पालिका कर्मचारी, कचरा गोळा करणार्‍यांनी सकाळी दहा वाजेपर्यंतच काम करायला हवे. तसेच 11 ते चार वाजेपर्यंत भर उन्हात काम करण्याचे टाळायला हवे.

उष्णतेपासून बचाव करण्यास कारखाने सक्षम नसल्यास तेथे कामगारांना दिवसा सुटी देण्याची व्यवस्था केली जाते. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत कामाचे नियोजन केले जाते. रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम देखील रात्री केले जाते.
अर्थात या झाल्या बचावात्मक उपाययोजना. पण मूळ प्रश्न तसाच राहतो. या वाढत्या तापमानाला रोखावे कसे? यावर परिणामकारक उपाय म्हणजे वृक्षारोपण. यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. शहरी भागात हिरवळ असेल तेथे ती वाढविण्याचा प्रयत्न हवा. बागेत झाडांचे प्रमाण वाढवणे आणि तोडणी थांबविली पाहिजे. बागेतील तलावालगत झाडांची संख्या वाढवावी. बंगळूर, हैदराबाद येथे तापमान नियंत्रित करण्यासाठी रिसायकल वॉटर म्हणजेच दूषित पाण्याचा पुन्हा वापर केला जातो. त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचा वापर बागेतील झाडासाठी केला जातो. अशा प्रकारचे प्रयत्न सर्वत्र करावे लागतील. याप्रमाणे सर्वसमावेशक रणनीतीसह वाटचाल केली तर वाढत्या उन्हापासून आपला बचाव होऊ शकेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news