अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर केवळ बॉलीवूडच नाही, तर देशही हादरून गेला आहे. एखादा सेलिब्रिटी किंवा बॉलीवूडचा नायक हा अमली पदार्थांच्या आहारी जाणे किंवा सेवन करणे, ही बाब नवीन नाही. संजय दत्त, फरदिन खान, प्रतीक बब्बर यासारख्या नायकांपासून ते ममता कुलकर्णी, पूजा भट्ट, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह आदी नायिकांचीही नावे या जीवघेण्या व्यसनाशी जोडलेली दिसून आली आहेत.
बॉलीवूड आणि अमली पदार्थ यांचे कनेक्शन गेल्या चार दशकांपासून राहिलेले आहे. बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रिटी अमली पदार्थांच्या मगरमिठीत अडकल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडची नवीन पिढीदेखील या जाळ्यात अडकली आहे. गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर बॉलीवूडचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आला. एवढेच नाही, तर अंडरवर्ल्ड डॉन, माफियांनी बॉलीवूडमधील मातब्बरांना हाताशी धरून अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून आले आहे. अंडरवर्ल्डचा पैसा बॉलीवूडमध्ये असल्याचा संशय नेहमीच व्यक्त केला गेला आहे. एखादा सेलिब्रिटी किंवा बॉलीवूडचा नायक हा अमली पदार्थांच्या आहारी जाणे किंवा सेवन करणे ही बाब नवीन नाही. संजय दत्त असो, फरदिन खान असो, अमली पदार्थांचे बॉलीवूड कनेक्शन नेहमीच उघड झाले आहे.
संजय दत्त : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचे करिअर सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्यात राहिले आहे. अमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय त्याने मोकळेपणाने कबूल केली होती. काही वर्षांपूर्वी सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये त्याने कॉलेजमध्येच आपल्याला अमली पदार्थ घेण्याची सवय लागल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, मला कोणी तरी सांगितले की, एकदा ट्राय कर; मग सुरू केले आणि ती सवय नऊ वर्षांपर्यंत राहिली. बराच काळ पुनर्वसन केंद्रात घालवल्यानंतर आज संजय दत्त अमली पदार्थांपासून चार हात लांब आहे.
ममता कुलकर्णी : 1990 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिचे नाव 2018 रोजी अचानक प्रकाशझोतात आले आणि क्षणात तिची प्रसिद्धी लयाला गेली. जून 2018 रोजी पोलिस ठाण्यात ड्रग्ज रॅकेटप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि यात ममता कुलकर्णीचे नाव होते. पोलिसांनी छाप्यात 2 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केलेे. अर्थात, ममताने हे आरोप नाकारले.
फरदिन खान : प्रसिद्ध अभिनेते फिरोज खानचे चिरंजीव फरदिन खान याने खूपच कमी काळ चित्रपटात काम केले आहे. अभिनयाऐवजी त्याच्या ड्रग्ज कनेक्शनचीच चर्चा अधिक झाली आहे. त्याला अमली पदार्थ सेवन करण्याची सवय होती. याप्रकरणी 5 मे 2001 रोजी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे 9 ग्रॅम कोकेन जप्त केलेे. त्याचवर्षी फरदिनने डिटॉक्सिफिकेशन कोर्स केला आणि अमली पदार्थांचे सेवन सोडले.
अरमान कोहली : अरमान कोहलीनेदेखील अमली पदार्थांवरून तुरुंगाची हवा खाल्ली आहे. ऑगस्ट महिन्यात अरमान कोहलीच्या घरावरही एनसीबीने छापा मारला होता. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. त्याच्या घरीदेखील अमली पदार्थ सापडलेे. परंतु, त्याचे प्रमाण कमी होते.
पूजा भट्ट : पूजा भट्ट एकेकाळी मद्याच्या आहारी गेली होती. आता ती या जगापासून दूर राहत आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच तिने मद्यपान करण्यास सुरुवात केली होती. 23 व्या वर्षी तिने पहिल्यांदा सिगारेट ओढली. परंतु, तिने कोकेनचे सेवन कधीही केले नव्हते.
प्रतीक बब्बर : स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचे चिरंजीव प्रतीक बब्बर यानेही संजय दत्तप्रमाणेच अमली पदार्थांची सवय असल्याचे मान्य केलेे. वयाच्या 13 व्या वर्षीच अमली पदार्थांचे सेवन केल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या आयुष्यात अनेक महिला आल्या आणि गेल्या. अमली पदार्थांची चटक कायम राहिली, असे प्रतीकने म्हटले आहे. कालांतराने तो नशामुक्ती केंद्रात राहिला आणि तो बाहेर आला. तो म्हणतो, अमली पदार्थांमुळे माझे बालपण हिरावले गेले. अंतर्गत कलहामुळे माझ्या डोक्यात सतत आवाज घुमायचा. मी स्वत:ला प्रश्न विचारायचो की, मी कोठे आहे. केवळ 13 व्या वर्षी पहिल्यांदा ड्रग्ज घेतले आणि नंतर सवय लागली. ड्रग्जशिवाय मी अंथरुणातूनही उठू शकत नव्हतो. दररोज सकाळी मी अस्वस्थ असायचो. कधी शरीर दुखायचे, तर कधी डोकं. जेव्हा माझ्याकडे आवडीचे ड्रग्ज नसायचे तेव्हा मी कोणतेही ड्रग्ज घेण्यासाठी आतूर असायचो. ही बाब खूपच हानिकारक होती.
रिया चक्रवर्ती : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एनसीबीला ड्रग्ज कनेक्शनचा शोध लागला. पोलिस तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्ती कायदेशीर कारवाईत अडकली. तिला महिनाभर तुरुंगातही राहावे लागले आहे. सुशांतला अमली पदार्थ दिल्याचा रियावर आरोप आहे. तसेच ती ड्रग्ज सिंडिकेटचा भाग होती, असे म्हटले जाते. रियाच्या भावालाही अटक केली होती.
सारा अली खान : सारा अली खानदेखील ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली आहे. सुशांतच्या फार्महाऊसवर होणार्या पार्टीत ती सामील होत असे. यात ड्रग्जचादेखील वापर केला जात होता. एनसीबीने चौकशी सुरू केल्यानंतर साराने ड्रग्ज घेतल्याचा इन्कार केला आहे.
श्रद्धा कपूर : श्रद्धा कपूरदेखील व्हॉटस्अॅपच्या चॅटिंगमुळे एनसीबीच्या 'रडार'वर आली. तिच्या चॅटमधून ती सीबीडी ऑईलचे सेवन करत होती, असे निदर्शनास आले आहे. एनसीबीच्या चौकशीत श्रद्धाने सीबीडी ऑईलचे सेवन एर्क्स्टनल यूजसाठी करत असल्याचे म्हटले आहे.
अर्जुन रामपाल : अर्जुन रामपालदेखील अमली पदार्थांच्या प्रकरणात अडकलेला आहे. अर्जुनची पार्टनर गॅब्रिएला डिमिट्रिएड्सचा भाऊ हा अमली पदार्थाच्या प्रकरणात आरोपी होता. त्यामुळे एनसीबीने अर्जुनच्या घरीदेखील छापा घातला होता. तेथे काही पुरावेदेखील सापडले होते.
दीपिका पदुकोण : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाशिवाय काही कलाकारही यात अडकले होते. दीपिकाचीदेखील चौकशी करण्यात आली. वास्तविक, दीपिका आणि तिचा मॅनेजर हे व्हॉटस्अॅपच्या चॅटमध्ये ड्रग्जशी संबंधित चर्चा करत असल्याचे आढळून आले. दीपिकाने हा संवाद कबूल केला.
रकुलप्रीत सिंह : रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान रकुलप्रीत सिंहचे नाव घेतले होते. एनसीबीने रकुलला समन्स बजावलेे. रकुलने चौकशीदरम्यान ड्रग्ज घेतल्याचा आरोप फेटाळला होता. रकुलचे नाव अलीकडेच दाक्षिणात्य चित्रपटातील मोठ्या कलाकारांबरोबर ड्रग्जच्या अन्य प्रकरणात आले होते.