भारतासाठी धोक्याची घंटा ! | पुढारी

भारतासाठी धोक्याची घंटा !

क्रीडा क्षेत्रामध्ये अधिकाधिक पैसा येऊ लागला तसतसे वेगवेगळ्या स्पर्धांच्या संयोजनातील गैरप्रकारांची संख्याही वाढू लागली आहे. स्पर्धेच्या संयोजनात आणि संघटनात्मक स्तरावरील व्यवस्थापनात पारदर्शीपणा नसेल, तर केव्हा ना केव्हा त्याचा फटका या संघटनांना आणि पर्यायाने खेळाडूंनाही बसतो. सन 2028 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग आणि मॉडर्न पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांना वगळण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंसाठी ही धोक्याची घंटा आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या तारखा आणि त्यामधील क्रीडा प्रकार हे साधारणपणे या स्पर्धांपूर्वी सहा-सात वर्षे अगोदरच निश्चित केले जातात. ऑलिम्पिक स्पर्धांचे संयोजन करणार्‍या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मार्गदर्शनाखालीच हा निर्णय घेतला जातो. सन 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धांसाठी कोणकोणत्या क्रीडा प्रकारांचा समावेश करायचा यासंबंधीचा निर्णय तेथील संयोजन समितीने नुकताच घेतला आहे. मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग आणि मॉडर्न पेंन्टॅथलॉन हे तीनही क्रीडाप्रकार सध्यातरी या स्पर्धांमधून वगळण्यात आले आहेत. वेटलिफ्टिंग आणि मुष्टियुद्ध या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांमधील अंतर्गत वाद, ढिसाळ व्यवस्थापन, पारदर्शी कारभाराचा अभाव, उत्तेजक औषधे सेवन प्रकरणांबाबत गांभीर्याने निर्णय घेण्याचा अभाव, पंचांची सदोष कामगिरी आदी कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मॉडर्न पेंन्टॅथलॉन या क्रीडा प्रकारांमध्ये असलेल्या अश्वारोहण स्पर्धांसाठी होणारा खूप वाढीव खर्च, खेळाडूंचे बेशिस्त वर्तन ही कारणे देत मॉडर्न पेंटॅथलॉन या जुन्या खेळालाही तूर्तास ऑलिम्पिकपासून दूर ठेवण्यात आले आहे. या तीनही क्रीडा प्रकारांचा 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये समावेश करायचा की नाही, याबाबत संबंधित खेळांच्या संघटनांना 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जर या संघटनांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या द‍ृष्टिकोनातून योग्य पावले उचलली नाहीत, तर कदाचित सन 2024 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही या खेळांना वगळले जाण्याची शक्यता आहे.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही जगातील सर्वश्रेष्ठ क्रीडा स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात भाग घेणार्‍या प्रत्येक खेळाडूचे ऑलिम्पिकमधील सहभाग हेच अंतिम ध्येय असते. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण करणे हीदेखील अवघड कामगिरी मानली जाते. हे लक्षात घेतले तर ऑलिम्पिक पदक मिळवणे म्हणजे अशक्य वाटणारे स्वप्न असते. तरीही प्रत्येक खेळाडू हे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करतो. त्यासाठी तो आणि त्याचे पालक अनेक गोष्टींचा त्याग करतात. खेळामध्ये व्यावसायिकता वाढल्यानंतर सहभागी होणार्‍या खेळाडूंची संख्याही वाढत गेली आहे. पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात आणि या गोष्टी येनकेनप्रकारे साध्य करण्याकडे काही खेळाडूंचा कल दिसून येऊ लागला आहे. त्यासाठी उत्तेजके सेवन करण्याचा शॉर्टकट स्वीकारण्यातही खेळाडू मागेपुढे पाहत नाहीत, असे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने दिसून येऊ लागले आहे. मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग, कुस्ती, ज्युदो, टेनिस आदी ताकदीच्या खेळांबरोबरच अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग या खेळांमध्येही उत्तेजक सेवन करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

उत्तेजक द्रव्य सेवन करण्यामुळे जरी खेळाडूंना तात्पुरती ऊर्जा मिळत असेल तरीही त्याचे त्यांच्या शरीरावर दूरगामी अनिष्ट परिणाम होत असतात. याबाबत खेळाडूंमध्ये आणि त्यांच्या पालक तसेच प्रशिक्षकांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही. खेळाडूंची ताकद वाढवण्यासाठी उत्तेजक द्रव्ययुक्‍त औषधे आणि अन्‍नघटक पुरवणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक वेळेला प्रशिक्षकांची मदत घेतात. या प्रशिक्षकांना भरपूर कमिशन देत त्याद्वारे खेळाडूंना उत्तेजक घेण्यासाठी उद्युक्‍त करण्यासही ते तयार असतात. उत्तेजक चाचणीच्या वेळी खेळाडूंच्या शरीरात उत्तेजकाचा अंशही दिसणार नाही, अशी औषधेही याच कंपन्या पुरवीत असतात आणि त्याबाबतही ते अशा प्रशिक्षकांना भरपूर कमिशन देत असतात. ऑलिम्पिक आणि अन्य जागतिक स्तरावरील स्पर्धा उत्तेजक द्रव्यमुक्‍त होण्याच्या द‍ृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समिती (वाडा) या संस्थेने खूप कडक पावले उचलली आहेत. उत्तेजक सेवनाबाबत योग्य रितीने नियमांचे पालन केले जात नव्हते म्हणून या संस्थेने रशियातील उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची मान्यताच काढून घेतली आहे आणि रशियन ऑलिम्पिक समितीवरही बंदी घातली आहे. हे उदाहरण समोर असूनही वेटलिफ्टिंगच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून अपेक्षित नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच वेटलिफ्टिंगमध्ये सातत्याने उत्तेजक द्रव्ये सेवन करणार्‍या खेळाडूंची संख्या वाढतच आहे.

सन 2010 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या वेळी यजमानपद असूनही भारतीय वेटलिफ्टिंग संघावर कारवाईची नामुष्की ओढवली होती. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाने मोठ्या प्रमाणात दंड भरला, तेव्हा कुठे भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. केवळ भारत नव्हे, तर अन्य अनेक देशांवरही अनेक वेळेला उत्तेजकाबाबत कारवाई करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाकडून अपेक्षेइतकी उत्तेजकविरहित स्पर्धा आयोजित करण्याबाबत स्वतःहून अशी ठोस पावले उचललेली नाहीत, असे मत खुद्द ‘वाडा’ संस्थेनेच व्यक्‍त केल्यामुळे ऑलिम्पिक संघटकांनी वेटलिफ्टससाठी ऑलिम्पिकची दारे बंद करण्याचा निर्णय घेतला.

मुष्टियुद्धाच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेमध्ये (एआयबीए) गेली अनेक वर्षे सातत्याने मतभेद दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने वारंवार सूचना देऊनही या संघटनेमधील व्यवस्थापनामध्ये सुधारणा झालेली नाही. आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शकतेचा अभाव, पंचांच्या कामगिरीत पक्षपातीपणा, त्यामुळे सातत्याने खेळाडूंचे खूप मोठे नुकसान झाले आहे. टोकियो येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी भारताची खेळाडू एम. सी. मेरी कोम हिलादेखील सदोष पंचगिरीचा फटका बसला होता.

टोकियो येथील ऑलिम्पिक स्पर्धेतील मॉडर्न पेंन्टॅथलॉनच्या एका अनुभवी खेळाडूला पदक मिळवण्यात अपयश आले, तेव्हा या खेळाडूने त्याच्या घोड्याला बडविले होते तर अन्य एका खेळाडूच्या घोड्याने अडथळ्यावरून उडी मारण्यास नकार दिला होता. या स्पर्धा आयोजित करण्याबाबत अनेक अडचणीही दिसून येत आहेत. या क्रीडा प्रकाराबाबत तरुणांमध्येही उत्साहाचा अभाव आहे, असेही ऑलिम्पिक संघटकांना वाटत आहे. अशा अनेक कारणास्तव त्यांनी मॉडर्न पेंन्टॅथलॉन या खेळास तूर्तास ऑलिम्पिकची दारे बंद ठेवली आहेत.

मुष्टियुद्ध आणि वेटलिफ्टिंग या दोन्ही खेळांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश नाही, या निर्णयाचा मोठा फटका भारतीय खेळाडूंना बसणार आहे. आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या करनाम मल्लेश्वरी हिने कांस्यपदक तर मीराबाई चानू हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे. मुष्टियुद्धामध्ये विजेंदर सिंग, मेरी कोम, लवलिना बोगोहेन यांनी कांस्य पदकावर मोहोर उमटवली आहे. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये या दोन्ही खेळांमध्ये भारतीय खेळाडू जागतिक स्पर्धेमध्ये भरघोस यश मिळवित आहेत. जर ऑलिम्पिकची द्वारे बंद झाली तर त्यांच्या उत्साहावर आणि एकूणच करिअरवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांवर भारताचे संघटक काम करीत असतात. त्यांनी आपली ही पालक संघटना कशी चांगल्या रितीने कार्यरत होईल, याचा विचार केला पाहिजे. आपली पालक संघटना स्वच्छ प्रतिमेची झाली तर आपोआपच त्याचे अनुकरण संलग्न संघटनांकडून केले जाईल. पारदर्शी व्यवहार, उत्तेजक द्रव्यांबाबतीतील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही ध्येये या संघटकांनी ठेवली पाहिजेत. अशा उपाययोजना तातडीने झाल्या तरच ऑलिम्पिक चळवळ स्वच्छ प्रतिमेची होण्यास मदत होणार आहे.

-मिलिंद ढमढेरे

Back to top button