स्‍मरण : अयोध्या : 6 डिसेंबर 1992

स्‍मरण : अयोध्या : 6 डिसेंबर 1992

दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटे झाली आणि शतकानुशतके हिंदूंनी ज्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला, ती घटना घडली! बाबरीच्या तीनपैकी पहिला घुमट कोसळला. चार वाजता दुसरा घुमट खाली आला. शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक गुलामगिरीचे एकेक अवशेष कारसेवकांकडून उद्ध्वस्त केले जात होते. हे होत असताना अनेक कारसेवक जखमी झाले. त्यांना उचलून बाजूला केले जाऊन पुढची तुकडी त्यांची जागा घेत होती. काम बंद होऊ नये, याची खबरदारी घेतली जात होती. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा सुरू होत्या. बरोबर साडेचार वाजता मधला घुमट कोसळला आणि लाखो कारसेवक आनंदाने नाचू लागले. रामनामाचा जल्लोष आता टिपेला पोहोचला होता…

अयोध्येतल्या बाबरी मशिदीच्या घटनेला नुकतीच तीस वर्षे पूर्ण झाली. 6 डिसेंबर 1992 हा दिवस केवळ भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा ठरला. बाबरी पतनाने जगाच्या राजकीय नकाशाची मुस्लिम आणि गैरमुस्लिम अशी फाळणी झाली. दरम्यानच्या काळात अयोध्येच्या शरयूसह थेट अमेरिकेच्या हडसन नदीतूनही बरेच पाणी वाहून गेले आहे. भारतासारख्या अनेक आक्रमणे सहन करणार्‍या आणि अर्वाचीन काळात सर्वधर्म समभावाचे काँग्रेसी डिंडीम पिटणार्‍या देशात एखाद्या ऐतिहासिक मशिदीवर हल्ला होतो आणि ती लाखोंच्या उपस्थितीत जमीनदोस्त केली जाऊ शकते, ही कल्पनाच कुणी केली नव्हती. त्यामुळेच बाबरी पतनानंतर मुस्लिम देशात, विशेषतः पाकिस्तानात आता आपली दादागिरी चालणार नाही, आक्रमण खपवून घेतले जाणार नाही ही भावना जास्तच प्रबळ झाली. बाबरीचा नाश होणे ही जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना त्यामुळेच ठरते. जगावर परिणाम करणार्‍या एखाद्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार होणे हे पत्रकाराचे भाग्यच. माझ्या वाट्याला ते आले! 'पुढारी'साठी केलेले बाबरीवरील कारसेवेचे वृत्तांकन त्यावेळी खूपच गाजले होते. फक्त 'पुढारी'नेच वस्तुनिष्ठ आणि सचित्र रिपोर्टिंग केल्याचे अनेकांनी म्हटले होते.

1 डिसेंबर 1992 : अयोध्येला निघा असा आदेश 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिल्यावर तिकिटासाठी धावपळ सुरू केली. सर्व गाड्या फुल्ल होत्या. त्यामुळे कारसेवकांसाठी आरक्षित केलेल्या खास गाडीने लखनौकडे निघालो. गाडीत अनेक ओळखीचे चेहरे होते. भाजप, अभाविप आणि विहिंपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने अयोध्येकडे निघाले होते. 'बच्चा बच्चा राम काम का, और न किसी के काम का' 'सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे'… अशा घोषणांनी रेल्वेचे डबे दणाणून गेले होते. मजल दरमजल करीत गाडी लखनौला पोहोेचली आणि त्या कारसेवकांचा निरोप घेऊन मी माझ्या कामाला लागलो. लखनौमध्ये एक-दोन ओळखीचे पत्रकार होते. त्यांना गाठले. भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्यांच्या बरोबर गेलो. तिथे कार्यकर्त्यांची गर्दी होती. प्रत्येकजण लगबगीत होता.

एक तरुण या गर्दीचे नियंत्रण करीत होता. बरोबरच्या पत्रकार मित्राला विचारलं, 'हा विनय कटियार. भाजपचा इथला प्रमुख कार्यकर्ता आहे. खूप उत्साही आणि कामाचा.' मी लगेच विनयला गाठलं आणि ओळख करून घेतली. 'विनयजी, मुझे मुख्यमंत्री जी से मिलना है. इंटरव्ह्यू चाहीये'. कल्याणसिंग एवढ्या गडबडीच्या काळात भेटतील अशी आशा नव्हती. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असा विचार करून मी विनयकडे शब्द टाकला. त्याने माझ्याकडे पाहात 'इथं चाललंय काय, हा विचारतोय काय', असा चेहरा केला. पण मी मुंबय्या बाण्याने त्याच्या मागेच लागलो. मग त्याने मला नेलं कलराज मिश्र यांच्या केबिनमध्ये.

कलराजजी तेव्हा उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष होते. गोरापान गडी. त्यांना मी माझी ओळख दिली. त्यांनी आपुलकीने विचारपूस केली आणि थेट कल्याणसिंगांच्या बंगल्यावर फोन लावला. मला ही अपेक्षा नव्हती. कल्याणसिंगांशी इतर कामाचे बोलणे केल्यावर माझा संदर्भ देत त्यांनी फोन माझ्याकडे दिला. 'नमश्कार, मै कल्याणसिंग बोल रहा हूं, हमारा मिलना तो मुश्कील लगता है, लेकिन आप फोनपर ही बात कर लो ना. आप को और मुझे भी सुविधा होगी.' आपल्या खर्जातल्या आवाजात कल्याणसिंग म्हणाले. माझी काहीच पूर्वतयारी नव्हती. तरीही त्यांच्याशी बोलताना दडपण आले नाही. माझे जे प्रश्न होते ते विचारून झाल्यावर त्यांनी आणखी काही विचारायचे असेल तर विचारा. आता मला वेळ मिळणार नाही, असे सांगून फोन ठेवला.

दहाएक मिनिटे झालेल्या या बोलण्यातून मला दणदणीत कॉपी मिळाली होती. पहिलीच कॉपी, तीही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मुलाखत, म्हणजे धमालच होती. त्यावेळी कॉम्प्युटर तर नव्हतेच; फॅक्सही मोजक्याच ठिकाणी असायचे. मी लखनौच्या तार ऑफिसात गेलो आणि तिथेच लिहायला बसलो. 'कारसेवकों पर गोली नही चलायेंगे…' बाबरी पडायच्या चार दिवस आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे मला सांगत होते. मी बातमी पाठवली, ती हेडलाईनही झाली आणि तसेच घडलेही. कारसेवकांवर कल्याणसिंग सरकारने एकही गोळी झाडली नाही.

2 डिसेंबर 1992 : उत्तर प्रदेश सरकारचा या कारसेवेबद्दल काय कल आहे, हे एक डिसेंबरपासूनच लक्षात येत होते. लखनौ शहरच काय, देशभरातले वातावरण भारलेले होते. लखनौच्या रस्त्यारस्त्यांवर कुठून कुठून आलेल्या आणि स्थानिक कारसेवकांच्या झुंडी फिरत होत्या. आता इथे न थांबता अयोध्येकडे निघायला हवे, असे मी ठरवले. आणखी दोन पत्रकार महाराष्ट्रातून आले होते, तेही भेटले. आम्ही एक टॅक्सी ठरवली. अयोध्येपासून अवघ्या पाच-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या फैजाबादला मुक्काम करायचे ठरले. शान-ए-अवध आणि तिरुपती ही फैजाबादची प्रसिद्ध हॉटेल्स. गेल्या काही वर्षांपासून भाजपने केलेल्या कारसेवा, ताला तोडो आंदोलन यामुळे अयोध्येकडे देशातल्याच नव्हे, तर जागतिक मीडियाचेही लक्ष गेले होते. त्यामुळे इथे पत्रकारांची ये-जा सुरू असायची. अयोध्येतील कोणताही 'इव्हेंट' कव्हर करायला आलेले पत्रकार आपला तळ याच 'शान-ए-अवध'मध्ये टाकतात. 'शान-ए-अवध'चा स्टाफही चांगलाच मीडिया फ्रेंडली झाला होता. आता पुढचे दोन दिवस अयोध्येत फिरायचे ठरवले. फैजाबादचीही ओळख करून घ्यायची होती.

5 डिसेंबर 1992 : संध्याकाळचे सात- साडेसात झाले असतील. मी फैजाबादच्या तार ऑफिसात बातमी फॅक्स करायला गेलो होतो. फॅक्स आणि एसटीडी एकाच लायनीवर असल्याने नंबर लावून उभा होतो. एवढ्यात पाच-सहाजणांचे टोळके तिथे आले. एकमेकांशी गप्पा मारताना त्यांनी इतरांचीही ओळख करून घेतली. त्यांचा म्होरक्या कुणी नेता असावा. त्याच्याशी ओळख झाली. म्हणजे, त्यानेच करून घेतली. तो होता संघ परिवारातला. शिवाय भाजपचा मध्य प्रदेशातला आमदार (विधायक) होता. मग मीही त्याला चावी देण्यासाठी संघ परिवाराची जवळीक दाखवली. त्याने मोकळेपणाने बोलायला सुरुवात करताच मी 'बातमी' शोधू लागलो. 'आप को एक बात बताता हूं, अब हम पीछे नहीं हटनेवाले. पूरी तैयारी से आये है…' असं त्यानं सांगताच माझ्याही अँटेना वर झाल्या. मीही त्याला फुल्ल चावी देत होतो.

पंधरा-वीस मिनिटे बोलल्यानंतर आमचं जमून गेलं. मी त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तर त्यानं मला 'थेट अयोध्येलाच माझ्याबरोबर चला, तुम्हाला दाखवतो, काय काय चाल्लंय ते' अशी ऑफरच दिली. मीही लगेच तयार झालो. एका मराठी साप्ताहिकाच्या ज्येष्ठ पत्रकाराबरोबर मी रूम शेअर केली होती. त्याला हॉटेलवर जाऊन 'मी अयोध्येला निघालोय, येतोस तर चल. बातमी मिळेल, नाहीतर कळेल तरी काय सुरू आहे ते', असं म्हणताच तोही तयार झाला. थंडी मी म्हणत होती. गरम कपडे घालून आम्ही त्या विधायक महोदयांबरोबर निघालो जीपने अयोध्येकडे. कडाक्याच्या थंडीची दुलई पांघरून झोपलेल्या अयोध्यानगरीत पोलिसांचा वावर तेवढा होता. उद्याचा सूर्य जगाला चटके देणारा असेल, याची जाणीव तेव्हा आम्हाला नव्हती. बरोबरचे आमदार महाशय तर खूप माहीतगार होते, असावेत. संघ परिवारातही ते आतल्या गोटातील असावेत. कारण त्यांच्याजवळ माहिती तर अफाट होती. बोलत बोलत आम्ही अयोध्येत शिरलो. जागोजाग चेकपोस्ट. पण आमदारांच्या ओळखीने जीप पुढे 'पास' होत होती. मध्येच दशरथ महालाजवळ त्याने जीप थांबवली.

दरवाजा अर्धवट उघडला, तेव्हा भाजप संघ परिवाराचे बडे बडे नेते आत बसलेले दिसले. रात्रीचे दहा वाजले असावेत. बाबरीच्या जवळ आम्ही पोहोचलो. समोर घुमट दिसत होता. तो पाहून आमदार महोदयांचे रक्त खवळलेच. 'आप को एक बात बताता हूं साहब, ये जो ढांचा दिख रहा है ना, ये कल नही रहेगा यहा, आप देखोगेे…' त्याचा तो आवेश पाहून आम्ही एकमेकांकडे त्या अंधारातही चपापून पाहिलं. मग एका ठिकाणी पोलिसांसाठी चहाचा ठेला लागला होता. आम्ही तिथे चहा घ्यायला थांबलो, तर मी त्या माझ्या मित्राला म्हटलं, 'आपण आता परत जायला नको फैजाबादला. मलाही उद्या काहीतरी गंभीर घडणार आहे, असं वाटायला लागलं आहे. इथंच राहूया, मी आमदाराला व्यवस्था करायला सांगतो.' तो मित्रही तयार झाला. आम्ही काही मुक्कामाच्या तयारीनं आलेलो नव्हतो. पण गरम कपडे होते. मी आमदारांना विनंती केली. त्यांनीही लगेच रामकथा मानसकुंजात एक खोली मिळवून दिली. मात्र तिथे एका लाकडी पलंगाशिवाय काहीही नव्हतं. गादी-उशी सोडाच, साधी सतरंजीही नव्हती. एक अत्यंत चांगली गोष्ट होती, ती ही, की त्या खिडकीच्या खिडकीतून बाबरीचा ढाचा अगदी जवळून दिसत होता. मी लगेच निर्णय घेतला, इथंच थांबायचं. आमदार महोदय जरा वेळ गप्पाटप्पा करून सहकार्‍यांसह निघून गेले, तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते! मी आणि माझा तो पत्रकार मित्र खिडकीत बसून त्या घुमटाकडे पाहात होतो. पोलिस आणि बांबूच्या कठड्यांनी वेढलेला. पोलिसांच्या मोटारींची वर्दळ सुरू होती. अवघ्या काही फुटांवर असलेली ती हिंदूंच्या स्वाभिमानाला आव्हान देणारी आणि मुस्लिमांचा गर्व कुरवाळणारी मजबूत वास्तू उद्या खरंच इथे नसेल…? कुणास ठाऊक.

6 डिसेंबर 1992 : सकाळी जाग यायला मी रात्री झोपलो होतोच कुठं? रात्रभर त्या बाबरीकडे पाहात होतो. शतकानुशतकं ही वास्तू हिंदू स्वाभिमानाच्या छाताडावर ठासून उभी होती. काय होणार तिचं? याबद्दल बोलत असतानाच आमच्या खिडकीखाली काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आला. वाकून पाहायचा प्रयत्न करीत असताना दिसलं की, काहीजणांनी तिथला कठडा तोडून बाबरीच्या दिशेनं जायचा प्रयत्न केला होता. पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी त्या 'घुसखोरांना' हाकलून लावलं खरं; पण त्या घटनेनं आम्ही अधिकच सतर्क झालो. पहाटे तिथे अंघोळीसाठी गरम पाणी मिळेल का, म्हणून प्रयत्न केला. पण 'ठंडे पानी से ही नहाना पडेगा भैया' हे ऐकायला मिळालं. मग मनाचा हिय्या करीत तिथली बादली अंगावर घेतली. दिवस वर येऊ लागला.

बाहेर जायचं की इथंच बसून काय होतेय ते पाहायचं, याबाबत आमच्यात चर्चा झाली. तिथून सगळं छान दिसत असलं तरी वातावरणाचा 'फील' मात्र येत नव्हता. अखेर खोली सोडून बाहेर जायचं ठरवलं, तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते. आम्ही राहात असलेली इमारत 'जन्मभूमी संकुलात'च येत असल्यानं आम्हाला पोलिसांनी फार अडवलं नाही. आम्ही सरळ विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात गेलो आणि मीडियाचे असल्याचं सांगून पासेस देण्याची विनंती केली. त्यांनी पास देतानाच आम्ही ज्या इमारतीत राहात होतो, त्याच इमारतीच्या गच्चीवर पत्रकारांची एकत्रित व्यवस्था केली असल्याची माहिती दिली. मी मात्र लगेच तिथं न जाता याच परिसरात भटकण्याचा निर्णय घेतला. (नंतर तिथे गेलेल्या पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना मारहाण झाली, तेव्हा माझाच निर्णय बरोबर ठरल्याबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेतली!)

साडेआठच्या सुमारास कारसेवक बाबरी परिसरात जमायला सुरुवात झाली. पोलिस आणि गार्ड त्यांना एका ठिकाणी उभे राहू देत नव्हते. मी सरळ एका दुकानात जाऊन रामनाम लिहिलेली शाल खरेदी केली आणि ती अंगावर घेऊन गर्दीत मिसळलो.

एव्हाना त्या 2.88 एकर जागेत हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्या-राज्यातून आलेले कारसेवक हळूहळू आत सोडायला सुरुवात झाली होती. बाबरीच्या जवळच उभारलेल्या 'राम चबुतर्‍यावर' साधू-संत जमू लागले. याच जागेत मुलायमसिंगांच्या कारकीर्दीत संघपरिवाराने शिलान्यास केला होता. त्यानंतर हा 2.88 एकरचा भूखंड वादग्रस्त ठरला. त्याच्याजवळच उभारलेल्या व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचा एकेक नेता साडेनऊच्या सुमारास यायला सुरुवात झाली. तिथूनच कारसेवकांना ध्वनिक्षेपकावर सूचना दिल्या जात होत्या. विहिंपचे सरचिटणीस अशोक सिंघल यांनी माईकचा ताबा घेऊन बोलायला सुरुवात केली. त्यांचे भाषण सुरू असतानाच बाजूच्या मोकळ्या टेकडीवर कारसेवक मोठ्या संख्येने येऊ लागले होते. सिंघल यांनी रामजन्मभूमीचा इतिहास सांगायला सुरुवात केली आणि ते अचानक पत्रकारांवर घसरले.

'आम्ही सर्व हिंदू एक आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. हे पत्रकारच खोटेनाटे लिहीत आहेत. त्यांना आता आपण जबाब दिला पाहिजे, असं सांगत सिंघल यांनी बीबीसीवर टीका करायला सुरुवात केली. सिंघल यांचे भाषण होताच मंचावरून रामधून सुरू झाली. सियावर रामचंद्र की जय च्या घोषणांना उधाण आलं. शिलान्यास झालेल्या ठिकाणी भगवा झेंडा फडकावलेला. त्याला पोलिसांचा वेढा. शंखध्वनी सा-या आसमंतात घुमतो.

जिल्हा दंडाधिकारी श्रीवास्तव सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात पाहणी करण्यासाठी राम चबुत-यावर येतात. बाजूच्या टेकडीवर आता लाखभर रामभक्त जमलेले होते.रामधून आसमंतात घुमत होती. आसपासच्या सर्व इमारती तसेच झाडांझाडांवर शेकडो रामभक्त चढून बसले होते. साधू संत आज राम चबुतरा धुणार असल्याचे जाहीर झाले होते. ही स्वच्छता म्हणजेच कारसेवा, असे विश्व हिंदू परिषदेकडून सांगितले गेले होते. सकाळचे साडेदहा वाजले आणि लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे आदि भाजपा नेते मंचावर आले. आपले प्रमोद महाजनही सोबत. या नेत्यांच्या आगमनाबरोबरच कारसेवकांकडून प्रचंड घोषणा सुरू होतात. रामधून अधिकच जोशात गायली जाते.

रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणार्‍या ॠतंबरा आणि उमा भारतीही मंचावर येतात. त्यांनी दोन्ही हात उंचावून अभिवादन केल्यावर पुन्हा एकदा कारसेवक उधाणतात. माईकवर आता रा.स्व.संघाचे नेते हो.वे.शेषाद्री आले होते. त्यांच्या सूचना सुरू असतानाच बाबरीच्या मागच्या बाजूने शंभरेकजणांनी पोलिसांचे कडे तोडून घुसायचा प्रयत्न केला. याचवेळी जोरदार घोषणा सुरू जाल्या. मंदिर वहीं बनाएंगे चे नारे सुरू झाले होते. ज्या मंचावरून या गर्दीचे नियंत्रण सुरू होते, त्याच्या शेजारीच मी खाली उभा होतो. रामनामाची शाल पांघरून! एक गोरा पत्रकार कुंपणावर उभा राहून 'शूटिंग' करीत असतो. त्याच्या साथीदाराने लोकांत बिस्कीटाचे पुडे फेकले, की ते घेण्यासाठी उडालेली झुंबड तो चित्रबद्ध करीत होता. या आंदोलनात गोरगरीबांना फशी पाडून आणले गेले असल्याचे यातून दाखवण्याचा हा विदेशी डाव ओळखून कुणीतरी त्याचा 'समाचार ' घेतो, आणि मग एकूणच पत्रकारांपुढे कारसेवक आक्रमक होतात. मी गुपचूप गळ्यातले आयकार्ड खिशात टाकले!

लालकृष्ण आडवाणींचे भाषण सुरू झाले. 'अब दुनिया की कोई ताकद राममंदिर को रोक नही सकती! अडथळा आणाल तर याद राखा, केंद्रसरकारही टिकू देणार नाही.जो शहीद होने आये है, उन्हे शहीद होने दो. रामचरण मे जाना अगर उनका भागधेय होगा, तो उन्हे शहीद होने दो' आडवाणींच्या आक्रमक भाषणातल्या प्रत्येक वाक्याने कारसेवकांत जोश निर्माण होत होता. आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, यांची भाषणे सुरू होती. ऋतंबरा, उमा भारती या 'फायरब्रॅन्ड' संन्याशिणींनी आधीच पेटवलेले वातावरण आणखी भडकले. कारसेवकांचा उत्साह आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली.

एव्हाना बाबरीच्या समोरच असलेल्या चबुतर्‍यावर कारसेवेची तयारी झाली होती. नेत्यांची भाषणे आणि कारसेवकांच्या भडकाऊ घोषणा सुरू असतानाच बाबरीच्या मागच्या बाजूला वेगळेच नाट्य सुरू होते. कारसेवकांचे आत्मघातकी पथक तिथून बाबरी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न करीत होते. राम चबुतर्‍यावरही काहीजण पोहोचले. मी सरकत सरकत चबुतर्‍याच्या दिशेने पुढे निघालो. वातावरणात उत्साह होता आणि तणावही. काय होणार याचा अंदाज मिडीयाला नेहमीप्रमाणेच नव्हता! अकराच्या सुमारास अवाढव्य बाबरीच्या दिशेने गर्दीतून पहिला दगड भिरकावला गेला आणि मग चोहोबाजूने दगडाचा वर्षाव सुरू झाला.

पूर्वनियोजित असल्यासारखे टनावारी दगडगोटे आधीच आणून ठेवले गेले होते. कोर्टाच्या आदेशानुसार बाबरीच्या भोवती तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिसांच्या तुकडीतले अनेकजण या दगडफेकीत जखमी झाले. समोरच्या बाजूने दगडांचा वर्षाव सुरू असतानाच बाबरीच्या मागच्या कुंपणाच्या तारा तोडून काही कारसेवकांनी कुंपणावरून आत प्रवेश केला. काहीजण घुमटावर चढले. बाबरीवर चढून भगवा फडकावला. कारसेवक पाहून परिसरातले कारसेवक प्रचंड घोषणाबाजी करू लागले. एकच गदारोळ आणि गोंधळ उडाला. बाबरीच्या रंगमंचावर हे महानाट्य सुरू असताना समोरच रामटेकडीवर जमलेल्या लाखभर कारसेवकांनी 'श्रीराम जयराम जय जय राम' ही रामधून गायला सुरूवात केली. हे दृष्य अंगावर रोमांच आणणारे होते.

परवा अयोध्येत रिपोर्टिंग करताना ज्ञानदा कदमच्या डोळ्यात अश्रू आले, तर अनेकानी तिला ट्रोल केले. वास्तविक अशा प्रकारच्या प्रसंगांचा साक्षीदार होताना भावना उचंबळून येणे साहजिकच असते. मी तर जागतिक महत्वाच्या प्रसंगाचा साक्षीदार होतो. मला अक्षरशः रडायला आले. हे रडू दुःखाचे नव्हते, तर जनभावनेशी तादात्म्य पावल्याचे होते. कारसेवक घुमटावर चढत असताना दगडफेकीला आणखीनच जोर चढला, तेव्हा माईकवरून सूचना सुरू झाल्या. हो.वे. शेषाद्री यांनी कारसेवकांना घुमटावरून खाली उतरण्याचे आवाहन केले. जवळपास बारा भाषांमधून ते बोलत होते. मात्र त्यांचे ऐकायला कारसेवक तयारच नव्हते. अचानक साध्वी ऋतंबरांनी माईक हातात घेतला आणि त्यांनी 'मिटा दो ये भारतवर्षपर लगा हुवा कलंक. मिटा हो मुघलोंके अत्याचार के निशान, रामलल्ला के जनमस्थान को मुक्त कर दो. मेरे हिंमतवान कारसेवकों राम के काज को आगे बढाओ. पुलीस को अनुरोध है के वो किसी भी हालत मे हस्तक्षेप ना करे.' असे अनपेक्षित भाषण सुरू केले. त्यामुळे कारसेवक अधिकच भडकले. हा सारा प्रकार आडवाणी, जोशी, शेषाद्री आदि भाजपा नेते हतबलपणे पहात होते. परिस्थीती आपल्या हाताबाहेर गेल्याची जाणीव त्यांना झाली होती.

हायकोर्ट, उत्तरप्रदेश सरकार आणि केंद्रसरकार अशा तिन्ही यंत्रणांचे तिहेरी संरक्षण फोल ठरले. उत्तरप्रदेश पोलीस तर शांतपणे हा प्रकार पहात उभे होते या परिसरासाठी कोर्टाने नेमलेले रिसीव्हरही शांतपणे 'सीतामाई की रसोई' च्या गच्चीवर बसून चहाचे घुटके घेत बसले होते. तेवढ्यात आणखी कारसेवक कुंपणावरून आत शिरले.सीआरपीचे डीआयजी ओ. पी. मलिक हे दगडफेकीत जखमी झाले.कारसेवक मशिदीत घुसले आणि पोलिसांमधील 'हिंदू' जागा झाला. एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि त्याच्याबरोबर दहापंधरा पोलिस आपापले गणवेश उतरवून चड्डी बनियानवरच कारसेवेत सहभागी झाल्याचे अद्भूत दृश्य मी स्वतः पाहिले. रामधूनच्या गजरात कारसेवक गर्भगृहात पोहोचले. तिथली रामलल्लाची मूर्ती बाजूला काढून ठेवली गेली. लगेचच मिळेल त्या हत्याराने, साधनाने घुमट फोडायला सुरूवात झाली. शंखध्वनी, घोषणा चालूच होत्या. साधुसंत बेभान होऊन नाचत होते. तोडफोडही जोरात सुरू असतानाच बाहेरची भिंत कोसळली, तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. आता वादग्रस्त ढाच्याचा ताबा कारसेवक आणि साधूंनी घेतला होता. पोलिसांचा फौजफाटा केव्हाच गायब झाला होता. ढोलकी, टाळ, ताशा वगैरेच्या गजरात रामधून गात गात लोक उद्ध्वस्त होणार्‍या बाबरी मशिदीच्या विटा, सळ्या नेत होते.

'सारे रोड ब्लॉक किये जाय. सीआरपी की एक भी गाडी अंदर नही आनी चाहियें' असे आदेश माईकवरून द्यायला सुरूवात झाली. या माईकचे स्पीकर अयोध्येतल्या मुख्य रस्त्यावर लावले गेले होते. अयोध्येत कोर्ट किंवा उत्तरप्रदेश सरकारचे नव्हे, तर कारसेवकांचे, साधुसंतांचे राज्य होते! दुपारी दोन वाजून चाळीस मिनीटे झाली, आणि शतकानुशतके हिंदूंनी ज्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला, ती घटना घडली! बाबरीच्या तीनपैकी पहिला घुमट कोसळला. चार वाजता दुसरा घुमट खाली आला. शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक गुलामगिरीचे एकेक अवशेष कारसेवकांकडून उध्वस्त केले जात होते. हे होत असताना अनेक कारसेवक जखमी झाले. त्यांना उचलून बाजूला केले जाऊन पुढची तुकडी त्यांची जागा घेत होती.

काम बंद होऊ नये याची खबरदारी घेतली जात होती. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा सुरू होत्या. बरोबर साडेचार वाजता मधला घुमट कोसळला, आणि लाखो कारसेवक आनंदाने नाचू लागले. रामनामाचा जल्लोष आता टिपेला पोहोचला होता. हिंदुत्वपर जो कलंक था वो खत्म हुआ, असे सांगत बंदोबस्तावरचे पोलिसही आनंद व्यक्त करीत होते. अयोध्येतील मिठाईचे प्रत्येक दुकान उघडून दुकानमालक मुक्तहस्ते जय श्रीराम चा घोष करीत आपल्या दुकानातील मिठाई वाटत होते. घराघरात जणू पुन्हा रामजन्मोत्सव साजरा झाला. मानस ट्रस्टच्या गच्चीवर कोंडून कारसेवकांकडून झोडपले गेलेले पत्रकार आणि छायाचित्रकार पोलिसांच्या बंदोबस्तात कसेबसे फैजाबादेत पोहोचले. फैजाबादेत संचारबंदी लागली लागली होती. मी तर अयोध्येतून चालतच फैजाबादकडे निघालो होतो. बातमी द्यायची होती.

सगळे रस्ते कारसेवकांनी रोखून धरले होते. फैजाबादच्या वेशीवरच एक सरकारी घरांची असावी तशी कॉलनी दिसली. बातमी देण्यासाठी फोन मिळेल, या आशेने त्या कॉलनीत शिरलो आणि पहिल्याच बंगल्याचे दार ठोठावले. दार उघडताच समोरच्या माणसाला माझी ओळख दिली. पत्रकारांना बडवताना पाहिल्याने मी संघपरिवारातला पत्रकार आहे आणि मुंबईहून आलो आहे, हे प्रसंगावधान राखून सांगताच त्या घरमालकाने मला मिठीच मारली. अत्यंत आनंदाने त्याने मिठाई खिलवली. मी माझे काम सांगितले आणि त्याने घरातला फोन माझ्यापुढे आणून ठेवला. 'अरे साहब जितने फोन करने है करो, दुनिया को ये आनंदवार्ता दे दो, की हमने बाबर के कलंक को मिटाया है.' असं सांगणारा हा घरमालक एका कॉलेजात वरिष्ठ प्राध्यापक होता! त्याची हीच भावना संपूर्ण हिंदूसमाजात होती. बाबरीचा भूगा झाला, आणि पुढे काय घडलं हा इतिहास आहे. आज या बाबरीच्या जागेवर पुन्हा एकदा रामलल्लाचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. केवळ एका देवाचे मंदिर म्हणून याकडे पाहले जाऊ नये. एका देशाचा स्वाभिमान म्हणून या मंदिराकडे पहावे लागेल. यापुढे या देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक श्रध्दास्थानांवर आक्रमण कराल तर त्याला असेच उत्तर दिले जाईल असा संदेश सर्वसामान्य जनतेने दिला आहे. अयोध्यानगरीला पुढच्या काळात व्हॅटिकन सिटीला जितके महत्व आहे तेवढेच म.त्व या देशात प्राप्त होईल हे नक्की!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news