Gondhal Movie | ऑस्करच्या स्वप्नपूर्तीची वाटचाल

Gondhal Movie |
Gondhal Movie | ऑस्करच्या स्वप्नपूर्तीची वाटचाल
Published on: 
Updated on: 

मंदार जोशी

‘गोंधळ’ चित्रपट म्हणजे एका रात्रीमध्ये घडणारा प्रसंग आहे. प्रेक्षकांना अपेक्षित असते ते थरार, नाट्य यात आहेच, शिवाय सर्वात आवश्यक असलेला संस्कृती-परंपरेचा भाग कथानकात खूप सुंदर गुंफलेला आहे. कोणत्याही चांगल्या चित्रपटाला उत्तम आशयाची गरज असते. ‘गोंधळ’च्या लेखनावर भरपूर काम केलं गेलं आणि कथानकाला गरज असलेल्या कलावंतांचीच निवड केली गेली. ‘गोंधळ’चा आशय अधोरेखित करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं संगीत. या आघाडीवर दक्षिणेतील सर्वात बुजुर्ग नि दिग्गज संगीत दिग्दर्शक इलाय राजा यांची कामगिरी ठळकपणे उठून दिसते.

गेल्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट. भायखळ्याच्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ‘गोंधळ’ या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीविषयक एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे चित्रपटाशी संबंधित असलेल्या कलाकारांची तिथं भाषणं झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांचं मनोगत अगदी खणखणीत झालं. या मनोगताच्या अखेरीस त्यांनी केलेलं एक विधान सगळ्यांच्याच नजरा वेधून घेणारं ठरलं. ‘१४ नोव्हेंबरनंतर आपला भारत देश गोंधळ चित्रपटानंसुद्धा ओळखला जाईल...’ असं ते विधान होतं. सर्वसाधारणपणे पहिला चित्रपट करणारे दिग्दर्शक थोडेसे बुजलेले असतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो; परंतु संतोष डावखर हे अत्यंत आत्मविश्वासानं मीडियाला सामोरे गेले होते. तेव्हाच ‘गोंधळ’ काहीतरी वेगळा आहे, याची कल्पना आली होती नि जवळपास दहा महिन्यांनी या चित्रपटानं देश नव्हे, तर जागतिक पातळीवरील चित्रपट रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवर्षी ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे एका चित्रपटाची निवड केली जाते. यंदा निवडीची ही माळ ‘गोंधळ’ चित्रपटाच्या गळ्यात पडली नि हा चित्रपट सर्वांच्या चर्चेत आला. ‘फिल्म फेडरेशन’च्या सदस्यांनी या चित्रपटाच्या आशयाबद्दल अत्यंत सकारात्मक भाष्य तर केलंच आहे, शिवाय बॉलीवूडनंदेखील आता या चित्रपटाची दखल घेतली आहे. ज्यांनी ‘गोंधळ’ पाहिलेला नाही, असे मान्यवरदेखील ‘गोंधळ’बद्दल लिहीत आहेत. त्याला शुभेच्छा देत आहेत. सुभाष घईंसारख्या दिग्दर्शकानंदेखील ‘गोंधळ’बद्दल भरभरून लिहिलं आहे.

‘ऑस्कर’मधील भारताच्या कामगिरीचा विचार केल्यास फारसं आशादायी चित्र दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या स्पर्धेसाठी आपला चित्रपट पाठवत असतो; मात्र आजतागायत या पुरस्कारावर आपल्या देशाचा चित्रपट मोहोर उमटवू शकलेला नाही. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटांच्या गटात आजपर्यंत ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ हे तीनच चित्रपट अंतिम पाच चित्रपटांमध्ये पोहोचले होते; परंतु पुरस्कार त्यांना काही मिळाला नाही. त्यावरून या स्पर्धेची काठिण्य पातळी लक्षात येते. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे या पुरस्कारासाठी जे चित्रपट पाठविण्यात आले होते, त्यांच्या निवडीवरूनही प्रचंड वादंग झालं होतं. सुमार दर्जाच्या निवडीवरून निवड समितीवर प्रचंड टीका झाली होती. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जे विचाधारा जोपासणार्‍या चित्रपटांबाबत लॉबिंग होतं, तेच इथंही यापूर्वी झालेलं होतं; मात्र या वेळी पहिल्यांदाच असं घडलं की, एखाद्या चित्रपटाच्या निवडीवरून देशभरातील चित्रपटप्रेमींनी या निवड समितीचं भरभरून कौतुक केलं. त्याला कारणीभूत ठरला तो आपला ‘गोंधळ’ चित्रपट. या चित्रपटाची निवड एवढ्यासाठीच महत्त्वाची अशासाठी की, यंदा चांगला आशय असलेले आणि ‘बॉक्स ऑफिस’वर खणखणीत यश मिळवलेलेही काही चित्रपट होते. व्यावसायिक यशाचा उच्चांक गाठणारे ‘धुरंधर’चे दोन्ही भाग यात होत; मात्र १४ परीक्षकांपैकी अवघ्या ४ परीक्षकांची पसंती ‘धुरंधर’ला मिळाली नि ‘गोंधळ’ सर्वांच्या पुढं निघून गेला.

‘ऑस्कर’च्या जागतिक प्रवेशिकेबद्दल आणि त्यात यश मिळवणार्‍या चित्रपटांबद्दल आजपर्यंत खूप उलटसुलट चर्चा झाली आहे. निव्वळ भारताचा विचार केल्यास आपल्याकडील तथाकथित गरिबी आणि जातियवाद चित्रपटांमधून प्रामुख्यानं ‘हायलाईट’ होत असल्याची टीका केली जात होती. या सर्व टीकेला चोख उत्तर म्हणजे ‘गोंधळ’ चित्रपट आहे. एका रात्रीमध्ये घडणारी ही गोष्ट आहे. एक चित्रपट म्हणून प्रेक्षकांना जे अपेक्षित असते ते थरार, नाट्य यात आहेच, शिवाय सर्वात आवश्यक असलेला संस्कृती-परंपरेचा भाग कथानकात खूप सुंदर गुंफलेला आहे. ‘गोंधळ’च्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असला, तरी ‘फिल्ममेकिंग’ त्यांच्यासाठी अगदीच नवीन नव्हतं. डावखर यांनी दिग्दर्शित केलेले काही लघुपट, माहितीपट यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय सादर करायला हवं, यासाठी लागणारा डोळा त्यांच्याकडे आता तयार झाला होता. तसेच स्वतः डावखर यांनी ‘कान’ चित्रपट महोत्सवासही काही वर्षांपूर्वी आपली उपस्थिती लावली होती. सर्वसाधारपणे ‘कान’ महोत्सवाला आपल्याकडील जी मंडळी जातात ती प्रामुख्यानं ‘इंडियन पॅव्हेलियन’मध्ये रेंगाळतात किंवा आजूबाजूला फिरत बसतात; परंतु महाभारतातल्या अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता, तसा संतोष डावखरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला नेणारा चित्रपट दिसत होता. म्हणूनच त्यांनी ‘कान’च्या दौर्‍यात जागतिक पातळीवरचे जास्तीत जास्त चित्रपट पाहून घेतले. जागतिक पातळीवर सध्या काय चाललं आहे, आजची तरुण दिग्दर्शक मंडळी आपल्या जाणिवा कशा पद्धतीनं व्यक्त करताहेत, आपलं म्हणणं व्यक्त करण्यासाठी त्यांच्या दृश्यचौकटी कशा आहेत, त्याला पूरक संगीत कशा पद्धतीनं त्यांनी दिलं आहे... अशा सर्वांगीण पद्धतीनं डावखर यांनी आजचा जगभरचा सिनेमा पाहिला, अभ्यासला नि मग ‘गोंधळ’ची निर्मिती सुरू केली. आपल्याकडे ‘फिल्ममेकर’चं व्हिजन आणि निर्मात्याचे सूर क्वचितच जुळतात. त्यामुळे डावखर यांनी आपल्या मनातील स्वप्न पडद्यावर उतरवण्यासाठी स्वतःचेच पैसे लावण्याचं ठरवलं नि तब्बल तीन वर्षांचं संशोधन आणि प्रत्यक्ष ‘मेकिंग’ची दोन वर्षं अशा तब्बल पाच वर्षांच्या मेहनतीनंतर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला.

कोणत्याही चांगल्या चित्रपटाला उत्तम आशयाची गरज असते. ही बाब ओळखून ‘गोंधळ’च्या लेखनावर भरपूर काम केलं गेलं आणि कथानकाला गरज असलेल्या कलावंतांचीच निवड केली गेली. किशोर कदमसारख्या ताकदीच्या कलाकाराची निवड जाणीवपूर्वक केली गेली आणि किशोरनी आपल्या भूमिकेचं सोनं केलं. ‘गोंधळ’चं सर्वाधिक बजेट खर्च झालं आहे ते ‘कास्टिंग’वर. यावरूनच दिग्दर्शकाचा आपल्या कलाकृतीकडे पाहण्याचा ‘अ‍ॅप्रोच’ किती वेगळा आहे, याची जाणीव होते. ‘गोंधळ’चा आशय अधोरेखित करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं संगीत. या आघाडीवर डावखर यांनी निवड केली ती दक्षिणेतील सर्वात बुजुर्ग नि दिग्गज संगीत दिग्दर्शक इलाय राजा यांची. गेल्या अनेक दशकांपासून हा संगीतकार वेगळ्या बाजाचं संगीत देतोय आणि ते मुख्यतः आपल्या मातीशी निगडीत आहे. मराठी संस्कृती, परंपरा जाणणार्‍या एखाद्या मराठी संगीतकाराकडे डावखर यांना आपला चित्रपट संगीतासाठी सोपवता आला असता; परंतु त्यांनी इलाय राजा यांच्यामध्ये असलेला संस्कृती-परंपरेच्या तसेच त्यांचे यापूर्वीचे काही चित्रपट ऑस्करशी जोडले गेले असण्याच्या ‘एक्स फॅक्टर’ला अधिक महत्त्व दिलं. त्याचा ‘रिझल्ट’ आता दिसतो आहे. दृश्य पातळीवर या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम उठून दिसणारी आहे. अमलेंदू चौधरी या प्रख्यात छायादिग्दर्शकानं आपलं सर्वोत्तम काम या चित्रपटासाठी दिलेलं आहे. दीर्घ लांबीचे शॉट्स यात ठेवले गेले आहेत.

‘गोंधळ’चे मूळ प्रदर्शन गेल्या वर्षीच झालं. दुर्दैवानं त्यावेळी त्याला मोठं व्यावसायिक यश काही मिळालं नाही. मराठी चित्रपटांची समस्या म्हणजे त्याला ‘माऊथ पब्लिसिटी’वरच पुढं जावं लागतं; मात्र हल्लीचं चित्रपट प्रदर्शनाचं गणित वेगळं आहे. ‘वीकेंड’ला चांगले आकडे आले, तरच तो चित्रपट चित्रपटगृहांमध्ये टिकून राहतो. कोणतीही चित्रकृती लोणच्यासारखी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये मुरावी एवढा ‘पेशन्स’ आज कोणत्याही वितरक, प्रदर्शकाकडे नाही. त्यामुळेच ‘गोंधळ’ची सुरुवातीला चर्चा झाली नाही नि आता तो ‘ऑस्कर’मुळे फोकसमध्ये आला आहे. अर्थात, पुढची तयारी खूप महत्त्वाची आहे. कारण, पहिल्या पाच चित्रपटांमध्ये नामांकन मिळवायचं असेल, तर ‘गोंधळ’च्या निर्मात्यांना आपली कंबर कसावी लागणार आहे. ऑस्करची निवड ज्या सुमारे १० हजार मतदारांद्वारे केली जाते, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं खूप मोठं आव्हान आता ‘गोंधळ’च्या टीमपुढे आहे. साधारण २५ वर्षांपूर्वी ‘लगान’साठी आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी काही महिने अमेरिकेत तळ ठोकला होता. आपला चित्रपट अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. तसंच काहीसं काम आता ‘गोंधळ’च्या टीमकडून अपेक्षित आहे. ते तसं झालं, तर आपण आता ‘ऑस्कर’चे स्वप्न सत्यात उतरवण्यापासून फार दूर राहणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news