बहार विशेष : नव्या भारताचे नवे क्रिकेट! | पुढारी

बहार विशेष : नव्या भारताचे नवे क्रिकेट!

डॉ. योगेश प्र. जाधव

गेल्या चार दशकांच्या कालावधीत क्रिकेटचा खेळ घराघरांतील दिवाणखान्यातच नव्हे, तर मोबाईलच्या माध्यमातून जवळपास प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे. आजच्या घडीला क्रिकेट हा भारतातील केवळ खेळ राहिलेला नाही तर तो धर्म झाला आहे अन् खेळाडूही क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत! आजवर भारतीय क्रिकेटने सर्व क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. खेळातील आर्थिक समीकरणे बदलली आहेत.

ती तारीख होती 25 जून 1983. कपिलने त्या रम्य सायंकाळी झळाळता विश्वचषक उंचावला आणि भारतीय क्रिकेटचे सर्व आयामच बदलून टाकले. त्यानंतर 28 वर्षांनी, 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. आता पुन्हा तो सुवर्णक्षण भारताच्या नजीक येऊन ठेपला आहे. आज (दि. 19 नोव्हेंबर) कोट्यवधी भारतीय विजयोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सलग दहा विजयांसह अपराजित राहिलेला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने जे यश मिळवले आहे ते अभूतपूर्व म्हणावे असेच आहे. या विश्वचषकाच्या अंतिम लढतीच्या निमित्ताने गेल्या चार दशकांतील भारतीय क्रिकेटमधील बदलांचा मागोवा घेणे औचित्यपूर्ण ठरेल.

1983 चा विश्वचषक

1983 मध्ये काहीच ‘बॅकग्राऊंड’ नसताना कपिलसारख्या धुरंधराने विश्वचषक जिंकण्याचा केलेला भीमपराक्रम हा अद्भुत, अभूतपूर्व आणि अविश्वसनीय वाटावा असाच होता. मुळात वस्तुस्थिती अशी की, 1983 मध्ये भारताला इतर प्रतिस्पर्धी संघांनी तर सोडूनच द्या, कपिल सोडून इतर संघ सहकार्‍यांनीदेखील जेतेपदासाठी खिजगणतीतही धरले नव्हते. भारतीय संघातील काही खेळाडू महिनाभर इंग्लंडचा कानाकोपरा धुंडाळून काढायचा, या इराद्याने विमानात चढले होते तर कृष्णम्माचारी श्रीकांतसारखा सलामीवीर स्पर्धेनंतर आखलेल्या हनिमूनच्या प्रतीक्षेत होता. पण पूर्ण दौर्‍यात आपल्या बॅगेत शॅम्पेनची छोटी बाटली घेऊन प्रवास करणार्‍या कपिलचे इरादे काही औरच होते!

वास्तविक कपिलच्या संघ सहकार्‍यांच्या नजरेतून शॅम्पेनची ती बाटली सुटली नव्हती आणि त्या शॅम्पेनचा आस्वाद लुटण्याची इच्छा त्या सर्वांनाच होती. कपिलला मात्र एकच स्वप्न खुणावत होते, ते म्हणजे झळाळता विश्वचषक उंचावण्याचे! लॉर्डस्वरच्या अंतिम सामन्यात भारताची 183 ही धावसंख्या काही सुरक्षित अजिबात नव्हती. एक वेळ 2 बाद 57 अशी विंडीजची स्थिती असताना सामना कोणाच्याही बाजूने झुकेल, अशीच चिन्हे होती. पण कपिलने मागे धावत जात रिचर्डस्चा अविस्मरणीय झेल टिपला. तो झेल त्या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. विंडीजचा संघ पुढे 140 धावांमध्ये गुंडाळला गेला आणि भारताच्या स्वप्ववत, देदीप्यमान विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब झाले!

2011 मधील घवघवीत यश

क्रिकेटच्या विश्वात भारतीयांच्याद़ृष्टीने असाच घवघवीत यश मिळवून देणारा आणखी एक दिवस म्हणजे 2 एप्रिल 2011! ज्याप्रमाणे 1983 मध्ये कपिलसारखा धुरंधर होता, तीच भूमिका 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीसारख्या कल्पक कर्णधाराने अगदी चोख बजावली. धोनीची क्रिकेटवर इतकी हुकूमत की, त्याला निष्णात क्रिकेटिंग ब्रेन म्हणून ओळखले गेले! एखाद्या कर्णधाराचा मिडास टच कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीचा हा मिडास टच इतका टचवूड होता की, तो ज्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवायचा किंवा ज्या फलंदाजाला क्रीझवर पाठवायचा तो धोनीला बावनखणी यश मिळवून द्यायचा. आता बरोबर एका तपानंतर भारत पुन्हा एकदा वन डे क्रिकेटच्या इतिहासात विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे.

सर्व क्षितिजे पादाक्रांत…

आजच्या घडीला क्रिकेट हा भारतातील केवळ खेळ राहिलेला नाही तर तो धर्म झाला आहे अन् खेळाडूही क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत! विराट कोहली, रोहित शर्मा, पंड्या खर्‍या अर्थाने स्टाईल आयकॉन झाले आहेत. युवा खेळाडूचे प्रेरणास्थान बनले आहेत.

आजवर भारतीय क्रिकेटने सर्व क्षितिजे पादाक्रांत केली आहेत. खेळातील आर्थिक समीकरणे बदलली आहेत. आयपीएलमुळे जणू खेळाडूंच्या कवेत जग आले आहे आणि आताच्या घडीला राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक खेळाडू कोट्यवधीच्या गर्भश्रीमंतीत लोळत आहे. मंडळाकडून मिळणारे वार्षिक कंत्राट असेल, सामना शुल्क असेल किंवा जाहिरातींचे मानधन… या सर्वांमधून खेळाडूंची कमाई डोळे दिपवणारी आहेच. त्याही शिवाय या खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्याचा द़ृष्टिकोन आता पालकांच्या अंगीही नकळत बाणवला गेला आहे.

खेळाचे डिजिटलायजेशन…

या चार दशकांच्या कालावधीत जो क्रिकेटचा खेळ पूर्वी फक्त स्टेडियमपुरता आणि काही क्रिकेटप्रेमींपुरता मर्यादित होता, तो सर्वप्रथम प्रत्येकाच्या दिवाणखान्यात पोहोचला आणि आजच्या घडीला लाईव्ह स्ट्रीमिंगच्या निमित्ताने तो प्रत्येकाच्या मोबाईलपर्यंत पोहोचला आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात क्रिकेटने कशी क्रांती घडवली, हे येथे अर्थातच लक्षवेधी आहे. खेळाचे झालेले डिजिटलायजेशन ही एका अर्थाने आधुनिक बदलाची नवी उत्क्रांतीच!

1980 च्या आसपास टीव्ही घराघरांत पोहोचले, कपिलच्या संघाने 1983 ला विश्वचषक जिंकला आणि नव्वदीच्या दशकापासून क्रिकेटच्या थेट प्रसारणाचे युग सुरू झाले. पाहता पाहता जाहिरातींचे युग अवतरले, सेकंदाच्या दराने जाहिराती सुरू झाल्या आणि येथून कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू झाली. अगदी क्रिकेटपटूंना जाहिरातीसाठीही मागणी वाढत गेली.

मध्यंतरात जगमोहन दालमिया यांनी पैसा कसा खेचून आणायचा, हे दाखवून दिले आणि त्यानंतर शरद पवारांच्या कुशल नेतृत्वात ललित मोदी यांचे ब्रेन चाईल्ड असलेल्या आयपीएलने बाळसे धरले. पाहता पाहता आयपीएलचा वेलू अगदी गगनातीरी पोहोचला आणि पैसा खेळाडूंच्या जणू अंगणात खेळू लागला.

आठवणींच्या कोंदणात…

कपिलचा झिम्बाब्वेविरुद्ध 175 धावांचा झंझावात ब्रॉडकास्टर्सच्या संपामुळे भले कॅमेराबद्ध झाला नसेल. पण, त्यानंतर शारजामधील भारताचे दणकेबाज विजय, सचिनने वादळी झंझावातात वॉर्नसह पुरत्या ऑस्ट्रेलियाची केलेली धुलाई, गांगुलीने जशास तसे उत्तर देताना जर्सी काढून बाल्कनीत केलेले सेलिब्रेशन, हे सारे काही चाहत्यांच्या मनात कोरले गेले आहे.

अजय जडेजाने बंगळुरात पाकिस्तानच्या वकार युनूसचा घेतलेला समाचार, वेंकटेश प्रसादने आमीर सोहेलचा उडवलेला त्रिफळा, सचिन-रोहितची द्विशतके, कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढताना, प्रसंगी मैदानावर रक्त ओकूनही मागे न हटता युवराजसिंग याने मिळवून दिलेला स्पृहणीय विजय, कुंबळेने जबड्याला प्लॅस्टर असतानाही घेतलेली लाराची विकेट, हे असे असंख्य भारतीय क्रिकेटने दिलेले काही संस्मरणीय क्षण. सुनील गावसकर, कपिलदेव, मदनलाल, बलविंदर संधू यांची जागा नंतरच्या काळात अझहर, सचिन, सेहवाग, गांगुली, द्रविड यांनी घेतली आणि आता त्यांच्याजागी रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन यांच्यासारख्या ताज्या दमाच्या खेळाडूंचे युग अवतरले आहे. चार दशकांच्या दरम्यान क्रिकेट बरेच बदलले आहे.

आयपीएलने बदलले क्रिकेट

आयपीएलचा 2008 मध्ये झालेला चंचुप्रवेश अवघ्या क्रिकेट विश्वासाठी दिशादर्शक ठरला. आयपीएलमुळे देश-विदेशातील क्रिकेटमधील सीमारेषा गळून पडल्या आणि इथेच नव्या पर्वाची सुरुवात झाली. आयपीएलमुळे अगदी ताज्या दमाच्या, युवा खेळाडूंसाठीही नवे व्यासपीठ प्राप्त झाले.

आयपीएलमुळे क्रांतिकारी बदल होत असताना नव्या-जुन्या खेळाडूंना मिळालेली संधी लक्षवेधी आहे. याही शिवाय महत्त्वाचे म्हणजे अगदी दुर्गम भागातून, छोट्या राज्यांमधून येणार्‍या गुणवत्तेला देखील न्याय मिळाला, हे दुर्लक्षून चालणार नाही.

आयपीएलपूर्वी रणजीसह अन्य स्थानिक स्पर्धांमधून खेळत राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावणे, हा एकमेव मार्ग होता. पण, आयपीएलमुळे सर्व समीकरणांची चांगलीच उलथापालथ झाली. आयपीएलमधील 10 संघांत प्रत्येकी 23 खेळाडू समाविष्ट असल्याने एका आवृत्तीतील खेळाडूंची संख्याच 230 वर पोहोचायची आणि यामुळे स्पर्धेची व्याप्ती कशी वाढत गेली, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

आयसीसीच्या नफ्यात बीसीसीआयचा वाटा सिंहाचा!

क्रिकेटचे सारे गणित भारताच्या कलेने फिरते, याची कल्पना आयसीसीला देखील आहे आणि याचमुळे आयसीसी आपल्या नफ्यात बीसीसीआयचा वाटा सिंहाचा ठेवत असेल तर यातही आश्चर्याचे कारण नाही. प्रसारण, माध्यम हक्क, प्रायोजकत्व, मर्चंडाईज सेल्स हे देखील यात महत्त्वाचे घटक आहेत. 2024 ते 2027 या कालावधीप्रमाणेच आताही आयसीसीच्या नफ्यातील सिंहाचा वाटा बीसीसीआयकडे असेल, हे सुस्पष्ट आहे. 2018 ते 2022 या आर्थिक वर्षात बीसीसीआयचा निव्वळ नफा 27 हजार कोटींच्या घरात होता, ही आकडेवारी क्रिकेट हा केवळ खेळ नव्हे तर फायनान्सियल ब्लॉकबस्टर आहे, याचीच प्रचिती देते! भारताने 1983 साली वन डे विश्वचषक जिंकला, त्यावेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या तिजोरीत अक्षरश: इतका खडखडाट होता की, मंडळ खेळाडूंचा साधा सत्कारही करू शकत नव्हते. पण त्यावेळी खेळाडूंचा इमानेइतबारे मानसन्मान केला जावा, यासाठी लता मंगेशकरांची गाण्याची एक मैफल आयोजित करण्यात आली आणि त्यातून मिळालेल्या तिकीट रकमेतून प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक लाख रुपयांची थैली देण्यात आली. नंतर जणू याचाच परतावा म्हणून की काय, बीसीसीआयने लतादीदींच्या प्रीत्यर्थ एका प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले आणि यातील उत्पन्नातून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला भरीव देणगी देण्यात आली होती.

22 हजार कोटींची उलाढाल!

यंदाच्या विश्वचषकामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत थोडीथोडकी नव्हे तर चक्क 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. आणखी तपशिलात जायचे तर 10,500 ते 12,000 कोटी रुपये टीव्ही प्रसारण हक्क व 1250 कोटी रुपये प्रायोजकत्वामधून अपेक्षित आहेत. जाहिरातींसाठी प्रत्येक सेकंदाचा दर 3600 डॉलर्सवर पोहोचला आहे. शिवाय 2015 मधील विश्वचषकाच्या तुलनेत तिकीट विक्रीतील उत्पन्न चक्क 75 टक्क्यांनी वाढले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात फक्त भारताने एकट्यानेच यजमानपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारत सहयजमान होता. त्यावेळी ती स्पर्धा संयुक्त विद्यमाने भरवली गेली होती. यंदा फक्त भारतातच ही स्पर्धा होत असल्याने आर्थिक उलाढालीत दळणवळण, विमानसेवा, हॉटेल्स तेजीत राहणार हे साहजिकच होते. त्यामुळे मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना आर्थिक धावफलकातही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली गेली तर यात आश्चर्याचे कारणच नाही.

टीम इंडिया, विजयी भव !

रविवारी अंतिम सामन्यात रोहितसेना ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक विजयाच्या निर्धाराने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरेल, त्यावेळी त्यांच्यासमोरही एकच बुलंद इरादा असेल, तो म्हणजे, टीम इंडिया विजयी भव! कारण सरतेशेवटी हा नवा भारत आहे आणि त्याला नव्या क्रिकेटची जोड आहे.

Back to top button