राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस : प्रश्न स्त्रियांच्या आरोग्याचा... | पुढारी

राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस : प्रश्न स्त्रियांच्या आरोग्याचा...

राजमोहन रासम

महिलांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी करायला हव्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फास्ट फूड बंद करायला हवे. सकाळी न्याहारी करून घ्यावी. बाजरीची भाकरी, नाचणी, सोयाबीन, चांगल्या प्रतीचे तांदूळ खावेत. हिरव्या भाज्यांचे सूप करून प्यावे, भाताची पेज, मुगाच्या डाळीची पेज करून प्यावी. यामुळे भूक शमते आणि जास्त अन्न खाण्याची गरज भासत नाही. आज, दि. 26 रोजी राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस आहे. त्यानिमित्त…

महिलांचा सर्वात मोठा आरोग्याचा प्रश्न म्हणजे चिंता आणि अपुरी झोप. स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने महिलांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. पीसोओडी, कॅन्सर, उच्च रक्तदाब, शुगर, वजन वाढणे, पाठीचे, पोटाचे आजार, बाळंतपणानंतरचा थकवा आणि त्यासंबंधित उद्भवणारे अनेकविध आजार, पोटाचे विकार, मूत्राशयाचे विकार वा तक्रारी या सर्व आजारांनी महिलांच्या जीवनात जागा घेतली आहे. पुरेशी काळजी घेणेदेखील महिलांना दुरापास्त झाले आहे. घर-संसारामुळे, नोकरीमुळे महिलांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. एका आजारातून बाहेर पडतो तोवर दुसर्‍या तक्रारी उद्भवतात. विवाहित महिला असो वा तरुणी, आतापासूनच त्यांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. उतरत्या वयात नको त्या आजारांपासून सुटका मिळवायची असेल, तर महिलांनी आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली पाहिजे. असे म्हटले जाते की, आजाराचे मूळ कारण चिंता किंवा तणाव होय. ताणतणावातून बरेचशे आजार बळावतात. त्यात आणखी भर म्हणजे जीवनशैली व्यवस्थित नसेल तर हेच आजार पुढे गंभीर स्वरूप धारण करतात.

घरातील स्त्री आजारी असेल तर घरातील वातावरण बिघडते. तिचे आरोग्य चांगले असेल तरच ती आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. कुटुंबातील सर्व मंडळींकडे लक्ष देऊ शकते. त्यामुळे आधी स्वत: त्यांनी आपल्या आरोग्याकडे नीटपणे लक्ष देणे गरजेचे आहे. एकटी महिला सर्व कुटुंबाची जबाबदारी पाहत असते. सासू-सासर्‍यांचा, मुलांचा सांभाळ, त्यांचे आजारपण, घरातील कामे, मुलांचा डबा, पतीकडे लक्ष देणे या सर्व गोष्टींसोबत इतर काही अगदी छोट्यातील छोट्या बाबींची जबाबदारीदेखील तिच्यावरच असते.

महिलांच्या सर्वात मोठ्या समस्येपैकी एक म्हणजे मासिक पाळीच्या तक्रारी. पीसीओडी, पीसीओएससारख्या तक्रारी आज तरुणींमध्ये जास्त पाहायला मिळत आहेत. कधी रक्तस्राव अधिक होणे, तर कधी मासिक पाळीचे चक्र बदलणे, त्यामुळे अनेकदा चिडचिड, हार्मोन्सचे असंतुलन, मूड स्विंग्ज अशा गोष्टी होत राहतात. योग्य पोषण आहार न घेतल्याने अनेकदा अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. शरीरात हिमोग्लोबीनचा अभाव असल्यामुळेदेखील अशा तक्रारींना सामोरे जावे लागते.

नोकरी करत असणार्‍या महिलांना तर तारेवरची कसरत करावी लागते. त्यांच्या आरोग्याची आपसूकच हेळसांड होत असते. घरकाम आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदार्‍या पार पाडल्यानंतर तिला थकवा जाणवतो. पुन्हा रोजचंच रुटीन. त्यामुळे विश्रांती घेणार कधी? असा प्रश्न समोर येतो.

नोकरी करणार्‍या महिलांमध्ये युरिन इन्फेक्शन वाढत असल्याचे समोर आले आहे. युरिन इन्फेक्शन होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. कामाच्या घाईत पाण्याच्या कमतरतेमुळेदेखील युरिन इन्फेक्शनच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून आले आहे. बर्‍याचदा हा थकवा अंगावर काढला जातो; पण पुढे जाऊन विविध आजारांना सामोरे जावे लागते. काहीवेळा स्त्रिया दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतात. कारण, थकव्यामुळे पुढे जाऊन कोणता नवा आजार उद्भवेल सांगता येत नाही.

सर्वात मोठी दुसरी समस्या म्हणजे अ‍ॅनिमिया आणि कॅल्शियमची कमतरता. अ‍ॅनिमिया आणि कॅल्शियमचा अभाव, हे महिलांमध्ये सर्रास आढळतात. रक्ताची कमतरता होऊन कधी थकवा येतो, त्यांना समजतदेखील नाही. कॅल्शियमच्या अभावामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे आजार, मानेचे दुखणे वाढते. दुखणे वाढल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेतला जातो; पण शरीर आजाराआधी संकेत देत असते. वेळीच त्याकडे लक्ष द्यायला हवे. रोजच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आहाराच्या माध्यमातून घेतली पाहिजे. महिलांनी गायीचे तूप आहारात वापरावे किंवा एक चमचा तूप सकाळी गरम पाण्यातून घ्यायला हरकत नाही. जेवणात वरून तूप न घेता तुपाची फोडणी दिलेली केव्हाही चांगले. सकस आहार आणि जोडीला व्यायाम असलाच पाहिजे. घरातील इतक्या कामांमुळे शरीराची हालचाल होत असते; पण खास असा व्यायाम करायला घडत नाही किंवा वेळ नसतो. तसे न करता दिवसभरात जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळेल, तेव्हा योगासने करणे, मेडिटेशन करणे, व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तणावमुक्त दिनचर्या ठेवणे, ही खूपच महत्त्वाची बाब आहे.

महिलांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी करायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फास्ट फूड बंद करायला हवे. सकाळी न्याहारी करून घ्यावी. नोकरी करणार्‍या महिलांनी तर नाश्ता अजिबात चुकवू नये. खजूर, अंजीर, केळी, द्राक्षे, डाळिंब, पेरू आणि सीझनेबल जी फळे उपलब्ध होतील, ती खावीत. बाजरीची भाकरी, नाचणी, सोयाबीन, चांगल्या प्रतीचे तांदूळ खावेत. हिरव्या भाज्यांचे सूप करून प्यावे, भाताची पेज, मुगाच्या डाळीची पेज करून प्यावी. यामुळे भूक शमते आणि जास्त अन्न खाण्याची गरज भासत नाही. शरीराला आवश्यक असणार्‍या सर्व भाज्यांचा समावेश आहारात महिलांनी करावा. फक्त दिवसा मांसाहार करावा. रात्रीचा मांसाहार टाळावा. शरीरात थोडा जरी बिघाड झाल्यास, लगेच डॉक्टरांकडे जावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध खावे. काहीवेळा मेडिकलमधून औषधे आणून आपण खातो; पण तसे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. आयुर्वेदिक औषधांचाही उत्तम आरोग्यासाठी फायदा होतो.

काही बिघाड झाल्यास लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा. आयुर्वेद या भारतीय वैद्यकाने सांगितलेली गर्भिणी परिचर्या त्या अवस्थेत अवश्य पाळावी, म्हणजे पुढील समस्याही टाळता येऊ शकतात. या सर्व बाबींचे योग्यरीतीने पालन करण्याचा निश्चिय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनी केल्यास त्यांना चांगले आरोग्य लाभेल. महिलांचे आरोग्य हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आरोग्याविषयी जागृती निर्माण करायला हवी. अनेक आरोग्य संस्था, एनजीओ यासाठी काम करताना दिसत आहेत.

Back to top button