क्रीडा : पुरस्कारांचे ओझे हवेच कशाला? | पुढारी

क्रीडा : पुरस्कारांचे ओझे हवेच कशाला?

मिलिंद ढमढेरे

‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी म्हण प्रचलित आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जातो. मात्र, या पुरस्कारासाठी आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, तसेच हा पुरस्कार मिळाल्यानंतर होणार्‍या नकारात्मक टीका लक्षात घेऊन अनेक खेळाडू, प्रशिक्षक व संघटक हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. किंबहुना या पुरस्काराच्या ओझ्यापेक्षा चाहत्यांकडून मिळणारे प्रेम हाच खरा पुरस्कार असल्याची त्यांची भावना असते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव उंचावणार्‍या खेळाडू, संघटक, प्रशिक्षक यांना आणखी प्रेरणा मिळावी यादृष्टीने सन 1970 पासून राज्य शासनातर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जात आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जावा, अशी अपेक्षा असली तरीही या पुरस्कारांच्या वितरण समारंभाबाबत शासकीय स्तरावर वितरणासाठी होणारा विलंब, त्याबाबत दिसून येणारी उदासीनता, नैपुण्यवान आणि पुरस्कारासाठी योग्य असलेल्या खेळाडूंना पुरस्कार मिळू नये, यासाठी संबंधित खेळाच्या संघटकांकडूनच केले जाणारे अडथळे, पुरस्कार मिळाल्यानंतरही काही नाराज मंडळींकडून समाज माध्यमांद्वारे होणारी अनावश्यक टीका यामुळे क्रीडा क्षेत्रातच या पुरस्कारांबाबत खूपच नैराश्य दिसून येते. मुळातच आम्हाला हे पुरस्कार मिळावेत यासाठी विनवणी करावी लागते, ही खेळाडूंच्या दृष्टीने कमीपणाची गोष्ट मानली जाते. खेळाडूंची कामगिरी ही कधीच लपून बसत नाही. गुगल, विकिपीडिया व वेगवेगळ्या समाज माध्यमांद्वारे खेळाडूंची अद्ययावत माहिती सहज मिळू शकते. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लागणारा वेळ व अन्य कटकटींपेक्षा एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग हा आमच्यासाठी जास्त सोपा असतो, अशीच भावना खेळाडूंमध्ये दिसून येते.

परदेशी खेळाडूंचा सहभाग : राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य पुरस्कारांबाबत सुधारित नियमावली तयार नुकतीच निश्चित केली आहे. त्यानुसार अश्वारोहण, गोल्फ व याटिंग या खेळांना पायाभूत सुविधांच्या अभावी खेळाचा विकास होत नाही, असे कारण सांगून पुरस्कारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याबाबत अभ्यास करणार्‍यांनी राज्यात असलेल्या सुविधांचा अपेक्षेइतका अभ्यास केला नसावा कारण मुंबई व पुणे या दोन्ही ठिकाणी असलेले गोल्फ कोर्स हे अव्वल दर्जाचे असून, त्या ठिकाणी होणार्‍या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन केले जाते आणि या स्पर्धांमध्ये जगातील अनेक नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. शासनाला जर गोल्फ हा व्यावसायिक क्रीडा प्रकार वाटत असेल, तर क्रिकेट हा तरी ‘जंटलमन्स गेम’ कुठे राहिला आहे. क्रिकेट म्हणजे निव्वळ पैशाचा खेळ झाला आहे, अशीच टीका सातत्याने होत असते. भारताची गोल्फपटू अदिती अशोक ही टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्याच्या उंबरठ्यावर असताना तिच्या खेळाचे थेट प्रक्षेपण वेगवेगळ्या समाज माध्यमांद्वारे एक लाखहून अधिक लोकांनी पाहिले होते. ही गोल्फ या खेळाच्या लोकप्रियतेची पावती होती.

याटिंग या खेळासाठी आवश्यक असणारा अथांग सागर महाराष्ट्राला लाभला आहे आणि भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू अनेक वेळा तेथे होणार्‍या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात आणि जागतिक स्पर्धेपूर्वीही तेथे सराव करीत असतात. मध्य प्रदेशमध्ये समुद्राचा लवलेश नसतानाही तेथील खेळाडू नेहा ठाकूर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक मिळवले होते आणि ते देखील अनेक नामवंत खेळाडूंना मागे टाकून. तिचे हे यश या क्रीडा प्रकारांमधील नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंसाठी अतिशय प्रेरणादायक आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनानेदेखील तिच्या या कामगिरीची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंना चांगले प्रशिक्षण कसे दिले जाईल, यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तसे न करता त्यांनी या खेळाला पुरस्काराच्या यादीतून वगळून खेळाडूंना व संघटकांना नाउमेदच केले आहे.

प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद

अश्वारोहण हा अतिशय आकर्षक क्रीडा प्रकार मानला जातो. विशेषतः या खेळांना अधिकाधिक प्रेक्षक मिळावेत यासाठी जलेबी रेस, अडथळ्यांच्या शर्यती इत्यादी अनेक क्रीडा प्रकार त्यामध्ये समावेश करण्यात आले आहेत. त्यामुळे या क्रीडा प्रकाराला प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच अनेक लहान मुलेही या क्रीडा प्रकाराकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. महाराष्ट्रात असलेल्या पर्यटन स्थळांवर अश्वारोहण करणार्‍यांची संख्या लाखाच्या घरात आहे. तेथे मदतनीस म्हणून काम करणार्‍यांची मुले-मुली या खेळाकडे वळू लागली आहेत. मुंबई व पुणे येथील रेसकोर्सवर आयोजित केल्या जाणार्‍या घोड्यांच्या शर्यतींद्वारे पैसा कमावणार्‍यांची संख्या भरपूर आहे. जर अशा रेसकोर्सचा उपयोग अश्वारोहणाच्या विकासाकरिता केला गेला, तर निश्चितच चांगले खेळाडू घडू शकतील. गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुमारे 41 वर्षांनी भारताला सांघिक अश्वारोहण स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते. त्यांच्या या कामगिरीपासून प्रेरणा घेत महाराष्ट्राच्या संघटनेने खेळाच्या विकासासाठी नवनवीन योजना सुरू केल्या आहेत. असे असताना शासनाच्या नवीन नियमामुळे त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.

भारतीय खेळाडूंचे वर्चस्व : बिलियर्डस व स्नूकर हे जरी सध्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकार नसले, तरी लवकरच या क्रीडा प्रकारांचा ऑलिम्पिक प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या खेळांचे संघटक त्यादृष्टीने खूपच जोरदार प्रयत्न करीत आहेत. या दोन्ही खेळांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांसह जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी सातत्याने वर्चस्व गाजविले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्याही अनेक खेळाडूंचा समावेश आहे. कॅरम हा जरी ऑलिम्पिक क्रीडा प्रकार नसला, तरी या क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी जगज्जेतेपदावर आपली मोहर नोंदवली आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये कॅरम संघटकांनी ऑनलाईन पद्धतीने जागतिक स्तरावर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांमध्येही ऑनलाईन पद्धतीने भाग घेणार्‍यांची संख्या खूपच मोठी होती. त्यांचा उत्साह पाहून जागतिक कॅरम संघटनेच्या अध्यक्षांसह अनेक पदाधिकार्‍यांनी खेळाडूंना रोख पारितोषिके दिली होती. या स्पर्धांमुळे अनेक लोकांना विरंगुळा मिळालाच; पण त्याचबरोबर त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही मदत झाली होती. पॉवरलिफ्टिंग व शरीरसौष्ठव या खेळांमध्येही जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद गाजविले आहे. हे दोन्ही क्रीडा प्रकार अन्य काही खेळांसाठीही पूरक व्यायाम म्हणून ओळखले जातात.

पारंपरिक खेळांपैकी आट्यापाट्या या खेळाच्या राज्य स्पर्धा केव्हा आयोजित केले जातात आणि केव्हा संपतात, याचा पत्ताही लागत नाही. एकाच वर्षी एका घरातील खेळाडू, प्रशिक्षक व संघटक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार देण्याची ‘किमया’देखील शासनाने केली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी याबाबत भरपूर टीकाही केली होती. पूर्वी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये या खेळाच्या नियमितरीत्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. त्याला प्रसिद्धी मिळत होती. हा खेळदेखील अनेक खेळांसाठी पूरक व्यायाम प्रकार आहे. खरेतर शासनाने या खेळाचा अधिकाधिक प्रसार कसा केला जाईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

खेळाडू व संबंधित घटकांना वेळेवर पुरस्कार मिळाले तर खर्‍या अर्थाने त्या पुरस्कारांचे चीज झाले असे म्हटले जाते; पण अनेक वेळेला या पुरस्कारांचे वितरण नियमितरीत्या झालेले नाही. कधी कधी दोन वर्षांचे तर कधी कधी तीन वर्षांचे पुरस्कार एकाच दिवशी वितरण करण्याची वेळही शासनावर आली आहे. गतवर्षीदेखील एकदम तीन वर्षांचे पुरस्कार देण्यात आले. शिवजयंतीच्या दिवशी हे पुरस्कार दिले जावेत अशी घोषणा आजपर्यंत अनेक वेळा झाली आहे. मात्र, त्यादृष्टीने योग्य ते नियोजन आणि अंमलबजावणी होत नाही. या महत्त्वाच्या पुरस्कारांचे योग्यरीतीने वितरण होईल, खेळाडू, प्रशिक्षक व संघटकाची नाराजी होणार नाही, याची काळजी राज्य शासनाने घेतली पाहिजे, तरच खर्‍या अर्थाने पुरस्काराची प्रतिष्ठा जपली जाईल.

Back to top button