क्रीडा : तेजस्वी तारे..!

क्रीडा : तेजस्वी तारे..!
Published on
Updated on

फेडरर, नदाल व जोकोविच या तीनही श्रेष्ठ खेळाडूंचे कौशल्य कार्लोस अल्कारेझ याच्याकडे आहे असे म्हटले जाते. खुद्द जोकोविच यानेही विम्बल्डनचा अंतिम सामना झाल्यानंतर कार्लोस अल्कारेझचे कौतुक करताना या विधानाला पुष्टी दिली होती. त्यामुळेच या तीनही श्रेष्ठ खेळाडूंचा वारसदार म्हणूनच कार्लोस अल्कारेझ याच्याकडे पाहिले जात आहे. कार्लोस व मार्केता यांनी मिळवलेल्या विजेतेपदामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धांना खर्‍या अर्थाने युवा चेहरा लाभला आहे.

ग्रँड स्लॅम स्पर्धांना केवळ टेनिसच नव्हे तर जागतिक क्रीडा क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही खेळाडू एक वेळ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार नाहीत; पण या स्पर्धेमधील मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी जीवाचे रान करतात. अशा या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये टेनिस चाहत्यांना बुजुर्ग खेळाडूंबरोबरच युवा शक्तीकडूनही सर्वोच्च यशाची अपेक्षा असते. यंदा कार्लोस अल्कारेझ व मार्केता वोंद्रोसोवा यांनी ही अपेक्षा पूर्ण केली.

टेनिसमध्ये मातब्बर खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्‍या रॉजर फेडरर, राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांच्यापैकी फेडरर याने स्पर्धात्मक टेनिसमधून यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली आहे तर नदाल हा दुखापतीमुळे विम्बल्डनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे जोकोविच हा विजेतेपदासाठी मुख्य दावेदार होता. व्यावसायिक टेनिसमध्ये मार्गारेट कोर्ट या महिला खेळाडूने एकेरीची सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवले आहेत. या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी जोकोविच याला होती. विशेषतः विम्बल्डन स्पर्धेपूर्वी झालेल्या फ्रेंच स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावीत अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र कार्लोस अल्कारेझ याने अतुलनीय कामगिरीच्या जोरावर जोकोविच याला या विक्रमापासून वंचित ठेवले.

नदाल व जोकोविच यांच्यासारख्या खे ळाच्या द़ृष्टीने प्रौढ असलेल्या खेळाडूंकडून प्रेक्षकांना सर्वोच्च कामगिरीची अपेक्षा असते. किंबहुना या श्रेष्ठ खेळाडूंचेही असंख्य चाहते आहेत. मात्र युवा खेळाडूंनीही ग्रँड स्लॅमच्या एकेरीतील विजेतेपदावर मोहोर उमटवावी अशी तीव्र इच्छा असते. यंदा टेनिस रसिकांची ही अपेक्षा पूर्ण झाली. फेडरर, नदाल व जोकोविच या तीनही श्रेष्ठ खेळाडूंचे कौशल्य कार्लोस अल्कारेझ याच्याकडे आहे असे म्हटले जाते. खुद्द जोकोविच यानेही विम्बल्डनचा अंतिम सामना झाल्यानंतर कार्लोस अल्कारेझचे कौतुक करताना या विधानाला पुष्टी दिली होती. त्यामुळेच या तीनही श्रेष्ठ खेळाडूंचा वारसदार म्हणूनच कार्लोस अल्कारेझ याच्याकडे पाहिले जात आहे.

अल्पावधीतच उत्तुंग भरारी

कार्लोस अल्कारेझ या वीस वर्षीय स्पॅनिश खेळाडूने तीन वर्षांपूर्वी एटीपी स्पर्धांच्या मालिकेत खेळण्यास सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांमध्ये टेनिसमध्ये त्याने केलेली प्रगती खरोखरीच अतुलनीय आहे. गतवर्षी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर नोंदविताना त्याने याची झलक दाखवली होती. टेनिसमधील तेजस्वी तारा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जात आहे. विम्बल्डन स्पर्धेतील एकेरीसाठी त्यालाच अग्रमानांकन देण्यात आले होते. मानांकन समितीचा विश्वास सार्थ ठरवताना त्याने अतिशय परिपूर्ण खेळाचा प्रत्यय घडविला. उपांत्य फेरीत डॅनिल मेदवेदेव याचा 6-3, 6-3, 6-3 असा धुव्वा उडवताना त्याने दाखविलेला वेगवान खेळ अतिशय कौतुकास्पद होता. मैदानाच्या सर्वच बाजूंवर चित्त्यासारखी धाव घेत परतीचे फटके मारण्याचे त्याचे कौशल्य सर्वांनाच थक्क करणारे होते. जोकोविच याच्याविरुद्ध अंतिम सामन्यात पहिला सेट त्याने 1-6 असा गमावला. त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पाठोपाठ दुसर्‍या सेटमध्येही तो पिछाडीवर होता. संयम व चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे आपण नेहमी म्हणतो. या सेटमध्ये त्याला लय सापडली. टायब्रेकरमध्ये सुरुवातीच्या पिछाडीवरून त्याने ड्रॉप शॉटस्, फोरहँड क्रॉसकोर्ट फटके असा खेळ केला. टायब्रेकरद्वारे हा सेट त्याने घेतला आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.

तेव्हा कुठे त्याच्या चाहत्यांनी सुस्कारा टाकला. वीसवर्षीय कार्लोस आणि 36 वर्षीय जोकोविच यांच्यातील हा सामना तेथून क्षणाक्षणाला रंगतदारच झाला. तिसर्‍या सेटमधील एक गेम तर 26 मिनिटे चालली होती. त्यामध्ये तेरा वेळा बरोबरी झाली. या गेममुळे टेनिस चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद घेण्याची संधी मिळाली किंबहुना त्यांचे पैसे वसूल झाले असेच म्हणावे लागेल. हा सेट कार्लोसने घेतला. तथापि चौथ्या सेटमध्ये जोकोविचने आपण या वयातही त्याने टेनिस सम्राटपदाला शोभेल असा असा खेळ केला. हा सेट त्याने जिंकल्यामुळे सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली आणि सामन्यातील उत्सुकता शिगेला पोहोचली. हा सेट गमावल्यानंतरही कार्लोसने जिद्द सोडली नाही. पाचव्या सेटमध्ये त्याने जोकोविच याची सर्व्हिस तोडण्यात यश मिळवले. वाढत्या वयाचा विचार केला तर खेळाच्या दृष्टीने जोकोविच याच्या मर्यादा स्पष्ट दिसू लागल्या आहेत याची झलक पाचव्या सेटमध्ये पाहावयास मिळाली. कार्लोसने हा सेट घेतला आणि स्वप्नवत् विजेतेपद मिळविले.

मार्केताचे विक्रमी यश

चेक प्रजासत्ताकच्या मार्केता हिने विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद मिळवताना विक्रमी यश संपादन केले. बिगर मानांकित खेळाडूने विजेतेपद जिंकण्याची अनोखी कामगिरी तिने केली. अर्थात हा पराक्रम करताना तिने अनेक मानांकित आणि अनुभवी खेळाडूंवर शानदार विजय मिळविला. तिने यापूर्वी फ्रेंच खुल्या स्पर्धेत चार वर्षांपूर्वी उपविजेतेपद मिळवले होते तर टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये तिने रौप्य पदक पटकावले होते. महिलांच्या जागतिक मालिकांच्या अंतिम स्पर्धेत तिने दोन वेळा विजेतेपद जिंकले आहे. मात्र एक वर्षापूर्वी ती दुखापतीमुळे काही महिने टेनिस पासून दूर होती. किंबहुना या दुखापतीमुळे तिची टेनिस कारकीर्द संपणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. पण इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या दुखापतीवर यशस्वीरीत्या मात केली आणि टेनिसमध्ये जोरदार पुनरागमन केले.

ट्युनिशियाची खेळाडू ओन्स जेबर हिने अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी सातत्यपूर्ण पराक्रमाची झलक दिली होती. गतवर्षी येथे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. विजेतेपदाची गमावलेली संधी यंदा साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती. अंतिम फेरीत पहिल्या सेटमध्ये मार्केताविरुद्ध 4-2 अशी तिने आघाडी देखील घेतली होती. त्यावेळी ती हा सामना जिंकणार असेच वाटत होते. 'धीर धरी रे धीरा पोटी, फळे मिळतील रसाळ गोमटी' असे आपण नेहमी म्हणतो. मार्केता या डावखुर्‍या खेळाडूने जिद्द सोडली नाही. या पिछाडीवरून परिपूर्ण खेळाचा प्रत्यय घडवत तिने सलग चार गेम्स घेतल्या आणि हा सेट जिंकला. ती एवढ्यावरच थांबली नाही तर पुढच्या सेटमध्येही पहिल्या दोन गेम्स तिने घेतल्या आणि सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकविले. पहिला सेट गमावल्यामुळे जेबर हिच्या खेळातील लय बिघडली. त्यातूनच तिच्याकडून नकळत चुका होत गेल्या त्याचाही फायदा मार्केताने घेतला नाही तर नवलच. जरी क्ले कोर्ट हे तिचे आवडते मैदान असले तरीही तिने विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर दाखवलेले कौशल्य अतिशय अतुलनीय होते. दुहेरी पद्धतीने बॅक हँडचे फटके, फसव्या व्हॉलीज, बिनतोड सर्व्हिस, नेट जवळून अचूक प्लेसिंग असा चतुरस्र खेळ करीत तिने दुसरा सेटही जिंकला आणि विक्रमी विजेतेपदाचे स्वप्न साकारले. तिच्या खेळात अतिशय विविधता आहे हे तिने दाखवून दिले.

दंडात्मक कारवाई

जोकोविच या ज्येष्ठ खेळाडूबरोबरच मीरा आँड्रिव्हा या युवा खेळाडूला देखील बेशिस्त वर्तनाबद्दल दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले. पंचांचा निर्णय आपल्याविरुद्ध लागला तरी खिलाडू वृत्तीने त्याचा स्वीकार केला पाहिजे तसेच आपल्या हातून होणार्‍या चुकांबद्दल रॅकेट आपटून किंवा फेकून राग व्यक्त करणे ही अतिशय बेशिस्त वर्तनाचीच लक्षणे आहेत. मीरा आँड्रिव्हा ही युवा खेळाडू असल्यामुळे तिने यापुढे तरी असे वर्तन टाळले पाहिजे. जोकोविच हा खेळाबरोबरच अन्य वेगवेगळ्या कारणांस्तव कायमच चर्चेत असतो. उदयोन्मुख खेळाडूंपुढे नेहमीच श्रेष्ठ खेळाडूंचा आदर्श असतो हे लक्षात घेऊन त्यानेही आपल्या रागावर व वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा अनेक विजेतेपद मिळवणार्‍या जॉन मॅकेन्रो याला चिडचिडा व बेशिस्त खेळाडू म्हणून ओळखले जाते, तशीच खूप कुप्रसिद्धी जोकोविच याला मिळण्याची शक्यता आहे.

कार्लोस व मार्केता यांनी मिळवलेल्या विजेतेपदामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धांना खर्‍या अर्थाने युवा चेहरा लाभला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेत अन्य युवा खेळाडूंनी देखील त्यांचा कित्ता गिरवण्याची आवश्यकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news