

डॉ. सुकृत खांडेकर
उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. पंचवीस वर्षांपूर्वी या राज्याचे विभाजन करून उत्तराखंडची निर्मिती झाली तरी सर्वात मोठी लोकसंख्या याच राज्यात आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ४०३ जागा आहेत. सर्वाधिक ८० खासदार याच राज्यातून लोकसभेवर निवडले जातात. केंद्रात सत्ता काबीज करण्याचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. देशाला सर्वाधिक पंतप्रधान याच राज्याने दिलेत. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी अशी नावे सांगता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याच राज्यातील वाराणसी मतदारसंघाने सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून दिले आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता उपभोगली. पण गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून काँग्रेसची सतत घसरण चालू आहे. मुलायमसिंग - अखिलेश यादवनंतर मायावतींच्या जाती-पातीच्या राजकारणात काँग्रेस टिकाव धरू शकली नाही. काँग्रेसच्या विरोधात भाजपसह सर्व विरोधी पक्ष उत्तर प्रदेशात युती-आघाड्या करून लढू लागल्याने काँग्रेसची दाणादाण उडाली. मोदी पर्वाचा देश पातळीवर उदय झाल्यापासून उत्तर प्रदेशात काँग्रेसची आणखी दयनीय स्थिती झाली. एका बाजूला योगी आदित्यनाथ व दुसरीकडे अखिलेश यादव या संघर्षात काँग्रेसला मतदारांनी साफ नाकारले. या राज्यात काँग्रेसची अवस्था आयसीयूमधल्या पेशंटसारखी झाली आहे. पण विधानसभा निवडणुकीत सपाशी जागावाटप करताना काँग्रेसची भूक फारच मोठी आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उत्तर प्रदेशच्या विधानसभेत केवळ दोन आमदार निवडून आले होते आणि आता तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १८१ जागा लढविण्याचा हट्ट सपाकडे धरला आहे. काँग्रेसकडे २५ जागा तरी लढविण्याची क्षमता आहे का, असा प्रश्न सपा विचारत आहे. राज्यात काँग्रेसची संघटना खिळखिळी झाली आहे. पक्षाला प्रदेश नेतृत्व नाही. अमेठी व रायबरेली या दोन मतदारसंघांतून काँग्रेसचे खासदार असले तरी तेथे सर्वाधिक आमदार सपा व भाजपचे निवडून आले आहेत, याकडे कसे दुर्लक्ष करता येईल?
उत्तर प्रदेशात भाजपविरोधात काँग्रेस स्वबळावर लढण्याचा स्वप्नातही विचार करू शकत नाही आणि आघाडी करायची तर सपाशिवाय दुसरा मित्र नाही. लोकसभेत काँग्रेसचे १०० खासदार आहेत. सपाचे ३७ खासदार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सपा आणि काँग्रेस संसदेत एकजुटीने लढताना दिसतात. पण याचा अर्थ असा नव्हे की, उत्तर प्रदेशात काँग्रेसने जेवढ्या मागितल्या, तेवढ्या जागा सपाने सोडाव्यात. उत्तर प्रदेशात सत्ता भाजपची असली तरी या राज्यातून निवडून गेलेल्या सपा खासदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेस व सपा यांच्यात खेचाखेची चालू आहे, असे चित्र दिसले. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. देश पातळीवर भाजपशी जिद्दीने लढणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. पण उत्तर प्रदेशात राहुल गांधींपेक्षा अखिलेश यादव यांना अधिक पसंती आहे. अखिलेश यांच्या सपाचे नेटवर्क उत्तम आहे. यादव - मुस्लिम मतदार व्होट बँक त्यांच्या पाठीशी आहे. जनतेला ते उपलब्ध आहेत. त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे. उत्तर प्रदेशमधील ४०३ विधानसभा मतदारसंघांपैकी १८१ जागा काँग्रेसला देण्यास सपाने पहिल्याच फटक्यात नकार दिला. नंतर काँग्रेसने १३० जागांची मागणी केली तेव्हाही सपाने २६ जागा देतो असे सांगितले. सपाने काँग्रेसला देऊ केलेल्या २६ जागांमधे २० जागा अशा आहेत की, तेथे सपाला गेल्यावेळी ७० हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती व तेथे काँग्रेसला जेमतेम दोन हजार मते पडली. मग निवडणूक हरण्यासाठी काँग्रेसला जागा सोडायच्या का, असा प्रश्न सपाचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी विचारला आहे. पण आपला राष्ट्रीय पक्ष आहे अशा कल्पनेत सदैव वावरणाऱ्या काँग्रेसला यूपीमध्ये कुवत नसतानाही १०० पेक्षा जास्त जागा लढविण्याची हाव आहे.
काँग्रेसने मायावतींच्या बहुजन समाज पक्षाबरोबर समझोता करून १९९६ मध्ये यूपी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा काँग्रसने १२६ जागा लढवल्या व ३३ जिंकल्या होत्या. हीच गेल्या ३० वर्षांतील काँग्रेसची सर्वात उत्तम कामगिरी होती. खरे तर ४०३ जागांच्या सदनात काँग्रेसचे ३३ आमदार हे सुद्धा दयनीय होते. त्या निवडणुकीत काँग्रेसला ८.३५ टक्के मते मिळाली होती. बसपने २९६ जागा लढवल्या व ६७ जागांवर विजय मिळवला होता. बसपला तेव्हा १९.६४ टक्के मते मिळाली. सन २००२ ची विधानसभा काँग्रेसने स्वबळावर लढवली. काँग्रेसने ४०२ जागा लढवल्या व २५ जिंकल्या. पक्षाला ८.९६ टक्के मते मिळाली. पाच वर्षांनी काँग्रेसच्या कामगिरीत आणखी घसरण झाली. सन २००७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३९३ जागा लढवल्या व पक्षाला २२ जागांवर विजय मिळाला. मतांची टक्केवारी ८.६१ होती. त्यावेळी बसपने स्वबळावर निवडणूक लढवली, स्पष्ट बहुमत मिळवले व मायावतींच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन केले.
सन २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली. राष्ट्रीय लोकदलाबरोबर युती करून काँग्रेसने ३५५ जागा लढवल्या व २८ जिंकल्या. या निवडणुकीत काँग्रेसला ११. ६५ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत सपाला बहुमत मिळाले व अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाले. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अखिलेश यादव यांना त्यांच्या काकांकडूनच मोठे आव्हान मिळाले होते. घरातील सत्तासंघर्ष मैदानात आला होता. तेव्हा अखिलेश यांनी काँग्रेसबरोबर युती केली. अखिलेश यादव व राहुल गांधी हे दोघेही उत्तर प्रदेशचे. म्हणून यूपी को ये साथ पसंत है… असा प्रचार केला गेला. अखिलेश व राहुल हे दोघे यूपीचे पुत्र असे भावनिक आवाहन केले गेले. सपाने ३११ जागा लढवल्या तर काँग्रेसने ११४ उमेदवार मैदानात उतरवले. पण सपा-काँग्रेस युतीचे केवळ ५४ आमदार निवडून आले. त्यात सपाचे ४७ तर काँग्रेसचे ७ विजयी झाले. भाजपच्या झंझावातापुढे (मोदी लाटेपुढे) सपा – काँग्रेस युतीचे पानिपत झाले. भाजपचे ३०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले. युतीचा लाभ मिळाला नाही हे दोघांनाही कळून चुकले.
सन २०२२ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस व सपा वेगवेगळे लढले. काँग्रेसने निवडणूक प्रचाराची सारी सूत्रे अ. भा. काँग्रेसच्या सरचिटणीस खा. प्रियांका गांधी यांच्यावर सोपवली होती. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अशी घोषणा प्रियांका यांनी दिली होती. काँग्रेसने ३९९ जागांवर उमेदवार मैदानात उतरवले. पण प्रत्यक्षात पक्षाचे केवळ दोनच आमदार निवडून आले. काँग्रेसला केवळ २.३३ टक्के मते मिळाली. मोदी-योगींचा करिष्मा व भाजपच्या रणनीतीपुढे काँग्रेसची धूळधाण उडाली. डिपॉझिट जप्त होण्याचा विक्रम काँग्रेसने केला.
सन २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सपा-काँग्रेसची युती झाली. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. यापैकी सपाने ६२ लढवल्या व ३७ जिंकल्या तर काँग्रेसने १७ लढवल्या व ६ जिंकल्या. सपा-काँग्रेस युतीचे मिळून ४३ खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले तर भाजपचे ३३ खासदार विजयी झाले. २०१९ मध्ये या राज्यातून भाजपचे ६२ खासदार निवडून आले होते. २०२४ च्या निकालापासून काँग्रेसला राज्यात अनुकूल वातावरण आहे. पाच वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर सपाने २०१७ मध्ये काँग्रेसला ११४ जागा सोडल्या होत्या. मग २०२७ मध्ये १८१ जागा सोडायला काय अडचण आहे, असा युक्तिवाद काँग्रेस करत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० विधानसभा मतदारसंघांत आघाडी होती, असा दावा काँग्रेसने केला आहे. १०० पेक्षा कमी जागा स्वीकारणार नाही, असे काँग्रेसचे नेते ठामपणे सांगत आहेत. एकेका जागेसाठी काँग्रेस सपापुढे अगतिक आहे.