शोध सुखाचा : आकर्षणाचा नियम

शोध सुखाचा : आकर्षणाचा नियम

मागच्या भागात आपण समजून घेतले की, माणसाची दोन मनं असतात किंवा मनाचे दोन भाग असतात. एक बाह्य किंवा जागरूक मन, दुसरे सुप्त किंवा अबोध मन. यांची कामे वेगवेगळी आहेत. एकजण आज्ञा देणारा असतो, तर दुसरा पाळणारा असतो. पाळणारा म्हणजे सुप्त मन. त्याचे स्वतःचे मत, बुद्धिरहित असते. फक्त आतपर्यंत पोहोचलेेले विचार किंवा आज्ञा पाळायच्या एवढेच ते करते.

आपण एक सोपे उदाहरण घेऊया. एखादा आर्किटेक्ट जेव्हा त्याला जी वास्तू बनवायची आहे, त्याचे कागदावर प्रथम रेखाटन करतो. ती वास्तू डिझाईन करताना अत्यंत बारीकसारीक मोजमापं, तपशील त्यानं लिहिलेले असतात आणि प्रत्यक्षात हे काम कोण करतं, तर एखादा इंजिनिअर आणि बांधकामाचं कंत्राट घेणारा आणि त्याचे सगळे मदतनीस. हे सगळे लोक आर्किटेक्टने बनवलेल्या प्लॅननुसार हुबेहूब काम करतात. हा अमुक एक त्रिकोण इथे का आहे, ही मोकळी जागा कशाची आहे, अशा प्रश्नांकडे ते लक्षही देत नाहीत. आराखड्याबरहुकूम वास्तू बनवणे, इतकेच त्यांचे काम असते. तसेच नेमके आपल्या मनाच्या वास्तूसंबंधी घडत असते. आपले बाह्य मन जे विचारी, संवेदनशील असते, ते ठरवते आणि सुप्त मन फक्त ते पूर्ण करते.

तुम्ही म्हणाल, इतकी सोपी थेअरी आहे, तर जगात सगळी माणसं सुखीच दिसायला हवीत; मग इतकं दुःख, दैन्य, संकटं का दिसताहेत? याचं उत्तर आहे ते म्हणजे माणसालाच त्याच्याकडे असलेल्या या गुरुकिल्लीचं खरं रहस्य किंवा योग्य पद्धत समजली नाही. अनेक विद्वान, शास्त्रज्ञ, बुद्धिमान लोक या पद्धतीला अनुसरून वागत असतात.

एखादा शास्त्रज्ञ काम करत असताना त्यातल्या एखाद्या ठिकाणी अडतो. त्याला त्याच्या समस्येचं उत्तर काही केल्या मिळत नाही. तो दिवस-रात्र या उत्तराच्या शोधात असतो. उत्तर मिळण्याच्या शक्यतेनं झपाटून काम करत असतो. तेव्हा त्याच्या सुप्त मनात ही गोष्ट पोहोचलेली असते आणि एक दिवस अचानक त्याला त्याचे उत्तर सापडते. निरंतर ध्यास घेऊन चांगल्या गोष्टीसाठी तीव्र इच्छा केली, तर ती पूर्ण होतेच. बुद्धिमान व्यक्ती 'मी हे उत्तर शोधणारच.' किंवा 'मला हे उत्तर मिळणारच,' असा संपूर्ण सकारात्मक विचार करतात. म्हणून त्यांना उत्तर मिळते.

सुप्त मनाची तुलना अशा जमिनीशी आपण करू शकतो, जिच्यात पेरेल ते उगवण्याची क्षमता असते; मग तुम्ही निवडुंग लावलात, तर तुम्हाला गुलाबाची फुले मिळणार नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीचे झाड लावाल, त्याला तशीच फळे मिळतात. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार केलात, तर चांगली फळे मिळणार आणि वाईट किंवा नकारात्मक गोष्टींचा विचार केला, तर आजूबाजूची परिस्थिती तशीच बनणार. बहुतेक सगळ्यांना मनाचे कायदे, नियम माहीत नसतात; पण संशोधक, कलावंत, गायक, लेखक यांना त्याची समज असते. कारण, एखाद्या गोष्टीसाठी झपाटून गेल्याशिवाय हव्या त्या गोष्टी मिळत नाहीत हे त्यांना समजलेलं असतं.

एक प्रख्यात गायक, ज्याने अनेक मैफली गाजवल्या, स्टेजवर वावरणे हा तर नेहमीचा सवयीचा विषय. अचानक एक दिवस त्याला स्टेजचीच भीती वाटायला लागली. या भीतीचा झटका इतका तीव्र होता की, त्याच्या अंगातले त्राणच निघून गेले. त्याच्या चेहर्‍यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. अगदी थोड्या वेळातच त्याला स्टेजवर गायला जायचे होते. त्याला वाटू लागलं की, 'मी आता गाऊ शकणार नाही. सगळे लोक मला हसतील. माझी टर उडवतील. माझी फजिती होईल.' या विचारांनी तो अगदी गर्भगळीत होऊन गेला; मग त्याच्या लक्षात आलं की, इथे मनावर ताबा मिळवणं गरजेचं आहे; मग त्याने ताडकन् सगळे नकोसे विचार बाजूला सारले. तो एकटाच आरशासमोर उभा राहिला आणि आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघून जोरात ओरडला. 'चालते व्हा! मला कुणीही घाबरवू शकत नाही. मी उत्तम गाणार आहे. लोक माझ्या परफॉर्मन्सची वाट बघताहेत.' तो गायक स्वतःच्या मनातल्या नकारात्मक विचारांना हद्दपार करत होता. मनावर योग्य तो ताबा मिळवल्यावर तो आत्मविश्वासाने स्टेजवर गेला आणि नेहमीसारखे उत्तम गायला; मग टाळ्यांचा कडकडाट झाला.
या गायकाला आपल्या मनाला कसं वळवता येतं याची पद्धत ठाऊक होती. त्यानुसार त्याने त्याक्षणी त्याला सुचेल त्या पद्धतीने स्वतःला सावरले.

आपले जागरूक मन शहाणे असते. त्याला सगळे कळते हे जरी खरे असले, तरी बाहेर घडणार्‍या घटनांमुळे किंवा अचानक आलेल्या संकटाने गर्भगळीत होऊ शकते, तेव्हाच जहाजाच्या कॅप्टनसारखे प्रसंगावधान राखून त्याला योग्य आज्ञा द्याव्या लागतात.

एखाद्या सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांवर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केले, तर त्या विचारांनुसार तुम्हाला सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव येतात. हा विश्वास म्हणजेच 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन.'

एक साठीच्या आसपास वयाची स्त्री, जिच्या पतीचे निधन झाल्याने एकटीच राहत होती. तिला पुढे कुणाच्या तरी सोबतीची, सहचराची गरज वाटू लागली. तिला 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन' या सिद्धांताची माहिती होती. सतत मनाला सांगणे, विश्वास आणि अपेक्षा यांच्याद्वारे सुप्त मनापर्यंत पोहोचता येतं आणि हवं ते मिळतं, हे तिला ठाऊक होतं; मग तिनं मनाशी अशी भावना बाळगली की, एका प्रेमळ, सुसंस्कृत उत्साही माणसाशी आपले लग्न झालेय आणि आपण आनंदात आहोत. हा विचार तिने निःशंक मनाने स्वीकारला. बरेच दिवस ती हा विचार वेळ मिळेल तेव्हा करत राहायची. एक दिवस जवळच असणार्‍या मेडिकलचे मालक तिच्या संपर्कात आले. औषधांच्या निमित्ताने झालेली ओळख पुढे इतकी छान वाढली की, त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले आणि लग्न करून ती आनंदात राहू लागली.

आपली प्रार्थना खरी आहे, हे जेव्हा पटून तिच्या अंतर्मनापर्यंत पोहोचले, तिथे रुजले आणि 'लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन'नुसार तिच्या सुप्त मनाने त्याचे परिणाम दाखवून दिले. म्हणून 'अमुक एक गोष्ट मला परवडण्यासारखी नाही,' किंवा 'मी हे करू शकत नाही,' असे कधीही म्हणू नका. 'मला कुठले एवढे पैसे मिळायला? आम्ही असेच राहणार जन्मभर गरीब!' असे काही जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुमचं भविष्य तुम्हीच लिहीत असता.

एखादी पॉझिटिव्ह गोष्ट जेव्हा मनाशी ठरवाल तेव्हा लगेच तुमचे मन ती गोष्ट करण्यासंबंधीचे आराखडे मनात रेखाटू लागते; मग नकळत एक ऊर्जा निर्माण होते. तो विचार जेवढा प्रभावी असेल तेव्हा ऊर्जेचा प्रवाहही जोरकस असतो. तो छोट्या छोट्या अडथळ्यांना भीत नाही आणि शेवटी हवे ते घडवून आणतो. हे तुम्हीही अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून अनुभवले असेलच. म्हणून या अत्यंत उपयोगी अशा 'आकर्षणाच्या नियमा'ला कधीही विसरू नका. अंतर देऊ नका. तोच तुम्हाला सुखाच्या वाटेवर नेईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news