आंतरराष्‍ट्रीय : सुनक यांची राजकीय कोंडी | पुढारी

आंतरराष्‍ट्रीय : सुनक यांची राजकीय कोंडी

हर्ष व्ही. पंत, किंगस्टन विद्यापीठ, लंडन

भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापुढील अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत. सुनक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून ब्रिटनच्या राजकारणात एक नवे वळण आले आहे. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना परराष्ट्रमंत्री बनवण्याच्या त्यांच्या निर्णयावर बरीच टीका होत आहे. परंतु सुनक यांची रणनीती कॅमेरून यशस्वी करू शकतात. तसे न झाल्यास त्यांची कारकीर्दच प्रश्नांच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. ब्रिटनमध्ये निवारा मिळण्याची इच्छा बाळगून असणार्‍या शरणार्थींना रवांडा येथे पाठवणे आणि त्यांना परत ब्रिटनमध्ये येण्यास मनाई करणे यांसारख्या वादग्रस्त निर्णयाला ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरविले आहे. यानंतर सुनक यांनी रवांडासमवेत औपचारिक करार करण्याची घोषणा केली आहे आणि या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी देशांतर्गत कायदेशीर व्यवस्थेवर नव्याने विचार करू, असेही म्हटले आहे. अर्थात या गोष्टींचे औचित्य सामान्य लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे.

गेल्या आठवड्याच्या प्रारंभी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केल्याने ब्रिटनच्या राजकारणाला पुन्हा एक नवीन वळण मिळाले. सुएला ब्रेवरमन यांना गृहमंत्रिपदावरून काढून टाकणे आणि माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना परराष्ट्र मंत्री करण्याचा निर्णय हा एका अपयशी नेत्यावर लावलेला डाव असल्याचे बोलले जात आहे. या माध्यमातून सुनक हे पक्षावर आणि पक्षाबाहेर आपले नियंत्रण कायम ठेवण्याची इच्छा बाळगून आहेत. तसेच पुढच्या वर्षी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर सज्ज होण्याच्या द़ृष्टीने राजकीय डावपेच म्हणूनही त्याकडे पाहिले जाऊ शकते.

आपण कोणत्याही द़ृष्टीने पाहिले तरी चर्चा ही सुनक यांचीच होत आहे. कारण ते आपल्या निर्णयामुळे झालेल्या परिणामांमध्ये पुरते अडकले आहेत. माजी गृहमंत्री ब्रेवरमन यांनी तर कडक शब्दांत पत्र लिहिले आहे. इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनच्या हद्दीत येणार्‍या लहान नौकांना रोखण्यासाठी सर्वंकष पावले उचलण्याचे दिलेले आश्वासन गुंडाळून ठेवल्याचा आरोप त्यांनी सुनक यांच्यावर केला आहे. सार्वजनिकरीत्या सुनक यांच्यावर आरोप करताना ब्रेवरमन यांनी म्हटले की, आपण प्रामाणिक होण्याची गरज आहे. आपल्या कल्पना, योजना काम करताना दिसत नाहीत. आम्हीही एकेकाळी विक्रमी पराभव पचवला आहे आणि आता आपलीही वेळ संपत आली आहे. म्हणून तत्काळ भूमिका बदलण्याची आणि विषय बदलण्याची गरज आहे.”

ब्रेवरमन या नेहमीच एक वादग्रस्त नेत्या राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत कन्झर्वेटिव्ह पक्षाने स्वत:चा एक दक्षिणपंथीय आवाज म्हणून त्यांना समोर आणले. लिस ट्रस सरकारच्या काळातही गोपनीय कागदपत्रे शेअर केल्याची चूक मान्य केल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. यावेळी देखील पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या भूमिकेला तिलांजली देत ब्रेवरमन यांनी मेट्रोपॉलिटन पोलिसांवर पक्षपातीपणे कारवाई केल्याचा आरोप केला होता. या घडामोडींवरून आपल्याला आव्हान मिळत असल्याचे ऋषी सुनक यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांच्यापासून सुटका मिळवण्यात सुनक यांनी धन्यता मानली. मात्र ब्रेवरमन या शांत बसणार्‍या नाहीत.

ब्रेवरमन यांना हटविणे आणि कॅमेरून यांना आणणे या उलथापालथीकडे पाहिल्यास सुनक यांची ही खेळी धोरणात्मक वाटते. त्यांच्या मते आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यममार्गी टोरी पक्ष हा एक चांगला डाव ठरू शकतो. कारण याच डेव्हिड कॅमेरून यांनी लेबर पक्षाकडून अनेक वर्षे पराभव सहन केल्यानंतर टोरीला केंद्रस्थानी आणले आणि त्याला जिंकून देण्यात यशस्वी ठरले. कॅमेरून हे कूटनीतीच्या विश्वात आपला दबदबा निर्माण करू शकतात, याबाबत कोणाचेही दुमत नाही. कारण ते एक अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. ब्रिटनचे परराष्ट्र धोरण सध्या मोठ्या आव्हानाचा सामना करत असताना ते आपल्या रणनितीच्या बळावर या आघाडीवर काही प्रमाणात स्थैर्य आणू शकतात.

कॅमेरून हे अलीकडच्या काळातील ब्रिटिश पंतप्रधानांत सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणून राहिले आहेत. भारताच्या दृष्टीने पाहता कॅमेरून यांनी भारताकडे पाहण्याचा ब्रिटिशांचा असणारा पारंपरिक द़ृष्टिकोन बाजूला करत नव्या शक्तीच्या रूपातून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान म्हणून त्यांनी 2010 मध्ये भारताला भेटही दिली होती. तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांनी पाकिस्तानला सार्वजनिकरीत्या इशाराही दिला. भारत अणि पाकिस्तानच्या वादात ब्रिटनने कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला नकार देत भारतासमवेत घनिष्ठ सुरक्षा सहकार्य ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे भारत आणि ब्रिटनच्या संबंधाला एक नवीन वळण मिळाले आणि ते आजतागायत कायम आहे.

सध्या कन्झर्वेटिव्ह पक्षाचे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून कॅमेरून हे सुनक यांच्यासाठी चांगला पर्याय ठरणार असे दिसते. परंतु दुसरीकडे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. कारण ब्रेवरमॅन यांना हटवून कॅमेरून यांना आणल्याने ‘टोरी’जमध्ये वेगाने बदल होईल, असे पक्षाला वाटत नाही. त्यामुळे सुनक यांना आगामी काळात खडतर वाटेवरून जातच दीर्घ पल्ल्याचा राजकीय प्रवास निश्चित करायचा आहे.

Back to top button