राजकारण : ‘भारत जोडो’ मते जोडेल? | पुढारी

राजकारण : ‘भारत जोडो’ मते जोडेल?

डॉ. जयदेवी पवार

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या विराट सभेने झाली. या सभेद्वारे एक प्रकारे विरोधी पक्षांनी प्रचाराचे रणशिंगच फुंकल्याचे दिसले. मात्र यात्रा काळातच नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांनी वेगळी चूल मांडल्याने ‘इंडिया’ आघाडी कमकुवत बनली आहे. त्यामुळे या न्याय यात्रेचे फलित काय, असा प्रश्न आहे.

काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी गतवर्षी ‘भारत जोडो’ यात्रेचा एक भाग म्हणून केरळ ते श्रीनगर अशी पदयात्रा केली. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, दक्षिण भारतातील दोन राज्ये आणि उत्तर भारतातील एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पक्षाला विशेष काही करता आले नसले तरी या यात्रेला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादामुळे राहुल यांनी आपल्या सल्लागारांच्या सांगण्यावरून मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेचे आयोजन केले. त्याची सुरुवात चालू वर्षी जानेवारीमध्ये झाली आणि 17 मार्च रोजी मुंबईतील धारावी येथे आघाडीच्या विशाल रॅलीने संपली.

आता या यात्रेतून राहुल गांधींनी काय साध्य केले आणि त्याचा काँग्रेस पक्षाला व काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला काय फायदा होणार आहे याचे मंथन सुरू आहे. राहुल यांच्या या पदयात्रेमागे काँग्रेसचा कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा केला जात असला, तरी त्यात तथ्य नाही. लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच ही यात्रा काढण्यात आली हे स्पष्ट आहे. न्याय यात्रेपूर्वी तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असला तरी 2024 साठी त्यांच्या कथित नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीची स्थापना झाली होती. पण ज्या दिवशी मणिपूरमध्ये या पदयात्रेला सुरुवात झाली, त्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला. पुढे दोन-तीन दिवसांनी हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी भाजपशी हातमिळवणी केली. भाजपने अशोक तंवर यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. याच काळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्ष सोडला आणि त्यांनाही भाजपने राज्यसभेचे सदस्यत्व दिले आहे.

ही पदयात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली तेव्हा राहुल आणि अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्ष चांगलाच संतप्त झाला. परिणामी एकेकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देणार्‍या ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील 42 जागांवर काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती करण्यास नकार दिला. परिणामी बंगालमध्ये ‘इंडिया’ आघाडी संपुष्टात आली.

राहुल बिहारमधील किशनगंजला पोहोचणार होते, त्याआधीच राजद आणि काँग्रेससोबत युती करून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले संयुक्त जनता दलाचे सुप्रिमो नितीश कुमार यांनी महागठबंधनातून बाहेर पडत भाजपसोबत एनडीएमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने बिहारमध्ये केवळ सत्ता गमावली नाही, तर लोकसभा निवडणुकीसाठीच्या ‘इंडिया’ आघाडीची पायाभरणी करणार्‍या नितीश कुमार यांचा पाठिंबाही गमावला.

थोडक्यात, एकीकडे राहुल गांधींच्या या यात्राकाळात काँग्रेसला जनमताचा आधार मिळण्याऐवजी महाराष्ट्र, बिहार, हिमाचल प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांत अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला. गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोधवाडिया ते उत्तर प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एआयसीसी सदस्य अजय कपूर, गुजरात काँग्रेसचे नेते अंबरिश डेर यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, हार्दिक पटेल या नेत्यांनी आधीच पक्ष सोडला आहे.

राहुल यांच्या न्याययात्रेचा समारोप मुंबईत इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या विराट सभेने झाला. पण ही आघाडी जितकी एकजूट दाखवू पाहात आहे, तितकी एकजूट आहे का, हा प्रश्नही उरतोच. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या संभाव्य जाहीरनाम्याचे चित्र मांडत लोकांचे लक्ष वेधून घेतले. भारत जोडो न्याय यात्रेचे अंतर कमी होते. त्यांनी पायी चालण्याबरोबरच वाहनातून जाण्याचेही नियोजन केलेले होते. भारत जोडो न्याय यात्रा 106 जिल्ह्यांतून गेली; तर भारत जोडो यात्रा 76 जिल्ह्यांतून गेली होती. न्याय यात्रा 62 दिवसांतच संपली आणि भारत जोडो यात्रा मात्र 140 दिवस चालली. न्याय यात्रा ही राहुल गांधी यांच्या मागील यात्रेपेक्षा अधिक प्रभावी होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. कदाचित ही यात्रा ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली झाली असती तर अधिक परिणामकारक ठरली असती.

भारत जोडो यात्रेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करणारे अखिलेश यादव यांनी न्याय यात्रेत सामील होणे ही उल्लेखनीय बाब आहे. मात्र या यात्रेच्या सांगता समारंभाला केजरीवाल, अखिलेश यादव यांची उणीव भासली. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना अखिलेश अणि अरविंद केजरीवाल यांची साथ लाभली असली तरी दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्ये आम आदमी पक्षाशी आघाडी व्हायला हवी होती; पण तसे झाले नाही. विरोधी पक्षांतील अनेक नेते भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सामील झाले. डी. राजा, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि फारुख अब्दुल्लांसारख्या नेत्यांनी व्यासपीठावर एकत्र येऊन ऐक्याचा संदेश दिला असला तरी तो तितकासा प्रभावी ठरलेला दिसत नाही.

‘पाच न्याय’च्या निमित्ताने राहुल गांधी यांनी लोकसभा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचा जाहीरनामा सांगून टाकला. तरुणांसाठी पदवीधर होताच अप्रेंटिसशिप, महिलांसाठी केंद्र सरकारच्या नोकरीत 50 टक्के आरक्षण, कुटुंबातील एका महिलेला वर्षात एक लाख रुपये देण्याची घोषणा या लक्षवेधी ठरल्या. मात्र या सांगता समारंभातील भाषणामध्ये राहुल यांनी वापरलेल्या ‘शक्ती’ या शब्दावरून भाजपने त्यांना घेरले आहे.

न्याययात्रेदरम्यानच्या राहुल गांधी यांच्या सर्वच भाषणांत लोकसभेच्या लढाईबाबत कोणतीही सुस्पष्ट दिशा दिसली नाही. त्यांनी मोदी व मोदी सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून आले. ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास देशाच्या विकासाचे प्रारूप कसे असेल याचे दिशादर्शन त्यांनी या यात्रेतून केले असते तर त्यांच्या विरोधाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असते. आपल्या पक्षाची विस्कळीत झालेली घडी सावरण्यासाठी, उरल्यासुरल्या नेत्यांमधील हेवेदावे दूर करण्यासाठी तसेच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्यांना आवरण्यासाठी त्यांनी या संपूर्ण देशव्यापी दौर्‍यात काहीही केल्याचे दिसले नाही. त्यामुळे त्यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मते कशी जोडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एक गोष्ट निश्चित आहे की, या दोन्ही यात्रांच्या माध्यमातून राहुल यांनी आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला असून तो बर्‍याच अंशी यशस्वीही झाला आहे. परंतु भाजपच्या मजबूत प्रचारतंत्राचा सामना करण्यासाठीचे राजकीय चातुर्य राहुल यांच्यामध्ये अद्यापही आलेले नाहीये. एकीकडे हिंदुत्वावर, जातीयवादावर, धार्मिकतेवर टीका करायची आणि त्याच वेळी मी जनेऊधारी ब्राह्मण आहे असे म्हणायचे ही विरोधाभासी भूमिका मोदी-शहांच्या रणनीतीचा सामना करताना त्यांचा गोंधळ उडाल्याचे दर्शवणारी आहे. त्यांच्या अशा भूमिकांमुळेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेतेही खुलेपणाने त्यांचे नेतृत्व मानण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे भाजपच्या ताकदीच्या प्रचारतंत्राचा सामना करण्यासाठी राहुल गांधी यांना बरीच मोठी मजल मारण्याची गरज आहे.

Back to top button