International Film Festival : सत्यान्वेषी वेध | पुढारी

International Film Festival : सत्यान्वेषी वेध

यंदा ऐन नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल लागण्याऐवजी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पाऊस कोसळत असताना यंदाच्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (International Film Festival)- इफ्फीचा मोर नाचला. तो कसा होता, यंदा तो कसा नाचला हा ज्याचा-त्याचा आकलनाचा प्रश्न. जगाची सफर समजून घ्यायला या मोरामुळे मदत होते…

कोणत्या बाजूने जायचे?

एकानंतर एक असे दोन चित्रपटांचे खेळ होते. पहिला होता – भारत : प्रकृती का बालक, दुसरा होता – कुझांगगल. एक उजवा तर दुसरा डावा. झाला ना पेच? पेच पडल्याशिवाय, पंचाईत निर्माण झाल्याशिवाय पिक्चरची मजा कशी येईल? भारत कसा महान आहे, हा पहिल्या चित्रपटाचा सांगावा. दुसर्‍या चित्रपटात भारतातल्याच गावातील दाहक वास्तवाचे चटके कसे असतात याचे दर्शन होते.

पहिल्या खेळावेळी डाव्यांनी गोंधळ घातला, तर दुसर्‍या खेळावेळी उजवे सरसावले. शाब्दिक सामना रंगला. असा विचारांचा निकराचा संघर्ष व्हायलाच पाहिजे. त्यासाठीच तर असे महोत्सव असतात. मानवीयतेचे गाणे कोण, कोणत्या विचारांनी, कोणत्या हेतूसाठी गातोय ते अशा महोत्सवांमध्ये समजते. ‘विचारांच्या विजयासाठी जगतो तो माणूस’ निवडेल ना मार्ग. कोणत्या बाजूने जायचा तो.

इफ्फीच्या मोरावर प्रारंभीचे चार-पाच दिवस पाऊस कोसळला. महोत्सवाच्या इतिहासात असे प्रथमच घडले असावे. आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी आपण निसर्गाचे अपरिमित दमन केले. त्यामुळे एकाच दिवशी सर्व ऋतुंचा अनुभव घेण्याची वेळ आली. आपणच ती आपल्यावर आणली. मती गुंग करून टाकणार्‍या या गुंतागुंतीच्या भवतालाचा सत्यान्वेषी वेध घेणारे अनेक चित्रपट अशा महोत्सवात डोळे उघडतात.

एकाचवर्षी दोन महोत्सव (International Film Festival)

दरवर्षी 20 नोव्हेंबरला हा महोत्सव सुरू होतो. कोरोनामुळे 16 ते 24 जानेवारी दरम्यान इफ्फी पार पडला होता. कोरोनामुळे तो जानेवारीत झाला. हा 51 वा महोत्सव. त्यानंतर गेल्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात 52 वा महोत्सव पार पाडला. एकाचवर्षी दोन महोत्सवांची पर्वणी. यंदाचा महोत्सव प्रत्यक्ष आणि आभासी (ऑनलाईन) अशा हायब्रीड पद्धतीने झाला, ही कोरोनाच्या परिणामाची देण. महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच असे करावे लागले.

बाह्य सजावटीवर मोठा खर्च (International Film Festival)

केंद्र आणि राज्य सरकारतर्फे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. दोन्ही सरकारे मिळून आर्थिक बाजू सांभाळतात. हा महोत्सव सुरू करण्यामागे जगभरातील चित्रपटांच्या दुनियादारीचा अभ्यास व्हावा, हा पंतप्रधान पंडित नेहरू यांचा हेतू होता. जो आजही समयोचितच आहे. इफ्फीत जत्रेसारखे वातावरण निर्माण केले जाते. बाह्य सजावटीवर मोठा खर्च केला जातो. इप्फीचे कायमचे घर असणारा गोवा जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे सजावटीच्या पताका लावल्या जातात, असा युक्तिवाद केला जातो.

इफ्फीमुळे पर्यटनाला मदत होते, असे सरकारचे म्हणणे. या म्हणण्यामध्ये किती तथ्यांश आहे, पर्यटनाला कसा आणि किती फायदा झाला, याचे गणित मात्र काही जाहीर होत नाही. इफ्फीचे आस्वादक आणि नेहमीचे पर्यटक यांच्यातील फरक मोठा आहे. त्यामुळे हा एक संशोधनाचाच विषय. चित्रपटविषयक नानाविध उपक्रम राबविण्यासाठी असा निधी वापरता येऊ शकतो.

रोपटे कधी उगवणार?

2004 पासून इफ्फीचे गोवा कायमचे घर झाले. त्यानंतर सुमारे पाच एक वर्ष इफ्फीमुळे गोव्यात चित्रपट संस्कृती रुजेल, असे जो-तो कानीकपाळी ओरडून सांगत असे. या संस्कृतीचे रोपटे मात्र कोठे उगवलेले दिसत नाही. लक्षात घेतले पाहिजे की, केंद्र सरकारने गोव्यात फिल्मसिटी उभा करावी, अशी अपेक्षा उद्घाटन सोहळ्यात गोवा सरकारने व्यक्त केली. उत्तर प्रदेशात दिव्य-भव्य अशी फिल्मसिटी उभीही राहिली. गोव्यात ‘नैसर्गिक फिल्मसिटी’ आहेच! गरज आहे ती पायाभूत तांत्रिक सज्जतेची. चित्रीकरणपूर्व आणि पश्चात प्रक्रियेच्या स्वयंपूर्णतेची. त्यासाठी दूरद़ृष्टीच्या राजकीय इच्छाशक्तीचे नेतृत्व हवे.

घरबसल्या महोत्सव

‘महोत्सव घरबसल्याही पाहता येणार’ अशी चित्रपट रसिकांची प्रारंभीची भावना होती. ते खरेही होते, पण तितकेच ते पुरेसे नव्हते. समन्वयाचा, स्पष्टतेचा गोंधळ राहिल्याने आपली फसगत झाली की काय अशी भावना चित्रपटाचा ऑनलाईन आनंद घेऊ पाहणार्‍यांची जानेवारील इफ्फीवेळी झाली होती. नोव्हेंबरमध्ये अशी ओरड ऐकू आली नाही. गाडी रूळावर आली असावी.

खासगीकरणाचा झोत

1) यापुढे महोत्सवाच्या आयोजनात खासगी क्षेत्राचा सहभाग असेल, असे केंद्रातर्फे जानेवारीतील महोत्सवात जाहीर केले होते. त्याचे दर्शन नोव्हेंबरमध्ये झाले.

2) यापुढेही उत्पादन आणि ग्राहक या नातेसंबंधांचा महोत्सवी पट ठळक होण्याचे धोके नाकारता येत नाही.

3) ओटीटींच्या नानाविध मंचांचा प्रवेश, त्यांची जाहिरातबाजी सुरू झालेली आहे. निर्मितीशी सबंधित सर्व चमूंबरोबर जाहीर संवाद हरवतो आहे, असे वाटते.

4) मास्टर क्लासमधून काहीएक बौद्धिक झाले, पण वलयांकित अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या निर्मितीची केवळ जाहिरातबाजी करण्यासाठीच आलेत, असे तीव्रतेने जाणवले.

ताकदीची बौद्धिक मेजवानी

जागतिक चित्रपट विभागात मात्र दरवर्षी बौद्धिक खुराक ताकदीचा असतो. यंदाही तसा तो होता. काही चित्रपटांमधून अन्न, वस्त्र आणि निवार्‍याच्या शोधार्थ माणसांचे होणारे स्थलांतर, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हा विषय अधोरेखित झाला. आपण माणसांनी जल, जमीन, जंगलांचे केलेले वाट्टोळे, नैसर्गिक प्रकोप, जागतिक तापमान वाढीचे धोके, तंत्रज्ञान आणि मानवी नातेसंबंधाचे केमिकल लोचे, जात-धर्म-वंश आदी भेदाभेद अंमगळाचे परिणाम, झालेल्या महायुद्धांचे परिणाम, संभाव्य महायुद्धांची दहशत, स्थलांतरितांचे प्रश्न, देव-धर्म संकल्पना आणि माणूस, राष्ट्रवाद, महिलांचे शोषण, अमर्याद मानवी लालसेने-चंगळवादामुळे आत्मनाशाकडे सुरू असलेली वाटचाल आदी कैक विषयांचा सत्यान्वेषी वेध जागतिक चित्रपटांमधून लख्ख दिसतो. कोटच्या आधारे म्हणता येईल की, ‘मानवीयतेसाठीच्या संघर्षाचा सर्वात मोठा आरसा म्हणजे चित्रपट.’ या संघर्षयात्रेत आपले ‘अच्छे दिन’ कोठे आहेत, ते तपासून घेण्यासाठी महोत्सवातील जगाची सफर अनुभवायला हवी.

महोत्सवातील विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट : रिंग वांडरिंग, जपान. उत्कृष्ट दिग्दर्शक : व्हॅकलाव कंद्रका, झेकोस्लाविया. उत्कृष्ट अभिनेता : जितेंद्र जोशी (गोदावरी). उत्कृष्ट अभिनेत्री : अँजेला मोलीना. विशेष ज्युरी पुरस्कार : निखिल महाजन (गोदावरी), रेनाता कार्व्हलो (दि फर्स्ट फॉलन). उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : मारी अलीसेंद्रिनी (झाहोरी), सायमन फॅरिओल (वेल्थ ऑफ दि वर्ल्ड). आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक : लिंगुई : दि सेक्रेड बॉण्ड. विशेष उल्लेखनीय पुरस्कार : दी डॉर्म, दिग्दर्शक रोमन वास्यनोव्हच्या.

ब्रिक्स चित्रपट विभागातील विजेते : सर्वोत्कृष्ट चित्रपट : बराकत, दक्षिण आफ्रिका आणि दि सन अबाव्ह मी नेव्हर सेट्स, रशिया. उत्कृष्ट दिग्दर्शक : ब्रोझिया लुसिया, रशिया (आना). उत्कृष्ट अभिनेता : धनुष (असुरन) आणि यान हान (लीगल रेड फ्लॉवर). उत्कृष्ट अभिनेत्री : लारा बोल्डोलिनी (ऑन व्हील्स)

सुरेश गुदले

Back to top button