महिला : गृहिणींच्या कामाचे मोल

महिला : गृहिणींच्या कामाचे मोल

अनेक महिलांसाठी सर्वात भीतीदायक प्रश्न असतो तो म्हणजे, 'आपण काय करता?' याचे उत्तर बहुतेकवेळा घरीच असते किंवा गृहिणी आहे, असे असते. स्वयंपाक करणे, कुटुंबातील सर्वांची देखभाल करणे या गोष्टींशी अर्थार्जन जोडलेले नसल्याने त्या गौण मानल्या जातात. तथापि, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात गृहिणींचे योगदान अमूल्य असल्याचे सांगत अशा मतप्रवाहांना छेद दिला आहे. 8 मार्च जागतिक महिला दिन. त्यानिमित्ताने…

सुमारे 17 वर्षांपूर्वीच्या रस्ते अपघातातील एका महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने 'गृहिणीं'विषयी मोलाचे मत मांडले आहे. हे मत मांडत असताना गृहिणींच्या घरगुती कामकाजाच्या अवमूल्यनाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. या निर्णयात गृहिणींचे योगदान अमूल्य असल्याचे म्हटले आहे. महिलांनी घरात केलेल्या कामाचे मूल्यमापन हे कार्यालयीन कामापोटी मिळणार्‍या वेतनापेक्षा कमी नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट नोंदविले. घराचा सांभाळ आणि देखभाल करणार्‍या महिलांची भूमिका उच्च प्रतीची आहे आणि त्याची पैशात तुलना करणे कठीण आहे, असे मत न्यायालयाने मांडले आहे.

यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका मोटार अपघातातील दाव्यासंदर्भात निकाल देताना म्हटले, आपल्या घरातील गृहिणी या काम करत नाहीत आणि त्यांचे घरात काहीच योगदान नसते, असा विचार मांडणे पूर्णतः चुकीचे आणि गंभीर आहे. एखाद्या गृहिणीचे उत्पन्न निश्चित करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अर्थात, या गोष्टी सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामस्वरूप घरात काम करणार्‍या सर्व महिलांशी संबंधित आहे आणि तो अशा कामांना मान्यता देणारा आहे. 1968 ते 2021 दरम्यान मोटार अपघात नुकसानभरपाईच्या सुमारे 200 प्रकरणांत विमा कंपन्यांनी गृहिणीच्या घरकामांना कमी लेखल्याचे निदर्शनास आले. यावरून समाज हा गृहिणींच्या अथक परिश्रमाकडे आणि त्यागाकडे किती असंवेदनशील द़ृष्टिकोनातून पाहतो हे स्पष्ट होते. गृहिणींचे प्रेम, त्याग, माया आणि समर्पित भावनांचे मूल्यांकन करणे कठीण आहे आणि यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण नाही; मात्र त्यांच्या मेहनतीची कोणत्याच पातळीवर दखल न घेणे हे कितपत संयुक्तिक आहे?

भारतच नाही, तर जगभरातील महिलांसाठी सर्वात भीतीदायक प्रश्न म्हणजे 'आपण काय करता?' कारण, त्याचे उत्तर घरीच असते किंवा गृहिणी आहे, असे असेल, तर समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन लगेच बदलतो. घरकाम करणार्‍या गृहिणीची प्रतिमा आळशी किंवा खूप रिकामा वेळ घालवणारी जीवनशैली जगणारी महिला म्हणून उभी केली जाते. वास्तविक स्वयंपाक करणे, घर नीटनेटके ठेवणे, मुलांचे पालनपोषण करणे, कुटुंबातील सर्वांची देखभाल करणे, ज्येष्ठांचा सांभाळ करणे अशा असंख्य जबाबदार्‍या गृहिणी पार पाडत असतात; पण त्याला अर्थार्जन जोडलेले नसते. एखाद्या कामातून पैसे मिळत असतील, तरच त्याला काम समजले जावे, या भांडवलशाही विचारांना एकप्रकारे पाठबळ देणारे आहे.

साधारणपणे गृहिणीच्या कामांचे मूल्यांकनाचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टींचे मूल्यमापन करणे हे भारतीय परंपरेच्या विरुद्ध आहे तसेच गृहिणींचा आणि परिश्रमाचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हणून त्यास अमान्य केले जाते. अर्थात, या विचारास एका द़ृष्टिकोनातून नाकारता येणार नाही. वास्तविकपणे गृहिणींचे काम अमूल्य आहे आणि हे समाजाने मान्य केले असते, तर गेल्या अडीच दशकांत गृहिणींच्या आत्महत्येच्या दरात वाढ झाली नसती. गृहिणींची अस्मिता, अस्तित्व या गोष्टी सामाजिक आणि राजकीय आघाडीवर कधीही चर्चेचा विषय ठरत नाहीत. कारण, हा मुद्दा पितृसत्ताक व्यवस्थेत असंवेदनशील आहे आणि राजकीय द़ृष्टिकोनातूनही हा मुद्दा फायद्याचा नाही.

2021 ते 2023 या काळात दरवर्षी आत्महत्या करणार्‍या गृहिणींची संख्या ही शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या तुलनेत दुप्पट राहूनही हा गंभीर असणारा मुद्दा राजकीय आणि सामाजिक पातळीवर अजेंड्यावर आलेला नाही. गृहिणींसंबंधी बाळगल्या जाणार्‍या दुटप्पी भूमिकेवरही गंभीर चर्चा करायला हवी. गृहिणींच्या घरकामाला कमी लेखायचे नसेल आणि ते मूल्यहीन मानायचे नसेल, तर तिच्या मेहनतीचे कौतुक करण्याबरोबरच आदरही ठेवायला हवा. अन्यथा घरी बसल्याची खंत गृहिणीच्या मनात कायम राहील आणि तिच्या कामाची होणारी उपेक्षा ही कायमच राहील. विशेष म्हणजे, गृहिणींच्या कधी न संपणार्‍या कामाचा अवमान थांबविण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी 1975 मध्ये आइसलँडच्या 90 टक्केे महिलांनी 24 ऑक्टोबर रोजी एक दिवस स्वयंपाक करण्यास, स्वच्छता करण्यास आणि मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. महिलांच्या या घोषणेमुळे एकप्रकारे देशाचे कामकाज ठप्प पडले. कामावर गेलेल्या पुरुषांना तत्काळ घरी परतावे लागले आणि अडलेली सर्व कामे पुरुषांनी केली. म्हणूनच कोणत्याही अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष रूपात असलेल्या मनुष्यबळाएवढेच गृहिणींचेही काम असते हे समजून घेतले पाहिजे. तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास त्यास 'अब्सट्रेक्ट लेबर' असे म्हटले जाते.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास गृहिणीच्या रूपातून काम करताना महिला तीन वर्गांसाठी सेवा देत असते. पहिला वर्ग हा ज्येष्ठ नागरिक असून तो देशाच्या आर्थिक घडामोडींत प्रत्यक्षपणे योगदान दिलेला असतो. दुसरा वर्ग तरुण वर्ग असून तो सध्याच्या काळात जीडीपीत योगदान देत असतो आणि तिसरा वर्ग म्हणजे बाळांचा वर्ग आणि तो आगामी अर्थव्यवस्थेत योगदान देणारा असतो. आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीवर विचार करणे गरजेचे आहे. गृहिणींच्या कामांची आर्थिक गणना ही सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 'वेळेचा सदुपयोग' या सर्वेक्षणाच्या सप्टेंबर 2020 च्या अहवालातून केली आहे. प्रत्येक दिवशी घराच्या कामात महिला 229 मिनिटे योगदान देतात. त्याचवेळी पुरुष 97 मिनिटे देतात. 'एसबीआय' कॉर्पोरेटच्या ताज्या अहवालानुसार गृहिणींच्या कार्याची आर्थिक आकडेमोड केली, तर त्यांचे योगदान वार्षिक 22.7 लाख कोटी रुपये होईल आणि ते प्रमाण देशाच्या एकूण जीडीपीच्या 7.5 टक्के आहे, तरीही समाज गृहिणींना काहीच काम करत नाहीत, असेच म्हणणार आहे का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news