शोध सुखाचा! : ‘जर… फक्त!’

शोध सुखाचा! : ‘जर… फक्त!’
Published on
Updated on

[author title="सुजाता पेंडसे" image="http://"][/author]

आनंद म्हणजे काय? त्याची व्याख्या कोणी करू शकेल का? हो! प्रत्येकजण आनंदाची व्याख्या करू शकतो; पण ती ज्याची त्याची वेगळी असेल; कारण व्यक्तिगणीक आनंद बदलत राहतो.

तुम्ही आज जिथे आणि जसे आहात; तोपर्यंतच्या आयुष्यातले आनंद मोजा, असं जर तुम्हाला सांगितलं तर महत्त्वाचे असे काही चार-पाच प्रसंग किंवा घटना तुम्ही सांगाल. उदा., व्यवसायात खूप प्रॉफिट झाला, स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण झालं, मनासारखी पत्नी मिळाली, उत्तम नोकरी मिळाली, एखादं अ‍ॅवॉर्ड मिळालं किंवा अशा काही ठळक घटना प्रत्येकजण सांगेल; पण याशिवाय इतर किती तरी गोष्टी घडल्या असतीलच ना, ज्या तुम्हाला आनंद देऊन गेल्या असतील. अनेक छोट्या छोट्या गोष्टी मनाला प्रसन्न करून गेल्या असतील; पण त्या तुम्ही विसरून जाता. याचे कारण कोणताही आनंद हा चिरकाल टिकणारा नसतो. तो क्षणभंगुर असतो; कारण तो बाह्य परिस्थिती किंवा घडणार्‍या घटना याच्यावर अवलंबून असतो. परंतु, ती मनाची सवय बनवून घेता आली, तर माणूस दीर्घकाळ आनंदी राहू शकतो.

सुख किंवा आनंद बाहेरच्या जगाशी जोडून घेणार्‍यांना बहुतांश वेळा दु:खी राहावे लागते. कारण, सुख आणि आनंदाची निवड करणं
खरं तर तुमच्याच हातात आहे. 'आपण कसे असावे' हे पूर्णत: आपल्या हातात ठेवण्याची कला किंवा कौशल्य म्हणा हवं तर; पण ते तुम्ही मिळवू शकता. तसं नसतं तर, विपरीत परिस्थितीतही आनंदी राहणारी माणसं सभोवताली दिसलीच नसती.

काही काळ माणसं सदैव दु:खी, हताश, निराश दिसतात. परिस्थिती भल्याभल्यांचे धैर्य संपवून टाकते, हे खरे असले तरी त्याही स्थितीत उत्तम जीवन जगणारी माणसं 'बातमी'चा विषय बनलेली पाहतोच की आपण. याचाच अर्थ आनंदाची निवड करायची की दु:खाची, याची जबाबदारी तुमचीच असते. ते करता येतं, कसं ते आता पाहू…

एक उदाहरण घेऊया. एका व्यक्तीच्या आयुष्यात एकामागोमाग खूप संकटे आली. त्यामुळे त्याचे जगण्यातले स्वारस्यच संपत आले. त्याचे घर खूप मोठे होते; पण दुर्दैवाने त्याच्या घरात आता कुणीच उरले नव्हते. त्यामुळे तो खिन्न झाला होता. खिन्न… उदास राहणे, ही त्याची मानसिक सवय बनली होती. त्याला कुणा तरी सुचवले की, तू एकटाच राहतोस तर घरी कुणी तरी पेईंग गेस्ट ठेवून घे. ज्यामुळे घरात थोडी जाग राहील, येणे-जाणे सुरू होईल. तसा एक तरुण मुलगा त्याच्या घरी राहायला आला. हा तरुण गिटार छान वाजवायचा. त्याच्या येण्या-जाण्याने, घरात संगीताचे सूर घुमण्याने, त्या घराला एकदम जाग आली. मुलामुळे त्या घरातले वातावरणच बदलून गेले. तो मालक आनंदून गेला; कारण तो मुलगा मालकाशी येता-जाता बोलत असे, चौकशी करत असे. महत्त्वाच्या वेळी त्याच्याशी सल्लामसलत करत असे. त्याला आता प्रसन्न, छान वाटत असे. मालक हळूहळू आनंदी व्यक्ती बनला. पुढे काही दिवसांनी तो मुलगा नोकरीनिमित्तानेे दुसर्‍या गावी निघून गेला. तेव्हा मालक थोडासा दु:खी झाला; पण जाताना त्या मुलाने सांगितलेले वाक्य एक धडा म्हणून त्याने घेतले. तो मालकाला म्हणाला होता, 'बाबा, आनंद आणि सुख हे हातात हात घालून तुमच्या समोर उभे राहील; पण त्यासाठी तुम्ही विचारात, जाणिवेत त्याची निवड करायला हवी.' आता तुम्हाला वाटते आहे की, मी तुमच्या आनंदाचे कारण आहे; पण तसे नाही. माझ्या माध्यमातून तुम्ही आनंद निवडला आहे. इथून पुढेही माध्यमं कोणतीही असू देत, परिस्थिती कितीही बदलू दे; पण तुम्ही आनंदच निवडाल, असं मला वचन द्या! मालकाने ते दिले. मुलगा निघून गेला; पण मालक पुढे सतत आनंदी राहण्याचे मार्ग शोधून, समाधानी जीवन जगले.

आनंदी राहायचे, म्हणजे नेहमीपेक्षा काही तरी वेगळे घडणे, असेच सर्वसाधारणपणे सर्वांना वाटते. आहे त्याहून काही अधिक चांगले मिळणे, म्हणजे आनंद, असे समीकरण बनवलेले दिसून येते; पण आता तुम्ही ज्या प्रकारचे आयुष्य जगत आहात, त्याकडे थोडे मनाने दूर होऊन पाहा. 'तुमच्याकडे आनंदी राहावं, असं खरंच एकही कारण नाही?' आहे हो; पण… हा 'पण' बर्‍याच ठिकाणी अडसर बनून राहतो. पण…च्या पुढे जी इच्छा असते, ती तुमच्या हातातल्या गोष्टींचा आनंद तुम्हाला घेऊ देत नाही किंवा तुमच्या वर्तमानातला आनंद, उणा करते.

तुमच्याकडे उत्तम घर असेल, कुणाकडे संपत्ती असेल, कुणाकडे सद्गुणी मुलं असतील, कुणाकडे मानमरातब असेल, कुणाचे कुटुंब खूप प्रेमळ असेल. कुणाला उत्तम आरोग्य लाभले असेल. प्रत्येकाकडे यातलं काही ना काही चांगलं असेलच. अर्थात, सर्वच बाबतीत तुम्ही संपन्न असाल, दु:खाचा लवलेशाही नसेल, अशी अपेक्षा करत असाल, तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही.

'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' हे खरंच आजूबाजूला डोळे उघडून पाहावं. कारण, एक गोष्ट मिळाली की, माणसाला दुसरी हवी असते, दुसरी मिळाली की, तिसरी हवी असते.'जर फक्त इतकं मिळालं तर मी आनंदी होईन!' असे म्हणत माणसाची 'जर… फक्त'ची यादी संपतच नाही. म्हणून तुम्ही मनाशी पक्के ठरवा की, 'मी इथून पुढे माझ्यासाठी आनंदाचीच निवड करणार!'

मन अत्यंत चंचल असतेच. ते क्षणोक्षणी तुमचा निश्चय मोडून काढायला सज्ज असते. नकोसे विचार आणून तुम्हाला सळो की पळो करून सोडते. भय, शंका-कुशंकांचे काहूर माजवते; पण इथेच तुमची परीक्षा असते. मनाला शिस्त लावणे हे कठीण असले तरी अशक्य नसते. यासाठी नेमकं काय करायचं?

स्वत:मधल्या सर्वोत्तम आणि चांगल्या गुणांची यादी करायची. दोषांचीही करायची; पण ती वारंवार मनात बोलायची नाही. चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करून त्याबद्दलची छोटी छोटी वाक्यं बनवायची आणि मनाशी अधूनमधून जाणीवपूर्वक बोलत राहायची. उदा., मला ही गोष्ट छान जमते! मी नेहमी आशावादी राहतो! माझ्यात जिद्द भरपूर आहे. प्रयत्नांनी मी हवे ते मिळवतो! माझ्या कुटुंबावर माझे खूप प्रेम आहे. मी त्यांची काळजी घेतो! अशी संपूर्णपणे चांगले बोलायची सवय ही लावूनच घ्यावी लागते.

सकाळी जागे व्हाल, तेव्हा स्वत:ला सांगा की, 'आज मी आनंदी राहण्याचे ठरवले आहे. योग्य तोच प्रतिसाद मी देणार आहे. सर्वांबद्दल फक्त प्रेम आणि सदिच्छांचीच मी निवड केली आहे. माझे मन शांत आणि स्वस्थ ठेवणे ही माझीच जबाबदारी आहे!'

यानंतर दिवसभर तुमची परीक्षा घेणारे प्रसंग, घटना तुमच्यासमोर येणारच आहेत, त्या त्या क्षणी सकाळी केलेला निश्चिय आठवून शांत, स्वस्थ, राहायचा प्रयत्न करा.

पहिल्याच दिवशी हे जमेल असे नाही; पण हळूहळू ही सवय लागायला लागते. चांगले परिणाम दिसायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही दु:खी, निराश, चिडलेले असाल, तर त्याने इतरांचे काहीच बिघडत नाही; पण तुमच्या मनाच्या आत असह्य कोलाहल होतोे. म्हणजे नुकसान फक्त तुमचे एकट्याचे होते. अशावेळी इतर लोक तुम्हाला वगळून पुढे चालू लागतील. म्हणून या क्षणापासून 'जर… फक्त' हा शब्द मनातून काढून टाका आणि वर्तमान असणार्‍या आनंदाची निवड करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news