गुरु परमात्मा परेशु

अखंड सहवास लाभतो, अशा आत्मस्वरूपी सद्गुरूंचेही स्मरण ठेवणे गरजेचे
Guru Parmatma Pareshu
गुरु परमात्मा परेशुPudhari News network
Published on
Updated on
सचिन बनछोडे

अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा तो गुरू. गळ्यातला हार गळ्यातच असूनही तो इतरत्र शोधत बसणे ही भ्रांती आहे. तशीच भ्रांती झालेला मनुष्य सुखाला, देवाला बाहेर सर्वत्र शोधत बसतो. पण ते आपल्याच अंतर्यामी खर्‍या ‘स्व’च्या रूपात आहेत, हे विसरतो! सद्गुरू ही भ्रांती दूर करतात. आज ( दि. 21 जुलै) गुरुपौर्णिमा. त्यानिमित्ताने...

Guru Parmatma Pareshu
गुरू पौर्णिमा 2024 | शिव हे आदियोगी आणि आदिगुरू आहेत - सद्गुरू

जन्म आणि मृत्यूदरम्यान जीवनाच्या वाटचालीत पावलोपावली मार्गदर्शकाची गरज ही भासतेच. जन्माला आल्यानंतर आईच सर्वांचा पहिला गुरू बनत असते. त्यानंतर वडिलांचे मार्गदर्शन मिळू लागते. तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीत ‘मातृ देवो भव’ आणि ‘पितृ देवो भव’ असे त्यामुळेच म्हटलेले आहे. या दोघांनंतर ‘आचार्य देवो भव’ असा उपदेश येतो. सांसारिक वाटचाल असो किंवा पारमार्थिक, गुरूची नितांत आवश्यकता ही असतेच. गीता, उपनिषदांपासून ते संतकाव्यापर्यंत अनेक ठिकाणी सद्गुरूंचे माहात्म्य वर्णन करून सांगितलेले आहे. मात्र सद्गुरूंना केवळ नाम-रूपाची एक व्यक्ती समजणे म्हणजे त्यांना व आपल्या जाणिवेलाही संकुचित करण्यासारखे आहे. प्रत्येकाचा शुद्ध ‘स्व’ किंवा ‘मी’ हासुद्धा सद्गुरू रूपच असतो. त्यालाच ब्रह्म, आत्मा, परमात्मा, परमेश्वर, परेश अशी वेगवेगळी नावे आहेत. संत एकनाथांनी म्हटले आहे, ‘गुरु परमात्मा परेशु। ऐसा ज्याचा दृढ विश्वासु॥1॥ देव तयाचा अंकिला। स्वये संचरा त्याचे घरा॥2॥ एका जनार्दनी गुरुदेव। येथे नाही बा संशय॥3॥’ गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व नाम-रूपांमधील गुरूंचे स्मरण, वंदन करणे हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या व ज्याचा आपल्याला अखंड सहवास लाभतो, अशा आत्मस्वरूपी सद्गुरूंचेही स्मरण ठेवणे गरजेचे आहे.

Guru Parmatma Pareshu
सद्गुरू जग्‍गी वासुदेव म्‍हणाले, मातीच्या आरोग्याबद्दल जागरुक रहा

आपण जन्माला आल्यानंतर सदैव बाह्य जगताकडेच पाहात असतो व बाह्यजगताचाच विचार करीत असतो. कठोपनिषदात म्हटले आहे की ‘स्वयंभू परमात्म्याने इंद्रियांना बहिर्मुख करून हिंसित केले आहे. त्यामुळे जीव बाह्य विषयांना पाहतो, अंतरात्म्याला नाही.’ जरी ‘मी आहे’ असे भान प्रत्येकाला सदैव असले तरी हा ‘मी’ कोण आहे, याकडे लक्ष देण्यास आपल्याला फुरसत नसते की, या ‘मी’च्या जाणिवेत आपण कधी राहातही नाही. या डोळ्यांनी कोण पाहात आहे, कानांनी कोण ऐकत आहे याकडे आपले लक्ष नसते. केन उपनिषदात आत्म्यालाच ‘डोळ्यांचा डोळा’, ‘कानांचा कान’ म्हटले आहे. ज्याने हे शरीर धारण केले आहे त्या ‘स्व’कडे आपले लक्ष नसते. ‘मी डोळा आहे’, ‘मी कान आहे’ असे न म्हणता आपण ‘माझा डोळा, माझा कान’ असेच म्हणत ‘मी’ यापेक्षा वेगळा आहे असेच जणू सुचवत असतो. आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हे त्यामधूनही आपण कधी खर्‍या अर्थाने लक्षात घेत नाही. आत्मदर्शी किंवा तत्त्वदर्शी सद्गुरू शिष्याला या खर्‍या ‘मी’चे भान देतात. ‘मी म्हणजे हे शरीर, मन, बुद्धी नसून सर्वव्यापी शुद्ध चैतन्य, आत्मा आहे’ याची जाणीव यामुळेच शिष्याला येत असते. एकदा का ही जाणीव आली की, परमार्थातीलच नव्हे तर संसारातीलही सर्व प्रश्न सुटतात! त्यामुळेच प्राचीन काळापासूनच सद्गुरूंचे माहात्म्य सांगण्यात आले आहे. कठोपनिषदात म्हटले आहे की, ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’. (उठा, जागे व्हा आणि आत्मदर्शी गुरूकडून आत्म्याचे ज्ञान घ्या.) प्राचीन छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की, ‘आचार्यवान पुरुषो वेद’. (जो सद्गुरूंच्या आश्रयाला आहे, त्यालाच ज्ञानलाभ होतो.) मुंडक उपनिषदात म्हटले आहे, ‘तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम’. त्याचा अर्थ ‘शाश्वत आत्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, हातात समिधा घेऊन श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरूकडे जावे’. असा सद्गुरू हा ‘श्रोत्रिय’ म्हणजेच शब्दज्ञानात पारंगत असावा, जेणेकरून तो शिष्याला शास्त्रोक्त मार्गदर्शन करू शकेल व दुसरे महत्त्वाचे म्हणजे तो ‘ब्रह्मनिष्ठ’ही असावा. याचा अर्थ त्याने स्वतः परमात्मतत्वाचा अपरोक्षानुभव घेऊन या स्थितीत तो सदासर्वकाळ स्थित असावा. अशा ‘शाब्दे परे च निष्णात’ गुरूचे अत्यंत महत्त्व असते.

Guru Parmatma Pareshu
…तर जीवन सुगंधित होईल; सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे विचार

भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की, ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः’ (हे ज्ञान तू तत्त्वदर्शी ज्ञानी गुरूकडे जाऊन प्राप्त कर. त्यांना नम्रतेने प्रणाम केल्यावर, त्यांची सेवा केल्यावर आणि कपटरहित, सरळपणाने प्रश्न विचारल्यावर असे ज्ञानी महात्मा तुला उपदेश करतील.) अशा सद्गुरूंकडे गेल्यावर ते आपल्याला आपल्या खर्‍या स्वरूपाची जाणीव करून देतात आणि जन्मोजन्मीच्या अज्ञानाचा अंधःकार दूर करतात. गुुरुगीतेत म्हटले आहे की, ‘गु’ म्हणजे अंधार आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा तो गुरू. गळ्यातला हार गळ्यातच असूनही तो इतरत्र शोधत बसणे ही भ्रांती आहे. तशीच भ्रांती झालेला मनुष्य सुखाला, देवाला बाहेर सर्वत्र शोधत बसतो; पण ते आपल्याच अंतर्यामी खर्‍या ‘स्व’च्या रूपात आहेत, हे विसरतो! सद्गुरू ही भ्रांती दूर करतात. उपनिषदांमधील महावाक्ये हेच परमसत्य स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात. ‘प्रज्ञानं ब्रह्म’ (ऐतरेय उपनिषद), ‘अयमात्मा ब्रह्म’ (मांडुक्य उपनिषद), ‘तत् त्वम् असि’ (छांदोग्य उपनिषद) आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ (बृहदारण्यक उपनिषद) अशी ही महावाक्ये प्रसिद्ध आहेत. ते सर्वव्यापी ब्रह्म तूच आहेस, असा अनमोल उपदेश गुरू करतात. त्यामुळे शिष्याला मी म्हणजे हे नश्वर शरीर किंवा मन नसून ‘माझा आत्माच ब्रह्म आहे’ किंवा ‘मी ब्रह्म आहे’ अशी स्पष्ट जाणीव होते. या श्रवण, मनन आणि निदिध्यासनाने शिष्य पूर्णत्वाला जातो. सर्व देवदेवतांपासून किडा-मुंगीपर्यंत आणि अगदी निर्जीव वाटणार्‍या दगड-धोंड्यांसारख्या वस्तूंपासून अवघ्या ब्रह्मांडापर्यंत सर्वत्र एकच परमात्मा भरून राहिलेला आहे याची त्याला निःसंदिग्ध प्रचिती येते. तो परमात्मा माझ्या अंतर्यामीच आहे हे त्याला प्रकर्षाने समजते. गीतेतही भगवंतांनी केलेल्या अखेरच्या उपदेशांमध्ये ‘ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति’ असे म्हटले आहे. प्रत्येकाच्या हृदयातच हा परमात्मा आहे, ज्याला कुठे बाहेर नव्हे तर स्वतःच्या ‘मी’ (शरीर व मनाच्या पलीकडील) अशा शुद्ध जाणिवेत तो शोधावा व अनुभवावा लागतो. ‘ब्रह्मानंदं परमसुखदं’ या गुरुस्तवनातील ‘गुरु’ असाच स्वतःच्या हृदयातीलच भावातीत, द्वंद्वातीत, गगनसदृश, एकमेवाद्वितीय, नित्य, विमल, सर्वांच्या बुद्धीचा साक्षी, त्रिगुणरहित असा शाश्वत गुरू आहे. ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत’ (त्यालाच तू सर्वप्रकारे शरण जा) असे गीतेत भगवंतांनी म्हटले आहे. स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या या नाम-रूपातीत, अखंडपणे आपल्याजवळच राहणार्‍या या सद्गुरूंची जाणीव बाह्यरूपाने भगवान दत्तात्रेय, महर्षी व्यास यांच्यासारख्या गुरूंनी प्राचीन काळापासूनच दिलेली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘आदिगुरु’ असे ज्यांना म्हटले जाते, त्या भगवान दत्तात्रेयांच्या स्थळी भाविकांची गर्दी असते. गुरुपौर्णिमेलाच व्यासांचा जन्म झाला असे मानले जाते व त्यामुळे या पौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हटले जाते. त्यामुळे यादिवशी त्यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते. मात्र सर्वच गुरू-शिष्य रूपाने जो आत्मा नटलेला आहे तो आपल्याच अंतर्यामी ‘स्व’ किंवा शुद्ध ‘मी’च्या स्वरूपात आहे याचीही जाणीव ठेवून त्या सद्गुरू स्वरूपासही या पौर्णिमेनिमित्त वंदन केले पाहिजे! ज्यांच्याकडून दीक्षा, ज्ञान घेतले ते सद्गुरू आपल्या अंतर्यामीच ‘स्व’च्या स्वरूपात सदैव आपल्या सोबत असतात, त्यामध्ये द्वैत नसते याची जाणीवही ठेवली पाहिजे. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थ दीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, ‘मज हृदयी सद्गुरु। जेणे तारिलो हा संसारपूरु। म्हणौनि विशेषे अत्यादरु। विवेकावरी॥’ गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वत्र एकच असलेल्या या गुरुतत्त्वास शतशः वंदन!

Guru Parmatma Pareshu
श्री संत बाळूमामा पालखी सोहळा खोर मुक्कामी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news