राज्‍यरंग : लोकसभेच्या निकालात विधानसभेची गणिते

राज्‍यरंग : लोकसभेच्या निकालात विधानसभेची गणिते

[author title="प्रमोद चुंचूवार" image="http://"][/author]

लोकसभा निवडणूक निकाल अनेक कळीच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला उपयुक्त ठरणार आहे. मुंबईवर आजही ठाकरे परिवाराची जादू चालते का? काही महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काय चित्र राहू शकेल? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून करीत असलेल्या कामकाजावर राज्यातील जनता समाधानी आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक निकालातून मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील पाचही टप्पे अखेर पूर्ण झाले आहेत. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने 25 जागा लढविल्या आणि 23 जागा जिंकल्या, तर भाजप दोन जागांवर दुसर्‍या क्रमांकावर होती. शिवसेना(तत्कालीन अविभाजित शिवसेना) 23 जागांवर लढली. यापैकी 18 जागा जिंकल्या, तर पाच जागांवर दुसर्‍या क्रमांकावर होती. काँग्रेसने 25 जागा लढल्या. यापैकी केवळ एकच जागा पक्षाला जिंकता आली होती, तर 21 जागांवर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर होती. राष्ट्रवादी काँग्रेस(तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस) 19 जागांवर लढली. यापैकी 4 जागांवर ती विजयी झाली, तर 15 जागांवर दुसर्‍या क्रमांकावर होती. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने 47 जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. एका जागेवर वंचितचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर, तर 39 जागांवर तिसर्‍या क्रमांकावर होता. मात्र, वंचितमुळे झालेल्या मत विभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला तेव्हा 8 ते 9 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यावेळची लोकसभा निवडणूक राज्याच्या आजवरच्या सर्व निवडणुकांपेक्षा पूर्णतः वेगळी होती आणि आहे.

1999 ला लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी राज्यात काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला होता. या पक्षाने 1999 ला एकत्रच झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात लढून यशही मिळविले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य याहून वेगळे आहे. जून 2022 म्हणजे जवळपास दोन वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना फुटली. नव्या नावाने नवा पक्ष स्थापन न करताच, यावेळेस एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा केला आणि निवडणूक आयोगाने तो मान्य केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या जवळपास एक वर्षाआधी राष्ट्रवादी फुटली आणि त्यांनीही आपण खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आणि निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे यावेळी रिंगणात दोन राष्ट्रवादी व दोन शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या.

जागा वाटप आणि लढतीचे चित्र

48 जागांबद्दल महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अखेरच्या क्षणापर्यंत घोळ सुरूच होता. महाविकास आघाडीने गुढीपाडव्याच्या दिवशीच जागा वाटप जाहीर केले. शिवसेने(उबाठा) ला 21, राष्ट्रवादी(शरद पवार) 10 आणि काँग्रेस 17 असे हे जागावाटप होते. महायुतीने औपचारिकरित्या जागा वाटपाचे सूत्र अखेरपर्यंत जाहीर केले नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच त्यांच्या जागा वाटपाचा अंदाज आला. भाजप 28, शिवसेना(शिंदे) गट 15 आणि राष्ट्रवादी 4, तर राष्ट्रवादीच्याच कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्ष एक असे त्यांचे जागा वाटप ठरले.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र लक्षात घेतले, तर भाजप विरुद्ध काँग्रेस 14 मतदारसंघांत, भाजप विरुद्ध शिवसेना(ठाकरे) 5 तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी(पवार) गट 7 मतदारसंघांत लढत रंगली आहे. दोन्ही शिवसेना13 मतदारसंघांत एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत, तर दोन्ही राष्ट्रवादी 2 मतदारसंघांतच एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. राष्ट्रवादी(अजित पवार) गटाला दोन मतदारसंघांत शिवसेना(ठाकरे) गटाशी झुंज द्यावी लागली आहे.

वंचितचा प्रभाव

गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे भलेही अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला असला, तरी यावेळी वंचितला तसा प्रभाव दाखविता येणार नाही कारण त्यांना मत दिल्यास मत विभाजनाचा लाभ भाजप व मित्रपक्षांना होतो, हे वंचितच्या मतदारांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच खुद्द आनंदराज आंबेडकरांनाही उमेदवारी भरण्यास अमरावतीतील दलितांनी विरोध केल्याचे वृत्त आहे. प्रकाश आंबेडकरांनी चर्चेच्या अनेक फेर्‍या करून अखेर अपेक्षेप्रमाणे 'एकला चलो रे'चे नारा दिला. गेल्या वेळेस त्यांनी रिंगणात उतरविलेले बहुसंख्य उमेदवार अन्य राजकीय पक्षात निघून गेले आहेत. दरवेळी नवे उमेदवार, नवा डाव खेळणे फायद्याचे ठरताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा मतटक्का यावेळी रोडावलेला दिसेल.

खर्‍या शिवसेनेचा निवाडा

खरी शिवसेना कोणती, खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाला प्रलंबित असला, तरी या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेच्या न्यायालयाचा निवाडा स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार व खासदार मोठ्या संख्येने गेले असले, तरी दुसर्‍या-तिसर्‍या फळीतील नेते, सामान्य शिवसैनिक मात्र गेलेले नाहीत, असे चित्र आहे. त्यामुळे या निकालात जनता कोणत्या शिवसेनेच्या बाजूने उभी राहते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी संवेदनशीलपणे, राज्याचा कुटुंबप्रमुख या नात्याने प्रभावी पद्धतीने परिस्थिती हाताळली. चांगले काम करणार्‍या या नेत्याचे सरकार पाडण्यात आल्याने राज्यातील सर्वसामान्य जनता, विशेषतः महिला वर्गात त्यांच्याबद्दल सहानुभूती असल्याचे म्हटले जाते. 80 पार केलेल्या शरद पवारांचा पक्षही फुटल्याने, त्यांच्या पाठीत अजित पवारांनी खंजीर खुपसल्याची भावना जनमानसात असल्याचे म्हटले जाते. ठाकरे आणि पवार यांची सहानुभूती आणि राहूल गांधी यांना 'भारत जोडो यात्रे'नंतर मिळालेली लोकप्रियता आणि काँग्रेसने जागा वाटपात घेतलेली तडजोडीची भूमिका, याचा लाभ महाविकास आघाडीला होईल, असे म्हटले जाते. मुस्लिम समाज यावेळी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र दिसले. कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्षे, कांदा, ऊस आदी रोख पिकांच्या उत्पादक शेतकर्‍यांमध्ये पिकाला मिळणारा हमीभाव आणि काही पिकांवरील निर्यातबंदी यामुळे नाराजी दिसली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची आणि जीवनावश्यक वस्तूंची महागाई यावरून सर्वसामान्य आणि विशेषतः गृहिणी वर्ग नाराज दिसला. या नाराजीचे प्रतिबिंब निकालात पडण्याची शक्यता आहे.

'अब की बार, पंचेचाळीस पार' अशी घोषणा देऊन महायुतीने आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा महायुतीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली तेव्हा त्यांचा दावा खरा ठरेल, असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष जागावाटप करताना जनतेला हे कळले की, अनेक मतदारसंघांत तर महायुतीकडे उमेदवारच नाही. त्यामुळे रामटेक, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, यवतमाळ-वाशिम, धाराशिव, शिरूर येथे ऐनवेळी कुठे काँग्रेस, कुठे शिवसेना(ठाकरे), कुठे मित्रपक्ष यांच्याकडून उमेदवार आयात करण्याची वेळ आली. अनेक विद्यमान खासदारांच्या पराभवाची शक्यता असल्याचे स्वतः महायुतीच्याच जागा वाटपाच्या चर्चेत भाजपने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे स्पष्ट झाले. त्यामुळे हा मुद्दाही त्यांच्याविरोधात गेला. मुंबईत तर महायुतीचे पाच खासदार होते. भाजपने स्वतःच्या तीनही खासदारांना घरी बसविल्याने मुंबईत त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचे संकेत गेले. भाजपचे आमदार आशिष शेलार, पराग अळवणी हेही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने अखेर राजकारणातच नसलेल्या उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्यतून उभे करण्याची वेळ भाजपवर आली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नसतानाही सुधीर मुनगंटीवार यांना बळजबरीने रिंगणात उतरविले गेले. महायुतीच्या विजयाची शक्यता जिथे कमी वाटते, अशा मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा, असे आवाहन भाजपसह सर्व सहयोगी पक्षांतर्फे केले. ही निवडणूक मोदी, हिंदुत्व, 10 वर्षांत झालेला विकास, भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी मोदींचे नियोजन या विषयांभोवती केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न महायुतीचा होता.

जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान जेव्हा भाजपतर्फे विविध सर्वेक्षणांचा हवाला देत शिवसेना वा राष्ट्रवादीकडील जागांवर दावा सांगण्यात आला, तेव्हापासून या दोन्ही पक्षांतील आमदार अस्वस्थ आहेत. लोकसभेला जागा वाटप होताना ही स्थिती असेल तर विधानसभेला काय होईल, या चिंतेत आमदार दिसले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान आमदारांनी आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनीही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करून घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत मदतीचे शब्द दिले गेले. दिग्रस विधानसभेत नेहमी आपल्या विरोधात उभे राहणार्‍या संजय देशमुखांना लोकसभेवर पाठविल्यास आपल्या मार्गातील अडथळा दूर होईल, असा विचार करून संजय राठोड यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे मदत केली. ज्यांना लोकसभेची तिकिटे नाकारण्यात आली, त्यांना विधानसभेचे लॉलीपॉप दाखविण्यात आले. भविष्यात भाजप आपल्या विधानसभेवर दावा करेल म्हणून लोकसभेत आपल्या विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्क्य मिळूच द्यायचे नाही, अशी रणनीती मित्र पक्षांच्या काही आमदारांनी राबविली. भाजपने विधानसभेतील मताधिक्क्यानुसार विधानसभा निवडणुकीत तिकिटे द्यायचे की नाही, याचा निर्णय होईल, असा दम आपल्या सर्व विद्यमान आमदारांना दिला.

लोकसभा निवडणूक निकाल अनेक कळीच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला उपयुक्त ठरणार आहे. मुंबईवर आजही ठाकरे परिवाराची जादू चालते का? शिवसेना फुटीनंतर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले; मात्र शिवसैनिक ठाकरेंसोबतच आहेत, असे सांगितले जाते. या दाव्याची वस्तुस्थिती काय? काही महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत काय चित्र राहू शकेल? राज्यात महापालिकेच्या जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा काय चित्र राहील?

राज्यातील सरकार उलथविणे, पक्ष फोडणे, 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप करून अजित पवारांना सोबत घेणे हे प्रकार जनतेला आवडले आहेत का? मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान झाले की, त्यांच्याविरोधात मतदान झाले? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून करीत असलेल्या कामकाजावर राज्यातील जनता खूश आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक निकालात शोधण्याचा आणि आपापल्या पद्धतीने निकाल लावण्याचा प्रयत्न विविध घटकांकडून, विश्लेषक व राजकीय पक्ष यांच्याकडून केला जाणार आहे, हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news