भारत ‘अयोध्या’ होवो! | पुढारी

भारत ‘अयोध्या’ होवो!

प्रसन्न जोशी

श्रीराम जन्मभूमी असलेली नगरी म्हणजे अयोध्या. अयोध्या म्हणजे जिथं युद्ध होत नाही, युद्ध केलं जात नाही. त्याहून पुढे जाऊन म्हणायचं तर रघुवंशाचा वारसा चालवणार्‍या, चक्रवर्ती सम्राट दशरथाचं जिथं राज्य होतं, साक्षात विष्णू अवतारी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा तेजस्वी, सामर्थ्यवान राजपुत्रांचं जिथं वास्तव्य होतं, त्या अयोध्येला तमा कुणाची? त्यामुळे, अशा सामर्थ्यवान नगरीला युद्ध करण्याची आवश्यकताच ती काय? म्हणूनच ती अयोध्या… म्हणूनच ती अवध्य.. अवध! वाल्मीकी रामायणातील बालकाण्डात अयोध्येचं सविस्तर वर्णन येतं. कौशल जानपदाची राजधानी असलेली अयोध्या 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद होती (एक योजन = 12 किलोमीटर). शरयू नदीच्या तटावर वसलेली ही नगरी विशाल आणि सुंदर होती. प्रशस्त रस्ते, भव्य महाल आणि डेरेदार वृक्षराजी, उद्याने यांनी ही नगरी सजली होती, असं वर्णन महर्षी वाल्मीकी करतात. मात्र, काळाच्या प्रचंड प्रवाहात अयोध्यानगरीचं भव्य-दिव्य स्वरूप लोप पावलं आणि उरलं ते तिथल्या वैभवाची, रघुवंशाची, रामराज्याची आणि रामलल्लाची महती गाणारं राम मंदिर. हे राम मंदिरही अनेक स्थित्यंतरातून गेलं.

496 वर्षांपूर्वी इथं मुघल शासक बाबराचा सेनापती मीर बाकीनं हेच मंदिर पाडून इथं बाबरी मशीद बांधली, असं मानलं गेलं. या सुमारे 500 वर्षांत भारतानं मुघल सत्तेचा अंत, ब्रिटीश साम्राज्याचं स्थिरावणं आणि अखेर 1947 साली फाळणी आणि देशाचं स्वातंत्र्य पाहिलं. 15 ऑगस्ट 1947 या तारखेनं भारताची ओळख स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश वसाहत ते स्वातंत्र्योत्तर सार्वभौम प्रजासत्ताक अशी केली. ही विभागणी काळाची आणि भूगोलाचीही झाली. मात्र, इतिहास अशा तारखांनी विभागता येत नाही. त्याचा सलग प्रवाह अखंडपणे गतकाळातील घटना, वास्तू, वारसा, लोकस्मृती यातून कायम राहतो.

नव्या भारताला या भल्या-बुर्‍या सगळ्याच इतिहासाच्या वारशातून नवी रचना, नवी यंत्रणा, नवे कायदे आणि नवा देश घडवायचा होता. मात्र, इतिहासात कधीकाळी बसलेल्या गाठी या नव्या भारतातही सुटल्या नाहीत. अयोध्या, बाबरी मशीद आणि राम मंदिर ही अशीच एक गाठ होती. राम मंदिर म्हटलं की 1990 चं दशक, कारसेवा, 1992ला पाडलेली बाबरी मशीद, नंतरचे दंगे हेच आठवू शकतं. मात्र, राम मंदिराचा प्रश्न बाबरी निर्माणानंतरही लोकमानसात रुतला होता, हे आजही अयोध्येत गेल्यावर कळतं. याच्या नोंदीही आहेत.

जुने जाणते सांगत की, बाबरीच्या ठिकाणीच राम मंदिर असल्याची अयोध्यावासीयांची नेहमीच श्रद्धा होती. अनेकांकडे घरातलं मंदिर, रामाची मूर्ती ही त्याच दिशेला तोंड करून ठेवली जाई. 19व्या शतकात ब्रिटीश आमदनीतही बाबरीच्या जागेवरील हक्कासाठी कोर्ट-कज्जे झाल्याचे दाखले आहेत. त्याही आधी मुस्लिम शासकांच्या काळात, मराठेही उत्तरेकडील हिंदू तीर्थक्षेत्र आपल्याकडे कायमस्वरूपी आणण्यासाठी प्रयत्न करत होते, असे संदर्भ आहेत. स्वातंत्र्यानंतर अगदी पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनाही बाबरी मशिदीत राम मूर्ती ठेवल्याच्या प्रकरणाला तोंड द्यावे लागले होते. तिथपासून ते शाहबानो प्रकरणानंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना तिथं टाळं उघडून पूजेला अनुमती देईपर्यंत अयोध्या आणि राम मंदिर हे प्रश्न धगधगते होतेच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ (नंतर भाजप), विश्व हिंदू परिषद, शिवसेना यांनी हा मुद्दा लावून धरलेला असतानाच काँग्रेसकडूनही तोडग्याचे प्रयत्न होत होते.

काशी, मथुरा, अयोध्या येथील धर्मस्थळे मुस्लिम समुदायाने हिंदूंना आपणहून सोपवावीत हा सामोपचार अयोध्येबाबतही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, 90च्या दशकाच्या सांध्यावर हिंदुत्वाच्या राजकारणानं जोर पकडला आणि बाबरी मशीद पाडण्यात त्याची परिणती झाली. एक संदर्भ म्हणून पाहायचं तर 1988, 89, 90, 91, 92 या पाच वर्षांत जगभर अशा उलथापालथी होत होत्या. पूर्व-पश्चिम जर्मनीची भिंत पाडली जाणं, सोव्हिएत रशिया कोसळणं, 1991ला भारतानं नवी आर्थिक रचना स्वीकारणं या त्या घटना होत. भारतात ओबीसींना आरक्षण देणारा मंडल आयोग येत होता आणि याच काळात हिंदू अस्मितेचं राजकारण आकार घेत होतं. याच राजकीय पर्वाला ‘मंडल वि. कमंडल पर्व’ असंही म्हटलं गेलं. बाबरी पाडली गेली तरी राम मंदिर द़ृष्टिक्षेपात नव्हतंच. पुढं तीन दशकांमध्ये सत्र न्यायालय, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात खुद्द ‘रामलल्ला विराजमान’ अशा प्रकारे साक्षात रामालाही न्यायालयात जाऊन बाजू मांडावी लागली आणि या ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. बाबरीच्या जागी मंदिर आणि मशिदीला स्वतंत्र जागा असा निवाडा मिळाला आणि एका दीर्घकाळ चाललेल्या वादाचा, खटल्याचा, संघर्षाचा समारोप झाला. एक पर्व संपलं.

…आणि अयोध्या! : आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं आहे. कोणत्याही देशात तिथल्या धर्माची पूजा-प्रार्थनास्थळं नसतील, इतक्या संख्येनं मंदिरं भारतात असतील. मात्र, अयोध्येचं हे एकमेव मंदिर राष्ट्रमंदिर म्हणविण्याइतकं महत्त्वाचं ठरतंय. त्यामागे हे मंदिर प्रभू श्रीरामाचं असणं, अयोध्येत असणं, सुमारे 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, संघर्षानंतर ते अस्तित्वात येणं ही कारणं तर आहेतच. मात्र, ज्या स्वरूपात हे मंदिर प्रत्यक्षात येतंय, देशात या मंदिराभोवती भावनांच्या ज्या लाटा तयार होतायत, मंदिर निर्मितीपासून ते विविध विधींसाठी आमंत्रित जे समाज समुदाय प्रतिनिधी येतायत, अशा सर्व कारणांमुळे या मंदिराचं राष्ट्रव्यापी वलय सिद्ध होतं. या मंदिराला घडवणं हे जसं कलेचं, स्थापत्यशास्त्राचं काम होतं, तसंच ते अभियांत्रिकी आव्हानही होतं. या बाबतीतही या देशाचं ‘अखिल भारतीयत्व’ पुन्हा दिसून येतं.

कारण मंदिर बांधकामाशी संबंधित अनेक तांत्रिक बाजूंचा अभ्यास, दोष निर्मूलन आणि उपाययोजना करण्यासाठी देशभरातील ‘आयआयटी’ आणि अन्य राष्ट्रीय संशोधन संस्थांनी योगदान दिलंय. राम आणि अयोध्या दोन्ही उत्तरेत असल्यानं अनेकदा या सगळ्याला ‘उत्तरेकडच्याचं’ असंही तिरक्या नजरेनं पाहिलं गेलं. मात्र, मंदिर न्यासानं प्राणप्रतिष्ठेच्या विविध विधींसाठी आमंत्रित केलेल्या मान्यवर आचार्य, पंडित यांची यादी पाहिली तरी यात उत्तर-दक्षिण समन्वय साधलेला दिसतो. भारतीय अध्यात्म परंपरेच्या सर्व शाखांचे, धर्मांचे, संप्रदाय, मठांचे, परंपरांचे आचार्य, संत, महंत, श्रीमंहत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर, मठाधीपती; आदिवासी, गिरीवासी, तटवासी, द्वीपवासी अशा जनजातीयांच्या प्रार्थना विधींचे प्रमुख यांची उपस्थिती या सोहळ्याला लाभतेय.

भारतीय संस्कृती परंपरेतील शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, पत्य, शीख, बौद्ध, जैन, दशनाम शंकर, रामानंद, रामानुज, निंबार्क, मध्व, विष्णू नामी, रामस्नेही, घिसापंथ, गरीबदासी, गौडिया, कबीरपंथी, वाल्मिकी, शंकरदेव, माधव देव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम संघ, गायत्री परिवार, अनुकूल चंद्र, ठाकूर परंपरा, महिमा समाज-ओडिशा, अकाली, निरंकारी, नामधारी, राधास्वामी, स्वामीनारायण, वारकरी, वीर शैव अशा घटक समुदायांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रण होतं. हे संदर्भ यासाठी कारण गेल्या अनेक वर्षांत राष्ट्रीय कार्यक्रम अनेक झाले असले तरी राष्ट्राच्या भौगोलिक आणि सामाजिक परिघातील लोकांना सहभागी करून घेणारा लोकसभा निवडणुकीनंतरचा मोठा ‘उत्सव’ कदाचित हा राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळाच ठरेल.

मात्र, राम मंदिर म्हणजे या प्रचंड मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाचा समारोप नसून श्री गणेशा आहे, असं जे म्हटलंं जातंय, ते खरंच आहे. याचीच प्रचिती अयोध्या नगरीच्या बदलत्या रूपानं येते. 5-10 वर्षांपूर्वी कुणी अयोध्या पाहिली असेल, तर आता तिचा कायाकल्प होतोय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्या शरयूच्या तीरी अयोध्या नगरी वसली आहे, त्या शरयूच्या ‘राम की पैडी’चा भाग विस्तारित, सुशोभित करण्यात आलाय. तिथे एका भव्य पडद्यावर रोज रामायण कथेचं संक्षिप्त रूप लेझर शोद्वारे दाखवलं जातं. नदीचा स्वच्छ प्रवाह शहराच्या मुख्य भागातून वाहतो. शरयू घाटावर रोज संध्याकाळी सहाच्या सुमारास नदीची आरती होते.

रामकथा पार्ककडे जाणार्‍या चौकात स्व. लता मंगेशकरांनी गायलेल्या रामावरील गाणी, भजनांची स्मृती म्हणून उभारलेला वीणा चौक, दुतर्फा इमारती, वास्तूंना केलेली रंगरंगोटी, स्वच्छतागृहे, राम मंदिराकडे जाणारा प्रशस्त कॉरिडॉर ही तर काही निवडक उदाहरणे. अयोध्या यापलीकडेही बदलते आहे. अयोध्यावासीयांनाच नव्हे, तर उत्तर प्रदेशवासीयांनाही हा प्रदेश देशाची आध्यात्मिक राजधानी बनतोय, याची जाणीव होतेय. या एकाच प्रदेशात काशी, मथुरा आणि अयोध्या आहे. शिवाय बौद्ध, जैन तीर्थक्षेत्रे वेगळीच. या सगळ्याचं एक मोठं पर्यटन क्षेत्र इथे विकसित होतेय.

आज भारत सामर्थ्याच्या नव्या जाणिवेसह जागतिक सत्ता म्हणून उदयास येतोय. गतेतिहासाच्या कटू घटनांचं सावट हा नवा भारत झुगारून देतोय. अयोध्येत पूर्णत्वास गेलेलं राम मंदिर हा याद़ृष्टीनं राष्ट्रासाठीचा आशीर्वाद ठरावा. संघ-भाजप-विहिंप यांची एकेकाळी घोषणा होती – ‘राम मंदिर से शुरू होगा राष्ट्रनिर्माण’. यातील पक्षीय अभिनिवेशाचा भाग सोडता आता खरोखरच या देशानं साने गुरुजी म्हणत तशा ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो…’ या संकल्पासाठी कटिबद्ध व्हावं.
रामरायाचा वरदहस्त सर्वांवर आहेच! आता भारतात धर्मयुद्ध नकोत, संघर्ष नकोत… त्या अर्थानं नवा भारत ‘अयोध्या’ व्हावा!
(लेखक ‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीचे वृत्त संपादक आहेत.)

विकासाचं ‘अयोध्या मॉडेल’

आजच अयोध्येत मोठ्या प्रमाणात नवी हॉटेल, निवासी संकुले यांच्यासाठी जमिनीचे व्यवहार होतायत. त्यातच अयोध्येला मिळालेला महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अयोध्याधाम रेल्वे जंक्शन यामुळे ही नगरी थेट देशाच्या आणि जगाच्या वाहतूक नकाशाशी जोडली गेलीये. 2017 मध्ये जिथं फक्त 2.84 लाख पर्यटक आले, त्याच अयोध्येत गेल्या वर्षअखेर सुमारे 2 कोटी 40 लाख पर्यटकांनी भेट दिली… राम मंदिर बनलेलं नसताना! मग, आपण कल्पना करू शकतो की, अयोध्येचा आगामी काळात किती मोठा आर्थिक विकास संभवतो. इथं जगभरातून आणि खासकरून भारतभरातून येणार्‍या पर्यटकांना एक जुन्या नगरीच्या परिवर्तनाचं एक मॉडेल म्हणून अयोध्या दिसणार आहे. भारतातील अनेक जुनी शहरे, नगरं ही देवस्थानंही आहेत. त्यामुळे विकासाचं हे ‘अयोध्या मॉडेल’ ठरेल हे नक्की. मात्र, या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर हे आगामी काळात हिंदू समाजासाठी अनिवार्य धार्मिक कर्तव्य ठरू शकेल. कदाचित आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाणं, हे हिंदूंचं कर्तव्य ठरेल. त्याद़ृष्टीने पाहता जसं ख्रिश्चनांसाठी जेरुसलेम, व्हॅटिकन; मुस्लिमांसाठी मक्का तसंच हिंदूंसाठी अयोध्या ठरल्यास आश्चर्य नाही.

अनेक राज्यांचे योगदान

मंदिराची रचनाच भारताच्या अनेक प्रदेशांच्या योगदानातून साकारली आहे. मंदिरासाठी वापरण्यात आलेला दगड हा राजस्थानातील बन्सी पहाडपूरचा आहे. मंदिराभोवतीचा प्राकार सहसा उत्तरेत न आढळणार्‍या दाक्षिणात्य मंदिर स्थापत्य शैलीतला आहे. मंदिर परिसरात सूर्य, शंकर, भगवती, गणेश आणि विष्णू यांची मंदिरे ही शंकराचार्यांच्या संंकल्पनेतील ‘पंचायतन’ संकल्पना साकारतात. मारुती, माता अन्नपूर्णा, शबरी, अहिल्या, महर्षी वाल्मीकी, वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज ही मंदिरे म्हणजे संपूर्ण रामायणात उत्तर ते दक्षिण अशा भारतीय भूगोलातील पूजनीय व्यक्तिमत्त्वांना स्थान आहे. इथल्या कुबेर टिला इथं जटायूची मूर्ती उभारण्यात आलीय. मुख्य म्हणजे कर्नाटकमधील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी नेल्लिकेरी दगडातून साकारलेली रामलल्लाची मूर्ती मंदिरातील गर्भगृहात विराजमान असेल.

Back to top button