प्रासंगिक : महावीरांची तपसूत्रे

प्रासंगिक : महावीरांची तपसूत्रे

भगवान महावीरांची तपसाधनेची प्रक्रिया व त्यातून होणारे आत्मकल्याण ही आपणास मानवी जीवन मिळाल्याने प्राप्त झालेली एक संधी आहे. आत्मउन्नतीचा मार्ग स्वीकारणार्‍या सर्व मानवजातीत प्रत्येक जण महावीर होऊ शकतो. आज भगवान महावीर यांची जयंती यानिमित्ताने…

भगवान महावीर केवळ भारताच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत 'या' तत्त्वत्रयीतून मार्गदर्शनाचे दीपस्तंभ ठरतात. सार्वकालिक तत्त्वे व त्यांचे कठोर आचरण यातून जैन धर्मीयांचेच नव्हे, तर सर्वच प्राणिमात्रास आदर्शवत ठरणारे भगवान महावीर व त्यांचे विचार, आचरणपद्धती त्यांच्या जन्मकल्याणकाच्या मंगलप्रसंगी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. जन्मकल्याणक ते केवलज्ञानप्राप्तीपर्यंतचा प्रवास हा ज्या तपसाधनेतून साध्य झाला, ती तपसाधना प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार स्वीकारणे, अनुसरणे व स्वतः महावीर होणे हेच धर्मपालनाचे खरे स्वरूप ठरते. कर्मकांडात व हिंसेत आणि अज्ञानमूलक प्रवृत्तीतून मुक्तता देण्यासाठी सर्वच तीर्थंकारांनी मार्ग दाखवला असला, तरी आज पुनश्च त्याच कर्मकांडाकडे वाटचाल सुरू असल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भगवान महावीरांनी स्पष्ट केलेली, आचरणात आणलेली तपसाधना आपण समजून घेऊन महावीरांचे जन्मकल्याणक ते स्वतःचे आत्मकल्याणक हे परिवर्तन साध्य करता येईल. भगवान महावीरांनी एकूण 12 प्रकारची तपसाधना सांगितली असून, त्यापैकी 6 तत्त्वे बाह्य स्वरूपाची, तर 6 तपे आंतरिक स्वरूपाची आहेत.

भगवान महावीरांची बाह्य तपे

बाह्य आचरणपद्धती शुद्धता ज्या 6 प्रकारच्या तपामधून साध्य होते, त्यामध्ये उपवास हे प्रथम तप असून, सामान्यतः सर्वच धर्माचरणात याचा स्वीकार झालेला दिसतो. तथापि, उपवासाचा नेमका अर्थ व त्याचे हेतू याबाबत स्पष्टता नसते. अन्नत्याग अथवा नेहमीचा आहार न घेणे एवढ्या मर्यादित अर्थाने उपवास केला जातो. खरे तर शरीरात लागणारी ऊर्जा अन्नातून प्राप्त होते. यातून आपण बाह्य क्रिया करण्यास सक्षम होतो. उपवास केल्याने ही ऊर्जा आंतरिक प्राणकोश जागृतीसाठी आवश्यक जाणीव प्राप्त करून देते. आंतरिक शुद्धता हा उपवासाचा हेतू असतो. उपवासापेक्षा कठीण तप हे अर्ध उपवासाचे किंवा अपूर्ण सेवनाचे असते. यामध्ये कोणतेही सेवन पूर्णपणे न करता अर्ध्यावर थांबणे अपेक्षित असते. जसे एखादे गाणे शेवटपर्यंत न ऐकणे, कादंबरी शेवटपर्यंत न वाचता थांबणे, असे केले जाते.

हव्यास, आणखी हवे, सर्व हवे ही मानसिकता त्याग करण्याचा मार्ग म्हणून या तपास महत्त्व आहे. मर्यादित उपभोगात तृप्ती किंवा समाधान प्राप्त करण्याचा सराव या तपातून होतो. भोग लालसा ही अखंडपणे आपणास अस्वस्थ करीत असते. त्यावर नियंत्रण ठेवणे हे अर्ध उपवासाचे उद्दिष्ट आहे. वृत्ती संक्षेप हे बाह्य तपसाधनेतील तिसरे तप असून, आपल्या पंचेंद्रियावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्यात एकमेकांवर आक्रमण होणार नाही, अशी धारणा केली जाते. प्रत्येक इंद्रियाचे काम जेवढे अपेक्षित आहे तेवढेच संक्षेपाने, थोडक्यात करणे हे अभिप्रेत आहे. स्वाद कसा आहे हे जीभ सांगत असते; परंतु ते किती घ्यावे याचा संक्षेप जीभेकडे नसतो. आपली भूक अकारण वाढण्याचे काम जिव्हा करते.

आपण इंद्रीय रथाचे सारथी असून, सर्व इंद्रीयरूपी घोडे एकाच दिशेने मार्गस्थ करणे म्हणजे वृत्ती संक्षेप होय. जर इंद्रियांचे आपण गुलाम झालो, तर त्यातून प्रत्येक इंद्रीय आपणास असमाधान देण्यास कारणीभूत ठरते. रस परित्याग या तत्त्वाचे व्यावहारिक स्वरूप हे वस्तूंचा त्याग करणे इतक्या मर्यादित स्वरूपात पाहिले जाते. अनेक वस्तूंचे सेवन त्याज्य समजले जाते. निर्धारपूर्वक तूप, दही अथवा विशिष्ट फळे घेतली जात नाहीत. हे रस त्यागाचे बाह्यरूप प्राथमिक टप्प्यातील असून, त्याचा मुख्य हेतू रसभावना त्याग करणे, असा आहे. स्वाद निर्माण होण्याची, रस निर्माण होण्याची प्रक्रिया थांबवणे हे रस परित्यागाचे खरे स्वरूप आहे. बर्‍याचदा ज्या वस्तूचा त्याग केला जातो, त्याच वस्तूचा भोग भाव मनात राहतो. उपवासाच्या दिवशी स्वप्नात जेवणच येते, हा रस त्याग नसल्याचे उदाहरण आहे. आपत्ती आंतरिक ऊर्जा वासनेत वाया जाऊ नये, यासाठी रस परित्यागाचे तप केले जाते.

कायाक्लेश या तपासंबंधी तत्त्व आणि व्यावहारिक समज यात मोठे भेद दिसतात. सामान्यतः, शरीरास क्लेश देणे किंवा त्रास देणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. खरे तर शरीर हे साधन आहे. त्याची योग्य देखभाल करणे आवश्यकच असते. या शरीरास आजारपण, अपघात यातून क्लेश मिळतात. त्याबाबत आपली मानसिकता ही आहे तसे स्वीकारण्याची ठेवणे. त्याबाबत तक्रार न करता निरपेक्ष भावनेने स्वीकारणे असा या तपाचा अर्थ आहे. आपणहून क्लेश आमंत्रित करायचे नाहीत, तर जे आले आहेत, येत आहेत त्यांचा स्वीकार करणे म्हणजे कायाक्लेश तत्त्व किंवा तप होय. बाह्य तपांमध्ये सहावे तप हे सल्लीनता असून, आंतरिक तपाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तल्लीनता ही आपण अनेकदा अनुभवलेली असते. एखादे गाणे अथवा व्याख्यान आपण तल्लीनतेने, पूर्णपणे मग्न होऊन ऐकतो, ही तल्लीनता असते. दुसर्‍या एखाद्या घटकात, विषयात पूर्णतः लक्ष देतो तेव्हा ही तल्लीनता येते. सल्लीनता यात आपण स्वतःमध्ये, आपल्या आत्मतत्त्वामध्ये मग्न होतो. आपले आत्मस्वरूप समजून समस्यता निर्माण होणे, एकात्मभाव तयार होणे, बाह्यजगताशी आनंदासाठी परावलंबत संपणे ही सल्लीनता असते. बाह्य तपांचा साधनेसोबत आंतरिक बदलाची अधिक सूक्ष्म; परंतु महत्त्वाची तपे ही प्रायश्चित, सेवाव्रत, विनय, स्वाध्याय, सामायिक आणि कायोत्सर्ग अशी आहेत.

प्रायश्चित या तत्त्वास पश्चा त्ताप करणे असे समजले जाते. खरे तर प्रायश्चित हे अधिक सूक्ष्म व भिन्न असून, पश्चात्ताप ही तात्कालिक व प्रारंभीक क्रिया असते. 'मिच्छामी डुक्कडम' अशी क्षमावली मागितली जाते व माझ्याकडून आपणास जर जाणतेपणी, अजाणतेपणी दुखावले असेल तर क्षमा करावी, असा भाव असतो. पश्चात्तापात माझ्याकडून चुकून घडले, मी शक्यतो चुकत नाही, हा छुपा अहंभाव असतो. प्रायश्चितामध्ये मी चुकलो हे सत्य असून, त्याचा स्वीकार केला जातो. माझे वर्तन बेहोशपणे, बेशुद्धावस्थेत होणार नाही याचा आंतरिक निर्धार व कृती ही पश्चात्तापाऐवजी प्रायश्चित घेण्यात असतात. हे आंतरिक परिवर्तन असते. आंतरिक तपामध्ये सेवा हे एक महत्त्वाचे तप असून, ज्येष्ठ, वृद्ध, ज्ञानी अशा लोकांची सेवा करणे असा त्याचा व्यावहारिक अर्थ घेतला जातो.

ख्रिस्ती धर्मतत्त्वात सेवा हे प्रमुख तत्त्व आहे व स्वर्गप्राप्तीसाठी आवश्यक मानले जाते. सेवा तप भगवान महावीरांनी या मर्यादित अर्थाने पाहिले नाही. सेवा करण्याचा उद्देश काही तरी प्राप्त करण्याचा नसावा, ती अकाम सेवा असली पाहिजे, असा व्यापक द़ृष्टिकोन आहे. पूर्वकर्मबंधानुसार आपणास सेवा करणे बंधनकारक होते. कर्मनिर्झरा होण्यास आवश्यक असते, असे सेवाव्रत किंवा तप अभिप्रेत आहे. विनय किंवा विनम्रता हे आचरणास सोपे वाटणारे तप खर्‍या अर्थाने आत्मशुद्धीची आवश्यक अट असते. आपण अनेकदा विनम्रतेचा मुखवटा धारण करतो. मनामध्ये शत्रुत्व असूनही विनयतेचे नाटक करतो. नको असणारे पाहुणे दारात पाहून आपण त्यांना 'या' म्हणतो; पण मनात वेगळेच असते. विनय किंवा विनम्रता ही अहंकार शून्यतेची घटना असते. आपल्याजवळील पैसा, पद, प्रसिद्धी, गुण, रूप यांचा अहंकार खूप असतो; पण हे सर्व अल्पकालीन व नष्ट होणारे आहे, हे समजून विनय तप केले जाते.

'स्वाध्याय' हे आंतरिक तपाचे स्वरूप व्यवहारात, आचरणात फक्त शास्त्र वाचन अशा स्वरूपात घेतले जाते. स्वाध्यायाचे मूळ तप हे स्व-अध्याय म्हणजे माझे आत्मस्वरूप अभ्यासणे, आपले मूळ स्वरूप समजून घेणे, आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण असे आहे. महावीरांनी 12 वर्षे स्वाध्याय तपात आपली साधना केली आणि केवल ज्ञान प्राप्त केले. स्वाध्यायासोबत सामाजिक हे तप महत्त्वाचे असून, समय किंवा वेळ, कालखंड आणि क्षेत्र एकच असल्याची भूमिका यामध्ये आहे. सामायिकमध्ये वर्तमानात साक्षीभावाने जगणे घडते. आपण भूतकाळाची आठवण व भविष्यकाळाचे नियोजन यातच वर्तमानकाळ हरवत असतो. सामायिक या भ्रमातून जागे करण्याचे कार्य करते.

आंतरिक तपामध्ये कायोत्सर्ग हे तत्त्व स्थूल शरीर ते प्राणशरीर असा प्रवास दर्शवते. आपण श्वास घेतला, तर त्याचा उत्सर्ग करतोच. तसेच आपल्या शरीरास सर्व तपांचा परिणाम म्हणून इतकी शुद्धता प्राप्त होते की, काया शिल्लक राहत नाही. आपण आपल्या शरीरापासून भिन्न असल्याचा आत्मभाव व आत्मभान जागे होते. भगवान महावीरांची ही तपसाधनेची प्रक्रिया व त्यातून होणारे आत्मकल्याण ही आपणास मानवी जीवन मिळाल्याने प्राप्त झालेली एक संधी आहे. आपण मानव ते मुक्ती किंवा उच्चस्तरावर जाणे अथवा मानव ते पशू अशी अधःपतनाची वाट स्वीकारण्याचे पर्याय निवडू शकतो. आत्मउन्नतीचा मार्ग स्वीकारणार्‍या सर्व मानवजातीत प्रत्येक जण महावीर होऊ शकतो. त्याची सूत्रे जाणीवपूर्वक वाटचालीस एक निमित्त ठरते!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news