अवकाश : महत्त्वाकांक्षी ‘गगन’ भरारी | पुढारी

अवकाश : महत्त्वाकांक्षी ‘गगन’ भरारी

हेमचंद्र फडके

‘इस्रो’ची गगनयान मोहीम ही विकसित देश म्हणून जागतिक पटलावर उदयास येणार्‍या भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी आहे. स्वदेशी क्षमता विकसित करणे हे ‘इस्रो’चे उद्दिष्ट असून चांद्रयान-3 प्रमाणेच गगनयान मोहीमही यशाची पताका उंचावेल यात शंकाच नाही. हीअंतराळ मोहीम यशस्वी झाल्यास भारताला चंद्र आणि मंगळावर मानवाला पाठविण्याचा मार्ग खुला होणार आहे. या मोहिमेला भविष्यातील संभाव्य अंतराळ पर्यटनाचीही पार्श्वभूमी आहे.

सातत्याने विकसित होत असलेल्या मानवजातीसाठी अंतराळ संशोधन हे एक मोठे आव्हान ठरले आहे. आतापर्यंत शास्त्रज्ञ सौरमंडल आणि ग्रहांच्या स्थितीबाबतच जास्तकरून संशोधन करू शकले आहेत. त्यातल्या त्यात चंद्र आणि मंगळ याविषयी अधिक माहिती प्राप्त झाली आहे. ‘इस्रो’च्या (भारतीय अवकाश संशोधन संस्था) सूर्य मोहिमेमुळे संशोधनाला एक नवी दिशा गवसली आहे. अंतराळाच्या अफाट पसार्‍यातील असंख्य गोष्टी आजही अनभिज्ञच आहेत. या रहस्यांचा उलगडा करण्याच्या द़ृष्टीने ‘इस्रो’ची गगनयान ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. या मोहिमेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आजपासून 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मध्येच ‘इस्रो’ने या मोहिमेसाठी तयारी सुरू केली होती. गतवर्षी या मोहिमेत वापरल्या जाणार्‍या प्रणालीशी संबंधित दोन चाचण्या घेतल्या होत्या आणि त्या यशस्वीही झाल्या.

या मोहिमेत सहभागी होणार्‍या अंतराळवीरांना गगननॉटस् म्हटले जाणार आहे. भारतीय किंवा मूळ भारतीय वंशाचे तीन अंतराळवीर आतापर्यंत अंतरिक्षात जाऊन आले आहेत. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. सोयूज-टी 11 या रशियाच्या यानातून शर्मा अंतरिक्षात गेले होते. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स याही अंतरिक्षात गेल्या होत्या. आता ‘गगनयान’ मोहिमेच्या माध्यमातून भारतातील चार अंतराळवीर अंतरिक्षाची सफर करणार आहेत. पृथ्वीपासून 400 कि.मी. उंचीवर अंतराळात पोहोचण्याचे गगनयानचे लक्ष्य आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवयुक्त अवकाशयान पाठवण्यात आले आहे. मानवाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यासाठी स्वदेशी क्षमता विकसित करणे हे ‘इस्रो’चे उद्दिष्ट असून चांद्रयान-3 या मोहिमेप्रमाणेच ‘गगनयान’ मोहीमही यशाची पताका उंचावेल यात शंकाच नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.

अंतराळ मोहिमांमध्ये जोखीम ही पावलोपावली असते. मानवरहित अंतराळ मोहिमांमध्ये काही बिघाड झाला, तरी जीवितहानी होण्याचा प्रश्न नसतो; परंतु ‘गगनयान’ ही मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. 1 फेब्रुवारी 2003 रोजी अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’चे स्पेस शटल पृथ्वीवर परतत असताना त्याला अपघात झाला होता. यामध्ये सात अंतराळवीरांचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर ‘गगनयान’ मोहिमेत सुरक्षेच्या द़ृष्टीने या मोहिमेसाठी जाणार्‍या अंतराळवीरांना पृथ्वीवर जशी लाईफ सपोर्ट सिस्टीम असते तशी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये एअर ड्रॉप टेस्ट, पॅड अ‍ॅबॉर्ट टेस्ट आणि टेस्ट व्हेईकल फ्लाईट यासारख्या अनेक चाचण्यांचा समावेश आहे. आपत्कालीन स्थितीत अवकाशवीरांना प्रक्षेपकापासून वेगळे करणार्‍या गगनयान मोहिमेच्या ‘क्रू एस्केप सिस्टीम’ची प्रत्यक्ष उड्डाणातील चाचणीही यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता या मोहिमेच्या प्रत्यक्ष उड्डाणाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गगनयान’साठी प्रशिक्षण घेणार्‍या चार अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या अंतराळवीरांचा समावेश आहे.

या चौघांची निवड महत्त्वाची मानली जाते. कारण, या ऐतिहासिक मिशनचा भाग होण्यासाठी मोठ्या संख्येने वैमानिकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 12 जणांनी सप्टेंबर 2019 मध्ये बंगळूरमध्ये प्रथम स्तरावरील निवड प्रक्रिया पूर्ण केली. ही निवड हवाई दलाच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनने केली आहे. यानंतर अनेक निवड फेर्‍या झाल्या आणि शेवटी आयएएम आणि ‘इस्रो’ने यातील चौघांची निवड केली. जून 2019 मध्ये ‘इस्रो’ आणि रशियन स्पेस एजन्सी यांच्यात वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी करार झाला होता. यानंतर या चार वैमानिकांना 2020 मध्ये सुरुवातीच्या प्रशिक्षणासाठी रशियाच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवण्यात आले. या वैमानिकांची आरोग्य चाचणी बंगळूर येथे इंडियन एव्हिएशन मेडिसिनमध्ये करण्यात आली आहे. यातील तीन वैमानिक पृथ्वीच्या कक्षेत अंतरिक्षात पृथ्वीची परिक्रमा करतील.

गगनयान मिशन 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला प्रत्यक्षात द़ृष्टिपथात येऊ शकते. तत्पूर्वी, एक मानवरहित चाचणी उड्डाण होणार असून त्यामध्ये व्योमित्र रोबोट पाठवण्यात येणार आहे. मानवयुक्त मोहिमेत भारताला यश मिळाले, तर असे यश संपादन करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी अंतरिक्षात मानवयुक्त याने पाठविली आहेत. रशियाने 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळवीर युरी गागारीन यांना अंतरिक्षात पाठविले होते. गागारीन हेच जगातील पहिले अंतराळयात्री होत. अमेरिकेने 5 मे 1961 रोजी एलन शेपर्ड यांना अंतरिक्षात पाठविले. ते अमेरिकेतर्फे पाठविण्यात आलेले पहिले अंतराळवीर होत. चीनने 15 ऑक्टोबर 2013 रोजी यांग लिवेई यांना अंतरिक्षात पाठविण्याची कामगिरी यशस्वी करून दाखविली होती. आता भारत अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. भारताकडून अंतरिक्षात पाठविल्या जाणार्‍या गगनयानाचे वजन सात टन, उंची सात मीटर आणि व्यास चार मीटर असणार आहे. गगनयानाचे प्रक्षेपण जीएसएलव्ही (एमके-3) रॉकेटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रक्षेपणानंतर 16 मिनिटांच्या आत ते अंतरिक्षाच्या कक्षेत पोहोचेल. पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावरील कक्षेत हे यान स्थापित करण्यात येईल. सात दिवस या कक्षेत राहिल्यानंतर गगनयान अरबी समुद्रात, बंगालच्या उपसागरात किंवा जमिनीवर उतरविण्यात येईल.

अंतरिक्षात पाठविण्यात येणार्‍या अंतराळवीरांना ‘व्योमनॉटस्’ असेही म्हटले जाते. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून घेण्यात आला आहे. व्योमचा अर्थ अंतरिक्ष असा आहे. मानवाची खगोलशास्त्रीय संशोधने उपनिषदांपासून सुरू होऊन अंतरिक्ष आणि ग्रह-उपग्रहांपर्यंत पोहोचली आहेत. आपल्या पूर्वजांनी शून्याची तसेच उडत्या तबकड्यांची संकल्पना मांडली होती. शून्याची संकल्पना हा अनेक संशोधनांचा केंद्रबिंदू ठरला. बाराव्या शतकातील महान खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट आणि त्यांची गणितज्ज्ञ मुलगी लीलावती यांच्याव्यतिरिक्त वराहमिहीर, भास्कराचार्य आणि यवनाचार्य ब्रह्मांडाचे रहस्य उलगडण्यासाठी सतत कार्यरत राहिले. त्यामुळे आधुनिक काळातील भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमांचे जनक विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांनी देशाच्या पहिल्या स्वदेशी उपग्रहाचे नामकरण ‘आर्यभट्ट’ असे केले होते. वास्तविक, अंतरिक्षात असलेल्या ग्रहांवर याने पाठविण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल असते. यान उतरविताना त्याचा कोन थोडा जरी हलला किंवा गतीचे संतुलन थोडे जरी बिघडले तरी अंतरिक्ष मोहीम उद्ध्वस्त होते किंवा भरकटते. भरकटलेले यान कधीही शोधून काढता येत नाही आणि त्यावर पुन्हा नियंत्रण मिळवून पुन्हा लक्ष्याच्या दिशेने पाठविताही येत नाही. त्यामुळेच मानवयुक्त गगनयान पाठविण्यापूर्वी भारताकडून दोन मानवविरहित गगनयान पाठविली जाणार असल्याचे सांगितले जाते.

एक महत्त्वाची बाब म्हणजे, युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांना स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे ‘इस्रो’ची गगनयान मोहीम ही विकसित देश म्हणून वैश्विक पटलावर उदयास येणार्‍या भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारी ठरणार आहे. मंगळयान, चांद्रमोहीम आणि आदित्य यापेक्षाही ही मोहीम अधिक गुंतागुंतीची आहे. याचे कारण, अवकाशात प्रक्षेपित केलेले सॅटेलाईट किंवा मंगळ-चंद्रावर पाठवलेली याने ही अंतराळातच राहतात. गगनयान मोहिमेमध्ये अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाऊन परतही आणण्याचे शिवधनुष्य पेलायचे आहे. त्यासाठी विशिष्ट कॅप्सूल विकसित करण्यात आली आहे, ज्यामध्ये अंतराळात गेल्यानंतर हे अंतराळवीर जीवंत राहू शकतील. ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ हे स्वतः गगनयान मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा यान उतरवले. याखेरीज या मोहिमेतील लाँच व्हेईकल डिझायनिंगची आणि स्पेस कॅप्सूल रिकव्हरीची जबाबदारी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. उन्नीकृष्णन यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय ‘इस्रो’च्या अ‍ॅडव्हान्सड लाँचर टेक्नॉलॉजीतज्ज्ञ असणार्‍या व्ही. आर. ललितांबिका यांचेही या मोहिमेमध्ये मोलाचे योगदान राहणार आहे. याखेरीज भारतीय सशस्त्र दलांव्यतिरिक्त, संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच डीआरडीओदेखील या मोहिमेत सामील आहे.

भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, इंडियन शिपिंग कॉर्पोरेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या भारतीय सागरी संस्थांचाही या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय हवामान विभाग आणि सीएसआयर लॅबसह काही बड्या खासगी संस्थांचाही या मोहिमेच्या कार्यात समावेश करण्यात आला आहे.

या मोहिमेचे महत्त्व म्हणजे मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता तपासणे, अवकाशामध्ये वैद्यकीय, जैवअवकाशीय आणि अभियांत्रिकीचे प्रयोग करणे, अवकाशातील यानांचे प्रक्षेपण आणि एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोहोचवणे व थांबवणे असे प्रयोग करणे, अवकाश स्थानकाची निर्मिती आणि अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांबरोबर सहकार्य वाढविण्यास मदत, भविष्यातील जागतिक अवकाश स्थानकाचा विकास आणि राष्ट्रीय हिताच्या संशोधनामध्ये भारताचे स्थान निर्माण करणे, अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सहकार्याचे व्यासपीठ तयार करणे असे अनेकांगी आहे. या मोहिमेदरम्यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीची सूक्ष्मता (मायक्रो ग्रॅव्हिटी) आणि जैवविज्ञान या विषयांचा अभ्यास करण्यात येणार आहे. ‘इस्रो’ची ही पहिलीवहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यास चंद्र आणि मंगळावर मानवाला पाठविण्याचा मार्ग खुला होणार आहे. आगामी काही वर्षांत अंतरिक्षात पर्यटनाचा विस्तार करण्याच्या शक्यताही यामुळे वाढणार आहेत. ‘इस्रो’च्या या मोहिमेला भविष्यातील संभाव्य अंतरिक्ष पर्यटनाचीही पार्श्वभूमी आहे. याखेरीज या मोहिमांमुळे अंतरिक्ष संशोधनालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

असे आहेत अंतराळवीर

ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे मूळचे केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील नेनमाराचे रहिवासी आहेत. त्यांनी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी रशियामध्ये प्रशिक्षण घेतले आहे. ते एनडीएमधून पदवीधर झाले असून वायुसेना अकादमीमध्ये त्यांना स्वोर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. 19 डिसेंबर 1998 रोजी ते हवाई दलात कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले. कॅट ए श्रेणीचे फ्लाइंग इन्स्ट्रक्टर असणार्‍या नायर यांना 3 हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. सुखोई, मिग-21, मिग-29, हॉक, डॉर्नियर, एएन-32 यासह सर्व प्रकारची विमाने त्यांनी चालवली आहेत. सुखोई स्क्वाड्रनचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन हे मूळचे चेन्नईचे आहेत. तेही एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना वायुसेना अकादमीमध्ये राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि स्वोर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. 21 जून 2003 रोजी ते हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात सामील झाले. कृष्णन यांना 2,900 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप हे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून येतात. त्यांनीही एनडीएमधून प्रशिक्षण घेतलेले आहे. 18 डिसेंबर 2004 रोजी भारतीय वायुसेनेत त्यांची नियुक्ती झाली. इतर गगनवीरांप्रमाणे अंगददेखील फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आहेत. त्यांना सुमारे 2000 तास उड्डाणाचा अनुभव आहे. विंग कमांडर शुभांशु शुक्ला हेदेखील उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांचा जन्म लखनौमध्ये झाला. तेही एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. 17 जून 2006 रोजी त्यांना हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांना सुमारे 2000 तास उड्डाणाचा अनुभव आहे.

या चारही अंतराळवीरांना दोन ते तीन दिवस अंतराळात घालवल्यानंतर त्यांना पुन्हा हिंद महासागरात सुरक्षितपणे समुद्राखाली उतरवले जाईल. या मिशनमध्ये ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे विशेष योगदान आहे.

Back to top button