व्यक्‍तिविशेष : राजकारणाचा चेहरा बदलणारा नेता | पुढारी

व्यक्‍तिविशेष : राजकारणाचा चेहरा बदलणारा नेता

तरुण विजय, माजी खासदार

अडवाणी यांनी देशातील सार्वजनिक संवादाची दिशा आणि प्रवाह बदलण्यात यश मिळवले. हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्ष देशात सर्वांशी समन्वयाने राहू शकतो, असा विश्वास अडवाणी यांनी भारतीय जनतेच्या मनात निर्माण केला. हे अडवाणींचे सर्वात मोठे कर्तृत्व आणि योगदान आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ मिळणे हा सन्मानाचा ‘सन्मान’ आहे. अवघ्या दोन जागांवरून बहुमतापर्यंत झेप घेणार्‍या भाजपला रामभक्त सेनानी अडवाणी यांनी राष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अडवाणी यांनी देशातील सार्वजनिक संवादाची दिशा आणि प्र वाह बदलण्यात यश मिळवले. हिंदुत्वावर आधारित राजकीय पक्ष देशात सर्वांशी समन्वयाने राहू शकतो, असा विश्वास अडवाणी यांनी भारतीय जनतेच्या मनात निर्माण केला. हे अडवाणींचे सर्वात मोठे कर्तृत्व आणि योगदान आहे. अडवाणींच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेला आले तेव्हा त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव घोषित करून सबंध देशाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे सोमनाथ ते अयोध्या ही राहिली. या यात्रेमध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सतत साथ राहिली. सोमनाथ ते अयोध्या यात्रेचा रथ मुक्कामाच्या ठिकाणी रात्री नऊ वाजता पोहोचण्याचे नियोजन असताना प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, यामुळे मध्यरात्री पोहोचायचा. काही वेळा रात्री उशिरा एक ते दोन वाजता यात्रा पोहोचायची; पण तरीही हजारो नागरिक अडवाणी यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर असायचे. त्यांच्या रथाची यथासांग पूजा व्हायची. मला आठवतंय, त्यांच्या टोयोटाच्या रथाच्या टायरचीही पूजा होत असे. या यात्रेमुळे एकप्रकारे त्यांना हिंदू जनजागृतीचे अग्रदूत म्हणून ओळखले जाऊ लागले.

अडवाणी हे नेहमीच कार्यकर्त्यांत मिसळणारे आणि त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे नेते म्हणून ओळखले गेले. पक्ष संघटनेतही जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासमोर काही आव्हाने यायची, तेव्हा अडवाणी यांनी त्यांना खंबीर साथ दिली. नरेंद्र मोदी यांनीही अडवाणी यांच्याबद्दल नितांत आदर ठेवला. अडवाणींसोबत दीर्घकाळ काम करत असताना त्यांच्या संयमी, शांत आणि कधी कधी तापट स्वभावाचा अनुभवही घेतला आहे. त्यांनी सिंधू दर्शन कार्यक्रमाला सहकार्य आणि आशीर्वाद दिले. त्यामुळे लडाखच्या संस्कृतीचे संरक्षण झाले आणि तेथील आर्थिक विकासासाठी मोलाचा हातभार लागला.

लालकृष्ण अडवाणी हे मूलतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक. ‘भारतरत्न’ स्वीकारण्यास मान्यता देताना त्यांनी श्री गुरुजींच्या वाक्याचा संदर्भ दिला. ‘इदं न मम इदं राष्ट्राय स्वाहा’ असे म्हणत सर्वकाही देशाला अर्पण करण्याची भूमिका मांडली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा. म्हणूनच त्यांना एकात्म मानववादाचे व्याख्यातेदेखील म्हटले गेलेले आहे. ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकातील चित्रपट समीक्षक तसेच संपादक के. आर. मलकानी अमेरिकेत गेले असता त्यांचा कार्यभार सांभाळणार्‍या अडवाणी यांचे चित्रपटप्रेम सर्वश्रुत आहे. प्रत्येक चांगला चित्रपट पाहण्याबाबत ते आग्रही असत. विशेषतः, दिल्लीच्या महादेव मार्गावरील चित्रपटगृहात ते आवर्जून चित्रपट पाहत असत. त्यांच्यासमवेत मला अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. एकदा ते डेहराडूनला आले असता सुरक्षेची तमा न बाळगता आणि अरुंद गल्लीबोळाचा विचार न करता माझ्या आईला भेटण्यासाठी घरी आले. त्यामुळे संपूर्ण शहराला आश्चर्य वाटले. सुरक्षा कर्मचार्‍यांचीदेखील धांदल उडाली होती. त्या रात्री आम्ही सर्वांनी डेहराडूनच्या एका टॉकिजमध्ये चित्रपट पाहिला होता.

त्यांच्या जीवनात असंख्य वेदनादायी घटनादेखील घडल्या. अत्यंत कष्टप्रद जीवनातून त्यांना वाटचाल करावी लागली आहे. त्यामुळे कधी कधी ते खचलेले वाटायचे. परंतु, त्यांनी आपल्या वेदना, दु:ख कधीही व्यक्त केले नाहीत. अडवाणी हे पूर्णतः शाकाहारी असून, नियमांचे पक्के, खूपच कमी प्रमाणात आहार घेणारे आहेत. अनेकांना आश्चर्य वाटेल; पण त्यांना चॉकलेट भलते आवडते. वाचनाचा गाढा व्यासंग असणार्‍या अडवाणींकडे नवीन पुस्तकांचा अपरिमित संग्रह आहे. नवतंत्रज्ञानाच्या काळात त्यांनी लिहिलेले ब्लॉगही प्रचंड लोकप्रिय ठरले. त्यांच्या आत्मचरित्राच्या विक्रीने विक्रमही नोंदविला आहे. माझी आणि त्यांची पहिली भेट 1979 मध्ये ‘पांचजन्य’च्या मुलाखतीच्या निमित्ताने झाली. ‘पांचजन्य’च्या अनेक मुलाखतींचा संग्रह दिल्लीच्या ‘किताबघर’ने प्रकाशित केला आहे. ते खूपच हळवे आणि भावनाप्रधान आहेत. छोट्याशा भावुक गोष्टींसाठी त्यांच्या डोळ्यांत लगेच पाणी येते. अडवाणींनी कधीही आपल्या मुलाला राजकारणात येण्यासाठी आग्रह केला नाही. त्यांची मुलगी प्रतिभा ही त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे. पत्नी कमला अडवाणी या त्यांना ‘श्रीराम’ मानतात. त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच सबंध देशाला आनंद झाला आहे. अडवाणींना दीर्घायुष्य लाभो आणि ‘भारतरत्न’ रूपाने ते सदैव सर्वांना राष्ट्रीयत्वाची प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा.

Back to top button