

स्वरदा वैद्य, लंडन
आल्हाददायक आणि थंड हवामानासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणार्या युरोप खंडाला सध्या हवामान बदलाच्या अत्यंत भीषण संकटाने ग्रासले आहे. जूनच्या सुरुवातीलाच युरोप खंडाचा काही भाग एखाद्या कोळशाच्या भट्टीप्रमाणे तप्त झाल्याने दरवर्षी येथील थंड हवामान अनुभवण्यास येणार्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला आहे. यंदाची युरोपातील उष्णतेची लाट (हीट वेव्ह) इतकी भयानक आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अवघ्या एका आठवड्यात १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. युरोपमधील सुमारे १५ कोटी जनता या अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या तापमानाचा सामना करत आहे.
नेहमीच आपल्या आल्हाददायक आणि थंड हवामानासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणार्या युरोप खंडाला सध्या हवामान बदलाच्या अत्यंत भीषण आणि अनपेक्षित संकटाने ग्रासले आहे. जून २०२६ च्या सुरुवातीलाच संपूर्ण युरोप खंड एखाद्या कोळशाच्या भट्टीप्रमाणे तप्त झाला आहे. यंदाची युरोपातील उष्णतेची लाट (हीट वेव्ह) इतकी भयानक आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अवघ्या एका आठवड्यात १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. या उष्णतेला ‘सायलेंट किलर’ म्हणजेच 'अदृश्य मारेकरी' असे संबोधले आहे. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे युरोपमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, तेथील पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयेसस यांनी दिलेल्या इशार्यानुसार, युरोप हा सध्या पृथ्वीवरील इतर भूभागांच्या तुलनेत दुप्पट वेगाने उष्ण होत चाललेला खंड आहे. सध्या युरोपमधील सुमारे १५ कोटी जनता या अत्यंत धोकादायक आणि जीवघेण्या तापमानाचा सामना करत आहे. हवामान बदलामुळे पूर्वी पिढ्यांमध्ये एखाद्या वेळेस येणारी उष्णतेची लाट आता दरवर्षी नियमितपणे धडक देत आहे. या उष्णतेला ‘सायलेंट किलर’ म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे, युरोपमधील पारंपारिक घरे, शाळा, कार्यालये आणि सार्वजनिक इमारती या थंड हवामानाचा विचार करून बांधण्यात आल्या आहेत. तिथे उष्णतेपासून संरक्षण करणार्या एअर कंडिशनिंगसारख्या सुविधांची मोठी कमतरता आहे. परिणामी, अचानक वाढलेले हे तापमान घरातील लोकांना आणि विशेषतः लहान मुले व वृद्धांना थेट प्रभावित करत असून, ते नकळत मृत्यूच्या खाईत ओढले जात आहेत.
सामान्यतः युरोपमध्ये जुलै महिन्याच्या उत्तरार्धात उन्हाचा चटका जाणवतो; मात्र २०२६ मध्ये जूनच्या सुरुवातीलाच तापमानाने सर्व ऐतिहासिक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. १९५० नंतरच्या इतिहासामध्ये उन्हाळ्याचा उच्चांक गाठण्यापूर्वीच इतकी प्रचंड उष्णतेची लाट येण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. ‘वर्ल्ड वेदर अट्रिब्यूशन’च्या हवामान शास्त्रज्ञांच्या मते, मानवी हस्तक्षेपामुळे आणि उद्योगांमुळे वाढलेल्या हरितगृह वायू उत्सर्जनाव्यतिरिक्त अशी भीषण उष्णता येणे अशक्य होते. जागतिक तापमान १.३ अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे जी उष्णतेची लाट ५० वर्षांतून एकदा येणे अपेक्षित होते, ती आता दर ५ वर्षांनी येऊ लागली आहे. जीवाश्म इंधनाचा अमर्याद वापर हेच यामागचे मुख्य कारण आहे.
या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका फ्रान्सला बसला आहे. तेथे १००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये १९४७ पासून हवामानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली, तेव्हापासूनचे जून महिन्यातील सर्वात उष्ण दिवस यंदा नोंदवले गेले आहेत. तेथील सरासरी तापमान २९.९ अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर १४७ शहरांनी जूनमधील स्वतःचे सर्वोच्च तापमान पार केले आहे. ४१ हवामान केंद्रांवर तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात उष्ण रात्रही याच काळात नोंदवली गेली. शेजारील स्पेन देशाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. स्पेनमधील काही भागांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. युरोपमधील मृतांमध्ये प्रामुख्याने केअर होम्स आणि खासगी घरांमध्ये राहणार्या वृद्धांची संख्या जास्त आहे. युरोपच्या ऊर्जा क्षेत्राला आणि पायाभूत सुविधांनाही बसला आहे. फ्रान्स आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये रात्रीच्या वेळीही तापमान अत्यंत उच्च राहिल्यामुळे डॅन्यूबसारख्या प्रमुख नद्यांचे पाणी प्रमाणाबाहेर गरम झाले आहे. अणू ऊर्जा प्रकल्प थंड ठेवण्यासाठी या नद्यांच्या पाण्याचा वापर केला जातो; परंतु हे पाणी आधीच गरम असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून अणू प्रकल्पांमधील वीजनिर्मिती पूर्णपणे थांबवावी लागली आहे. जर्मनीच्या नॉर्थ राईन वेस्टफेलिया राज्यामध्ये अतिउष्णतेमुळे रेल्वेचे रूळ वितळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक प्रमुख रेल्वे फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर लीपझिग शहरात ट्राम सेवा पूर्णपणे निलंबित करण्यात आली आहे. इटलीची जीवनवाहिनी मानली जाणारी पो नदी इतकी सुकली आहे की, समुद्राचे खारे पाणी नदीच्या पात्रात आत १८ किलोमीटरपर्यंत घुसले आहे. यामुळे नदीकाठची शेती आणि पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
युरोपीय हवामान जोखीम मूल्यमापन अहवालानुसार, या अतिउष्णतेमुळे कामगारांची कार्यक्षमता घटत आहे. २०५० पर्यंत या उष्णतेमुळे युरोपच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनाला जवळपास १ टक्क्यांहून अधिक आर्थिक फटका बसेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. दक्षिण युरोपमधील देशांमध्ये हे नुकसान आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. पोर्तुगालसारख्या देशांमध्येही उष्णतेच्या लाटेदरम्यान रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले असून, यामुळे तेथील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत आहे. पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच १९७६ मध्ये आलेली उष्णतेची लाट आजच्या तुलनेत सुमारे ३.५ अंश सेल्सिअसने थंड होती, असे दिसून आले आहे. यावरून यंदाची परिस्थिती किती भीषण असेल, याची कल्पना करता येईल. युरोपीय आयोगाने या उष्णतेच्या लाटेची दखल घेत नवीन ‘युरोपीय एकात्मिक हवामान लवचिकता आराखडा’ लागू करण्याचे ठरवले आहे.
‘युरोपियन स्टेट ऑफ द क्लायमेंट’च्या ताज्या अहवालानुसार 2025 च्या काळात युरोपात किमान 95 टक्क्यांपेक्षा अधिक दिवसांत सरासरी कमाल तापमान अधिक असल्याचे नोंदले गेले आहे. या भीषण उष्णतेचे कारण म्हणजे आर्कटिक सर्कल (धु्रवीय सर्कल) सारख्या थंड वातावरणातील तापमान 30 अंशापेक्षा अधिक राहणे होय. याशिवाय समुद्राच्या पृष्टभागातील तापमान आजवरच्या इतिहासात सर्वात उष्ण असल्याचे नोंदले गेले. 19 व्या शतकाच्या अखेरीस पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत आज युरोपचे तापमान सरासरी 2.5 अंशांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण जगाचा विचार केल्यास तज्ज्ञांनी जागतिक पातळीवर तापमान वाढीची सरासरी केवळ 1.4 अंश सेल्सिअस नोंदविली आहे.
2022 च्या उन्हाळ्यात युरोपमध्ये उष्णतेमुळे 60,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 2020 ते 2024 दरम्यान उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटांमुळे एकट्या ब्रिटनमध्ये 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सध्याच्या उष्णतेच्या लाटेच्या एकूण प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेले सांख्यिकीय विश्लेषण पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागेल. तरीही, या उष्णतेच्या लाटेमुळे मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान होणार हे निश्चित आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, युरोपची भौगोलिक रचना उत्तर ध्रुवावरील ‘आर्क्टिक’ क्षेत्राशी जोडलेली आहे. हा भाग पृथ्वीवरील इतर भागांच्या तुलनेत तीन पटीने अधिक वेगाने तापत आहे. या प्रक्रियेला ‘आर्क्टिक अॅम्प्लिफिकेशन’ म्हणतात. वाढत्या उष्णतेमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फ आणि युरोपमधील हिमनद्या (ग्लॅशियर्स) वेगाने वितळत आहेत. एरवी पांढरा शुभ्र बर्फ सूर्याची किरणे अंतराळात परावर्तित करून पृथ्वी थंड ठेवतो. याला ’अल्बेडो इफेक्ट’ म्हणतात. परंतु, बर्फ वितळल्यामुळे खाली असलेली गडद रंगाची जमीन आणि समुद्र उघडे पडत असून, ते सूर्याची उष्णता परावर्तित करण्याऐवजी स्वतःमध्ये शोषून घेत आहेत. यामुळे युरोपच्या उत्तर भागात उष्णतेचे एक न संपणारे चक्र तयार झाले आहे.
दुसरे म्हणजे विषुववृत्त आणि उत्तर ध्रुव यांच्यातील तापमानातील फरकामुळे वातावरणात ‘जेट स्ट्रीम’ नावाचे वेगवान वारे वाहतात. हे वारे युरोपमधील हवामान नियंत्रित ठेवतात. मात्र, बर्फ वितळल्यामुळे ध्रुवीय प्रदेश गरम होत असून दोन्ही भागांतील तापमानाचा फरक कमी झाला आहे. परिणामी, हे जेट स्ट्रीम वारे दोन भागात विभागले जात आहेत. या बिघाडामुळे युरोपच्या आकाशात उच्च दाबाची प्रणाली निर्माण होऊन हवा स्थिर होते. ही प्रणाली उत्तर आफ्रिका आणि सहारा वाळवंटातील उष्ण हवा युरोपमध्ये खेचून घेते आणि ‘हीट डोम’ (उष्णतेचा घुमट) तयार करून ती हवा तिथेच कोंडून ठेवते.
गेल्या काही दशकांत युरोपियन युनियनने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कडक कायदे लागू केले आहेत. यामुळे कारखाने आणि वाहनांमधून निघणारे घातक सल्फरसारखे सूक्ष्म कण म्हणजेच ’अॅरोसोल्स’ वातावरणात जाणे खूप कमी झाले आहे. आरोग्यासाठी हा बदल चांगला असला, तरी याचा एक पर्यावरणीय दुष्परिणाम झाला आहे. हे हवेतील सूक्ष्म अॅरोसोल्स कण आणि त्यांच्यामुळे बनणारे ढग सूर्याची किरणे अडवून ती पुन्हा अवकाशात पाठवत असत, ज्यामुळे पृथ्वीला एक प्रकारे सावली मिळत होती. आता हवा स्वच्छ झाल्यामुळे थेट आणि प्रखर सूर्यप्रकाश युरोपच्या जमिनीवर पडत असून तापमानवाढीचा वेग वाढला आहे.
जागतिक तापमानवाढीबाबत एरवी विकसनशील आणि गरीब देशांना दूषणे देणार्या युरोपियन देशांनी आता हवामान बदलांबाबतचा शहाजोगपणा आणि बचावात्मक भूमिका सोडून जागतिक सामूहिक उपाययोजनांसाठी सक्रिय पुढाकार घ्यायला हवा.