विठ्ठलभक्तीचा निरंतर प्रवास!

आषाढी एकादशी : अंतर्बाह्य परिवर्तनाचा अनुपम्य सुख सोहळा
Ashadhi Ekadashi
वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान सगुण साकार विठ्ठल आहे.Pudhari File Photo
Published on
Updated on
ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर

वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान सगुण साकार विठ्ठल आहे. वारी ही अज्ञानाकडून ज्ञानाकडे, तिमिराकडून तेजाकडे, अणू-रेणूकडून आकाशतत्त्वाकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे होणारा अंतर्बाह्य परिवर्तनाचा अनुपम्य सुख सोहळा आहे. वारी ज्ञानप्राप्तीचा, नामसाधनेचा, सामाजिक बांधिलकी जपण्याचा, स्वयंशिस्तीचे, आदर्श गृहस्थाश्रमाचे धडे घेण्याचा आणि शुद्ध आचार, विचार व उच्चार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा विठ्ठलभक्तीचा निरंतर प्रवास आहे. येत्या बुधवारी (दि. 17) आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने...

Ashadhi Ekadashi
संदीप पाठक म्हणतोय 'जगात भारी पंढरीची वारी'

भागवत धर्माचे आद्य पीठ आणि भाविकांची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सावळा सुंदर असा आद्य तत्त्व परब्रह्म श्री विठ्ठल अठ्ठावीस युगापासून भक्तांसाठी कटेवर हात ठेवून पंचमहाभूतांपासून परिपूर्ण असलेल्या विटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेऊनिया॥ ही वीट पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूतांपासून पूर्णत्वास प्राप्त झालेली असते. कारण विटेला माती, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पंचमहाभूतांपासूनच परिपूर्णता प्राप्त झालेली असते. सर्व वारकर्‍यांचे उपास्य दैवत आणि आराध्य दैवत असलेल्या या विठ्ठलाचे चरण आणि दृष्टी सम आहे. श्रीकृष्ण भगवंत हे रुसलेल्या रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले होते. परंतु तेथे ते पुंडलिकाच्या भेटीसाठी गेले. माता-पित्याच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि भगवंताला दारात तिष्ठत उभे केले. आदरातिथ्य म्हणून उभे राहण्यासाठी वीट मागे फेकून दिली. का रे पुंड्या मातलासी। उभे केले विठ्ठलासी॥ ऐसा कैसा रे तू धीट । मागे भिरकाविली वीट॥ माता-पित्यांची सेवा झाल्यावर, पुंडलिकरायांनी त्यांना वंदन केले. भगवंतांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिक म्हणाला, देवाने या रूपात इथे असेच उभे राहावे व अज्ञानी, मूढ, पापी लोकांचा उद्धार करावा.

पुंडलिका दिला वर । करुणाकरे विठ्ठले ॥

मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥

Ashadhi Ekadashi
वारकऱ्यांसाठी खुशखबर|आषाढी वारी करणाऱ्या दिंड्यांना मिळणार 68 लाख रुपये

राजस सुकुमार व मदनाचा पुतळा असलेला द्वारकेचा राणा श्रीकृष्ण भगवंत पुंडलिकाच्या इच्छेनुसार तेथेच उभा राहिला आणि भक्तांसाठी पंढरीचा राणा झाला. द्वापारयुगाच्या शेवटी श्रावण वद्य अष्टमीला बुधवारी श्रीकृष्णाचा जन्म झाला असल्यामुळे ‘बुधवार’ हा विठ्ठलाचा वार मानला जातो. पुढे त्या क्षेत्रास तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले आणि पंढरपूर म्हणून नावारूपास आले. पूर्वी या क्षेत्राला पांडुरंगपूर, पौंडरिक क्षेत्र, पांडुरंगपल्ली अशी विविध नावे होती. या नगरीच्या पूर्वेस भक्तिप्रेमाने ओथंबलेली, भक्तांच्या सकल पापांचा परिहार करीत निरंतर प्रवाहित असलेली भीमा नदी आहे. या भीमा नदीने अर्धचंद्राकार रूप धारण केले म्हणून तिचे ‘चंद्रभागा’ हे नाव सार्थ झाले आहे. अनेक संतांनी विठ्ठल, पंढरी आणि चंद्रभागा यांचा महिमा आपल्या रचनेमध्ये वर्णन केला आहे. या पंढरीला अनेकांनी भूलोकावरील वैकुंठाची उपमा देऊन तिची महती गायली आहे.या प्राचीन नगरीचे वर्णन करताना संत नामदेव महाराज म्हणतात,

आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥

पंढरीचा विठ्ठल भक्तांसाठी सगुण साकार रूपात या ईहलोकी अवतीर्ण झाला आहे. तसेच तो ‘रामकृष्णहरी’ या वारकरी संप्रदायातील बीज मंत्राचे सगुण रूप आणि देवतांचे वात्सल्यरूप आहे. संत ज्ञानदेवांना तो लावण्याचा पुतळा वाटतो, संत नामदेवांना तो निष्काम परब्रह्म प्रतीत होतो, संत एकनाथांना तो सुखाचा सागर भासतो,

एका जनार्दनी दावियेला तारू ।

सुखाचा सागरू विठ्ठल देव ॥

जगद्गुरू तुकोबारायांना तोच विठ्ठल अनाथांचा बंधू कृपासिंधू वाटतो; तर संत निळोबारायांना तो कैवल्याचा गाभा भासतो.

विठो कैवल्याचा गाभा । व्यापुनिया ठेला नभा॥

आठव्या शतकात होऊन गेलेल्या आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाचे वर्णन करणार्‍या पांडुरंगाष्टकाची अत्यंत भक्तिपूर्ण रचना केली आहे.

महायोगपीठे तटे भीमरथ्या:। वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्दै:।

समागत्य तिष्ठंन्तमानन्दकन्दं । परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्॥

Ashadhi Ekadashi
Ashadhi Wari |वारी दृष्टीहिनांची, वाट पंढरीची : महाराष्ट्रातील पहिलीच स्वतंत्र दिव्यांगांची वारी

पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. मस्तकी मुकुटासारखी उंच टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा आहे. त्यामुळे या मूर्तीमध्ये शिव व विष्णू यांचे ऐक्य निदर्शनास येते. त्याचे मुख उभट आहे तर गाल फुगीर आहेत. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात समोर, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे; तर डाव्या हातात शंख आहे. दोन्ही दंडावर दुहेरी बाजुबंद आहे. छातीवर उजवीकडे भृगू ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. मध्ये ब्रह्मदेवाचे उगम स्थान नाभी आहे. कमरेला वस्त्र व मेखला आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे. गळ्यामध्ये कौस्तुभ मण्याचा हार, कर्णात मकर कुंडले आहेत. दृष्टी समचरणी स्थिर आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली सावळी, सुंदर, मोहक मूर्ती आहे. विशेष म्हणजे व्यक्तिपरत्वे, प्रत्येकाच्या वैचारिक बुद्धीनुसार भगवंताचे गुणगान केले जाते. त्याचा आकार, उंची, रूप आणि हास्य काही साधकांना समयानुरूप वेगळे भासते. ब्रह्म मुहूर्तसमयी, प्रभात, माध्यान्हसमयी सायंकाळी आणि रात्री मूर्तीमध्ये वैविध्यपूर्ण बदल जाणवतात, असे काही साधकांचे मत आहे.

image-fallback
वारकर्‍यांनो, नका जाऊ पंढरी, गावातच करा ‘वारी’! 

वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान सगुण साकार विठ्ठल आहे. सकळ मंगळ निधी असलेल्या याच आद्य तत्त्व विठ्ठलाची उपासना भारतात शतकानुशतके केली जात आहे. वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे आणि परम परमात्मा विठ्ठलाची निष्काम आणि निरपेक्ष भक्ती हे परमोच्च उद्दिष्ट आहे. सहेतुक संत ज्ञानदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, नामदेवादी अनेक संतांच्या पूर्वजांमध्ये पंढरीची वारी परंपरेने पूर्वापार चालत आली होती. चैत्री, माघी वारीबरोबरच आषाढी-कार्तिकी वारी हा वारकरी संप्रदायातील महत्त्वपूर्ण आचार आहे. एकादशी व्रताला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामसाधना, उपवास, भजन कीर्तन अशी एकादशी व्रताची वारकर्‍यांची दिनचर्या असते. तुकोबारायांच्या आधी काही पिढ्या त्यांच्या पूर्वजांमध्ये वारीची परंपरा अव्याहतपणे चालू होती. त्यांचे आठवे पूर्वज संत ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन असलेले विश्वंभरबाबा यांनी त्यांच्या आईच्या आज्ञेने पूर्वापार चालत आलेली पंढरीची वारी चालू केली होती, असा महिपती लिखित चरित्रामध्ये उल्लेख सापडतो. तुझ्या वडीलो वडीली निर्धारी । चालविली पंढरीची वारी ॥ त्यासी सर्वथा अंतर न करी । तरीच संसारी सुफळ पणा॥

(महिपती)

Ashadhi Ekadashi
प्रदूषणामुळे ’इंद्रायणी’चा श्वास गुदमरला

विश्वंभर बाबाच्या वृद्धापकाळातील निरपेक्ष भक्तीला प्रसन्न होऊन श्री विठ्ठल-रखुमाई देहूमध्ये मूर्ती रूपात अवतीर्ण झाले. तेव्हापासून पंढरीत जगाला नांदवणारा पांडुरंग देहूमध्ये त्यांच्या घरी नांदू लागला. साडेसातशे वर्षांपूर्वी विश्वंभरबाबांकडून जगातील पहिल्या एकत्रित विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना देहूच्या वाड्यात करण्यात आली.

धन्य देहूगाव पुण्य भूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग॥

यानंतर त्यांच्या घराण्यात ही वारी हरी-विठ्ठल-पदाजी- शंकर-कान्होबा यांच्याकडून वंश परंपरेने निरंतर चालू राहिली. तुकोबारायांचे वडील बोल्होबा यांनी चाळीस वर्षे वारी केली. पुढे त्यांचे चिरंजीव संत तुकाराम महाराज ही वारी करू लागले. ज्ञान-भक्ती-वैराग्य याचा त्रिवेणी संगम असलेल्या जगद्गुरू तुकोबारायांनी 1400 टाळकरी घेऊन विठुनामाचा गजर करीत सामूहिक स्वरूपाची पंढरीची वारी पूर्ववत चालू केली.

Ashadhi Ekadashi
वडगाव मावळ : पंढरीचा वारकरी.. विधानसभेचा मानकरी.. हरपला ! दिगंबर भेगडे यांच्या निधनाने मावळात शोककळा

पंढरीची वारी आहे माझे घरी॥ आणिक न घरी तीर्थ व्रत॥ तुकोबारायांच्या या वारीमध्ये भेदाभेद विसरून अठरापगड जाती सहभागी होऊ लागल्या. वारीच्या अनुषंगाने पंढरपूर क्षेत्री चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व जाती-पातीच्या समाजाने आणि स्त्री-पुरुषांनी गात-नाचत संघटित व्हावे, हे मोठे परिवर्तणीय आणि लोकोद्धाराचे कार्य तुकोबांनी हाती घेतले होते.

यारे यारे लहान थोर । याती भलती नारीनर॥

समता, बंधुता आणि एकता या त्रिसूत्रीचा तुकोबारायांनी आधार घेतला. त्यांना नेहमीच वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद विसरून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असलेला समाज अभिप्रेत होता. आजचा लाखोंचा सोहळा त्याचीच फलश्रुती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत सर्वांना एका ध्वजाखाली आणण्यात तुकोबारायांचे वारकरी संस्कार आध्यात्मिक पातळीवर सहायक ठरले. शेतीच्या कष्टातून गुजराण करणारा नांगरधारी शेतकरी, वारकरी संप्रदायामध्ये टाळकरी म्हणून प्रवाहित झाला. वेळप्रसंगी तोच वारकरी स्वधर्म रक्षणासाठी सहेतुक तलवारधारी वार-करी बनला. मुघलशाहीचे प्राबल्य असताना देखील भक्ती-शक्तीचा हा अभूतपूर्व संगम होता. पाईकाच्या अभंगातून तुकोबारायांनी छत्रपतींना आणि सैनिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

जीवाचे उदार शोभती पाईक। मिरवती नाईक मुकुटमणी॥

Ashadhi Ekadashi
लागला टकळा पंढरीचा

तसेच तुकोबारायांनी सर्व जाती-पातीच्या विठ्ठल भक्तांच्या हातात टाळ देऊन मानसिक बळदेखील प्रदान केले. धर्माचे पालन करताना पाखंड खंडन करणे गरजेचे आहे, त्या बरोबरच

दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दाळण कंटकाचे॥ हा धर्म नितीचा व्यवहार शिकवला.

जगद्गुरू तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनानंतर वारीची परंपरा त्यांचे अनुग्रहित असलेले त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी अखंडित चालू ठेवली. कालपरत्वे तुकयाबंधू कान्होबांनी वारीच्या परंपरेची ही धुरा तुकोबारायांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांच्या खांद्यावर दिली. त्यांनी भागवत धर्माचा पाया ज्ञानोबाराय माऊली आणि कळस तुकोबाराय यांच्या पादुका गळ्यात किंवा पालखीत ठेवून ज्येष्ठ वद्य सप्तमी 1685 या वर्षी परिपूर्ण आणि भक्तिरसपूर्ण पालखी सोहळा चालू केला. देहूत जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका घेऊन, नंतर आळंदीत माऊलींच्या पादुका घेऊन हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा वारकर्‍यांचा श्वास आणि उच्छ्वास असणारा भाव भक्तीचा गजर या पालखी सोहळ्यात तेव्हापासून चालू झाला. परंतु काही कारणास्तव 1832 यावर्षी संत ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा विभक्त झाला.

काळानुरूप दोन्ही पालखी सोहळ्यांना राजाश्रय प्राप्त झाला. मुघलांचा पालखी सोहळ्याला उपद्रव होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती राजाराम महाराजांनी पालखी सोहळ्याला संरक्षण प्रदान केले होते. अंकलीच्या शितोळे सरकार यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याला मोठा हातभार लावला होता. सांप्रत काळात ही वारी आनंदमय, भक्तिमय आणि निरामय होऊ लागली. ऊन-पाऊस याचा विचार न करता कीर्तन, प्रवचन, भजन करीत हा सोहळा पंढरीची वाट चालत असतो. सोहळ्यातील रिंगण सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा विस्मरणीय असतो. वारी ही अज्ञानाकडून ज्ञानाकडे, तिमीराकडून तेजाकडे, अणू-रेणूकडून आकाशतत्त्वाकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे होणारा, अंतर्बाह्य परिवर्तन करणारा अनुपम्य सुख सोहळा आहे.

image-fallback
बोल दिंडीकऱ्यांचे…वारकर्‍यांत पंढरीचा पांडुरंग दिसतो

कर्नाटक,आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार होत आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि एकनाथी भागवत ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. परदेशातील अनेक अभ्यासक संत तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी आणि वारकरी संप्रदायाचा सखोल अभ्यास करत आहेत. त्यामुळे देश-परदेशातले, विविध धर्माचे, पंथाचे लोक वारीचा निखळ आनंद घेत आहेत. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा भावविभोर मन:स्थितीचा आणि वारीतल्या प्राप्त परिस्थितीचा ते याची देही याची डोळा अनुभव घेत आहेत. हा पंढरीच्या वारीतल्या सोहळ्याचा आनंद अनुपमेय, अलौकिक, अवर्णनीय असतो. त्यामुळे महाराष्ट्रीयन व्यक्ती या मुक्ती आणि भक्तीच्या सोहळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही.

मी का पडेन निराळा । ऐसा सांडूनी सोहळा॥

या आषाढी वारीच्या अनुषंगाने संस्कृती, समाज परंपरा यांचे उन्नयन करण्याचे देदीप्यमान कार्य परिपूर्ण होत आहे. विठ्ठलभक्ती अधिष्ठानावर उभ्या असलेली ही वारी ज्ञान प्राप्त करण्याचा, नाम साधनेचा महिमा जाणण्याचा, सामाजिक बांधिलकी जपण्याचा, स्वयंशिस्तीचे, आदर्श गृहस्थाश्रमाचे धडे घेण्याचा आणि शुद्ध आचार, विचार व उच्चार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचा विठ्ठलभक्तीचा निरंतर प्रवास आहे. म्हणून

पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी॥

image-fallback
संतवाणी : ‘पंढरीचा चोर!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news