संशोधन : आता लक्ष्य रामसेतू | पुढारी

संशोधन : आता लक्ष्य रामसेतू

प्रा. विजया पंडित

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामसेतू बांधला गेलेल्या तामिळनाडूतील अरिचल मुनाई येथे पोहोचले. रामसेतूबाबत अनेक मतमतांतरे आहेत. हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक, असा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. शतकानुशतके या पुलाच्या अस्तित्वाला आणि वानरसैन्याने केलेल्या बांधकामाला हिंदू धर्मियांमध्ये मान्यता आहे; पण पूल केवळ एक मिथक आहे, असा दुसरा मतप्रवाह आहे. हा पूल मानवनिर्मित आहे हे सिद्ध करण्यासाठी देशात अनेक प्रयत्न झाले, परंतु त्यापैकी बहुतेकांना मान्यता मिळाली नाही. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर आणि राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर आता येणार्‍या काळात रामसेतूशी संबंधित गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आध्यात्मिक प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या अरिचल मुनाईला भेट दिली. अरिचल मुनाई हे नाव अनेकांना ठाऊक असेल. कारण याच ठिकाणी रामसेतूची उभारणी झाली, असे पौराणिक संदर्भातून दिसून आले आहे. प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी रामसेतूला भेट देण्यामागे आगामी काळात मोदी सरकार या सांस्कृतिक वारशाची पुनर्रचना करणार असल्याचे आणि त्याला वैधानिक अधिमान्यता मिळण्यासाठी वैज्ञानिक संदर्भांची उकल करणार असल्याचे प्रतीत होते. रामसेतू खरोखरच अस्तित्वात होता का, याबाबतचे गूढ आजही भारतीय समाजात आहे.

रामायणातील उल्लेखाप्रमाणे रावणाच्या लंकेला जाताना वानरसेनेने या सेतूची उभारणी केली होती. तमिळनाडूच्या पंबन बेटाला श्रीलंकेच्या मन्नार बेटाशी जोडणारा हा आराखडा रामायण काळापासून असल्याचे सांगितले जाते; पण हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. इसवी सनपूर्व पाच हजार वर्षांपूर्वीचा रामायणाचा काळ आणि रामसेतूच्या शास्त्रीय विश्लेषणात एक साम्य दिसून येते. यानुसार 15 व्या शतकात 48 किलोमीटर लांबीचा हा पूल पायी चालत पार करता येत होता. काही पुराव्यांनुसार 1480 पर्यंत हा पूल समुद्रावर होता. तथापि, यानंतरचे संशोधन उपलब्ध नाही.

रामसेतूवरून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या एका प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला. ‘सेतुसमुद्रम’ नामक या प्रकल्पांतर्गत रामसेतूच्या चहूबाजूंनी खोदकाम करण्याचा प्रस्ताव होता. या आधारे तेथून मोठ्या जहाजांची वाहतूक करता येईल, असा उद्देश होता; पण यास आक्षेप घेतल्यानंतर हा प्रकल्प थांबविण्यात आला. 2021 मध्ये विद्यमान केंद्र सरकारने रामसेतूच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी एका संशोधन प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागानुसार (एएसआय) केंद्रीय सल्लागार मंडळाने सादर केला होता. याप्रमाणे ‘सीएसआयआर’ आणि ‘एनआयओ’ला याचा शोध घ्यायचा होता. या प्रकल्पाचा उद्देश रामसेतूच्या रूपातून भारत आणि श्रीलंका यांच्यातील दगडी पुलाचे बांधकाम कधी आणि कशारीतीने केले गेले, याचा अभ्यास करण्याचा होता. सध्या भूशास्त्रीय काळाचा अभ्यास करण्यासाठी आणि अन्य पर्यावरणीय आकडेमोड करण्यासाठी अनेक शास्त्रीय प्रयोग केले जात आहेत. प्रामुख्याने कॅल्शियम कॉर्बोनेटच्या अभ्यासातून आराखडा निर्मितीचा काळ शोधून काढला जात आहे.

या प्रकल्पाला राजकीय, धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व अधिक आहे. धार्मिक ग्रंथांनुसार लंकेत जाण्यासाठी श्रीरामाच्या सैन्याला समुद्रावर 100 योजन (त्या काळातील मोजण्याचे माप) लांब आणि 10 योजन (एक योजन म्हणजे 8 कि.मी.) रुंद पूल बांधावा लागला. नल आणि नीलसह हजारो वानरांच्या सेनेने पहिल्या दिवशी 14 योजन, दुसर्‍या दिवशी 20 योजन, तिसर्‍या दिवशी 21 योजन, चौथ्या दिवशी 22 योजन आणि पाचव्या दिवशी 23 योजनवर दगडफेक केली. अशा प्रकारे पाच दिवसांत 100 योजनचे काम पूर्ण झाले. आजच्या काळातील मोजणीनुसार रामसेतूची लांबी 1000 कि.मी.पेक्षा जास्त होती.

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पुलाचा आकार फक्त 48 किलोमीटर शिल्लक आहे, असाही एक तर्क आहे. चुनखडीच्या दगडांना जोडत 48 किलोमीटरपर्यंत उभारलेल्या या साखळीला नैसर्गिक निर्मिती न मानता, रामसेतू म्हटले जात. यामागचा दावा म्हणजे हा पूल मानवनिर्मित आहे. अर्थात 2007 मध्ये ‘एएसआय’ने याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले होते; पण या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले शपथपत्र नंतरच्या काळात मागे घेतले. आजही पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ यांच्यात रामायण काळातील रामसेतूवरून मतमतांतरे असून, काही वादविवाद सुरू आहेत. रामसेतू आणि त्याच्या सभोवतालच्या पाण्याखालच्या भागाचा पुरातत्त्व निकषानुसार अभ्यास करत त्याचा उद्देश शोधणे आणि वादविवाद निष्कर्षाप्रत आणणे, हा केंद्र सरकारच्या प्रकल्पाचा हेतू आहे.

वास्तविक ‘एएसआय’च मुळात रामसेतूवरून संभ्रमावस्थेत राहिली आहे. या सेतूवरून अनेक प्रश्न नागरिकांबरोबरच शास्त्रज्ञांच्या मनात आहेत. 2007 मध्ये अमेरिकेतील एका सायन्स वाहिनीवर एका कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. त्यात अमेरिकी भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा दाखला देत भारताच्या रामेश्वरमच्या पंबन बेटावरून श्रीलंकेच्या मन्नार बेटादरम्यान पुलासारखा दिसणारा आराखडा हा मानवाने तयार केलेला आहे, असे सांगितले गेले. रामसेतूला आदम (अ‍ॅडम) ब्रिज असेही म्हटले जाते. धार्मिक घटनांचा उल्लेख केला, तर रामसेतूचा उल्लेख तुलसीकृत रामचरित मानस आणि वाल्मीकी रामायण या दोन्हींमध्येही आहे. रामायण काळात वानरसेनेने लंकेला जाण्यासाठी रामसेतूची निर्मिती केली, अशा हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा आहेत. परंतु, आणखी एक बाजू आहे आणि ती म्हणजे सेतू हे केवळ मिथक आहे.

वास्तविक हा पूल दंतकथा असल्याचा दावा अमेरिकी अंतरिक्ष संशोधन केंद्राने खोडून काढला आहे. आणखी एक दावा म्हणजे 14 डिसेंबर 1966 रोजी ‘नासा’चा उपग्रह जेमिनी-11 ने अवकाशातून एक चित्र टिपले होते. त्यात समुद्रात या ठिकाणी पुलासारखा एक आराखडा दिसतो. हे चित्र टिपल्यानंतर 22 वर्षांनंतर 1988 मध्ये आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकार्नेदेखील रामेश्वरम अणि श्रीलंकेच्या जाफना बेटादरम्यान समुद्रात या आराखड्याचा शोध लावला आणि छायाचित्र टिपले होते.

भारतीय उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांत धनुष्यकोडीकडून जाफनापर्यंत नजर फिरविली, तर एक बारीक रेष दिसते आणि तेथे पूल असल्याचे लक्षात येते. अर्थात, या चित्रांचे विश्लेषण केल्यानंतर ‘नासा’ने या छायाचित्रावरून तो सेतू मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होत नाही, असे स्पष्ट केले. परंतु, ‘नासा’च्या शास्त्रज्ञांच्यामते सॅटेलाईटने घेतलेला हा फोटो खरा आहे. भारत-श्रीलंकेच्या दरम्यान असलेले हे गूढ स्पॉट एका पुलाचेच अवशेष आहेत. समुद्रावर दिसणार्‍या त्या रेषेखाली दगड आहेत. ते दगड सात हजार वर्षे जुने आहेत; तर त्यावर जमलेली माती चार हजार वर्षे जुनी आहे. हा पाण्याखाली असलेला पूल मानवनिर्मित असल्याचा दावा काही संशोधकांनी केला आहे.

वाल्मीकी रामायणात असा उल्लेख आहे, की ‘तीन दिवस शोध घेतल्यानंतर प्रभू श्रीरामांना रामेश्वरममध्ये पूल बांधण्यासाठी समुद्रात एक जागा मिळाली, जिथून श्रीलंकेला सहज जाता येणे शक्य होते. त्यानंतर नल आणि नील यांच्या मदतीने त्या ठिकाणाहून लंकेपर्यंत पूल बांधण्यास सुरुवात झाली. वास्तविक, धनुष्यकोडी हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील एकमेव ठिकाण आहे, जिथे समुद्राची खोली नदीएवढी आहे. धनुष्यकोडी हे भारतातील तामिळनाडूच्या पूर्व किनार्‍यावरील रामेश्वर बेटाच्या दक्षिणेकडील किनार्‍यावरील एक गाव आहे. ते पंबनच्या आग्नेयेला आहे.

धनुष्यकोडी हे श्रीलंकेतील तलाईमन्नारच्या पश्चिमेला सुमारे 18 मैलांवर आहे. येथून श्रीलंकेपर्यंत वानरसैन्यानं बांधलेल्या पुलाचा आकार धनुष्यासारखा आहे, म्हणून या गावाला धनुष्यकोडी म्हणून ओळखले जाते. पूल बनवताना उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे अनेक पुरावे वाल्मीकी रामायणात आहेत. काही वानरांनी मोठमोठे दगड समुद्रकिनार्‍यावर आणले होते. काही वानरांनी पूल बांधण्यासाठी लांब सूत धरले होते. पुलाच्या बांधकामात या धाग्याचा अनेक प्रकारे वापर होत होता. कालिदासांनी ‘रघुवंश’च्या 13 व्या वाक्यात रामाच्या आकाशमार्गातून परत येण्याचे वर्णन केले आहे. यामध्ये श्रीरामांनी माता सीतेला रामसेतूबद्दल सांगितल्याचे वर्णन आहे. स्कंद पुराणातील तिसरे, विष्णू पुराणातील चौथे प्रकरण तसंच अग्नि पुराणातील पाचवे ते अकरावे प्रकरण आणि ब्रह्म पुराणातही श्रीरामाच्या सेतूचा उल्लेख आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत झालेल्या चर्चेत रामसेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्याप सापडले नाहीत, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. त्याचवेळी सरकार यावर सातत्याने काम करत आहे, असेही केंद्राकडून सांगण्यात आले. काही वर्षांपूर्वी ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ने समुद्राचा अभ्यास करत रामसेतूचे गूढ उकलले जाईल, असे जाहीर केले होते. या संस्थेकडून नोव्हेंबर 2017 रोजी अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र, त्याचे काम सुरूच झाले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर ‘एएसआय’ने आता याबाबत विडा उचलला आहे आणि अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणाला भेट दिली आहे. त्यावरून येणार्‍या भविष्यात रामसेतूबाबतचे गूढ उकलले जाईल, असे दिसते. रामसेतूच्या पौराणिक संदर्भांना शास्त्रीय पुष्टी मिळाल्यास रामायण हे केवळ महाकाव्य आहे, ही मांडणी पूर्णतः पुसली जाणार आहे. त्यादृष्टीने या संशोधनाला गती देणे आवश्यक आहे.

Back to top button