सिनेमा : बंधमुक्तीचा प्रवास | पुढारी

सिनेमा : बंधमुक्तीचा प्रवास

डॉ. अनमोल कोठाडिया

बंधमुक्त करणे हे चांगल्या सिनेमातून अगदी सहजतेने घडतेच घडते. त्यासाठी केवळ विषय नव्हे तर त्या विषयाकडे पाहण्याचा दिग्दर्शकाचा द़ृष्टिकोन खूप महत्त्वाचा ठरतो.

54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) अशा काही लक्षवेधी सिनेमांविषयी…

अ हाऊस इन जेरुसलेम (इस्रायल) : आईच्या अपघाती मृत्यूमुळे मनावर गहिरा परिणाम झालेल्या रिबेकास घेऊन तिचे वडील जेरुसलेम येथील तिच्या आजोबांच्या घरी राहायला येतात. तिथे तिची एका समवयीन पॅलेस्टाईन मुलीशी गूढ भेट होत राहते. त्यातून रिबेका पॅलेस्टाईन वस्तीतील एका आजीची गाठ घेते. तर ती गूढ मुलगी म्हणजे त्या आजीचेच त्या घरात रेंगाळणारे मन असते. कारण ते घर मुळात त्या आजीचेच वडिलोपार्जित असते. व्यक्तिगत मातृशोकाचा सांधा मातृभूमीतून होणारे विस्थापन इतक्या व्यापक घटनेशी जोडताना चालू असणार्‍या इस्रायलच्या युद्धउन्मादाच्या पार्श्वभूमीवर हा इस्रायलचाच सिनेमा अतिरेकी राष्ट्रवादातून मानवतेची सुटका करू पाहतो, हे खूप महत्त्वाचे आहे.

‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ (अमेरिका, इंग्लंड आणि पोलंड) : हा नाझी क्रौर्यावर आजवर आलेल्या कलाकृतींपेक्षा एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणी करतो. तो छळछावणीतील नाझी क्रौर्याचे थेट दर्शन घडवण्यापेक्षा छळछावणीस लागून असलेल्या अधिकार्‍यांच्या घरातील कुटुंबवत्सल वातावरण आणि आयुष्यातील सर्वसाधारण सुखासीन पण रटाळ दिनक्रम दाखवत राहतो. अशाप्रकारे नाझी अधिकारी असणार्‍या क्रूरकर्म्यांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहमती असणार्‍या लाभार्थी कुटुंबीयांचे निगरगट्ट आणि क्रूर अंतरंग दिसून येते. एवढेच नव्हे तर नाझींमध्येही एकमेकांत सारे काही आलबेल नाही, त्यांच्यातही असुरक्षितपणाची भावना आहे, वरिष्ठांची मर्जी राखण्याची गुलामी आहे. शोषक-शोषित उतरंडीतील शोषकाची मुक्ती शक्य नसते.

‘हॉफमन्स फेअरी टेल्स’ (रशिया) : कौटुंबिक हिंसाचारासारखा विषय आधुनिक परीकथासद़ृश मांडला आहे. पण त्यामुळे त्यातील आशयाचे गांभीर्य यत्किंचितही कमी होत नाही. नावातच आशा असणारी नादेज्दा प्रचंड लाजाळू, भित्री, कष्टाळू, अर्थार्जन करणारी, सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व असणारी अशी आहे. तिचा नवरा घरबशा, स्वयंकेंद्रित, चिडचिडा, तिच्यावर सतत वर्चस्व गाजवणारा असा आहे. तरीही नादेज्दा घराबाहेर पडून दोन नोकर्‍या करून घराचीही सारी जबाबदारी संभाळत आहे. सुदैवाने तिला अचानक तिच्या सुंदर लांबसडक बोटांसाठी जाहिरातींमध्ये, चित्रपटांमध्ये काम मिळू लागते. यात एकदा तिला समोरच्याला थप्पड मारण्याचा प्रसंग असतो. पण अगदी अभिनयासाठीही कोणासही थप्पड मारण्यास ती तयार नसते. तिला तिचा मित्र नवर्‍याचे दोष ऐकवून समोरच्यास नवरा समजून थप्पड मार, अशी स्फुरणशील अभिनय टीप देतो आणि तिचे खर्‍या अर्थाने सबलीकरण होते.

‘वुमन ऑफ’ (पोलंड) : कम्युनिझम ते भांडवलशाही अशा बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये 45 वर्षांच्या प्रवासात एका पुरुष देहात अडकलेल्या स्त्रीची कुटुंब आणि समाज अशा दोन्ही पातळीवर होणारी घुसमट अतिशय संवेदनशील पद्धतीने दाखवली आहे. यातील फ्लॅशबॅक्सचा क्षणद़ृश्यांसारखा केलेला वापर वेधक आहे. अशीच एका पारलिंगी घुसमटीची आत्मकथा मात्र आपल्याकडे हाताळणी असते तशी विषयाची माहिती देण्याचा पद्धतीने ‘नीला नीरा सुरियन’ (तमिळ) मध्ये संयुक्ता विजयन यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती करताना स्वतःची भूमिका स्वतःच केली आहे. व्यक्त होण्यातच मुक्ती आहे !

‘एन्डलेस समर सिंड्रोम’ (झेक, फ्रान्स) : या उत्कंठावर्धक नाट्यात दोन दत्तक अपत्यांच्या आईस एक निनावी फोन येतो की त्या दोघांपैकी एकाबरोबर तिच्या नवर्‍याचेच लैंगिक संबंध आहेत. अगदी जवळच्या नात्यातील ही गुंतागुंत कॉम्पॅक्ट अस्पेक्ट-रेशोचा आशयपूरक वापर करीत आणि कथानकाची सुयोग्य बांधणी करत तिच्या आत्महत्येचा उलगडा येथे होतो. यातील समलैंगिक संदर्भ लैंगिकतेच्या भावनेने धक्कादायक वाटत नाही तर नात्यातील फसवणूक या भावनिक अर्थाने अस्वस्थकारक होतो. या पद्धतीचे सहज चित्रण लिंगभाव संदर्भातील चित्रपटांमध्ये आता यायला हवे.

‘बोस्नियन पॉट’ (बोस्निया) : कथानक सुरू होताना माहितीपट पद्धतीने शीर्षकी पाककृतीची माहिती सांगितली जाते आणि नंतर त्याचा कलाकृतीच्या आशयावकाशाशी सांधलेला संबंध हा थक्क करणारा आहे. एका बोस्नियन लेखकाची ऑस्ट्रियात राहण्याचा परवाना वाढवून मिळण्याच्या दृष्टीने केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्याचा एखादा काव्यसंग्रह / कादंबरी प्रकशित होणे किंवा त्याच्या नाटकाचा प्रयोग होणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भाने तो प्रकाशक, निर्माते, प्रायोजक आणि दिग्दर्शकांना भेटतो आहे. या भेटीगाठीत कलाव्यवहाराची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर येते. अखेर अनेक अडचणींवर मात करत तो नाट्यप्रयोग घडवून तर आणतो पण अर्ध्या प्रयोगातच शॉर्टसर्किट झाल्याने ध्वनी प्रकाश योजना बंद पडते. तेव्हा त्याशिवाय प्रयोग अशक्य असे दिग्दर्शक निर्वाणीचे सांगतो. या पार्श्वभूमीवर लेखकच नाटकाच्या अभिवाचनास सुरवात करतो. त्यास अभिनेते साथ देतात आणि तो नाट्यप्रयोग यशस्वी ठरतो.

‘स्नो लिओपार्ड’ (चीन) : निसर्ग आणि माणूस यांच्यातील संघर्ष आणि सहजीवन यांबाबत अनेक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भूमिका समोर आणणारी एक माहितीपट निर्मिती सुरू आहे. तिबेटमधील एका मेंढपाळाच्या खुराड्यात शिरून हिमबिबट्याने त्याच्या नऊ मेंढ्या मारल्या आहेत. पण आता त्याच खुराड्यात हिमबिबट्या अडकला आहे. त्याचे प्राण घेण्यास तो मेंढपाळ उतावीळ आहे. त्या मेंढपाळाचा लहान भाऊ बौद्ध भिक्कू आहे, तो या बिबट्यास वाचवू पाहात आहे. त्यासाठी त्याने आपल्या माहितीपटकर्त्या मित्रास आणि पोलिसांनाही बोलावून घेतले आहे. त्या दोघांचे वडील जगण्याच्या शहाणपणातून त्या दोघांत समन्वय साधू पाहात आहेत. हिमबिबट्याचा बछडा दूर उंचावरून आपल्या अडकलेल्या आईची वाट पाहत केविलवाणेे उभा आहे.
या सार्‍यातून हिमबिबट्याची होणारी सुटका माणसातील बुद्धत्वाची प्रचिती देणारे आहे.

बाप आणि मुलगी यांच्या नात्यातील अढी अगदी अलवारपणे सोडविणार्‍या दोन कलाकृती पाहता आल्या. ‘मॉन्टेव्हिडीओ युनिट’ (रशिया) ही प्रसूतीशास्त्रातील एक संज्ञाच शीर्षक असलेल्या कलाकृतीत अपराधगंडाने ग्रस्त असणारा शल्यचिकित्सक असणारा बाप आणि त्याचा प्रचंड द्वेष करणारी व्यसनग्रस्त तरुणी यांची अतिशय उत्कट आणि उत्कंठावर्धक गोष्ट येते. ‘स्क्रॅपर’ (इंग्लंड) मध्ये किशोरवयीन वयातच बाप झाल्यावर प्रेयसीस आणि मुलीस सोडून गेलेल्या जेसन या अजूनही बालिश असणार्‍या तरुणाची गोष्ट येते. 12 वर्षीय जॉर्जी आईविना एकटे राहतीये, तेव्हा तिची जबाबदारी घेण्यास तो येतो. पण अजून स्वतःचीच जबाबदारी पेलू शकत नाहीये. या दोन्हीही कलाकृतीत अढीवर मात होते. मात्र मेलोड्रामाचा वापर न करता त्याचे भावनाशील चित्रण येते.

‘कॉबवेब’ (दक्षिण कोरिया) : व्यावसायिकद़ृष्ट्या यशस्वी पण समीक्षकांनी झिडकारलेला एक दिग्दर्शक आपला नवीन सिनेमा पूर्ण केल्यानंतरसुद्धा अस्वस्थ आहे.

त्यास काही स्वप्नं पडत आहेत आणि ती त्यास चित्रीत करून सिनेमात घालून त्याची पुनर्मांडणी करायची आहे. पण यास सरकारी सेन्सॉर बोर्डापासून ते निर्माते ते सहकलाकार या सार्‍यांचाच विरोध आहे. तो सिनेमा पूर्ण करण्याची त्याची धडपड म्हणजे हा धमाल चित्रपट होय. यात चित्रपट कलाव्यवहारातील अनेक निरीक्षणे रंगतदारपणे रंगवली आहेत. एकूण सेन्सॉर आणि भांडवलदार यांच्या जाचातून स्वतःला हवी अशी कलाकृती निर्माण करणे ही एक मुक्तीच आहे.

Back to top button