आंतरराष्‍ट्रीय : ‘मोसाद’च्या वाटेवर ‘रॉ’? | पुढारी

आंतरराष्‍ट्रीय : ‘मोसाद’च्या वाटेवर ‘रॉ’?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

विदेशातील इस्रायली शत्रूंच्या वेचक हत्या घडवून आणण्यात ‘मोसाद’ ही या देशाची गुप्तहेर संघटना माहिर आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आजपर्यंत हिजबुल्लाहचे 38 आणि हमासचे 51 एजंटस् इस्रायल इंटेलिजन्सच्या रोषाला युद्ध क्षेत्राबाहेर बळी पडले आहेत. हे सुरू असतानाच अलीकडील काळात भारतविरोधी कारवाया करणारे काही दहशतवादी पाकिस्तानसह अन्य देशांत मारले जात असून त्यामागे ‘रॉ’चा हात असल्याचे आरोप होत आहेत; पण ते कोणीच सिद्ध करू शकलेलं नाही.

दोन जानेवारी 2023 रोजी हमास या पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ नेता सालेह अल अरौरीची लेबनानमधील बॉम्बस्फोटात झालेली हत्या अपेक्षितच होती. तो हमासचा काँटॅक्ट टीम लीडर देखील असल्यामुळे लेबनान येथील अतिजहाल आतंकी हिजबुल्लाह आणि त्यांचे इराणमधील मदतगार व हमास यांच्यामधील दुवा होता. 1990 मध्ये उदयास आलेल्या इझ एल दीन अल कासीम या हमासी हत्यारबंद ब्रिगेडचा तो जन्मदाता आणि सर्वेसर्वाही होता. इस्रायलवरील जवळपास सर्वच हल्ले या ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या खाती जमा असल्यामुळे हमासने इस्रायलवर 7 ऑक्टोबर, 2022 रोजी केलेल्या हल्ल्याच्याही आधीपासूनच तो इस्रायल इंटलिजन्स एजन्सींच्या, विशेषत: मोसादच्या पर्मनंट हिट लिस्टवर होता.

अल अरौरीला मारण्यासाठी मोसाद अथक प्रयत्न करत होती. कारण अ) 2021 पासून अरौरीने इस्रायलवर हल्ले करण्यासाठी रमजान कार्निव्हल्स आयोजित करणं सुरू केलं होतं. कुराणानुसार रमजानच्या पवित्र महिन्यात ज्यूंची हत्या केल्यास स्वर्गप्राप्ती होते या अपप्रचारांतर्गत हे हल्ले होत असत. ब) 2023 च्या रमजान कार्निव्हलमधे वेस्ट बँक आणि जेरुसलेममध्ये 70 इस्रायली मारले गेले होते. क) वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेममधील जिहादी कारवायांना मदत करण्यासाठी अरौरी जॉर्डन, टर्की आणि इराणकडून टेरर फंडस् मिळवत असे. ड) कतार, युनायटेड अरब अमिराती आणि सौदी अरेबियामधील, मूलपंथी जिहाद्यांच्या द़ृष्टीने मवाळ असलेल्या सरकारांच्या विरोधात तो कार्यरत असल्यामुळे त्या राष्ट्रांनाही अरौरी नको होता. परिणामी मोसादला त्यांच्या हत्येची खुली मोकळीक होती.) गाझा पट्टीतून होणार्‍या इस्रायलविरोधी कारवाया आणि अल अस्क मशिदीतील ज्यूंच्या हत्येस अरौरीच जबाबदार होता. अल अरौरीच्या हत्येमुळे हमास व इस्रायलमधील सामरिक संबंध एक नवीन व अतिशय स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहेत. त्याची परिणती कशात होईल याची पुसटशीही कल्पना करता येत नाही.

अल अरौरीच्या हत्येबाबत इस्रायलने मोघम वक्तव्य केलं आहे. पण सर्वच संरक्षणतज्ज्ञांच्या मते अरौरी हत्याकांड इस्रायली इंटलिजन्स एजन्सी मोसादनेच केलं आहे. स्वतंत्र झाल्यापासून जर्मनी व अरब मुस्लिम देशांतील इस्रायली शत्रूंच्या विविध देशांमधील असंख्य हत्या मोसादच्या नावे आहेत. इस्रायलच्या जवळपास 2800 शत्रूंना मोसादने मारलं आहे. कोणत्याही पाश्चिमात्य सिक्रेट सर्व्हिसनी केलेल्या हत्यांपेक्षा ही संख्या खूपच जास्त आहे.

विदेशातील इस्रायली शत्रूंच्या वेचक हत्या घडवून आणण्यात मोसाद ही या देशाची गुप्तहेर संघटना माहिर आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने जगात कुठेही लपलेल्या हमासच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना आम्ही नक्की ठार करू, अशी स्पष्ट धमकी दिली होती. त्यावेळी तो हवेतील गमजा करत नव्हता. मोसादची सामरिक कार्यशैली आणि त्यांचा, कुठल्याही देशातील खबर्‍या- मारेकर्‍यांचा जमाव उल्लेखनीय व जगप्रसिद्ध आहे. मुस्लिम शियापंथीयांच्या आतंकी वर्चस्वाखाली असलेल्या, दक्षिण बैरुटच्या दाहीयेह या उपनगरातील हिजबुल्लाहच्या मुख्यालयाजवळच अल अरौरीची हत्या करण्यात आली होती.

हिजबुल्लाहसारख्या कट्टर शत्रूच्या मुख्यालयाशेजारी त्यांच्या नंबर दोनच्या नेत्याची हत्या करून मोसादने त्यांची कार्यपद्धत आणि सामरिक कार्यकुशलतेेची चुणूक दाखवून दिली आहे. इस्रायलने 7 जानेवारी 2024ला हिजबुल्लाहचा रदवान फोर्स कमांडर, विसम अल ताविलचा लेबनानमधील मजदल सेल्म् आणि रॉकेट फोर्स कमांडर हसन हकाशहचा सीरियातील बेल्ट जिनमध्ये गेम केल्याची बातमी आली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आजपर्यंत हिजबुल्लाहचे 38 आणि हमासचे 51 एजंटस् इस्रायल इंटलिजन्सच्या रोषाला युद्ध क्षेत्राबाहेर बळी पडले आहेत.

इस्रायल हमास लीडर्सचा खातमा करण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र हे करताना, मोसादला दोहा, अंकारा, बैरुत, दमास्कस आणि मध्य पूर्वेतील इतर महानगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या हमास नेत्यांना, इस्रायलच्या सीमेबाहेर जाऊन मारावे लागेल. कारण हे सर्व तेथे ऐषोआरामात राहताहेत. मोसादच्या सामरिक कौशल्य आणि कर्तृत्वाची ही एक कसोटी असणार आहे. इस्रायलच्या इंटलिजन्स प्रमुखांनी तेथील सिनेटला दिलेला शब्द खरा करून दाखवण्यासाठी मोसादला ही परीक्षा द्यावीच लागेल. ही परीक्षा देताना, हमास नेत्यांच्या हत्येचा विडा उचललेल्या मोसादला, तिच्या कार्यपद्धतीच्या काही स्पष्ट खुणा मागे सोडण्याचा धोका पत्करावा लागेल. असं झालं तर मोसादची सामरिक कार्यपद्धत, सामरिक क्षेत्र, सामरिक सीमा व घातपाती हेरांचे जाळेदेखील उघड होण्याचा धोका आहे.

अल अरौरीच्या हमास मुख्यालयाजवळच झालेल्या हत्येमुळे त्यांच्या संरक्षित बालेकिल्ल्यातील मर्मस्थानं उजागर झाली आहेत. त्याचबरोबर आपलं भवितव्य काय या भीतीनं ग्रासलेल्या गाझा पट्टीबाहेरील हमास नेत्यांची गाळण उडून मन:शांती भंग झाली असेल. असं म्हणतात की, अल अरौरीला मारण्यासाठी मोसादने ड्रोन्स वापरले होते. हे खरं असेल तर, उर्वरित हमास नेत्यांच्या हत्येसाठीही मोसाद हीच पद्धत अंगीकारेल या भीतीअंतर्गत ते सर्व नेते मोसादी ड्रोन्सविरुद्ध संरक्षण मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या दिवशी अल अरौरीची हत्या झाली त्याच दिवशी टर्कींनी देशांतर्गत कारवाई करून मोसादसाठी हेरगिरी आणि घातपाती कृत्य करण्याच्या आरोपांखाली 34 लोकांना अटक केली. उर्वरित 12 संशयितांना याच आरोपाखाली ताब्यात घेण्यासाठी 57 ठिकाणी छापे मारले. संरक्षणतज्ज्ञांनुसार टर्कीची ही कारवाई, अरौरीच्या हत्येनंतर इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केली गेली आहे. इस्रायलच्या कारवाईमुळे, मध्य पूर्वेत राजकीय असंतोषाचा भयंकर उद्रेक होईल, तेथील स्वातंत्र्यवीरांच्या धमन्यांमधील विद्रोही रक्त सळसळू लागेल आणि पॅलेस्टाईन जगभरात त्याच्या विरुद्ध सामरिक आघाडी उघडेल,अशी शक्यता इराणनी व्यक्त केली आहे.

एक मात्र खर की, मोसादच्या टार्गेट किलिंग संबंधातील आगामी संभाव्य कारवायांच्या भयामुळे टर्की, लेबनान, जॉर्डन आणि कतार गाझा पट्टीत हमासच्या मदतीसाठी युद्धात उडी घ्यायच्या आधी चारदा विचार करतील. युद्धात उतरल्यास या युद्धाची परिणीती विभागीय किंवा जागतीक युद्धात होऊ शकते.

हमास-इस्रायल आणि भारत-पाकिस्तानमधील सांप्रत परिस्थितीत विलक्षण समानता दिसून येते. 1971 च्या युद्धातील लाजिरवाण्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारताशी छद्म युद्ध करतो आहे. याची सुरवात सीमेवर होणार्‍या गोळीबाराच्या घटनांनी झाली आणि सीमोल्लंघन, सीमेच्या थोड आत येऊन केलेले सशस्त्र हल्ले, मोठया शहरांमधे झालेले छोटे आतंकी बॉम्बस्फोट, मोठी हत्याकांडे, हवाई घुसखोरी, संसदेवरील हल्ला, मुंबईवरील मोठा धाडसी हल्ला असे टप्पे पार करत भारताला पिडत राहिली. पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नाही. त्याने दाऊद इब्राहिम, सैयद सलालुद्दिन, मसुद अजहर, हाफिज सईदसारख्या असंख्य भारतविरोधी लोकांना राजाश्रय दिला. याबरोबरच सय्यद गिलानी, फारुख अब्दुल्लासारख्यांना फुटीरवादी कारवाया करण्यासाठी उद्युक्त केले.त्याचप्रमाणे निज्जर, पन्नून आझादसारख्या खालिस्तानी फुटीरतावादी लोकांना पैसे देऊन भारत विरोधात उभं केलं.

अमाप पैसे देत पाकिस्ताननं भारतातील प्रसारमाध्यमांना हाताशी धरून, आतंक्यांचं समर्थन करणारं पाकिस्तानधार्जिणं वातावरण तयार केलं. तसच त्यानी नक्सल समर्थनही सुरू केलं. ऑगस्ट 2020मधे कलम 370 रद्द करून काश्मिरच्या भारतातील विलयाला पूर्णाकार देण्यात आला त्यावेळी हे पाक समर्थक गोंधळ घालू शकले नाहीत म्हणून पाकिस्ताननं कॅनडा, अमेरिका, जर्मनी,ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व जर्मनी या पाश्चात्य देशात भारत विरोधी डिसीडंट सेल्स स्थापन केले आहेत. तसेच आधीच असलेल्या सेल्सना आर्थिक मदत केली. या सेल्सनी या देशांमध्ये खालिस्तानचं समर्थन करण्यासाठी आणि कलम 370 पुन्हा लागू करून काश्मिरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, भारत विरोधी चळवळी सुरू केल्या. भारत सरकारनी त्यांना शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले,अनेक पाऊले उचललीत, त्यांच्याशी शांतीपूर्ण, तार्किक वार्तालाप केलेत. पण त्यांनी आपला राग,हेका, हट्ट सोडला नाही आणि आपली कुटील कृत्य सुरूच ठेवलीत.

मग नंतर एक दिवस अचानक; कोणा एका संघटनेचा नेता हॉस्पिटलमधे उपचार सुरू असताना मेल्याची बातमी आपण ऐकली. लगेचच कुठल्याश्या दुसर्‍या संघटनेच्या नेत्याला दोन अज्ञात बंदुकधार्‍यांनी गोळ्या घालून मारल्याची खबर ऐकू आली. नंतर एका तिसर्‍याच संघटनेच्या नेत्याचं अपघाती निधन झाल्याचं वृत्त आलं. मग एक दिवस शत्रू देशातील बॉम्ब स्फोटांचा आणि त्यामुळे होणार्‍या जीव व वित्त हानीचा गवगवा सुरू झाला.या घटनांंसाठी कुठलातरी ‘अननोन एक्स फॅक्टर’ जबाबदार आहे हे हळूहळू पाकिस्तान व पाक समर्थक पाश्चात्य देशांच्या लक्षात येऊ लागलं. मग सुरू झाली; हा एक्स फॅक्टर कोणता, तो कुठून व कसा आला, त्याच्या मागे कोण आहे याची प्रसार माध्यमांमधील घमासान चर्चा. अशा चर्चा, आधी पाक राष्ट्रीय टीव्हीवर झाल्या आणि नंतर या घटनांसाठी भारताची रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ, हीच जबाबदार आहे, असं दोषारोपण, कांगावा पाकिस्तान व पाश्चिमात्य राष्ट्रांनी सुरू केला. हळूहळू हे लोण भारत व जगातही पसरू लागलं.

खालिस्तान चळवळीचा एक नेता, निज्जर याच्या कॅनडामधे झालेल्या हत्येला भारतच जबाबदार आहे असा स्पष्ट आरोप त्या देशाचे पंतप्रधान ट्रूडूंनी तेथील संसदेत केला.अमेरिकेतील खालिस्तान समर्थक नेत्याच्या हत्येची सुपारी रॉनी या एका भारतीय इसमाच्या माध्यमातून अमेरिकन हत्यार्‍यांना दिली, असा आरोप करत बायडेन प्रशासनानी भारताला आपली बाजू मांडायला सांगितलं. आपलं मन स्वच्छ असणार्‍या भारत सरकारने अर्थातच याचा सपशेल इन्कार केला व अजूनही करतो आहे. भारतातील विरोधी पक्षांनी यासाठी सरकारच जबाबदार आहे, असा प्रचार सुरू केला. अनेक विचारवंत आणि प्रसार माध्यमांनी देखील हाच राग आलापला. सगळ्यांच्या मते, याला जबाबदार रॉ हीच भारतीय इंटलिजन्स एजंसीच आहे. पण कोणीच हे सिद्ध करू शकत नाही. जगभरातील इंटलिजन्स गँबिट असच काहीस धूसर आणि अकल्पित असतं. भारत विरोधी शत्रूंचा खातमा विदेशात होतो आहे. पण हे कोण करत आहे हे कोणालाच माहित नाही. फक्त भारत विरोधी लोक मारले जात असल्यामुळे, त्याला जबाबदार रॉ नाही तर कोण आहे हा प्रश्न उपस्थित होणे नैसर्गिकच आहे. या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.

Back to top button