संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
Published on
Updated on

प्रा. रामचंद्र गोहाड

समाजात वर्णभेद आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होणे दुरापास्त होते. सामाजिक व धार्मिक अराजक दूर करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची गरज होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या संजीवन समाधीचा 725 वा सोहळा येत्या 2 डिसेंबरपासून होत आहे. त्यानिमित्ताने….

देशामध्ये निरनिराळ्या कला व शास्त्रे यांचा विकास होणे हे देशाच्या संपन्नतेचे द्योतक मानले जाते. मध्ययुग हे साधना पद्धतीचे सुवर्णयुग होते. या युगात अनेक प्रकारच्या साधन पद्धतीचा उदय व विकास झाला. नाथ संप्रदायाचा उदय या कालावधीतच झाला. नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथ व गोरखनाथांचा उदय म्हणजे एक पर्वकाळ होता. असा उल्लेख आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज मराठवाड्यातील पैठणजवळच्या आपेगावचे कुलकर्णी.

माऊलींचे आजोबा गोविंदपंत व आजी निराबाई यांना गोरक्षनाथांनी घरी येऊन आशीर्वाद दिला होता की, 'कुळामध्ये सत्पुरुष जन्माला येईल व जगाचे परिवर्तन करेल.' त्यांना विठ्ठलपंत पुत्र झाला. पहिल्यापासून संतांची वृत्ती, आध्यात्मिक व शास्त्रांचा अभ्यास. विठ्ठलपंत तीर्थाटनाला गेले असताना आळंदीस आले. तेथे सिद्धेश्वराचे जुने मंदिर आहे.

ज्ञानाने डोळे उघडले असल्याने तीर्थयात्रेचे सुख भोगणे झाले. आळंदीचे कुलकर्णी सिधोपंत, त्यांची कन्या उपवर होती. त्यांच्या द़ृष्टीस विठ्ठलपंत आले व पुढे त्यांचा विवाह कन्या रुक्मिणीशी झाला. विठ्ठलपंतास वैराग्य प्राप्त झाले होते. संसारामध्ये त्यांना स्वारस्य नव्हते. तरीही यावेळच्या रितीरिवाजांप्रमाणे विवाह होत असत. तसा हा झाला. संसारात मन रमेना. काशीस जाऊन रामानंद स्वामींकडून संन्यास घेतला. चैतन्याश्रम नावाने राहत होते. गुरू रामानंदांना खरी माहिती कळल्यावर त्यांनी पंतांना खडसावले व पुन्हा गृहस्थाश्रमात जाण्याचा आदेश दिला.

सबब, पुन्हा संसार सुरू झाला. आळंदीस ब्रह्मवृंदांनी त्यांची हेटाळणी करून बहिष्कार टाकला. सर्व व्यवहार बंद. रुक्मिणीबाईस शके 1197 माघ महिन्यात निवृत्तीनाथ जन्मास आले. शके 1197 श्रावण वद्य 8 रोजी ज्ञानेश्वर महाराज जन्मास आले. शके 1199 मध्ये सोपानदेव व शके 1201 मध्ये मुक्ताबाई जन्मास आल्या. चारी भावंडे आई-बापाविना गरिबीत व बहिष्कार स्थितीत आयुष्य कंठत ज्ञान प्राप्त करून घेत होती.

ज्ञानेश्वरकालीन धार्मिक स्थिती

त्या काळात देशात मुस्लिम धर्माचा प्रसार झालेला नव्हता; पण जैन, लिंगायत व महानुभाव यांचा प्रसार होता. पंढरपुरातील विठ्ठलाचा भागवत धर्म व वारकरी होते. प्रचलित पंथात वादविवाद होते. समाजात वर्णभेद, स्पृश्यास्पृश्यता आणि विषमता होती. सर्व धर्मग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने सामान्य माणसाला अशिक्षित व इतरेजनास ज्ञान प्राप्त होणे दुरापास्त होते. ठरावीक उच्चविभूषित वर्गाची मक्तेदारी होती. नाथ संप्रदायसुद्धा एवढा प्रसारात नव्हता.

सामाजिक व धार्मिक अराजक दूर करण्यासाठी, धर्माची ग्लानी दूर करून सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी नव्या सामाजिक विचारप्रवाहाची जरूरी होती. याबद्दल सुंदर वर्णन शं. दा. पेंडसे यांनी त्यांच्या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, "यातून मार्ग काढणार्‍या धर्माचे सत्य स्वरूप महाराष्ट्राला स्पष्ट सांगणार्‍या, सर्वसामान्य लोकांची धार्मिक भूक भागवून त्यांना धर्माचे मर्म समजावून सांगणार्‍या,बाह्य आचारणास खरा धर्म समजून, त्यावर खूश होणार्‍या लोकांच्या-समाजाच्या डोळ्यात अंजन घालणार्‍या शक्तिमान नेत्याची आवश्यकता होती आणि ही आवश्यकता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी म्हणजे त्यांच्या रूपाने पूर्ण झाली."

ज्ञानेश्वरांची साहित्यनिर्मिती

वैदिक धर्मास सुधारक असा मराठीमध्ये ग्रंथ नव्हता. ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार हा भगवान गोपालकृष्णाचा महाराष्ट्रातील अवतार आहे. संचित ज्ञान सर्व असल्याने जरी समाजाने बहिष्कार टाकला, स्पृश्यास्पृश्यता होती, मौजीबंधने, शुद्धीपत्र पैठणकरांनी नाकारल्याने तेथे रेड्याच्या तोंडून वेद वदवल्याने ही भावंडे ईश्वररूप आहेत, हे कळले. पैठणहून आळंदीस परत येतेवेळी वाटेत माऊलींचे गुरू निवृत्तीनाथ यांनी माऊलीस सामान्य समाजासाठी 'गीता' या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करण्यास आदेश दिले.

प्रचलित संतमंडळींपैकी संत नामदेव महाराजांची माऊलींना जवळीक होती. वाटेत नेवासे मुक्कामी गावाबाहेर असणार्‍या महादेवाच्या मंदिरात असणार्‍या खांबास टेकून माऊलींनी गीतेतील 700 श्लोकांचे विवरण 9033 ओवीबद्ध ग्रंथात 18 अध्यायांत केले. संस्कृतमधील सर्व गुह्यज्ञान सामान्यजनांना सांगण्यासाठी "ज्ञानेश्वरी" ग्रंथरूपी 'देशीकार लेणे' निर्माण केले. 56 भाषांचा गौरव ज्ञानेश्वर माऊलींनी या ग्रंथराजात केला आहे. नेवासे ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व या महान ग्रंथात विदीत करताना माऊली म्हणतात –

ऐसे युगी परि कळी । आणि महाराष्ट्र मंडळी ।
श्री गोदावरीच्या कुळी । दक्षिणलिंगी ॥ 1803 ॥
त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचकोश क्षेत्र ।
जेथ जगाचे जीवनसूत्र । श्री महालय असे ॥ 1804 ॥
तेथ यदुवंश विलासु । जो सकळकळानिवासु ॥
न्यायाते पोषी क्षितीशु ॥ श्री रामचंद्र ॥ 1805 ॥
तेथ महेशान्वय संभूते । श्री निवृत्तनाथसुतें ।
केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें ॥ 1806 ॥

याप्रमाणे कलियुगातील आणि महाराष्ट्र लोकांसाठी भागवत धर्माचा पाया रचून माऊलींनी समस्त मानवजातीस एक कायमस्वरूपी देणे दिले आहे. ब्रह्मांडाची सूत्रे या ग्रंथाच्या रूपाने सामान्यजनांस 13 व्या शतकात प्राप्त झाली.

सगळ्यात जर ब्रह्मानंद कोणास झाला असेल! तर संत नामदेव, जनाबाई, बंका, चोखामेळा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी आदी संतांस झाला. संत नामदेव महाराज म्हणतात –

ज्ञानराज माझी योग्यांची माऊली । जेणे नियमदली प्रकटली । गीता अलंकार नाम 'ज्ञानेश्वरी'। ब्रह्मानंद लहरी प्रकट केली । अध्यात्मविद्येचे दाखविले रूप । चैतन्याचा दीप उजळला ।
छप्पन्न भाषेंचा केलासे गौरव । भवार्णवी नाव उभारिली ।
श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी । सामराज्य भुवनी सुखी नांदे ।
नाम म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी । एकतरी ओवी अनुभवावी॥

यानंतर माऊलींनी 'अमृतानुभव', 'अभंग', 'चांगदेव पासष्टी', 'विरहिण्या', 'गाथा' इत्यादी ग्रंथसंपत्ती तमाम मराठी सारस्वतासाठी अर्पण केली. मराठी भाषेचा गौरव करून तिला राजप्रासादात नेली.

ज्ञानेश्वरीचे समाप्तीस माऊली गुरू निवृत्तीनाथ यांना ग्रंथ अर्पण केला. तत्पूर्वी, हा ग्रंथ तमाम जनतेला खुला करण्याची अनुमती मागितली. गुरू म्हणाले, 'ज्ञाना, नाथ संप्रदायाचे बंधन मला आहे, त्यामुळे मी तुला अनुग्रह केला आहे. सबब ग्रंथ खुला करता येणार नाही.' माऊलींनी भागवत धर्माची महती कथन केली. वारकरी संप्रदायासाठी ज्ञानाचे मागणे घातले व हट्ट केला व त्याशिवाय मी हलणार नाही. गुरूंना त्यांच्या मातेचे शेवटचे शब्द आठवले. 'तुझ्या ओट्यात ही तीन लेकरे टाकत आहे. तू त्यांचा सांभाळ कर. ज्ञाना अतिशय बुद्धिमान आहे, त्याचा लळा कर.'

गुरू माऊलींना म्हणाले, 'ज्ञाना, माझ्या नाथ संप्रदायाचे काही होवो, हा ग्रंथ तू तमाम समाजास खुला कर' असे म्हणून प्रसाद दिला. मग माऊलींनी पसायदानाच्या 9 ओव्या निर्माण केल्या व आज आपणास, समाजास त्या ऊर्जा देणार्‍या ठरत आहेत. जन्मभर भावंडांचे समाजाने हाल केले. पण खल लोक नष्ट होऊ नयेत, त्यांची दुष्ट बुद्धी नष्ट व्हावी व सज्जन लोकांचा समाज निर्माण व्हावा, असेे माऊलींनी म्हटले. या ग्रंथाविषयी निरनिराळ्या बुद्धिवंतांनी मते दिली आहेत. सहित्यसम्राट न. चिं. केळकर म्हणतात, 'या ग्रंथाचे विभूतीमत्त्व अगदी पहिल्या दिवसासारखे आहे.'

माऊलींची तीर्थयात्रा

ज्ञानदेवादी सर्व 50 संतांनी संत नामदेवांसह तीर्थयात्रेस जाण्याचा मनोदय व्यक्त केला. संत नामदेव माऊलींस म्हणाले, 'जर मला देव विठ्ठलाने परवानगी दिली तर मी येईन.' सर्व संत मंडळी चार धाम यात्रा करून आले. पंढरपूरला मावंदे घातले. सर्व संत आपापल्या गावी जाण्याच्या द़ृष्टीने हालचाल करू लागले. माऊलींच्या मनात आपले इच्छित कार्य झाले आहे. सबब विठ्ठल देवांना त्यांनी संजीवन समाधी घेण्यास अनुमती मागितली. विठ्ठलदेवांना ही कल्पना मान्य झाली नाही. पण माऊलींनी त्यांना 'चैतन्य आता देहात राहू शकत नाही. सबब अनुमती द्याच,' असा आग्रह धरला. माऊलींचे अवतारकार्य संपत आल्याने देव विठ्ठलांनी त्यांना आशीर्वाद दिला की, 'पहिली एकादशी माझ्याकडे वारकरी येतील व दुसर्‍या एकादशी वारकरी यावत चंद्र दिवाकरो तुझ्याकडे येतील.' म्हणून हा वारकरी सोहळा आजतागायत सुरू आहे.

संजीवन समाधी महत्त्व

21 व्या वर्षी संत ज्ञानदेव संजीवन समाधी घेते झाले. नामदेवांच्या मुलांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरातील नंदीजवळ भुयार काढून तळघर तयार केले. तेथे माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पुढे ठेवला. कार्तिक वद्य 13 ला माध्यान्हीला (12.30 वा.) नामदेवांचे कीर्तन झाले व संजीवन समाधी घेतली. या संजीवन समाधीचे महत्त्व समस्त वारकरी व इतर समाजात आहे. गेल्या शतकात आळंदी संस्थानने 700 वा सोहळा वर्षभर 12 डिसेंबर 1995 पासून 12 डिसेंबर 1996 पर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केला.

एकूण प्रत्येक 700 वेळा पारायणे झाली. राष्ट्रपती भवनात 5 मार्च, 1997 रोजी टपाल तिकिटाचे अनावरण झाले. 12 डिसेंबर, 1996 रोजी समाधीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. सर्व क्षेत्रांतून संतांच्या पालख्या-ज्योती आळंदीला आणल्या. येत्या 2 डिसेंबर, 2021 रोजी माऊलींना समाधी घेऊन 725 वर्षे होत आहेत. या शतकातील 725 वा समाधी दिन सोहळा साजरा करणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

(लेखक श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त आहेत)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news