

निम्म्या लोकसंख्येच्या पूर्ण सहभागाशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे. जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढच्या टप्प्यात पारंपरिक लिंगभेदाच्या (gender education) मानसिकतेची वाढ रोखता येईल.
पुरुष आणि स्त्रिया, दोघांसाठी अधिक समान जग निर्माण करण्यासाठी आपण बराच पल्ला गाठला आहे; पण तरीही लैंगिकतेचा मुद्दा आजही प्रासंगिक आहे. लैंगिकतेशी संबंधित पूर्वग्रहांनी जगासमोर भलतीच आव्हाने उभी केली आहेत. विशेषतः जेव्हा प्रश्न स्त्रियांशी संबंधित असतो तेव्हा त्याच्याशी सामना करणे कठीण होते. महिला सक्षमीकरण हा गेल्या शतकापासूनचा चर्चेचा आणि विचारमंथनाचा विषय आहे. सक्षमीकरणाचे स्वरूप कोणतेही असो, त्याचा पाया शिक्षणाच्या जमिनीवरच उभारलेला आहे. शिक्षणाचा थेट संबंध आर्थिक सक्षमीकरणाशी आहे. आत्मनिर्भरतेमुळे नेतृत्व आणि निर्णयक्षमता मजबूत होते आणि सक्षमीकरण मजबूत करण्याचे ते एक शक्तिशाली माध्यम आहे.
शिक्षण आणि नोकरी यांचा जवळचा संबंध आहे. प्रत्येक कालखंडात समाजाच्या आणि देशाच्या गरजेनुसार रोजगाराचे स्वरूप बदलत असते. त्यामुळे शिक्षणाला तेव्हाच महत्त्व असते, जेव्हा ते रोजगाराभिमुख असते. देशात चौथ्या औद्योगिक क्रांतीने दार ठोठावले आहे. आता भारताला सुमारे 50 दशलक्ष तंत्रज्ञान-सक्षम कामगार तयार करावे लागतील. पण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, महिलाही त्यात आपले स्थान निर्माण करू शकतील का? कारण महिलांची क्षमता, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता केवळ भारतातच नाही, तर जगभरात प्रचंड असमामनतेने आणि पूर्वाग्रहांनी ग्रासलेली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, भविष्यात नव्वद टक्के नोकर्या अशा असतील, ज्यामध्ये माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचे ज्ञान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवश्यक असेल. (gender education)
स्टेम क्षेत्राशी (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) संबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. परंतु जगभरात स्टेम विषयांमध्ये सर्व स्तरांवर लैंगिक असमानता आहे, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचप्रमाणे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रगती असूनही जगाचा एकही कोपरा असा नाही, जिथे लैंगिक रूढी, व्यावहारिक पातळीवर जटिल स्वरूपात उपस्थित नाहीत. जगातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त देशांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये मुलींचा वाटा केवळ 15 टक्के आहे. या आकडेवारीवरून वस्तुस्थितीला पुष्टी मिळते.
एक सर्वमान्य समज असा आहे की, विशिष्ट कामांसाठी पुरुषच पात्र आहेत आणि विज्ञान आणि गणित हे कथितरीत्या जटिल विषय आहेत म्हणून ते स्त्रियांसाठी नाहीतच. वस्तुतः हे खरे नाही. विज्ञान हे विशिष्ट लिंगासाठी नाही. लिंगभेद हा विज्ञानामुळे नसून, सामाजिक नियमांमुळे जन्माला आलेला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, उच्च शिक्षणात विज्ञान विषयातील लैंगिक असमानता क्षमता दर्शविणारी आहे, असा युक्तिवाद केला जात आहे.
परंतु जेव्हा दहावीच्या विद्यार्थ्यांची सलग सहा वर्षे गणित अभियोग्यता चाचणी घेण्यात आली, तेव्हा मुले आणि मुलींनी समान कामगिरी केली. एवढे साम्य असूनही मुले स्वतःला गणितात माहीर समजतात, तर मुली स्वतःला कमी लेखतात. 'फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी' नियतकालिकात प्रसिद्ध झालेले हे संशोधन असे स्पष्टपणे दर्शविते की, जेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा समूहाच्या क्षमतेवर सातत्याने अविश्वास दर्शविला जातो, तेव्हा ती आपोआपच आपण अक्षम असल्याचे मान्य करू लागते.
चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या 'द कन्सेन्ट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स' या पुस्तकात लिहिले आहे की, महिला आणि पुरुषांच्या क्षमतांमध्ये खूपच फरक आहे आणि पुरुष प्रत्येक क्षेत्रात महिलांपेक्षा अधिक यश मिळवतात. त्यांच्या मते, या फरकाचे कारण म्हणजे जैविकद़ृष्ट्या पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी आहेत. परंतु डार्विनचा हा युक्तिवाद कोणत्याही शास्त्रीय पडताळणीशिवाय मान्य करणे तर्कसंगत ठरेल का? डार्विनचे भाष्य हे सामाजिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे, जिथे स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी संधी दिली गेली आणि त्यांचे स्वातंत्र्यदेखील नियंत्रित केले गेले. (gender education)
'ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट'ने 60 देशांमध्ये केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पालकदेखील मुलींना विज्ञान विषय घेण्यापासून परावृत्त करतात. याशिवाय आणखी एक सत्य नाकारता येणार नाही, ते म्हणजे स्त्रीला हीन दाखविण्याची प्रवृत्ती आणि विज्ञानाला पुरुषांचा विषय मानणारे संशोधनही पुरुषांनीच केलेले आहे.
ब्रिटिश विज्ञान पत्रकार अँजेला सैनी यांनी 'इन्फिरिअर ः हाऊ सायन्स गॉट वूमन राँग अँड द न्यू रिसर्च दॅट रिराईट्स द स्टोरी' या लेखात लिहिले आहे ः आम्ही नेहमीच विज्ञानाला तटस्थ मानले आहे; पण वास्तव हे आहे की, विज्ञान बहुतेक पूर्वग्रहांनी व्यापलेले आहे. कारण शास्त्रज्ञ स्वतःच पूर्वग्रहाचे बळी आहेत. कोणतेही जीवशास्त्रीय संशोधन हे सिद्ध करू शकले नाही की, पुरुष जे करू शकतेत ते स्त्रिया करू शकत नाहीत.
विज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व असल्याने विज्ञानाच्या गुंतागुंतीमध्ये स्त्रियांना सहजता येऊ शकत नाही, हे सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. ही स्त्री-पुरुष तफावत दूर करणे सोपे नाही. कारण आपल्यापैकी बहुतेकांची ही लैंगिक पक्षपाती मानसिकता लहानपणापासूनच असते. एका अभ्यासानुसार, अगदी पाच वर्षांच्या मुलांमध्ये (मुलगा किंवा मुलगी) त्यांच्याकडून लिंगाधारित कोणती वागणूक अपेक्षित आहे, याची समज विकसित होते.
लिंगभेदाविरुद्ध लढणे कधीही सोपे नव्हते. परंतु प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर शिक्षक आणि पालकांनी मुलींमध्ये विज्ञान, गणित या विषयांची आवड निर्माण केल्यास परिस्थिती बदलू शकते. हे निश्चित आहे की, शिक्षक प्रशिक्षणातील नावीन्य आणि लिंगभेद आणि गरजा समजून घेणार्या तंत्रज्ञानातील गुंतवणूक सध्याचा ट्रेंड बदलू शकते. वास्तविक, हा सारा प्रयत्न सामाजिक विचार बदलण्याच्या पूर्वअटीवर अवलंबून आहे. यासाठी अशा वातावरणाची निर्मिती करावी लागेल, जिथे मुली भविष्यातील आघाडीच्या शास्त्रज्ञ आणि नवकल्पक बनतील आणि सर्वांसाठी न्याय्य आणि शाश्वत भवितव्य घडवतील. (gender education)
सत्य असे आहे की, निम्म्या लोकसंख्येच्या पूर्ण सहभागाशिवाय कोणतीही अर्थव्यवस्था विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाचे स्वरूप बदलणे आवश्यक आहे, जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढच्या टप्प्यात पारंपरिक लिंगभेदाच्या मानसिकतेची वाढ रोखता येईल. शैक्षणिक स्वरूप आणि त्यात पद्धतशीर केलेले बदल आपली भूमिका तर बजावतीलच; परंतु ते मुलींमध्येही आत्मविश्वास निर्माण करतील.
डॉ. ऋतू सारस्वत