शोध सुखाचा! : तथास्तू!

शोध सुखाचा! : तथास्तू!

माणसाचं विचारचक्र ही मोठी गमतीची गोष्ट आहे. दिवसभर माणूस कुठेही काहीही करत असो, त्याचं मन हे कृतीपेक्षा वेगळ्याच ठिकाणी हिंडत असतं. म्हणजे एखादी स्त्री समजा खूप गडबडीत आहे, तरीही तिचं मन त्याच कृतीत असेल असं नाही. ते काही तरी तिसराच विचार करत असतं किंवा कुणी तरी पुस्तक वाचतो आहे तर त्याच्या मनात पुस्तकाचे, त्यातील मजकुराचे विचार असतात; पण त्याहूनही काही तरी तिसरंच डोक्यात चालू असतं. बरं, मनाच्या वेगाला मर्यादाच नाही. ते क्षणात भूतकाळात रमतं, तर क्षणार्धात भविष्यकाळाच्या चिंतेत घुटमळतं. मध्येच वर्तमानाचं भान त्याला येतं. हे विचार म्हणजे एकप्रकारचं मंथन असतं. त्यात बरं-वाईट, जुनं-नवं असं बरंच काही असतं. त्यातून विविध अनुभवांतून त्याची स्वतःची 'बिलीफ सिस्टीम' तयार होत असते. ही 'बिलीफ सिस्टीम' म्हणजे विचारांच्या चक्रातून त्याचे त्याने काढलेले निष्कर्ष. हे निष्कर्ष कोण, कसा काढतो यावर बरंच काही अवलंबून असतं. जागरूक मन हे निष्कर्ष काढतं आणि सुप्त मनात ते सहज पोहोचतात. भुसभुसीत केलेल्या मातीत पाणी घातलं तर ते तळापर्यंत जातं, तसंच काहीसं हे घडतं. सुप्त मन खूप आज्ञाधारक असतं. ते असंच का, तसंच का, असले प्रश्न विचारत नाही. फक्त आज्ञा पाळायची इतकंच त्याचं काम.

एखादा कुशल संमोहन तज्ज्ञ जेव्हा एखाद्या व्यक्तीला संमोहित करतो, तेव्हा ती व्यक्ती ज्या आणि जशा आज्ञा करतील तसे वागतो, तेवढेच करतो. भोवतालच्या परिस्थितीची जाणीव त्याला राहत नाही. असेच काहीसे आपले सुप्त मन करत राहते. दिवसभर समाजात वावरताना रात्रीचा, झोपेचा काळा सोडला, तर पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे काही समोर येतं, त्या प्रत्येकावर माणसाचं मन विचार करतं. या सगळ्यांची मिळून एखादी प्रतिमा किंवा निरीक्षण तयार होतात. त्यावर विश्वास बसला की, ते थेट सुप्त मनात जातं ही प्रक्रिया सतत सुरू असते. तिथे जाणारे विचार जसे, ज्या पद्धतीचे असतील, तेच परिणाम घडवून आणत राहतात. त्यामुळं तिथे काय जाऊ द्यायचं, काय नाही, हे ठरवणं आपल्या हातात आहे.

आज आपले जे वय आहे, त्याकडे बघताना आयुष्यातल्या इतक्या वर्षांत सुप्त मनापर्यंत काय काय नको ते पोहोचवलंय, याचा एकदा प्रत्येकाने विचार करून बघा. मग नको त्या धारणा, समजुती रुजलेल्या आहेत, त्याचं काय करायचं, हा एक प्रश्न निश्चितच पडेल. त्याचं उत्तर आहेच. ते म्हणजे आधीच्या धारणा पुसून टाकून तिथे नवीन सुद़ृढ, सुसंवादी विचार रुजवणं शक्य असतं. त्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात. उदा., फरशीवर पडलेला काळा डाग वेळेवर स्वच्छ न केल्याने त्यात माती मिसळून अधिक गडद होतो. तो काढता येतो; पण त्यासाठी सतत प्रयत्न करून मग तो निघतो.

माणूस आज ज्या परिस्थितीत आहे तिथे त्याला बर्‍याच आघाड्यांवरच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. नोकरीची चिंता, आरोग्याच्या समस्या, मुलाबाळांचे प्रश्न, प्रॉपर्टी, नातेसंबंध यातून उद्भवणारे अवघड पेच, असं बंरच काही आजूबाजूला घडत असतं. त्यातून भीती, चिंता, तणाव यांची निर्मिती होते. वरवर माणूस आनंदी दिसत असला, तरी मनामध्ये असुरक्षितता, भीती, तणाव असतात; पण म्हणून त्याच त्या घातक विचारांच्या अधीन झालात, तर ते विचार सुप्त मनापर्यंत जाऊन कालांतराने तुमची भीती खर्‍यामध्ये परिवर्तित करतात. म्हणून सुप्त मनात दडलेलं प्रचंड सामर्थ्य ओळखा, प्रचंड हा शब्द खरोखरच कमी पडेल इतकं सामर्थ्य त्याच्यात असतं. फक्त ते वापरायचं कसं, ते आता पाहूया.

आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट नीट कळली असेल की, सुप्त मनात जे जाते आहे, ते योग्यच आणि आनंदी, आशावादी, सकारात्मक आहे, याची काळजी आपल्या जागरूक मनाने, म्हणजे आपणच घ्यायला हवी. एखाद्या जागरूक पहारेकर्‍यासारखे आपल्या विचारांवर आपले लक्ष हवे. चुकीच्या खोट्या गोष्टी सुप्त मनावर बिंबवल्या जाऊ नयेत यासाठी सावध राहायला हवे. योग्य त्याच सूचनांचे फर्मान सुप्त मनाकडे जायला हवे.

एखाद्या सूचनेमध्येही खूप मोठी ताकद असते. उदा., समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी पर्यटनाला गेलात. तिथे एखादा जुना किल्ला बघायला गेलात. तिथे एखाद्या ठिकाणी तुम्हाला तिथल्या कुणी तरी सांगितलं की, तिथे असलेल्या विहिरीजवळ जाऊ नका. गेलात तर पाण्यात पायर्‍या उतरून जाऊ नका. तिथे पूर्वी कुणी तरी जीव दिला आहे किंवा अशी काही तरी दंतकथा. तर तुमच्या अंगाला सूक्ष्म थरथर सुटेल, तोंडाला-घशाला कोरड पडल्यासारखं वाटेल आणि तुम्ही तिथे जायचं टाळाल. काही क्षण तुम्ही पूर्वी कधी तरी ऐकलेल्या अशा गोष्टींचे कनेक्शन जोडून भयभीत व्हाल. ही आहे त्या व्यक्तीच्या सूचनेची ताकद; पण जर तुम्ही जागरूक असाल, तर तुम्ही हसून ही गोष्ट सोडून द्याल. भूतखेतं, आख्यायिका या बर्‍याचदा माणसांनी पसरवलेल्या गोष्टी असतात, असं म्हणून ते विचार झटकून टाकाल.

त्यावेळी तुमच्या शरीराची स्थितीही सामान्य राहते. अर्थात, वरवर दुर्लक्ष केले असेल तर जेव्हा एकटे असाल तर तो प्रसंग, सूचना तुम्हाला पुन्हा आठवेल आणि तुमची धडधड वाढेल; पण पूर्ण आत्मविश्वासाने जर ही सूचना तुमच्या मनाने नाकारली असेल, तर त्या सूचनेचा असर संपून जातो. सूचनेच्या परिणामांवरून एक गोष्ट आठवली. एका स्त्रीच्या मुलाचं लग्न काही केल्या जमत नव्हतं. ती म्हणायची सतत, 'माझ्या मुलाचं लग्न एवढं होऊ दे!' तिच्या मैत्रिणीनं सांगितलं, 'अगं, नुसतं लग्न करायचंय म्हणून करू नको. वेळ लागू दे; पण मुलगी चांगली बघ, उद्या तिच्यावर तुझंही आयुष्य अवलंबून आहे ना!' असं म्हटलं की, ती म्हणायची, 'मला बघू दे, न बघू दे, नवर्‍याला चांगलं बघू दे; पण लग्न एवढं होऊ दे देवा!' असे संवाद वारंवार घडत.

तिनं मुलाच्या लग्नासाठी कंबर कसली होती. खूप प्रयत्नांनी अखेर लग्न झालं. ती खूश झाली. सगळं भरून पावल्यासारखं तिला वाटलं. काही महिन्यांनी तिची मैत्रीण तिला भेटली. म्हणाली, 'खूश आहेस ना आता? झालं एकदा लग्न. सुटलीस तू!' मग ती स्त्री म्हणाली, 'लग्न झालं, याचा आनंद झाला; पण टिकला नाही गं. सून मला जराही विचारत नाही. माझ्याशी धड बोलतसुद्धा नाही आणि मुलगाही तिचं ऐकतो. आता काय करू सांग. त्या दोघांना मी घरात नकोच आहे!' तिची मैत्रीण म्हणाली, 'मी तुला सांगत होते ना, चांगलं बोलावं, तूच सतत म्हणत होतीस, माझं काहीही होऊ दे; पण त्याचं लग्न होऊ दे. आता बघ!' तात्पर्य, त्या स्त्रीनं मुलाच्या लग्नाचा ध्यास घेताना स्वतःचा विचार करताना जे मनात पेरलं, तेच उगवलं. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे, 'नेहमी चांगलं बोला. वास्तू 'तथास्तू!" म्हणते.

तर मथितार्थ हाच आहे की, मनाला काय सूचना द्यायच्या हे जागरूक राहून आपल्याला जे हवंय ते स्पष्ट आणि चांगलं, विधायक तेवढंच बोलायचं आणि मनात राहू द्यायचं. बाकीचे विचार डिलिट करायचे. ते कसे करायचे, हे पुढच्या भागात पाहूया.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news