सिंहायन आत्मचरित्र : आबा : एक विद्यापीठ

सिंहायन आत्मचरित्र : आबा : एक विद्यापीठ

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

गतवर्षी पाच नोव्हेंबर, 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

आबा गेले! ते तृप्त मनानं गेले!
आयुष्यभर एक निगर्वी, निष्ठावंत, निर्भीड पत्रकार म्हणून ख्यातकीर्त असलेल्या आबांची ओळख ही 'एक विद्यापीठ' अशीच होती. या विद्यापीठाच्या शाखा समाजकारण, राजकारण, साहित्य, शेती, सहकार, शिक्षण, क्रीडा, कला, उद्योग अशा विविध क्षेत्रांत पसरल्या होत्या. डॉ. डी. वाय. पाटील, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्यासारखे कार्यकर्ते ते जाहीरपणे बोलून दाखवत.

स्वातंत्र्य संग्रामात क्रांतिकारकांना आबांची कशी मदत व्हायची, हे स्वतः क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनीच लिहून ठेवले आहे! महाराष्ट्र राज्यातील एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे तत्कालीन हेवीवेट मंत्री बाळासाहेब देसाई यांचं कोल्हापूर दौर्‍यातील पान आबांच्या उपस्थितीशिवाय हलत नव्हतं. आबा द़ृढनिश्चयी, नेमस्त पण परखड त्यांचं बोलणं आणि कृती ही समाजहिताच्या कैवाराची, बाणा लढाऊ, त्यामुळे मधाच्या पोळ्यातील मधमाशांसारखे विविध क्षेत्रांतील लोक त्यांच्याभोवती असायचे.

आबांच्या महानिर्वाणानंतर 'लोकसत्ता', 'महाराष्ट्र टाइम्स'सारख्या बड्या भांडवलदारी वृत्तपत्रांनीही आबांच्या कार्याचा यथोचित गौरव केला होता. 'महाराष्ट्र टाइम्स'नं 'त्यांच्या निधनानं कोल्हापुरातील आणखी एक सामाजिक संस्था कमी झाली,' अशा बहुमानी विधानाद्वारा आबांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं होतं. आबांना मानवंदना देताना 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुढे लिहिलं होतं, 'सभोवतालचं जीवन हीच पाठशाळा समजून आणि बिनशिक्षकी शिक्षण घेऊनही, सुशिक्षिताचा आयुष्यक्रम जगलेल्या एका असामान्य व्यक्तीची अखेर!'
'महाराष्ट्र टाइम्स'सारख्या दर्जेदार वृत्तपत्राने दिलेल्या या मानवंदनेचं मोजमाप करायला शब्दही अपुरे आहेत.

दक्षिण महाराष्ट्रातील जनतेमध्ये 'पुढारी'ची ओळख सामाजिक शिक्षणाची पाठशाळा अशीच आहे. अन् या पाठशाळेचे आद्य भीष्माचार्य म्हणून आबांकडे पाहिले जायचे. आबा तृप्त मनानं गेले; पण त्यांच्या स्मृतींचा सुगंध मात्र माझ्या जीवनात सदोदित दरवळत राहिला. मला नेहमीच चेतना पुरवीत राहिला. आबांचं व्यक्तिमत्त्व हे सह्याद्रीसारखं विशाल होतं. त्यांचा पुत्र म्हणून मी हे म्हणतो, असं मुळीच नाही. त्यांचं मोठेपण हे काळाच्या ओघात सिद्ध झालेलंच होतं. आबा म्हणजे पाठ्यपुस्तकासाठी पैसे नाहीत म्हणून आपले शिक्षणही पूर्ण करू न शकणारा एक विद्यार्थी.

परंतु हाच विद्यार्थी भावी आयुष्यात एका मोठ्या वृत्तपत्राचा संपादक होतो, जनजागृती करतो, समाजात आमूलाग्र परिवर्तनाची प्रक्रिया घडवतो व शिवाजी विद्यापीठासारखे नामांकित विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार मांडून ते प्रत्यक्षात येण्यासाठी झटतो, हाच मुळी देशातील पत्रकारितेच्या इतिहासातील एक चमत्कारच आहे. त्यांनी गोरगरीब, तळागाळातील लोकांसाठी आपली लेखणी सतत झिजवली. सौजन्यशील स्वभाव, साधी राहणी, प्रेमळ, निगर्वी स्वभाव, प्रसिद्धिपराङ्मुखता ही गुणसंपदा म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आयुधंच. साहजिकच, अशा अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाकडे विविध क्षेत्रांतील मंडळी का बरे आकृष्ट होणार नाहीत!

आबांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ही कामगार चळवळींपासून झाली. मुंबईमध्ये 'कैवारी'ची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी कामगार कायद्यांचा, औद्योगिक धोरणांचा परिपूर्ण अभ्यास केला व ते ज्ञान त्यांनी कामगारांच्या हितरक्षणासाठी उपयोगात आणले. आबा तडफेने कामगार प्रश्नांबाबत लिहायचे. कामगारांचं दैन्य, त्यांच्यावर होणारे अन्याय याला वाचा फोडायचे. आपल्या हक्कासाठी मोर्चे, आंदोलने करणार्‍या कामगारांना ते उघड उघड पाठिंबा द्यायचे.

आबांचे हे वागणे पोलिसांना कामगारातील अशांतता वाटायचे. एकदा तर मुंबईच्या पोलिस कमिशनरशीही याबाबत आबांची खडाजंगी झालेली. पण, आबांनी घेतलेला वसा सोडला नाही. नाभिक समाजाविषयी अनुद्गार असलेले काही लेख प्रसार माध्यमांमध्ये छापले गेल्यानंतर आबांनी 'नाभिक परिषद' भरवून त्याचा निषेध तर केला होताच; पण त्याबाबत पुस्तिका छापून नाभिक समाजाची अस्मिता समोर आणली व ठाणे शहरात नाभिक परिषदही भरवली होती! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीतही आबा उतरले होते.

आबांनी तेव्हा 'युवक परिषद' भरवून बाबासाहेबांच्या कार्याला सर्वंकष पाठिंबा दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक सामाजिक लढ्यात आबा सहभागी झाले. त्यांच्याबरोबर अनेकदा व्यासपीठावरही आले होते. 5 सप्टेंबर, 1943 रोजी आबांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला होता. सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही आबांचा मोठा सहभाग. त्या वेळी मुंबई बंदरात परदेशी माल यायचा. त्यावर पिकेटिंग घालण्यासाठी आंदोलन उभे राहिले. ते गणेश शंकर जोशी हे चालवायचे. त्यांच्याकडून व इतर नेत्यांकडून येणारे महत्त्वाचे संदेश आंदोलकांना देण्याची महत्त्वाची व अवघड जबाबदारी आबांनी खांद्यावर घेतली होती.

आपलं दैनंदिन कामकाज सांभाळून ते या कामातही गर्क असत. त्यांच्यावर तेव्हा पोलिसांची करडी नजर असायची. तरीही ते हे काम बिनबोभाट पार पाडायचे. स्वातंत्र्य चळवळीतील प्रत्येक आंदोलनात आबांचा सदेह सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीत बहुजन समाजाने उतरावे याबाबत आबा आग्रही होते. आबा, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर ही ब्राह्मणेत्तर आघाडीची नेतेमंडळी. पण आबांना नेहमी वाटायचे, की बहुजन समाजाने यात अडकून न राहता स्वतः राष्ट्रीय प्रवाहात म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले पाहिजे.

त्यांच्या कुंचल्यातून त्याबाबत तशा स्वरूपाचं लेखनही झालं. त्याला हळूहळू प्रतिसादही मिळू लागला. परंतु, त्यामध्ये गती यावी यासाठी आबा 20 एप्रिल, 1930 रोजी गुजरातमधील कराडे मतवाड इथं गेले व त्यांनी गांधीजींची भेट घेतली. त्या वेळी बहुजनांनी स्वातंत्र्य चळवळीत उतरावे यासाठी गांधीजींनी आबांकडे एक संदेश दिला. आबा कराडे मतवाडहून परतले तेव्हा त्यांची 'नवा काळ' या दैनिकामध्ये मुलाखत प्रसिद्ध झाली. त्या मुलाखतीमध्ये आबांनी गांधीजींचा हा संदेश वाचून दाखवला व तो छापण्यातही आला.

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांनी आबांकडे दिलेला संदेश असा होता, 'यह लढत न ब्राम्हणोंकी है न ब्राम्हणेतरोंकी है, न हिंदू की है परंतु सारी हिंदुस्थानकी है. इसमे भी मुख्यशः हिंदुस्थानके करोड़ो भूके मरते हुए गरिबोंकी है. इसलिए सब ब्राम्हणेतरोंको जो हिंदुस्थान में इतनी बड़ी संख्यामे है इस लढत में आ जाना चाहिए.' या संदेशाने एक महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे गोंधळलेल्या ब्राह्मणेत्तर समाजाला राष्ट्रीय प्रवाहात नेऊन सोडले! त्याला विधायक दिशा मिळून एक महत्त्वाचा सामाजिक घटक स्वातंत्र्य चळवळीशी जोडला गेला.

आबांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी प्रकर्षाने याची आठवण करून दिली. साहेब म्हणाले, "आज महाराष्ट्रात बहुजन समाज जो सत्तेत दिसत आहे, तो गणपतरावजींनी त्या वेळी महात्मा गांधींच्या मिळवलेल्या संदेशामुळे व स्वतः राष्ट्रीय प्रवाहात बहुजन समाजाला घेऊन सामील होण्याच्या निर्णयामुळेच."

क्रांतिकारक नागनाथअण्णा नायकवडी यांनी आबांवर एक विशेष लेख लिहिला होता व आम्हा क्रांतिकारकांना पैशांची गरज भासायची तेेव्हा ग. गो. जाधव हे आम्हाला कसे पैशाची मदत करायचे, 1942 सह इतर स्वातंत्र्य चळवळ आंदोलनात आबांनी क्रांतिकारकांना सढळ हाताने कशी मदत केली होती, हे त्यांनी आपल्या लेखातच नमूद केले होते. स्वकार्य करीत करीत देशसेवा कशी केली जाते, हे आबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. जवळकर यांच्याबरोबर आबा कराचीत झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस परिषदेलाही गेले होते.

आबांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय हाही तसा ऐतिहासिकच. सलग दहा वर्षे आबा त्याचे अध्यक्ष होते. त्या माध्यमातून त्यांचं समाज प्रबोधन व समाज परिवर्तनाचे काम सुरू असायचं. बहुजन समाजातील असंख्य तरुण त्यांच्या सहवासात असायचे. राज्य पातळीवर जेधे, जवळकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आबा उभे राहिले होते.

व्यक्तिविकास व विकासात्मक कार्य ही दोन्ही अंगे परस्परपूरक असून हे भान ठेवून कार्य केले तर त्यातून गतिशीलपणे समाजविकास होत राहतो, हे आबांचं मत व त्यावर त्यांनी जोरही दिला. ब्राह्मणेत्तर चळवळीतील एक बिनीचे शिलेदार म्हणूनही आबांची नोंद इतिहासाने घेतली आहे.

पुढे प्रजा परिषदेची चळवळ, महाराष्ट्र राज्य निर्मितीची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आदी अनेक आंदोलनांत आबांचा सिंहाचा वाटा होता. गोवा मुक्ती संग्राम आंदोलनाची पहिली तुकडी तर 'पुढारी'च्या कोल्हापूरमधील कार्यालयातूनच निघालेली. एकंदरीतच आबा चळवळींचेही अध्वर्यू होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत जनहिताच्या असंख्य चळवळींना, युवकांना मार्गदर्शन केले. कामगार नेत्यांना सल्ले दिले, त्या अनुषंगानेही ते चळवळींचे विद्यापीठच ठरले.

सामाजिक, शैक्षणिक, सहकारसारख्या कार्यात आबा स्वतः अग्रेसर होतेच; पण या क्षेत्रांतही त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या. माणसाला फक्त ज्ञानामृत पाजून उपयोग नाही; तर त्याचा उदरनिर्वाह चालेल, विकास होईल असे काही संस्थात्मक कामही हवे, हे आबांचं सुरुवातीपासूनचं मत. ते त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्धही केले. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या पसरलेल्या जाळ्यामध्ये आबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेने अनेक साखर कारखाने मार्गी लागले.

शेतकर्‍यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी स्थापण्यात आलेला कोल्हापुरातील शेतकरी खरेदी-विक्री संघ असो, छोट्या-मोठ्या कृषी, तसेच उद्योग-व्यवसायांच्या सहकारी संस्था असोत… प्रत्येक ठिकाणी आबांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात होता. बावडा घाट, काळम्मावाडीसारखे धरण अशा विकासात्मक व जनहिताचे अनेक भव्य प्रकल्प साकारण्यामध्येही आबा आघाडीवर होते. मौनी विद्यापीठ, ताराराणी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आदींची मागणी करण्यापासून त्यांची स्थापना व त्यानंतरही या संस्थांशी आबा निगडित होते.

बहुजन समाजातील तरुणांची ओढाताण होऊ नये व त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी, हा या संस्था स्थापण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश होता. डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला मौनी विद्यापीठाचे द्वार खुले करून देणारे आबाच होते. त्याच अनुभवावर डी. वाय. यांचे पुढे शैक्षणिक विश्व स्थापित होऊन फुलारले. डी. वाय. यांच्यासारख्या असामींना मौनी विद्यापीठाचे द्वार उघडताना आबांचा आपले कार्यकर्ते सबळ व्हावेत, त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा हा द़ृष्टिकोन होता.

श्रीपतराव बोंद्रे वा डी. वाय. असतील… त्यांची राजकीय कारकीर्द आबांच्या सहकार्यावरच फुलली. दोघांनाही निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्यापासून बोंद्रे यांना मंत्रिपद मिळवून देण्यापर्यंत आबांनी कष्ट उचलले होते. डी. वाय. किंवा बोंद्रे यांच्यापर्यंतच आबांचे काम सीमित नव्हते. ग्रामपंचायतीपासून मंत्रिपदापर्यंत जिल्ह्यातील अनेकांच्या कारकिर्दीची नाळ आबांशी जोडली गेली आहे. अनेक मंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, कामगार नेते हे आबांनी अक्षरशः घडवले.

बाबा आढाव यांच्यासारख्या प्रसिद्ध समाजसेवकास आबांचे मार्गदर्शन लाभले होते. दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्यापासून असंख्य समाजसेवकांची ऊठबस आबांकडे असायची. अनेक विषयांवर आबा त्यांना मार्गदर्शन करायचे. 'ग.गो.' नावाने परिचित असलेल्या या विद्यापीठात किती लोक तयार झाले याची गणतीच करता येणार नाही. एका द़ृष्टीने ते किंगमेकर होते.

आबांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं त्यांना 'पद्मश्री' हा किताब देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघानं त्यांना मानाचा 'आचार्य अत्रे पुरस्कार' देऊन त्यांच्या पत्रकारितेमधील योगदानाची पोचपावती दिली. तर पुणे पत्रकार संघानं 'ज्ञानप्रकाशकार लिमये पुरस्कार' देऊन त्यांचा गौरव केला होता आणि शिवाजी विद्यापीठानं तर त्यांना सन्माननीय 'डी. लिट.' देऊन त्यांच्या नावामागे 'डॉक्टर' ही सर्वश्रेष्ठ उपाधी लावली.

त्याचबरोबर आबांच्या स्मृतिदिनी व्याख्यानमाला सुरू करून त्यांची स्मृती चिरंतन जपण्याचं महान कार्य विद्यापीठानं केलं. शिवाजी विद्यापीठाने आबांच्या नावे एक स्वतंत्र अध्यासन स्थापून पत्रकारितेच्या शिक्षणालाही चालना दिली आहे. विशेष म्हणजे या अध्यासनासाठी स्वतंत्र इमारतीचे प्रयोजनही करण्यात आले आहे. एखाद्या संपादकाच्या नावाने असलेले हे देशातील पहिले अध्यासन आहे.

आबांचं व्यक्तिमत्त्व हेच एक विद्यापीठ होतं, यात संशय नाही. माझ्यासाठी तरी आबा म्हणजे एक पाठशाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठही होते. त्यांचं अस्तित्व हे माझ्यासाठी हुरूप वाढवणारं होतं. ऊर्जा देणारं होतं. त्यांची कार्यकुशलता व्यक्त करण्यासाठी शब्दही कमी पडावेत, असं हे असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. मला माझ्याच घरात, माझ्याच पित्याच्या रूपानं 'माझं विद्यापीठ' मिळालं, याबद्दल मी स्वतःला भाग्यवानच समजतो. आबा सर्वश्रुत होते. अष्टावधानी तर होतेच होते. परंतु, शालीनतेनं घटनेचा ऊहापोह कसा करावा, समोरच्या माणसात ऊर्जा कशी निर्माण करावी, हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखं होतं.

आबांनी नेहमीच बहुजनवाद आणि बहुहितवाद जोपासला. वर्धिष्णू केला. देव, दैव आणि दैववादाच्या खातेर्‍यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला त्यांनी लोकशिक्षण, लोकजागरण आणि लोकप्रबोधनाच्या माध्यमातून, परिवर्तनाच्या टप्प्यावर आणून उभं केलं, हे आबांचं योगदान वादातीत आहे. याविषयी अनेक सामाजिक विचारवंतांनी आणि ज्ञानवंतांनी आबांविषयी केलेलं भाष्य याची प्रचिती देऊन जातं. त्यांच्या मौलिक विचारांवरून आबांच्या दूरद़ृष्टीचा अनुभव येतो. म्हणूनच आज 'पुढारी' ज्या स्थानावर आहे, तिथून त्याला कुणी धक्काही लावू शकत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. ही सर्व आबांची पुण्याई आहे, हेही तितकेच खरेे आहे.

ज्यांचं राजकीय जीवन आबांनीच घडवलं, ते माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी आबांविषयी लिहून ठेवलं आहे, की "मला राजकारणात आणून, आर्थिकद़ृष्ट्याही मदत करून काँग्रेसचा पहिला नगराध्यक्ष होण्याचे भाग्य मिळवून दिले, ते संपादकांनीच!" ते आबांना 'संपादक' म्हणूनच संबोधित असत. ते पुढं म्हणतात, "आबांना श्रमिक व कष्टकर्‍यांविषयी खराखुरा जिव्हाळा होता. मी राष्ट्रीय तालीम संघाचा अध्यक्ष होतो, त्या वेळी सन 1955 ते 1965 पर्यंत आबांनी तालीम संघाला मदत केली. त्यामागे बहुजन समाजाने पुढे आले पाहिजे, हीच त्यांची तळमळ होती."

असेच अनुभव प्रकाशक चंद्रकांत शेट्ये तसेच ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाईंनासुद्धा आले होते. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, शिवाजी सावंत, आनंद यादव, ह. मो. मराठे, शंकर खंडू पाटील, चंद्रकुमार नलगे, रमेश मंत्री, ना. सी. फडके, डॉ. एस. एस. भोसले… अशी किती नावे घ्यावीत! अनेक साहित्यिकांच्या प्रथम कलाकृतींना 'पुढारी'नेच उजेडात आणले.

वि. वा. शिरवाडकर असतील वा शंकर खंडू पाटील… अशा अनेक महननीय हस्ती 'पुढारी'च्या आस्थापनावर होत्या. त्यांच्या जडणघडणीत आबांचा खूपच मोठा वाटा आहे. एखाद्या साहित्यिकाला लिहिण्यास उद्युक्त करण्याबरोबरच त्यांना प्रथम प्रकाशात आणणे व त्याचा पुढचा प्रवास कसा आहे, हेही आबा पाहायचे. आपल्या स्वभावगुणधर्मानुसार संबंधितांशी चर्चा करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे.

जे साहित्याचा बाबतीत तेच कुस्ती व इतर कलांच्याबाबतीतही. आबा तालीम संघाचे अध्यक्ष तर होतेच; परंतु त्या माध्यमातूनही त्यांनी क्रीडा क्षेत्राचा ध्वज कसा उंच राहील, हे पाहिले. त्यांची प्रेरणा व प्रोत्साहन घेऊन अनेक कसदार मल्ल तयार झाले. आबा महत्त्वाच्या कुस्ती मैदानांनाही उपस्थित असायचे. त्यांच्या हस्ते महत्त्वाच्या कुस्त्याही लावल्या जात. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, दिनानाथ सिंह, मारुती माने, चंबा मुत्नाळ, लक्ष्मण वडार यांच्यापासून ते नंतरच्या काळातील दादू चौगुले, युवराज पाटील यांच्यापर्यंतच्या अनेक मल्लांच्या कुस्त्या त्यांच्या उपस्थितीतच लढल्या गेल्या.

कोल्हापूरचा एखादा पैलवान बाहेरच्या पैलवानाशी लढत देत असेल तर ती कुस्ती निकाली होईपर्यंत आबा मैदानात बसून राहायचे. जिंकणार्‍या कोल्हापुरी पैलवानाचा सत्कार करताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा. तालीम संघ व 'पुढारी'च्या माध्यमातून आबांनी तालीम संघाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. क्रीडाक्षेत्र हे नवयुवकांसाठी नेहमीच आव्हान असून युवकांनी विविध खेळांत झोकून दिलं पाहिजे, हा मंत्र मात्र आबांनी अखेरपर्यंत जपला. त्याचं हस्तांतरणही करीत राहिले. त्यापाठीमागं तरुण पिढीचा उत्कर्ष व कोल्हापूरचे नाव नेहमीच अग्रेसर असावे, हा आबांचा हेतू होता व त्याद़ृष्टीनेच ते संबंधित खेळांकडे, खेळाडूंकडे पाहायचे.

ज्येष्ठ संपादक व विचारवंत माधव गडकरी यांनी आबांनी 'पुढारी' हे लोकशिक्षणाचं साधन म्हणून वापरल्याचं सांगितलं होतं. आबांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले होते, 'ग्रामीण वृत्तपत्राचा संपादक हा त्या त्या परिसरातील कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक आणि नेता असतो. विविध क्षेत्रांतील तरुण आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन अशा कार्यकर्त्यांची एक साखळीच तो निर्माण करीत असतो. मग अशा कार्यकर्त्यांच्या हातून चांगल्या सामाजिक संस्था उभारल्या जातात आणि विधायक समाजकार्यही घडून येते. या द़ृष्टीनं विचार करता, 'पुढारी'नं आणि त्याचे संस्थापक संपादक ग. गो. जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. निरक्षरांनाही त्यांनी 'पुढारी' वाचायला शिकवला ही वस्तुस्थिती आहे. अण्णा पाडळकरांसारखा निरक्षर पैलवानही एखाद्या विद्यार्थ्याला पकडून त्याच्याकडून 'पुढारी' वाचून घेत असे!'

इतके सांगून गडकरी थांबले नाहीत, तर त्यांनी आबांच्या 'सोपी भाषासुद्धा कमवावी लागते. मला स्वतःलाही ती कमवावी लागली!' या जाहीर उक्तीचाही संदर्भ दिला होता.

आबांच्या निधनानंतर 'लोकसत्ता'नं आबांचं केलेलं मूल्यमापन अगदी वास्तव आणि बोलकं होतं. आबांच्या कार्याचा गौरव करताना 'लोकसत्ता'नं लिहिलं होतं, 'दै.'पुढारी'चे संस्थापक-संपादक गणपतराव जाधव यांच्या निधनाने, केवळ 'पुढारी'चे संपादकच आपल्यातून गेले असे नाही, तर मराठी पत्रकारांचेच 'पुढारी' आपल्यातून निघून गेले आहेत, असंच म्हणावं लागेल. सामाजिक न्यायाचा आग्रह हा जसा गणपतराव जाधव यांचा विशेष होता, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विकासकार्याच्या मागे ठामपणे उभे राहणे हेही त्यांचे एक वैशिष्ट्य होते. दक्षिण महाराष्ट्रातील विकासकार्याचे प्रतिबिंब 'पुढारी'त पडले ते त्यांच्या या धोरणामुळेच! त्यामुळेच 'पुढारी' प्रादेशिक वृत्तपत्रात अग्रेसर ठरले आणि गणपतराव पत्रकारांचेच 'पुढारी' झाले.'

आबांच्या निधनाचं तीव्र दुःख. त्यामध्ये मी अंतर्बाह्य पोळून निघालेलो असतानाच आबांबद्दलचे असे कौतुकाचे शब्द ऐकले, की त्या दुःखावर क्षणभर हळुवार फुंकर बसत होती आणि मनाला शांती लाभत होती.

आबांच्या जाण्याचं दुःख डोंगराएवढं होतं, पण त्यांच्याविषयी व्यक्त होणार्‍या या कळकळीच्या भावना मला मात्र कर्तव्याची जाणीव करून देत होत्या. दुःख कुरवाळत बसू नकोस, ते आबांना आवडणार नाही, असे मला बजावीत होत्या आणि त्यामुळेच आबांच्या या वैचारिक ऊर्जास्रोतावर मी नव्यानं उभारी घेत होतो.

ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाई यांनी आबांचं वर्णन करताना लिहिलं होतं, 'आबांकडे एक विधायक आणि रचनात्मक द़ृष्टिकोन होता. त्याचा आविष्कार करताना त्यांनी कसलाही आपपरभाव स्वीकारला नाही. जिथं संघर्ष तिथं विधायक विरोध आणि जिथं स्वीकार तिथं रचनात्मक प्रवृत्ती, अशी मुळी संपादक जाधव यांची मूलभूत द़ृष्टीच होती! दै.'पुढारी'नं जनतेचं पुढारीपण केलं पाहिजे, अशी संपादक जाधवांची प्रारंभापासूनच धारणा होती.' 'स्वामी'कार रणजित देसाई यांनी आबांचं या ठिकाणी यथोचित मूल्यांकन केलं आहे. यावरून आबांच्या विचारांची उंची लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

आज आपल्यात आबा नाहीत. परंतु, त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारीचं किती मोठं ओझं ठेवलं आहे, याची प्रचिती येण्यास हरकत नाही. अर्थात, त्याच मार्गानं माझीही वाटचाल सुरूच आहे. आबांचं डोंगराएवढं कार्य, त्यांनी विविध क्षेत्रांत निर्माण केलेली, शक्ती दिलेली माणसं; त्यांचा वैचारिक पिंड, हे सारं पाहिल्यानंतर आबा हे वृत्तपत्राचे एक विद्यापीठच होते, हे प्रकर्षानं जाणवतं.

आबा नावाच्या या विद्यापीठातून असंख्य पत्रकार तयार होऊन बाहेर पडले आहेत. सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांनी स्वतःच सांगितलं आहे, की दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी ते मुंबईतून 'पुढारी'चा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. युद्धाच्या बातम्या ते तारेनं 'पुढारी'कडे पाठवीत असत. त्यातूनच त्यांची जडणघडण होत गेली.

तर रमेश मंत्रींसारख्या साहित्यिकांनीही 'पुढारी'च्या संपादक विभागात काम करून आबांच्या हाताखाली पत्रकारितेचे धडे गिरवले होते. तसेच ह. मो. मराठे यांच्यापासून शंकर खंडू पाटील, डॉ. एस. एस. भोसले ते चंद्रकुमार नलगे यांच्यापर्यंत अनेक नामवंतांनी कधी ना कधी 'पुढारी'साठी आपलं योगदान दिलेलं असून, आबांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ त्यांनाही झाला होता.

त्याशिवाय रणजित देसाई यांच्यापासून शिवाजी सावंत, सूर्यकांत खांडेकर, रमेश मंत्री, मधु मंगेश कर्णिक आदी लेखकांना लिहितं करून; त्यांचं साहित्य 'पुढारी'मधून प्रकाशित केलं, ते आबांनीच! मराठी साहित्यासाठी त्यांनी दिलेलं हे योगदान लक्षणीय आहे, यात शंकाच नाही. म्हणूनच आबा हे पत्रकारितेचं एक स्वतंत्र अभिमत विद्यापीठच (Deemed University) होते, असं म्हटलं तर ते अनाठायी होणार नाही. जीवनाच्या विद्यापीठात मिळणारं शिक्षण विद्यापीठात मिळतंच असं नाही. पत्रकारितेत घेतलेल्या बीसीजी, एमसीजीसारख्या पदव्याही त्यासमोर थिट्या असतात, हे दिसून येतं. साहजिकच आबांच्या कार्यकर्तृत्वावर ओझरता द़ृष्टिक्षेप टाकला तरी आपल्याला हे कळून येतं, की आबा हेच 'विद्यापीठबाह्य विद्यापीठ' होतं.

कुठलंही चांगलं योगदान हे शुद्ध बीजासारखंच असतं. त्याच्या पोटी आज ना उद्या रसाळ गोमटी फळं येणारच असतात. पराक्रम करणार्‍या शूरानंही आधी पराक्रम करून ठेवायचा असतो. त्याच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारा शाहीर नंतर जन्माला येतो. आबांचंही तसंच झालं. त्यांना जिवंतपणी जेवढा मानसन्मान मिळाला, त्याहून त्यांच्या कर्तृत्वाचं मूल्यांकन त्यांच्या निर्वाणानंतरच अधिक झालं. त्यातलाच एक भाग म्हणून, आबांच्या प्रथम स्मृतिदिनाचं औचित्य साधून शिवाजी विद्यापीठानं त्यांच्या नावे एक व्याख्यानमाला सुरू केली. 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव या व्याख्यानमालेत आतापर्यंत अनेक राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक, संरक्षण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले बहुमोल विचार मांडले आहेत.

ही व्याख्यानमाला कोल्हापुरातील सांस्कृतिक जीवनाचा एक भागच बनली असून, आजपर्यंत इथं येणार्‍या वक्त्यांच्या, विचारवंतांच्या अनमोल विचारांचा लाभ हजारो श्रोत्यांनी घेतलेला आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तर ही व्याख्यानमाला म्हणजे एक पर्वणीच असते.

आबांच्या पत्रकारितेचा श्रीगणेशा मुंबईत झाला होता. मामा वरेरकर, जेधे-जवळकर, भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा एकापेक्षा एक दिग्गज महारथींच्या सहवासात आबा आले.

साहजिकच, जिथं आबांच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला, त्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतच आबांच्या नावे ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार सुरू करावा, असा विचार माझ्या मनात आला. कारण त्यांचं कार्य जरी पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात फुललेलं असलं, तरी ज्या मुंबईत त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले, त्याच ठिकाणी असा उपक्रम सुरू होणं औचित्यपूर्णच ठरलं असतं. शिवाय आबांनी 'पुढारी'च्या माध्यमातून पत्रकारांच्याही पिढ्या निर्माण केल्या. त्यामध्ये वि. वा. शिरवाडकर ते भैरव कुंभार यांच्यापर्यंत असंख्य पत्रकारांचा समावेश आहे, होता. आबांच्या हाताखाली, 'पुढारी'त सुरुवात करून पुढे अनेक पत्रकार संपादक झाले, मीडिया हाऊसेसचे संचालकही झाले. एकूणच या द़ृष्टिकोनातूनही आबा काय किंवा दैनिक 'पुढारी' काय, एक विद्यापीठच!

आबांच्या पत्रकारितेतील व सामाजिक कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली व आबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने म्हणजे 2008 साली केंद्राने आबांच्या फोटोसह पोस्टाचे तिकीट काढले. राष्ट्रपती भवनात त्या वेळी महाराष्ट्रातील व केंद्रातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती ना. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण झाले. पत्रकारितेच्या जगतातील हा एकमेव असा उपक्रम होता.

आबांनी 'पुढारी' नावाचं लावलेलं हे रोपटं आज कसं महावृक्षात रूपांतरित झालेलं आहे, हे सर्वांनाच ठाऊक होतं. भांडवलदारांच्या आणि राजकारण्यांच्या वृत्तपत्रांशी दोन हात करून आबांनी लावलेल्या या रोपट्यानं स्वतःची 'स्पेस' कशी तयार केली, याची जाण सर्वांनाच होती. मुंबई मराठी पत्रकार संघानं, आबांच्या कार्याची अगोदरच दखल घेऊन, त्यांना आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरवलेलं होतं. तसेच मुंबई पत्रकार संघाशी आबांचे पूर्वापार संबंधही होते. त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघाने 'ग. गो. जाधव पुरस्कार' सुरू केला. पत्रकारितेतील आबांचे योगदान पाहता, हा पुरस्कार प्रतिष्ठेचा आणि बहुमानाचा म्हणून ओळखला जाईल, असा सार्‍यांनाच विश्वास वाटला. आबांच्या प्रथम पुण्यदिनापासून हा पुरस्कार द्यायचं पत्रकार संघानं निश्चित केलं आणि तशा हालचाली सुरू झाल्या.

प्रथम पुरस्कार कोणाला द्यायचा, यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघानं पदाधिकार्‍यांची एक बैठक घेतली आणि 'लोकसत्ता'चे संपादक माधव गडकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं! अर्थात, कोणाला पुरस्कार द्यायचा, या प्रक्रियेत 'पुढारी'चा सहभाग असण्याचं कारणच नव्हतं. तो सर्वस्वी निर्णय पत्रकार संघाचा होता.

हा पुरस्कार मातब्बर आणि मान्यवर अशा ज्येष्ठ पत्रकारालाच दिला जावा, असा सुरुवातीपासूनच संकेत आहे. त्यामुळे स्वाभाविकच "पुढारी'कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव' पुरस्काराची महती वाढली. हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला गेला. हा पुरस्कार कोणाला मिळणार, याविषयी मोठी उत्सुकता निर्माण होऊ लागली. बहुतांश वेळा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि दिग्गजांच्या उपस्थितीतच प्रदान करण्यात आला. त्यामुळे या पुरस्काराची शान दिवसेंदिवस वाढतच गेली.

1989 साली सर्वप्रथम हा पुरस्कार माधव गडकरींना दिल्यानंतर पुढे र. गो. सरदेसाई (मुंबई), द. श. पोतनीस (नाशिक), म. य. दळवी (औरंगाबाद), रंगा वैद्य (सोलापूर), जयंतराव टिळक (पुणे), स. मा. गर्गे (पुणे), अनंतराव पाटील (पुणे), कृ. पां. सामक (मुंबई), तु. श्री. कोकजे (मुंबई), राधाकृष्ण नार्वेकर (मुंबई), ग. गो. राजाध्यक्ष (बेळगाव), मधु शेट्ये (मुंबई), प्रफुल्लकुमार मोकाशी (मुंबई), भारतकुमार राऊत (मुंबई), दिनू रणदिवे (मुंबई), दिनकर रायकर (मुंबई), शिरीष पै (मुंबई), नारायण आठवले (मुंबई), गणेश वसंत ऊर्फ भाऊ तोरसेकर (मुंबई), वसंत शिंदे (मुंबई), शरद कारखानीस (मुंबई), अरुण खोरे (पुणे), कुमार केतकर (मुंबई), अरुण टिकेकर (मुंबई), निळकंठ खाडिलकर (मुंबई), ज्ञानेश महाराव (मुंबई), रामभाऊ जोशी, विजय कुवळेकर आदी ज्येष्ठ पत्रकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

एका अर्थानं असं म्हणता येईल, की ज्या मान्यवरांना हा पुरस्कार मिळाला, ते सर्व जण जणू स्नातकच होते आणि त्यांना आबांच्या अभिमत विद्यापीठाची (Deemed University) ही डॉक्टरेटच मिळाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news