अंतराळ : ‘नॉटी बॉय’चे यश | पुढारी

अंतराळ : ‘नॉटी बॉय’चे यश

श्रीनिवास औंधकर, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने अलीकडेच बदलत्या हवामानासोबतच अवकाशातील भविष्यातील आपत्तींचीही वेळेवर माहिती देणारा इनसॅट थ्री-डीएस हा उपग्रह प्रक्षेपित केला. या मिशनसाठी ‘इस्रो’कडून विशेष रॉकेटचा वापर करण्यात आला असून, त्याला ‘नॉटी बॉय’ म्हणून ओळखले जाते. 2,274 किलो वजनाचा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर, पृथ्वी विज्ञान, हवामानशास्त्र विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, हवामान अंदाज केंद्र आणि भारतीय राष्ट्रीय केंद्रांतर्गत विविध विभागांना सेवा देईल.

भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’च्या यशस्वी अवकाश मोहिमांमुळे आज जगभरामध्ये भारताची प्रतिमा उंचावण्यास मोलाची मदत झाली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक अंतराळमोहीम यशस्वी केल्यानंतर ‘इस्रो’ने अलीकडेच हवामानशास्त्राच्या क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यामध्ये एक यशस्वी पाऊल टाकले आहे. इनसॅट थ्री-डीएस या उपग्रहाचे अलीकडेच झालेले यशस्वी प्रक्षेपण अनेकार्थांनी महत्त्वाचे ठरणार आहे. हा उपग्रह हवामान आणि नैसर्गिक संकटांची अचूक माहिती देऊ शकणार आहे. त्यामुळं किनारपट्टी भागात येणारी चक्रीवादळं आणि अतिवृष्टीपासून बचावासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं योग्य उपाययोजना करणं शक्य होणार आहे. हा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्स्फर ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आला असून, ही कक्षा पृथ्वीपासून 35,786 किलोमीटर उंचीवर आहे. दूरसंचार आणि हवामान उपग्रहांसाठी ही एक लोकप्रिय कक्षा आहे. जीएसएलव्ही एफ 14 या रॉकेटद्वारे हा हवामान उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. हा उपग्रह वाहून नेणार्‍या रॉकेटची लांबी 51.7 मीटर इतकी असून, उपग्रहाचे वजन 2,274 किलो आहे. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर पृथ्वी विज्ञानअंतर्गत येणार्‍या विविध विभागांना यामुळे मदत होणार आहे. यामध्ये भारतीय हवामान विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग आणि इंडियन नॅशनल ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस सेंटर यांचा समावेश आहे.

भारताच्या अंतराळ संस्थेसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, या उपग्रहामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करून हवामान अंदाजाची अत्यंत अचूक माहिती मिळणार आहे. याखेरीज हा उपग्रह आपत्ती निवारणातदेखील उपयुक्त ठरणार आहे.

या उपग्रहाला अंतराळात सोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या जीएसएलव्ही रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असे म्हटले जाते. या रॉकेटमध्ये भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले असून, आणखी काही प्रक्षेपणांनंतर ते निवृत्त करण्याची ‘इस्रो’ची योजना आहे. जीएसएलव्हीचे शेवटचे प्रक्षेपण 29 मे 2023 रोजी झाले होते आणि ती यशस्वी चाचणी होती. लाँच व्हेईकल मार्क-3 ला बाहुबली रॉकेट असेही म्हणतात. ते जीएसएलव्हीपेक्षा जड आहे. या बाहुबली रॉकेटने सात मोहिमा केल्या असून, सातही मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. पीएसएलव्ही रॉकेटच्या यशाचा दरही 95 टक्के आहे. याउलट जीएसएलव्हीच्या मागील 15 प्रक्षेपण मोहिमांपैकी चार मोहिमा अपयशी ठरल्या. याउलट पीएसएलव्हीच्या 60 मोहिमांपैकी केवळ तीन मोहिमाच अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळेच जीएसएलव्हीला ‘नॉटी बॉय’ असे म्हटले जाते. तथापि, या ‘नॉटी बॉय’ने यंदाची मोहीम यशस्वी केली आहे. त्यामुळेच या प्रक्षेपणाच्या यशानंतर ‘इस्रो’च्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने आनंदाने खोडकर मुलगा आता आज्ञाधारक झाला आहे, म्हणजेच ‘नॉटी बॉय’ आता ‘स्मार्ट बॉय’ बनला आहे, अशी टिपणी केली.

इनसॅट थ्री-डीएस हा उपग्रह 2013 मध्ये लाँच करण्यात आलेल्या इनसॅट थ्री-डी उपग्रहाचं अत्याधुनिक रूप आहे. ढग, धुके, पाऊस, बर्फ आणि त्याची खोली, आग, धूर, जमीन आणि महासागर यावर संशोधन करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल.

हवामानशास्त्र हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये भारताला वेगवान प्रगती करणे आवश्यक आहे. याचे कारण भारत हा कृषिप्रधान आणि भौगोलिक विविधता असणारा देश आहे. या दोन्हींमुळे भारताला हवामानातील चढ-उतारांच्या आव्हानांचा सातत्याने सामना करावा लागतो. विशेषतः, जागतिक तापमानवाढीमुळे होणार्‍या हवामान बदलांच्या काळात अचूक अंदाजांचे महत्त्व वाढले आहे. गेल्या दशकभरामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्याच्या पद्धतीत मोठे परिवर्तन घडून आले आहे; परंतु त्यामध्ये अधिकाधिक अचूकता किंवा बिनचूकपणा येण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने ‘इस्रो’च्या या मोहिमेकडे पाहिले पाहिजे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विविध प्रकारचे उपग्रह विकसित करण्यापेक्षा उपग्रहांना योग्य कक्षेत ठेवण्याची क्षमता प्राप्त करणे हे अधिक आव्हानात्मक आहे. खरं तर या संमिश्र प्रक्षेपण वाहनातून हे 16 वे प्रक्षेपण होते आणि ते यशस्वी होणे अत्यंत आवश्यक होते. हवामानविषयक उपग्रहांमध्ये सतत विकास होत असून, अचूक अंदाज वर्तवता यावेत यासाठी नवीन उपग्रह कक्षांमध्ये स्थापित करत राहावे लागणार आहे. ‘इस्रो’साठी हा खूप चांगला काळ आहे.

‘इस्रो’ने गेल्या काही महिन्यांत यशाची विजयीपताका दिमाखात फडकावत ठेवली आहे. उदाहरणार्थ, ऑगस्ट 2023 मधील चांद्रयान-3 लँडर-रोव्हर मिशनच्या यशामुळे भारत मून लँडिंग क्लबमध्ये सामील झाला. यानंतर भारताने आदित्य-एल 1 देखील लाँच केले आहे. यावर्षी 1 जानेवारी रोजी, देशाने कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह प्रक्षेपित केला. भारतीय अंतराळ विज्ञानाने खूप मोठी मजल मारली आहे, यात शंका नाही. आगामी दोन वर्षांनी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट प्रक्षेपित केला त्याला 50 वर्षे पूर्ण होतील. 19 एप्रिल 1975 रोजी रशियाने भारताचा आर्यभट्ट अंतराळकक्षेत प्रक्षेपित केला होता. तेव्हापासून सुरू झालेल्या अंतराळ संशोधनाच्या आणि अंतराळ मोहिमांच्या प्रवासात भारत जगातील अनेक देशांच्या कोसो मीटर लांब पुढे निघून गेला आहे. भारताने आतापर्यंत 130 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. विशेष म्हणजे, इतर देशांना मदत करण्यातही भारत सदैव आघाडीवर आहे.

हवामानशास्त्राबद्दल विचार करता, 2002 मध्ये यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेला कल्पना-1 हा भारताचा पहिला हवामानविषयक उपग्रह होता. कल्पना ते इनसॅट थ्री-डीएसपर्यंतचा ‘इस्रो’चा प्रवास हा धवल यशोपताका फडकावणारा राहिला आहे. भारतीय अवकाश विज्ञानाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा संदेश आताच्या मोहिमेतून पुन्हा एकदा जगाला देण्यात आला आहे. आता येत्या काळात व्हीनस ऑर्बिटर मिशनअंतर्गत, ‘इस्रो’ने शुक्रयान-1 हे अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे. जवळपास पाच वर्षांसाठी हे यान शुक्राची परिक्रमा करणार आहे. डिसेंबर 2024 किंवा 2025 मध्ये नियोजित केलेल्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचं उद्दिष्ट शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्याचे आहे.

Back to top button