मनोरंजन : पॉप संगीत सम्राज्ञी

मनोरंजन : पॉप संगीत सम्राज्ञी

अमेरिकेत सतत चर्चेत असणार्‍या सेलिब्रिटीजमध्ये पॉप स्टार टेलर स्विफ्टचा समावेश करावा लागेल. सोशल मीडियावर 45 कोटींहून अधिक चाहते असणार्‍या या गायिकेने अलीकडेच आपल्या 'एराज टूर'मधून केलेल्या लाईव्ह कॉन्सर्टमधून गर्दीचे, लोकप्रियतेचे अनेक नवे विक्रम प्रस्थपित केले. याच नावाने काढलेल्या या कॉन्सर्टवरील चित्रपटानेही उत्पन्नाच्या आघाडीवर आधीचे विक्रम मोडीत काढले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या तारकेचे यश नव्या पिढीला प्रेरणादायी वाटेल.

अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय आणि सतत या ना त्या कारणाने चर्चेत असणार्‍या मोजक्या सेलिब्रिटीजमध्ये प्रामुख्याने नाव घेतले जाते ते टेलर स्विफ्टचे. पॉप संगीताच्या जगात लाखो तरुण-तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या या तेहतीस वर्षाच्या गायिकेने अलीकडील 'एराज टूर' या आपल्या विविध अमेरिकन शहरातून ज्या 'म्युझिक कॉन्सर्ट' केल्या, त्याने आर्थिक उत्पन्नाचे, लोकप्रियतेचे आणि चाहत्यांच्या गर्दीचे जुने विक्रम मोडीत काढले. त्यापैकी एका कॉन्सर्टवर आधारित याच नावाचा चित्रपट काढला, तोही तडाखेबंद चालला. डिजिटल म्युझिक, पॉडकास्ट आणि व्हिडीओ सेवा देणार्‍या स्पॉटिफायच्या प्लॅटफॉर्मवर महिन्याला 10 कोटी श्रोते आणि प्रेक्षक मिळविणारी पहिली पॉप स्टार, विविध गाणी आणि अल्बम यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप करणार्‍या बिलबोर्ड चार्टवर पहिल्या क्रमांकावर बारा वेळा राहण्याचे यश मिळविणारी पहिली स्त्री कलाकार, 'अल्बम ऑफ द इअर'चे ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड तीन वेळा मिळवणारी एकमेव गायिका, स्वतःची गाणी स्वतः लिहून ती सादर करणारी किमयागार गीतकार, संगीतकार, टीव्ही आणि चित्रपटात झळकलेली तारका, निर्माती, दिग्दर्शिका आणि फॅशन क्षेत्रात आयकॉन बनून स्वतःचा वेगळा ब्रँड तयार करून तो यशस्वी करणारी एक उद्योजक अशी अनेक प्रकारे तिची ओळख करून देता येईल.

कंट्री म्युझिकपासून आपल्या वयाच्या 12 व्या वर्षांपासून कारकिर्दीला सुरुवात करून आज जगभरातील पॉप संगीताच्या विश्वात शिखरावर पोहोचलेल्या या कलाकार गायिकेचा प्रवास नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा देणारा वाटेल. तिची सर्व गाणी तोंडपाठ असणार्‍या चाहत्यांना रोल मॉडेल वाटणारी टेलर स्विफ्ट अमेरिकेत तरी 21 व्या शतकातील सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व झाले आहे, हे तिच्या वाटचालीवरून स्पष्ट होईल.

बालनाट्यातील सहभाग, वयाच्या 11 व्या वर्षी फिलाडेल्फिया बास्केटबॉल गेममध्ये म्हटलेले अमेरिकेचे राष्ट्रगीत, त्यानंतर गिटार घेत संगीताचा अखंड रियाज, नवव्या इयत्तेत असताना गीत लेखन प्रारंभ, वयाच्या 14 व्या वर्षी सोनी / ए टीव्हीबरोबर साँग रायटर म्हणून करार आणि त्यापाठोपाठ आपल्या गीतांना चाली लावून त्याच्या सादरीकरणाचा धडाका. अशाच एका कार्यक्रमात बिग मशिन लेबलच्या अधिकार्‍याने तिचे प्रभावी सादरीकरण पाहून तिच्याशी करार केला आणि तिचा पहिला अल्बम 2006 मध्ये बाजारात आला. हे सारे अद्भुत वाटावे असेच आहे. त्यानंतर तिने कंट्री म्युझिकमध्ये आपले स्थान भक्कम करीत हळूहळू पॉप संगीत क्षेत्रातही पाय रोवले.

2008 मध्ये आलेल्या फिअरलेस अल्बमने तिचे हे स्थान पक्के केले. तेव्हापासून यश, संपत्ती, चाहत्यांचे अलोट प्रेम तिच्याकडे येत गेले. 'एराज टूर'ने त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. अमेरिकेच्या इतिहासातील या अभूतपूर्व टूरमुळे या गायिकेने त्या त्या शहरातील अर्थव्यवस्थेला लाखो डॉलर्स मिळवून दिले. या दौर्‍याने 5.7 अब्ज डॉलर्सचे पाठबळ अर्थव्यवस्थेला दिल्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. तिच्या कॉन्सर्टच्या किती तरी आधी तिकिटे मिळविण्यासाठी चाहत्यांची इतकी झुंबड उडते की , तिकीटमास्टर ही तिकीट विक्रीची ऑनलाईन वेबसाईट यंत्रणाही अफाट मागणीमुळे बंद पडल्याची उदाहरणे आहेत. त्याला उपस्थित राहणार्‍या चाहत्यांच्या गर्दीवर आघाडीच्या न्यूयॉर्क टाईम्स सारख्या वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून जो मजकूर प्रसिद्ध झाला आहे, त्यात ही गर्दी फॅशन परेड पेक्षा कमी नाही, हे लक्षात येते.

त्यांचे आराध्य दैवत हे फॅशन आयकॉन असल्याने तिच्यासारख्या वेगवेगळ्या फॅशनचे पोशाख परिधान करण्याचीही चढाओढ असते. या टूरमधील एका कॉन्सर्टच्या कार्यक्रमाचे सरासरी तिकीट 456 डॉलर होते, तरी रिसेलमध्ये त्याचा दर 1000 डॉलरपुढेही गेला होता. टेलर स्विफ्ट कॉन्सर्टसाठी असलेला ताफा सुमारे 90 ट्र्कसह येतो, त्यावेळी त्या त्या भागातील पर्यटन व्यवसायाची चलती होणे स्वाभाविक आहे. तिच्या कार्यक्रमामुळे हॉटेल व्यवसायाला मे महिन्यात मोठा लाभ झाला, याची नोंद फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ फिलाडेल्फियाने आपल्या अहवालात घेतली आहे. हॉटेल, रेस्टॉरंटस्, वाहतूक व्यवसाय या काळात तेजीत आल्याने कोरोना काळातील आर्थिक मरगळ 'स्विफ्ट इफेक्ट'ने दूर झाली. लाखो चाहते येतात, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर खरेदी होते.

विमान व्यवसायाची झेप उंचावते, रोजगार वाढतात. या काळात तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फ्रेंडशिप ब्रेसलेट आपल्या दोन्ही हातात घालतात. त्याच्या मण्यांवर तिच्या गाण्याच्या ओळीतील अक्षरे असतात. त्यांची देवाणघेवाण होते. हे ब्रेसलेटस् घरगुती उद्योगातून तयार होतात. या टूरमुळे टेलरला तब्बल 4. 1 अब्ज डॉलर्स मिळाले असल्याचे सांगितले जाते. लायबेरियासह 42 छोट्या देशांच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नापेक्षा ही रक्कम मोठी असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. पण आपल्याबरोबरचे डान्सर, म्युझिशिअन, साऊंड टेक्निशिअन्स, केटरर्स आदींनाही भरभरून देण्याची दानत तिच्याकडे आहे. आपल्या दौर्‍यातील ट्र्क ड्रायव्हर्सना तिने 1 लाख डॉलर इतका अतिरिक्त बोनसही दिला. टूरवरील चित्रपटाने प्रारंभीच्या आठवड्यात 123 दशलक्ष डॉलरची कमाई करून आधीचे विक्रम मोडले. अब्जाधीशांच्या यादीत ती अर्थातच ठळकपणे आता दिसू लागली असल्यास नवल नाही.

अशा या स्टारच्या यशाचे रहस्य नेमके कशात आहे, याचा शोध घेणारी किमान 25 पुस्तके सापडतील. माध्यमे, कॉलेज आणि विद्यापीठे यांनाही यात बरेच स्वारस्य आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या क्लाईव्ह डेव्हिस इन्स्टिट्यूटने यासंबंधीचा पहिला अभ्यासक्रम सुरू केला. स्टॅनफोर्ड विद्यापीठ, टेक्सास विद्यापीठ, बर्कले कॉलेज ऑफ म्युझिक, सी टी बाऊर कॉलेज ऑफ बिझनेस इत्यादी 10 ते 12 उच्च शिक्षण संस्थांनी त्याचे अनुकरण केले असून तिच्या गाण्यांचे, प्रत्येक दशकातील त्यातील बदलांचे विश्लेषण इथे केले जाते. बिझनेस स्कूलमध्ये तिची बिझनेस स्ट्रॅटेजी आणि ब्रँड बिल्डिंगवर लक्ष केंद्रित करून तिच्या यशाचे फॉर्म्युले शिकविले जातात.

माध्यमांनाही तिच्या कॉन्सर्ट आणि अनुषंगिक विषयांच्या विश्लेषणात्मक लेखनासाठी खास अभ्यासू वार्ताहराची गरज पडू लागली आहे. या गायिकेचे बीट सांभाळू शकणार्‍या वार्ताहराचे पद भरण्याची 'यूएसए टुडे'ने दिलेली जाहिरात आणि त्यानंतर झालेली नियुक्ती याची बातमी मध्यंतरी चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या शक्तिस्थानाचा विचार केला तर प्रामुख्याने शब्द आणि स्वर या दोघांवरही असलेली तिची हुकूमत जाणवते. कवितेच्या प्रांतात तिचा अभ्यास किती आहे, हे रॉबर्ट फ्रॉस्ट, पाब्लो नेरुदा, इमिली डिकन्सन आदी कवींच्या कवितांच्या संदर्भावरून जाणवल्याशिवाय राहात नाही.

तिच्या वादग्रस्त आणि वादळी आयुष्यात अनेक संघर्ष आले, काही सेलिब्रिटींबरोबर नाजूक नाते जुळले. पण कालांतराने त्यात दुरावा आला. तोही तिने पचवला. त्यामुळे प्रेमाच्या नात्यांचे उत्कट रंग तसेच विरहाचे दु:ख आणि कधी कधी फसवणुकीचे शल्य, एकटेपणा आदी भाव नकळतपणे तिच्या गीतातून उमटणे अपरिहार्य आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना (ज्यांचा उल्लेख स्विफ्टीज असा केला जातो) हा अनुभव त्यांच्या भावभावनांचा आविष्कार आहे, असे वाटत राहते. आपल्या मूल्यांशी प्रामाणिक राहणारी लढाऊ कलाकार म्हणूनही ती त्यांची रोल मॉडेल आहे. सामाजिक कार्याचा भाग म्हणून लाखो डॉलर्सच्या देणग्या तिने दिलेल्या आहेत. आपल्या आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांच्या हक्कांसाठी तिने दिलेले लढे हेही तिच्या करिअरचे वेगळेपण आहे.

स्त्रियांचे हक्क, वातावरण बदल, लोकशाही संवर्धन, वर्ण आणि वंशद्वेषाला विरोध, गन कंट्रोलला समर्थन, एलजीबीटीक्यू प्रकरणी भेदभावास विरोध याबाबत ती अत्यंत ठाम असल्याने अतिउजव्या ट्रम्पवादी गटाच्या रोषाला तिला सामोरे जावे लागले. गर्भपातबंदीला विरोध केल्याने या रागात भर पडली. सोशल मीडियावर तिचे सुमारे 45 कोटी फॉलोअर्स आहेत, तर तिचा सध्याचा प्रियकर आघाडीचा फुटबॉलपटू ट्रॅव्हिस केल्सी याचे सुमारे 50 लाख फॉलोअर्स आहेत. या दोघांनी मनात आणले तर मतदानासाठी लाखो मतदारांना ते बाहेर आणू शकतात. म्हणून या दोघांच्या लोकप्रियतेची धास्ती डोनाल्ड ट्रम्प यांना पडू शकते, अशा स्वरूपाचे मतप्रदर्शन करणारा लेख अलीकडेच वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केला होता. सुमारे 70 हजार प्रेक्षक क्षमतेच्या खचाखच भरलेल्या फुटबॉल स्टेडियममध्ये स्विफ्ट एखाद्या सम्राज्ञीच्या थाटात आत्मविश्वासाने आपल्या गिटारसह उभी असते, तेव्हा या लावण्यवतीचे हे संपूर्ण अधिराज्य असते. 'मिस अमेरिकाना' या डॉक्युमेंट्रीत तिने आपली बरीच गुपिते आणि कलाकार म्हणून असलेली सुख-दु:खे उघड केली आहेत. स्वत:ला सतत सर्जनशील ठेवत नवनवे आविष्कार सादर करण्याची प्रेरणा कलाकारात असणे किती महत्त्वाचे आहे, हे या उदाहरणावरून अधोरेखित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news