

Ase Hote Vivekananda Book Review: काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची ओळख एखाद्या फोटोपुरती, एखाद्या प्रसिद्ध वाक्यापुरती किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेपुरती मर्यादित राहते. स्वामी विवेकानंद हे त्यापैकीच एक. भगवा फेटा, तेजस्वी चेहरा आणि शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत 'माझ्या बंधू आणि भगिनींनो...' अशी सुरुवात केलेलं भाषण, एवढीच ओळख आज बहुतेक भारतीयांच्या मनात आहे. पण विवेकानंद म्हणजे फक्त शिकागोतील भाषण नव्हे, तर एक व्यापक विचारविश्व आहे.
धर्म, विज्ञान, समाज, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रनिर्मिती, मानवता आणि आधुनिक भारत यांचा विचार करणारा एक दूरदृष्टीचा विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद. वाचकांसमोर खरे विवेकानंद उभं करण्याचं महत्त्वाचं काम लेखक मुकुंद कुलकर्णी यांनी 'असे होते विवेकानंद' या पुस्तकातून केलं आहे.
हे पुस्तक वाचताना सर्वप्रथम जाणवणारी गोष्ट म्हणजे लेखकाने विवेकानंदांचं पारंपरिक चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटनांचा धावता आढावा यात आहेच; पण त्या घटनांपेक्षा त्यांनी सांगितलेला विचार अधिक महत्त्वाचा आहे, हे लेखकाने या पुस्तकातून सांगितलं आहे.
लेखक विवेकानंदांच्या बालपणापासून सुरुवात करतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, वडिलांकडून मिळालेली उदारमतवादी विचारसरणी आणि आईकडून मिळालेले धार्मिक संस्कार यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला परिणाम अत्यंत सहजपणे उलगडून दाखवतात. नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद हा प्रवास एका दिवसात घडलेला नाही, तर सतत प्रश्न विचारणाऱ्या, सत्याचा शोध घेणाऱ्या आणि समाज समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या आयुष्यातील अनेक अनुभवांतून घडला आहे, हे आपल्याला पुस्तक वाचताना कळतं.
श्रीरामकृष्ण परमहंस यांची भेट हा त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा होता. अनेकदा या नात्याचं वर्णन भक्तीभावाने केलं जातं; मात्र मुकुंद कुलकर्णी या नात्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहतात. रामकृष्णांनी विवेकानंदांना अंधश्रद्धा शिकवली नाही, तर प्रत्येक धर्मात असलेलं सत्य शोधण्याची दृष्टी दिली, हे लेखक प्रभावीपणे सांगतात. त्यामुळे विवेकानंदांचा धर्म हा कर्मकांडाचा नव्हे, तर मानवतेचा धर्म होता, ही गोष्ट पुस्तकातून प्रकर्षाने समोर येते.
या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विवेकानंदांचा भारतभ्रमणाचा काळ. पुस्तकात लेखकाने केवळ त्यांनी कुठे प्रवास केला याची माहिती दिलेली नाही, तर त्या प्रवासात त्यांनी भारताला कसं पाहिलं, हे सांगितलं आहे. एका बाजूला प्रचंड संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला भीषण दारिद्र्य, एका बाजूला धर्माच्या नावाखाली चालणारे कर्मकांड आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणापासून वंचित जनता, एका बाजूला जातीच्या भिंती आणि दुसऱ्या बाजूला उपासमारीने मरत असलेले लोक, हा भारत विवेकानंदांनी जवळून अनुभवला. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रवादापेक्षा समाजनिर्मितीला अधिक महत्त्व का आहे, याचं उत्तर या पुस्तकातून मिळतं.
आज विवेकानंदांना अनेकदा धर्माच्या चौकटीतून पाहिलं जातं. पण लेखकाने त्यांच्या मूळ लेखनाचा आधार घेत हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. शिकागोतील भाषणाचा संदर्भ देताना त्यांनी केवळ "माझ्या बंधू आणि भगिनींनो" एवढ्यावर न थांबता, त्यानंतर विवेकानंदांनी नेमकं काय सांगितलं होतं, याचं सविस्तर विवेचन केलं आहे. सर्व धर्म हे माणसाला सत्याकडे नेणारे वेगवेगळे मार्ग आहेत, कोणताही धर्म दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि धार्मिक सहिष्णुता ही भारताची खरी ओळख आहे, हा त्यांचा संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा वाटतो.
विवेकानंदांनी स्त्रियांना केवळ सन्मान देण्याची भाषा केली नाही, तर समाजाच्या प्रगतीसाठी त्यांचं शिक्षण, स्वातंत्र्य आणि समान सहभाग आवश्यक असल्याचं सांगितलं. अमेरिकेतील स्त्रियांचं शिक्षण आणि आत्मविश्वास पाहून ते प्रभावित झाले होते आणि भारतातील स्त्रियांची स्थिती पाहून त्यांना वेदना होत होत्या. आज स्त्रीसक्षमीकरणाची चर्चा होत असताना शंभर वर्षांपूर्वी विवेकानंदांनी स्त्री-पुरुष समानतेची जी भूमिका मांडली होती, ती आजही समकालीन वाटते.
या पुस्तकातील सर्वात प्रभावी प्रसंग म्हणजे गोरक्षक मंडळाशी झालेला विवेकानंदांचा संवाद. दुष्काळात लाखो लोक उपाशी मरत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त गोसेवेवर भर देणाऱ्यांना विवेकानंदांनी विचारलेले प्रश्न आजही समाजाला अस्वस्थ करतात. "माणूस वाचवणं महत्त्वाचं की कर्माचा हवाला देत त्याला मरू देणं?" हा त्यांचा प्रश्न आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. हा प्रसंग वाचताना विवेकानंद किती तर्कनिष्ठ, मानवतावादी आणि निर्भीड होते, याची प्रचिती येते.
लेखकाची भाषा हे या पुस्तकाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे. कुठेही अवघड शब्दांचा भडिमार नाही किंवा विचारांचं ओझं नाही. साधी, सरळ आणि प्रवाही भाषा असल्यामुळे पुस्तक सर्वसामान्य वाचकांपर्यंत सहज पोहोचतं. लेखक स्वतःचं मत लादत नाहीत, तर विवेकानंदांचे विचार त्यांच्या मूळ संदर्भांसह वाचकांसमोर ठेवतात.
या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे लेखक विवेकानंदांना वर्तमानाशी जोडतात. आज जात, धर्म, अंधश्रद्धा, विज्ञान, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक विषमता आणि शिक्षण यावर जे प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यांची उत्तरं विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वीच दिली होती, याची जाणीव हे पुस्तक करून देतं. त्यामुळे हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही; ते वर्तमान समजून घ्यायलाही मदत करतं.
हे पुस्तक वाचताना एक गोष्ट मात्र सतत जाणवते. आपण विवेकानंदांचं नाव घेतो, त्यांचे फोटो लावतो, त्यांची जयंती साजरी करतो; पण त्यांच्या मूळ विचारांपासून आपण बरेच दूर गेलो आहोत. विवेकानंदांचा धर्म म्हणजे मानवता, त्यांचा राष्ट्रवाद म्हणजे समाजातील शेवटच्या माणसाचा विकास, त्यांचं अध्यात्म म्हणजे कर्म आणि त्यांची देशभक्ती म्हणजे शिक्षण, विज्ञान आणि विकास. लेखकाने हे सर्व इतक्या सहजपणे मांडलं आहे की पुस्तक संपल्यानंतर विवेकानंदांविषयीची आपली दृष्टीच बदलून जाते.
एकूणच, 'असे होते विवेकानंद' हे पुस्तक स्वामी विवेकानंदांचं केवळ चरित्र सांगत नाही, तर त्यांच्या विचारांची ओळख करून देतं. आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या आणि अंधश्रद्धेच्या काळात विवेकानंदांना त्यांच्या मूळ स्वरूपात समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे.
• पुस्तक - असे होते विवेकानंद
• लेखक - मुकुंद कुलकर्णी
• प्रकाशन - समकालीन प्रकाशन
• किंमत - 200 रुपये